Saturday, October 14, 2017

राजकारण्यांचा खरा चेहरा तपासा

     आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा असा कुणी विचारदेखील केला नसेल की, आपल्या देशातले राजकारण खोटारडेपणा, गद्दारी,फसवणूक अशा गोष्टींच्या आहारी जाईल. आजच्या घडीला राजकारणात खोटारड्या, स्वार्थी लोकांचा भरणा अधिक आहे आणि त्यांचाच अधिक प्रमाणात प्रभाव आहे.लोकशाहीत खरा राजा आम जनताच आहे, असे म्हटले जाते,पण ते फक्त नावालाच आहे. खरे ऐश्वर्य हे राजकारणी माणसेच उपभोगतात. जनता मात्र त्यांच्या बोलण्या-वागण्याला भुलते आणि नोकरासारखं जीवन जगते. राजकारणी लोक असा काही लिंबू या लोकांवर फिरवतात की, ही मंडळी राजकारणी जसं सांगतील, तसं वागायला लागतात. अशी जादू करण्यात ते अव्वल पटाईत असतात.त्यांच्या भुलवण्याला जनता अशी काही भुलते की, ते आपलं सर्वस्व या लोकांच्या पायावर ठेवून मोकळे होते. त्यांचे खोटे बोलणेदेखील या मंडळींना खरे वाटत असते,त्यामुळे असा चमत्कार फक्त आपल्या देशातले राजकारणीच करू जाणोत.

     वास्तविक आपल्या देशाची लोकशाही या खर्या-खोट्याच्या राजकारणावर हेलकावे खात आहे. आजचे राजकारणी जनतेसमोर विकासाच्या स्वप्नांचे इमले बांधत आहेत.जेव्हा यांचा खरा खरेपणा उजेडात येतो तेव्हा, हीच मंडळी आपल्या मागच्या चुकांशी तुलना करून आजची परिस्थिती कशी चांगली आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न करतात.देशातल्या खरे तर सगळ्याच राजकीय पक्षांच्या सरकारांचे प्रदर्शन आणि परिणाम देशाच्या प्रगतीच्यादृष्टीने साधारणपणे एकसारखेच आहे.पण सध्याच्या राजकारणात एकमेकांविरोधात जे  काही मतप्रदर्शन केले जात आहे,त्याच्याने जनतेची फारच निराशा झाली आहे. जनतेला मोठा धक्का बसला आहे, असे म्हणायला हवे. अर्थात आपल्या देशातल्या राजकारणात प्रामाणिक आणि योग्य व्यक्ती यायला नाही म्हणत नाहीत, मात्र राजकारणातली मंडळी जी खुर्ची धरून बसली आहेत, ती सोडायलाच तयार नाहीत.राजकारणात घराणेशाही,जातीयवाद,गटबाजी अशी काही ठासून भरली आहे की, सर्वगुण संपन्न, देशभक्त व्यक्तींसाठी जागाच मिळेनाशी झाली आहे. चर्चा किंवा विश्लेषण सध्याच्या राजकारणाचे अथवा सरकारचे होते.लोकांच्या हिताच्यादृष्टीकोनातून सध्याच्या सरकारच्या आश्वासन आणि त्यांच्या पूर्ततेचा विचार जनतेने करायला हवा आहे.त्याचे आकलन करायला हवे.
     सध्या आपल्या देशाचा जीडीपी घसरला आहे.राजकोषीय तूट वाढत आहे.15 लाख रोजगार कमी झाला आहे.मानव विकासाच्यादृष्टीने भारताचे स्थान 188 देशांमध्ये 131 वे आहे. शिक्षण क्षेत्रात 145 देशांमध्ये आपण 92 व्या क्रमांकावर आहोत. आरोग्याच्या यादीतदेखील आपल्या देशाची परिस्थिती फारशी वेगळी नाही. 188 देशांमध्ये आपले स्थान 143 वर आहे. असे असूनही आपला देश आपल्या बजेटच्या फक्त 16 टक्के शिक्षणावर आणि 15 टक्के आरोग्याच्या क्षेत्रावर खर्च करते. यात वाढ होण्याची आवश्यकता आहे. वास्तविक या क्षेत्रात आपली परिस्थिती तातडीने सुधारण्याची गरज आहे.देशातील 60 ते 70 टक्के जनता शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिक संशोधन आणि विकास होण्याची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.या क्षेत्राबरोबरच शिक्षण, आरोग्य,सामाजिक संरक्षण आणि स्वच्छता या पायाभूत साधनांची उपलब्धता महत्त्वाची आहे.त्यामुळेच विकासाचा आधारस्तंभ मजबूत होणार आहे.फुगीर, खोट्या,फसव्या आकडेबाजीचा खेळ करून जनतेला किती दिवस आपण फसवू शकणार आहोत,याचाही विचार व्हायला हवा आहे. लोकांनीही त्याच्यावर किती विश्वास ठेवावा, हे पाहिले पाहिजे. कधी ना कधी त्याचा स्फोट हा होणारच असतो. मात्र आपल्या देशातल्या लोकांना याची सवय झाली आहे.
     लोकांनीही आता स्वत:च्या बुद्धीने चालायला शिकले पाहिजे. फसवणुकीला बळी पडता कामा नये.राजकारणी हा स्वार्थी बनला आहे, याचे आता आपल्याला आकलन व्हायला हवे. त्यानुसार आपण कितीदा आणि किती दिवस,वर्षे फसायचे, हे ठरवले पाहिजे. आपणही आता फसवायला शिकले पाहिजे,त्याशिवाय राजकारणी ताळ्यावर येणार नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा फसव्या,गोड बोलण्याला भुलायचे नाही, हे एकदा ठरवून टाकले पाहिजे.

No comments:

Post a Comment