Monday, October 30, 2017

वर्तमानपत्रे वाचा,पर्सनॅलिटी बनवा

     कित्येकजणांच्या दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र वाचल्याशिवाय होत नाही. त्यांना रोज चहाबरोबर वर्तमानपत्र हवे असते. कारण त्यांना जगातल्या घडामोडी जाणून घ्यायची मोठी उत्सुकता असते. आपल्या आजूबाजूला, शहरात,तालुक्याच्या,जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्यात,देशात नव्हे संपूर्ण विश्वात काय चालले आहे, हे जाणून घ्यायला त्यांचे मन अतुर असते.काहींना आपल्या आवडीच्या विषयावर आलेल्या बातम्या,लेख वाचायला फार आवडते. त्यामुळे त्यांच्या मित्रपरिवारात किंवा सहकार्यांमध्ये एकप्रकारचा दबदबा असतो. कारण काही घटना घडली असेल,तर त्याची सत्यता पडताळण्यासाठी विचारा त्यांना,ते नेहमी पेपर वाचतात, असाच सूर निघत असतो.शिवाय त्यांच्या बोलण्याला एकप्रकारचे वजन प्राप्त असतं,कारण त्यांच्या बोलण्यात विश्वासाहर्ता असते.त्यामुळे वर्तमानपत्र वाचणे, हा काही टाईमपास नाही, हे लक्षात घ्यायला हवे.या वर्तमानपत्रांमुळे माणूस अपडेट तर राहतोच,पण त्याचे ज्ञानही वाढत असते.त्यामुळे आजच्या घडीला वर्तमानपत्रे वाचणे आपली पर्सनॅलिटी बनवण्यासाठी उरपयोगाचे आहे, हे आजच्या विद्यार्थ्यांनी आणि करिअर करू पाहणार्यांनी लक्षात ठेवायला हवे.

     जो कोणी विद्यार्थी वर्तमानपत्र वाचत नसेल,त्याने तात्काळ वर्तमानपत्राशी दोस्ती करावी,ते त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी चांगलेच आहे. रोज वर्तमानपत्र वाचल्याने तुम्हाला नव्या शब्दांची ओळख होणार आहे.या नव्या शब्दांमुळे तुमच्या माहितीत वाढच होणार आहे. आज कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि नोकरीसाठी इंग्रजी एक अनिवार्य विषय बनला आहे. अशा वेळेला रोज आपल्या मातृभाषेबरोबरच एकादे इंग्रजी वर्तमानपत्र वाचत राहिल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या युवकांसाठी फारच लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे कसे मिळेल,तसे वर्तमानपत्रे वाचून काढा.त्यासाठी हमखास वेळ द्या.
     आजच्या धावपळीच्या जगात जर तुम्ही स्वत: देश-परदेशात चाललेल्या ज्वलंत मुद्द्यांबाबत अपडेट राहिलात तर लोकांमध्ये तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होते. जर एकाद्या व्यक्तीला या मुद्द्यांबाबतीत माहिती हवी असेल तर साहजिकच तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न होतो.तुम्ही विद्यार्थी असा किंवा नोकरदार, तुम्हाला आपल्या आजूबाजूला काय चालले आहे,याची माहिती असायलाच हवी.यामुळे तुमच्या जागरुकतेबाबतचा स्तर समजून येतो.त्यामुळे या सगळ्या बातम्या किंवा माहिती मिळवण्याचे माध्यम आहे ते म्हणजे वर्तमानपत्र. तुम्ही हे ऐकलंय का बघा, आजच्या वर्तमानपत्रातल्या मुख्य बातम्या उद्या जनरल नॉलेजच्या पुस्तकांच्या पानांमध्ये असतात.
      आजच्या माहितीच्या या युगात प्रत्येकाला सगळ्यात अगोदर बातम्या जाणून घेण्याची जिज्ञासा असते. याबाबतीत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने तर फारच मोठी सोबत केली आहे आपल्याला! पण ज्यावेळेला बातम्यांच्या विश्वासाहर्तेचा प्रश्न निर्माण होतो,तेव्हा वर्तमानपत्राशिवाय पर्याय राहत नाही. वर्तमानपत्रात डोकावून पाहिल्याशिवाय त्यांचा संबंधित बातम्यांवर विश्वास बसत नाही. आजच्या काळातदेखील वर्तमानपत्र आपले आरोग्य राखण्याच्या उपचारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. स्कॉटलंडमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक नियमितपणे वर्तमानपत्रे वाचतात, त्यांचे आरोग्य वर्तमानपत्र न वाचणार्या लोकांपेक्षा 20 टक्क्यांनी चांगले असल्याचे आढळून आले आहे. या शोधात असेही आढळून आले आहे की,नियमितपणे वर्तमानपत्र वाचल्याने तणाव उत्पन्न करणारे हार्मोन्स म्हणजेच कोर्टीसोलचा स्तर कमी राहतो. लहान मुले, मोठी किंवा वयस्कर माणसे वर्तमानपत्रातल्या आपल्या आपल्या उपयोगाच्या गोष्टी सकाळीच वाचून काढतात. आणि मग पूर्ण दिवसात बहुतेक वेळ ते सकाळी वाचलेल्या गोष्टींवर विचार करतात. सकाळच्या वेळेला वर्तमानपत्र वाचल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्यांवर विचार करण्याची संधी मिळते आणि मग आपला मेंदू नकारात्मक विचारांपासून दूर राहतो. मग युवक मित्रानों, वाचणार ना पेपर? जे कोणी वर्तमानपत्र वाचत नसेल त्यांनी वाचायला सुरुवात करा. यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा तर होतोच,पण तुमच्या आरोग्यावरदेखील सकारात्मक परिणाम होतो.                                      

No comments:

Post a Comment