शाळेच्या डाव्या बाजूला एक
दुकान होतं,खंडू कॉर्नर. खंडू या दुकानात बसलेला
असायचा.मुलांच्या गरजेच्या वस्तू याच दुकानात मिळायच्या.
एक दिवस हिनाने एक रबर
मागितला.तो खंडूने दिला,पण त्याच्याबरोबर एक चॉकलेट दिले.हिना
चकीत झाली,"हे चॉकलेट!"
खंडू हसत म्हणाला,"सुट्टा एक रुपया नाही."
हिना म्हणाली,"पण मला चॉकलेट नकोय."
खंडू तोंड बारीक करत म्हणाला," मग चार रुपये सुट्टे दे." हिनाने रबर आणि
चॉकलेट घेतले आणि शाळेच्या दिशेने पळाली.
एक दिवस पुन्हा असेच
घडले.हिनाने दहा रुपये दिले.खंडूने एक पेन्सील,एक शार्पनर आणि दोन चॉकलेट दिले.हिना म्हणाली,"खंडूकाका,मला चॉकलेट नकोयत."
खंडू म्हणाला,"दोन रुपये सुट्टे नाहीत."
हिना वस्तू परत करत म्हणाली,"तुम्ही नेहमी उरलेल्या पैशांच्या बदल्यात चॉकलेट
देता." हिना वस्तू न घेताच शाळेला निघून गेली.
एके दिवशी मधली सुट्टी झाली
होती. सगळे आपापला डबा उघडत होते,तोच रूपा
रागारागात आत आली आणि म्हणाली," दोन रुपयांची
रिफिल पाहिजे होती,पण त्यासाठी मला पाच रुपये मोजावे
लागले.हे बघा,तीन रुपयांची चॉकलेटस! खंडू उरलेले पैसे देत
नाहीत.बदल्यात चॉकलेटस देतात."
बोलता बोलता इतरही काही
मुलींनी आपल्याबाबतीतही असेच घडल्याचे सांगितले. बोलता बोलता हिनानेदेखील
मागे तिच्यासोबत घडलेला किस्साही सांगितला. मग हिनाने सगळ्यांना जवळ
बोलावले.त्यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या.सगळे मोठमोठ्याने हसू
लागले.सगळ्यांनी डबा खाल्ला आणि खेळायला निघून गेल्या.
काही दिवस उलटले.मग एक दिवस
नुपूर,अन्सर,रणजीत,अनिकेत,उषा,नम्रता,अनिता आणि कविता खंडूच्या दुकानात येऊन थडकल्या.हिनाच्या हातात एक डबा
होता.तो चोकलेट्सने भरलेला होता.हिनाने सगळे चोकलेट्स काऊंटरवर ठेवून दिले.खंडू
चकित होऊन म्हणाला,"काय हे?"
हिना म्हणाली,"चोकलेट्स आहेत."
अनिकेत म्हणाला,"खंडूकाका,मोजून घ्या.बरोबर 120
आहेत.यांच्या बदल्यात 120 रुपये द्या."
अन्सर म्हणाला,"खंडूकाका, ही चॉकलेटस
तुम्हीच दिलीत आम्हाला.फक्त आम्ही गोळा केले.आता तुम्हाला परत द्यायला आलोय."
रणजीत म्हणाला,"आम्ही अगदी बरोबर सांगू शकतो की आम्ही कधी कधी आणि
काय काय विकत घेतले ते! आम्ही हेही सांगू शकतो की, तुम्ही
उरलेल्या पैशाँतून कधी कधी किती चॉकलेटस दिलीत."
उषा वही दाखवत म्हणाली,"हे बघा,आम्ही यात एकेका
चोकलेट्सचा हिशोब लिहिला आहे."
मुलांचे बोलणे ऐकून खंडू
चांगलाच बिथरला. पण उसने अवसान आणून म्हणाला,"निघा इथून!एकदा विकलेला माल परत घेतला जात नाही. माहीत आहे ना ?"
मुलांनी गोंधळ घालायला
सुरुवात केली.मुख्याध्यापिका समोरून येत होत्या.आपल्या शाळेतल्या मुलांना
पाहून त्या दुकानाकडे आल्या.हिनाने सारा प्रकार बाईंना सांगितला.तेवढ्यात खंडू
मुख्याध्यापक बाईंना म्हणाला,"असं
कुठं असतं का? मी ही विकलेली चोकलेटस परत घेऊ शकत
नाही."
हिना म्हणाली,"खंडूकाका, आम्ही तुम्हाला कधी
चोकलेटस मागितलीच नाहीत.तुम्हीच आम्हाला दिलीत.तेही आमच्या उरलेल्या पैशांच्या
बदल्यात!"
मुख्याध्यापिका हसल्या आणि
हिनाला म्हणाल्या," चला काही हरकत नाही.मी
तुम्हाला 120 रुपये देते. तुम्ही ही चोकलेटस वर्गातल्या
मुलांना वाटून टाका. पण एक लक्षात ठेवा,यापुढे तुम्ही अशा
दूकानातूनच वस्तू खरेदी करा,जिथे उरलेले सुट्टे पैसे
देतात.मी सगळ्याच वर्गशिक्षकांना अशा सूचना द्यायला सांगेन.आता तुम्ही इथून
निघा."
हे ऐकून खंडू म्हणाला,"नका मॅडम असं करू.मी सगळे चोकलेटस परत घेतो. पण
मीदेखील सुट्टे एक-दोन रुपये कोठून आणू?मलासुद्धा सुट्टे
पैसे लागणारच.माझाही विचार करा."
मुख्याध्यापिका बाई विचार
करत म्हणाल्या," दर महिन्याला 15 तारखेला आम्ही फी जमा करून घेत असतो.त्यात सुट्टे पैसे अधिक
असतात.ते आम्ही तुला देत जाऊ. समस्या जिथे असते,तिथे
उपायही असतो. पण लक्षात ठेव, मुलेदेखील खरं-खोटं यातला फरक
जाणतात."
हे ऐकून खंडूने मान खाली
घातली.120 रुपये घेऊन मुले शाळेत
परतली.उषाच्या वहीत पैशांचा सगळा हिशोब होता.त्यामूळे पैसे वाटण्यात अडचणी आल्या
नाहीत.
No comments:
Post a Comment