जीवनात यशस्वी
व्हायचे असेल तर सर्वात अगोदर कोणती गोष्ट केली पाहिजे तर पहिल्यांदा आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय नसलेला माणूस समुद्रात भरकटलेल्या नावेसारखा आहे, असे म्हणायला हरकत नाही. ध्येय नसेल तर त्याला किनारा
सापडणारच नाही. त्यामुळे आयुष्यात पुढे जायचे असेल तर कोणतेही
एक ध्येय निश्चित केले पाहिजे. आयुष्यात
खूप मोठे कष्ट केला,पण यश हाताला लागत नाही,कारण तिथे ध्येय नसते. मला कलेक्टर व्हायचे आहे,
असे ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास त्याला
कष्टाची,मेहनत,जिद्द,चिकाटी या गोष्टींचा हातभार लागला की, तुम्ही कलेक्टरच
होताच.कारण कलेक्टर व्हायला काय काय करावे लागेल, कोणती दिशा पकडावी लागेल, असा मार्ग सापडतो.त्यामुळे त्यादिशेने वाटचाल सुरू राहते. महत्त्वाचे म्हणजे
आपल्या जीवनात काही तरी ध्येय असायलाच हवे. एकदा ध्येय निश्चित ठरले की, त्यासाठी तुमच्या सर्व क्षमता वापरल्या
जातात. क्षमतांचा पुरेपूर वापर झाला की, तुमचे ध्येय खूप जवळ असल्याचे तुम्हाला आढळून येईल.
तुम्ही सगळ्याच
गोष्टी करू, असे म्हटले
तर ते शक्य होत नाही.कोणत्या तरी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित
केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही यशस्वी होणार नाही.
समजा तुम्ही दोन बसच्या मागे धावत असाल तर तुम्ही एकही पकडू शकत नाही,कारण तुम्हाला कोणती बस पकडायची आहे आणि तिच्यातून कुठेपर्यंत प्रवास करायचा
आहे, हेच तुम्ही नक्की केलेले नसते. त्यामुळे
त्या दोन्हीही बस तुमच्या हाताला लागत नाहीत. तुम्ही तुमच्या
जीवनाचे काही ध्येयच निश्चित केले नसेल तर तुमच्या नशिबात अपयश,त्रास आणि गोंधळ याशिवाय काहीच मिळणार नाही. कारण विटा
आणि मातीच्या चिखलाला आपण इमारत म्हणू शकत नाही.
खरे तर प्रत्येक
माणसाच्या आयुष्यात यश मिळवणे,प्रगती करणे आणि पुढे जाणे हे पहिले ध्येय असते,मात्र
एक गोष्ट कळत नाही की, प्रत्येकजण आपले ध्येय गाठण्यासाठी विचारपूर्वक
प्रयत्न का करत नाही? एके ठिकाणी मी दोन व्यंगचित्रे पाहिली,
एकात एका मोठ्या माणसाच्या मागून एक तरुण त्याचे सामान अंगा-खांद्यावर घेऊन चालत असतो. त्या व्यंगचित्राखाली लिहिले
होते, ज्यांचे काही ध्येय असत नाही,ते इतरांसाठी
काम करतात. दुसर्या चित्रात सुटाबुटातली
एक व्यक्ती पुढे आहे आणि त्याच्या मागे एक साधारण माणूस त्याचे सामान घेऊन चालतो आहे.
त्याच्याखाली लिहिले होते- ज्यांचे ध्येय असते,
त्यांच्यासाठी दुसरे लोक काम करतात. त्यामुळे आपल्याला
आयुष्यात ध्येयाला किती नहत्त्व आहे,हे अधिक सांगण्याची गरज नाही.
आता आपले ध्येय
निश्चित झाल्यावर गप्प बसून चालणार नाही.ते गाठण्यासाठी धडपड तर करावी लागणारच आहे. आपले ध्येय
गाठण्यासाठी माणसाने सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. कारण कुत्रेही
काही शोधत निघाले तर त्यालाही कुठे ना कुठे, कशाचे ना कशाचे हाड
सापडते. अशाच प्रकारे अगदी अज्ञानी व्यक्तीनेदेखील आपल्या ध्येयासाठी
सतत प्रयत्न केले तर त्यालाही थोडे फार यश नक्कीच मिळते. आपल्या
देशात असे अडाणी शेतकरी आहेत की, त्यांच्या प्रयत्नाने,
अनुभवाने एक यशस्वी,प्रगतशील शेतकरी बनले आहेत.
आपल्या आयुष्यात एकादे मोठे ध्येय ठरवले आणि ते मिळवण्यासाठी विचारपूर्वक
प्रयत्न केले तर कधी ना कधी ते ध्येय गाठण्याची तुम्ही आशा कायम ठेवू शकता.
एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्याला कुठे
जायचे आहे,हे ज्या व्यक्तीला माहित नाही,त्याला आपले ध्येय कधीच मिळवता येत नाही.
जीवन फक्त एकदाच
मिळते. त्यामुळे त्याचा सदुपयोग झाला पाहिजे.
तुम्ही जर आपले योग्य ध्येय गाठण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न करीत जगत
असाल तर तुम्हाला हवे ते मिळवण्यासाठी हे एकच जीवन पुरेसे आहे, हे लक्षात घ्या. एक लक्षात ठेवा,कोणते ना कोणते तरी ध्येय निश्चित करून तुम्हाला जीवनात
पुढे जायचे आहे. पण तुमचे हे ध्येय प्राप्त करण्यासारखे असायला
हवे.
No comments:
Post a Comment