Friday, October 20, 2017

आयुष्याची योग्यता

बादशहा नौशेरवां एका गावाला निघाला होता. वाटेत त्याला एक म्हातारा शेतकरी युवकासमान स्फुर्तीने चालताना दिसला.त्याच्या डोक्यावरच्या आणि दाढीच्या पांढर्या केसांवरून दृष्टी टाकत बादशहा नौशेरवांनं त्याला विचारलं, दादा, तुझं वय काय?
म्हातारा नौशेरवांला पाहून मान तुकवत हसत म्हणाला, चार वर्षे!
हे ऐकून बादशहा चाट पडला. तो म्हणाला,गंमत करतोस का माझी,दादा? तुमच्या डोक्याचे आणि दाढीचे केस तर पिकले आहेत.शरीरावर सुरकुत्यांची झालर चढली आहे. तरीही तू तुझं वय चार वर्षे सांगतोस?
म्हातारा त्यांना समजावणीच्या स्वरात म्हणाला, तुमचा अंदाज बरोबर आहे. पण मी गंमतही करत नाही.मी ऐंशी वर्षांचा म्हातारा आहे.पण स्वत:ला चार वर्षाचा यासाठी मानतो की,मी माझ्या आयुष्याची शहात्तर वर्षे पैसा कमावण्यात, सुख भोगण्यात आणि मुलांचा सांभाळ करण्यात गमावली. असं आयुष्य तर पशु-पक्षीदेखील जगतात. मग मानव आणि पशु-पक्षी यांच्यात फरक तो काय राहिला? आता या सगळ्यांतून मुक्त होऊन ईश्वरभक्ती आणि लोकांच्या सेवेत लागलो आहे. यासाठीच मी माझं योग्य वय चार वर्षेच मानतो, व्यर्थ गमावलेली शहात्तर वर्षे, मला अजिबात आठवायची नाहीत.
बादशहा नौशेरवां याच्यावर त्या म्हातार्या शेतकर्याच्या या गोष्टींचा असा काही परिणाम झाला की,त्याने महालात परतताच आपली संपूर्ण जीवनशैलीच बदलून टाकली. आता त्याने सेवा आणि धर्म कार्याला आपले आयुष्य वाहून टाकले.यामुळे त्यालाही आपल्या जीवनाच्या योग्यतेची जाणीव झाली.

No comments:

Post a Comment