Wednesday, October 11, 2017

ग्रामपंचायतींची झोळी भरली

     आपल्या देशातल्या लोकांना शासनाचा कर बुडवायला फार आवडतं.पालिका,ग्रामपंचायतीची माणसं दारापर्यंत आली तरी त्यांना दाद दिली जात नाही.त्यात गावपुढारी असेल तर मग बोलायचीच सोय नाही.ग्रामपंचायत आपलीच जहागिरी असल्याच्या थाटात ही माणसं वागत असतात.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पाणीपट्टी आणि घरपट्टी भरतो आणि गावचा लोकप्रतिनिधी त्यावर गमजा मारतो, अशीच सर्वसाधारण सगळीकडे परिस्थिती असते.मात्र यंदा उलटे चित्र दिसत आहे. राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. काही ठिकाणी पहिला टप्पा पार पडला आहे. आता दुसरा टप्पा सोमवारी दि. 16 रोजी पार पडत आहेत.मात्र या निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या मंडळी ऐनवेळी कुठली रिस्क नको म्हणून ग्रामपंचायतीचा कर भरून टाकला आहे. सांगली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींना सव्वा पाच कोटी रुपये कररुपाने मिळाले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी झाली आहे.
     सांगली जिल्ह्यात 453 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.जिल्ह्यात तिरंगी आणि त्याहून अधिक लढती प्रत्येक गावागावांमध्ये होत आहेत. सध्या राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे.मनसोक्त पैसा खर्चला जात आहे.त्यामुळे चोहोकडून ग्रामपंचायतींच्या निवडी या चुरशीच्या होणार असाच अंदाज असल्याच्या बातम्या येत आहेत. तिकडे निकाल काही का लागेना,पण निवडणुकीच्या काळात ग्रामपंचायती सक्षम झाल्या आहेत.इच्छूक उमेदवार मंडळींनी स्वत:हून व कर्मचार्यांच्या मागे लागून ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी यांच्यासह अन्य कर भरला आहे.तब्बल सव्वापाच कोटीची रक्कम ग्रामपंचायतींना काहीही खळखळ न करता मिळाली आहे. यातून गावांमध्ये विकास कामे होण्यास मदत होणार आहे. तब्बल सतरा हजार इच्छूक उमेदवारांनी आपली थकबाकी असलेली रक्कम भरली आहे. दोन हजारांपासून दहा हजारांपर्यंत ही प्रती माणसी रक्कम आहे. ऐन निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद व्हायला नको म्हणून त्यांनी आधीच ग्रामपंचायतींची थकीची रक्कम भरून टाकली आहे.
     सरपंच निवडणूक ही थेट जनतेतून असल्याने अन्य सदस्य निवडीसाठी इच्छुकांची गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. नाही तर एरवी सदस्य संख्या अधिक असायची.मात्र नव्या नियमानुसार होल अॅन्ड सोल सरपंचच असल्याने इतरांचे महत्त्व कमी झाले आहे. अगोदर सरपंच पदाच्या उमेदवाराला विकले जायचे किंवा विकत घेतले जायचे.पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.सरपंच थेट लोकाम्मधून निवडला जाणार आहे आणि किमान दोन वर्षे त्याच्यावर अविश्वास आणता येणार नाही.त्यामुळे याचा फायदा सरपंचाला झाला आहे.गावचा एकप्रकारचा आमदारच तो राहणार असल्याकारणाने अन्य लोक सदस्य म्हणून का राहायचे, असा सवाल उपस्थित करत आहेत. काहींनी या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली आहे. गावाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने अनेकांना सरपंच पदाचे डोहाळे लागले आणि काहींनी सरपंचपदाच्या खुर्चीत बसायचेच, असा काहींनी चंगच बांधला आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा गावागावांमध्ये लढती या चुरशीचे होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.पण काही का असेना या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामपंचायतींना कररुपाने पैसा उपलब्ध झाला आहे. त्याचा विकासासाठी विनियोग नवा सरपंच करणार आहे. त्यामुळे त्याला हार्दिक शुभेच्छा!
(संकेत टाइम्स-संपादकीय)

No comments:

Post a Comment