माणसाला उद्याची
चिंता फार असते. उद्या माझं
कसं होणार?पोरांचं कसं? पण या उद्याच्या
नादात आजचा क्षण मात्र आनंदाने जगायचं सोडून देतात. आज आलेले
महत्त्वाचे क्षण आपण उगाचंच काळजी करत घालवतो. त्यामुळे माणसं
फार काही गमावून बसतात. उद्या हा येतच नसतो,तरीही त्याच्या काळजीने कमालीची काटकसर करतात. पोरा-पोरींसाठी पुंजी गोळा करून ठेवतात. आज मात्र पोटाला चिमटे
मारून बसतात. माणसाने काटकसर करावी, आपले
सेव्हिंग ठेवावे. उद्याची थोडीफार तरतूद करून ठेवावी,मात्र ती आजचा आनंद हिरावून घेणारी नसावी. पैसे असूनही
माणसे भिकार्यासारखी वागतात, तेव्हा त्यांच्या
जगण्याला जगणं म्हणायचं का, हाच प्रश्न
आहे. भूत,वर्तमान आणि भविष्य यात सर्वाधिक
महत्त्व आपण वर्तमानाला द्यायला हवं. गेलेला भूतकाळ आपल्याला
खूप काही देऊन गेलेला असतो. त्यातून सुखाचे क्षण वेचून बाकीचे
सारे विसरून आजचा वर्तमान आनंदाने जगाचा असतो. हाच आपल्यासाठी
महत्त्वाचा आहे. उद्याचे कोण काय बघितले आहे, असा विचार करत भविष्याची तमा न करता जगलं पाहिजे.
आजचे काम उद्यावर
ढकलू नका, ते आजच करा नव्हे आताच करा,
असे आपल्याला सांगितले जाते. कारण उद्या उद्या
करत वेळ मारून नेला जातो आणि काम काही होत नाही. त्यामुळे आजचे
काम आजच नव्हे आताच करा, या उक्तीचा स्वीकार करायला हवा.आपल्यासाठी सर्वात अवघड काम कोणतं आहे, माहित आहे का
पाहा. जर ते माहित नसेल तर ते जाणून घ्या. तुमच्यासाठी सर्वात अवघड काम आहे, ते म्हणजे तुम्ही काल
करू शकला नाही ते! त्यामुळे आजचा म्हणजे वर्तमानाचीच काळजी घ्या,कारण भविष्य आपोआप तुमची काळजी घेणार आहे. तुम्हाला उद्यासाठी
तयारी करायची असेल तर तुम्हाला आजचा सदुपयोग करायला हवा. उद्याच्या
नादात आजचा दिवस वाया घालवला तर तुमच्या आयुष्याला यशाचे पाठबळ मिळणार नाही. उद्याचे
यशाचे शिखर पाहायचे असेल तर आज काळजी करत बसण्यापेक्षा यशाकडे लक्ष केंद्रित करत वाटचाल
करा. मात्र आज सुखासाठी, आनंदासाठी लागणार्या वस्तूंचा त्याग करू नका. आजची गरज भागवा.त्यात कंजुषी करू नका.
लक्षात ठेवा, गेलेल्या काळाकडे पाहून आपण जीवन
समजू शकतो,पण येणार्या काळावर लक्ष ठेवून
आपण जीवन जगू शकतो. तसं पाहायला गेलं तर अनुभवाशिवाय आपल्या पदरी
काही मिळत नाही.फक्त त्यातून शहाणे होऊन आपल्याला आज जगता आले
पाहिजे. कारण भविष्याची आपल्याला काहीच कल्पना असत नाही.त्यामुळे वर्तमानाची काळजी करायला हवी. तुम्ही गमावलेला
काळ कधीही तुमच्या आजच्याशी बरोबरी करू शकत नाही. भूतकाळात आपल्या
हातून चुका घडल्या म्हणून आणि उद्याची काळजी करत त्याची भिती बाळगत जगण्याने आजचा दिवस
मात्र वाया जाणारा असतो. फक्त सकारात्मक विचार मनाशी ठेवा.
महापूर किंवा दुष्काळ याचा विचार न करता प्रत्येक शेतकरी पुढच्या वर्षी
आपण नक्की श्रीमंत होऊ असा विचार करतात. असा शेतकर्यांप्रमाणेच आपले विचार सकारात्मक ठेवा. खरे तर आपल्याला
भविष्याबद्दल काहीच माहित नसते, त्यामुळे ते एका दृष्टीने बरेच
आहे, असे म्हणायला हवे,कारण आपण एक क्षणही
सुखाने जगू शकलो नसतो. भविष्याची काळजी ही अशा प्रकारची वाळवी
आहे, जी आतल्या आत माणसाला पोखरून पोकळ करून टाकते.
प्रत्येक माणसाचे
जीवन फक्त वर्तमानातच स्थीर असते. कारण भूतकाळात तर काम होऊन गेलेले असते आणि भविष्यकाळ तर अनिश्चित असतो.गेलेल्या काळाचा वापर कसा करायचा, हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक समजूतदार माणूस भूतकाळापासून
धडा घेऊन पुढे वाटचाल करत असतो आणि प्रत्येक मूर्ख भविष्याची काळजी करत झुरत असतो.
आपण काय व्हायचे
आहे, याचा विचार केला पाहिजे.
कारण त्यादृष्टीने पावले टाकत राहिले पाहिजे. आपला
वर्तमान सफल करण्यासाठी सतत आपले काम करत राहिले पाहिजे.वर्तमान
चांगले असेल तरच भविष्यकाळ नक्की चांगले असते. तुम्ही उद्या कोण
होणार आहे, हे आज ठरवित असतो, त्यावरूनच
आपली वाटचाल राहायला हवी. तुम्ही आज काय करत आहात,यावरूनच तुमचे चांगले किंवा वाईट भविष्य नक्की होत असते.
आपण नेकीने राहिलो, वागलो, आनंदाचे
क्षण सुटू दिले नाहीत तर आपल्यासारखा सुखी प्राणी आणखी कोणी नाही. जिद्द,चिकाटी,मेहनत यांच्या जोरावर
आजचे जीवन जगत असाल तर उद्याचा सुवर्ण काळ तुमचा आहे. इतिहासाच्या
पानात यशस्वी माणसाच्या जीवनगाथा भरलेल्या असतात. तुम्हीही तुमच्या
कामाने असे काही करा की, इतिहासदेखील तुमच्या यशाचा साक्षीदार
व्हायला हवा. या जगात तीन प्रकारचे लोक असतात. पहिले इतिहासाचा अभ्यास करतात.दुसरे इतिहास लिहितात.
त्यामुळेच इतिहासाच्या पहिल्या पानावर त्यांचे नाव असते.परंतु, तिसरे लोक या सगळ्यांपेक्षा खास असतात.
कारण हेच तिसरे लोक इतिहास निर्माण करणारे असतात. त्यामुळेच संपूर्ण पुस्तकच त्यांच्यावर लिहिलेले असते.
No comments:
Post a Comment