आज शाळा सुटल्यावर अंकिता घरी जायला बसमध्ये बसली,तेव्हा ती फार खुशीत होती. कारणही तसंच होतं. उद्या आजीकडे जायचं होतं. दोन दिवसांनी आजीचा वाढदिवस होता.तिने विचार केला होता, आजीला आपल्या पॉकेटमनीतून काही तरी भेटवस्तू द्यायची. आईला सांगितल्यावर ती आपल्याला एकाद्या चांगल्या दुकानात घेऊन जाईल, जिथे आजीसाठी एक चांगली सुंदर साडी घेऊ.पण तिच्याजवळ तर फक्त 95 रुपयेच होते. या 95 रुपयांमध्ये साडी येईल? ती तिच्या आईला विचारेल. नाही ... ती आजीसाठी एक चप्पल जोड घेईल.नाही...नाही...वुल्फची जोडी ठिक राहील...गरम वुल्फची जोडी...आजीला थंड वाजत असेल ना! नाही ... नाही... कोणती तर चांगली वस्तू घेण्याचा विचार करू. या गोंधळातच तिचे घर कधी आले,तिला कळलेच नाही. बसमधून उतरून ती दप्तर सावरत घराच्या दिशेने निघाली. घरात जाताच आपला इरादा पक्का करण्यासाठी तिने आईला विचारले, “आई, मग उद्या आपण आजीकडे जायचं ना? ”
“ हो बाळा,नक्की जायचं आहे. ”आई लगेच होकार देत म्हणाली. “ आता लवकर जाऊन कपडे बदल आणि खाऊन घे. मला खूप कामं आहेत. ”
अंकिता जेवणाच्या टेबलवर येऊन बसत म्हणाली, “ आई, तुझ्या लक्षात आहे ना,परवा दिवशी आजीचा वाढदिवस आहे तो. मी काय गिफ्ट देऊ? ”
“ अगं,मुलांनी गिफ्ट द्यायची नसते. ” आई हसत म्हणाली.
“ पण मी तर देणार!” अंकिता काहीशा लाडिवाळ्पणे हट्ट धरत म्हणाली.
“ मी आजीलाच विचारते. ” अंकिताने खाता खाताच आजीला फोन लावला. आणि म्हणाली,ङ्घ आजी, आम्ही येतोय तुमच्या वाढदिवसाला. तुमच्यासाठी काय आणू? ”
आजी हसली आणि म्हणाली, “ शहाणी गं माझी छकुली, आण हो, पण मी सांगेल ते आणायचं! ”
“ काय? ” अंकिता डोळे मोठे करून म्हणाली.
“ अंकिता, तू गेल्या दोन-तीन वर्षात जे कपडे वापरले नाहीस, आणि पुढेही कधी वापरणार नाहीस, असे कपडे घेऊन ये. हां, आणखी एक. टीव्ही बघण्यातला काही वेळदेखील तुला द्यावा लागेल माझ्यासाठी! ” आजी तिकडून फोनवर मोठ्या प्रेमाने बोलत होती.
“पण आजी, माझ्याजवळ तर 95 रुपये आहेत. मी त्यातून तुम्हाला काही तरी आणू इच्छिते. सांगा ना काय आणू? ” अंकिताने आपली इच्छा प्रकट केली.
“ माझी सुंदर बाहुली! मी अशी कुठलीच वस्तू घेणार नाही,ज्याच्याने तुझे पैसे खर्च होतील. ” आजी मोठ्या प्रेमाने म्हणाली.
“ का...का...? आजी! ” अंकिता लाडाने म्हणाली.
“ काही नाही! तुम्ही फक्त लवकर या. मी तुमची वाट पाहतेय. ” आजी बोलली.
अंकिताने आपल्या आईजवळदेखील आजीला गिफ्ट देण्याचा हट्ट धरला,पण तीही समजावत म्हणाली, “ जसं आजी सांगते तसंच कर. ती जे काही सांगते, ते खूप विचारपूर्वक सांगते. ”
अंकिताने आपल्या कपाटातले सगळे कपडे खाली काढले. खाली कपड्यांचा ढिग लागला. त्यातून तिला दोन जिन्स,दोन फ्रॉक, चार शर्ट्स, तीन स्कर्ट-टॉप आणि दोन स्वेटर मिळाले, जे तिने गेल्या वर्षभरात कधीच घातले नव्हते.घालणार तरी कशी? तिला ते लहान पडत होते. तिने ते कपडे कपाटाच्या खालच्या कप्प्यातल्या एका कोपर्यात ठेवून दिले. उद्या आजीकडे जाताना ते एका बॅगेत भरून घेऊन जायचे, असा तिने विचार केला.
आता तिने आपल्या ड्राइंग फाईलमधून दोन पाने काढली आणि आजीचे काही फोटो तिच्या अल्बममधून काढले. त्याचे सुंदर ग्रिटिंग कार्ड बनवले. अंकिताने ते आईची नजर चुकवून तिच्या सॅकच्या एका कप्प्यात ठेवून दिले. ती संध्याकाळी गाडीत बसून आईसोबत जतसाठी रवाना झाली. बाबा त्यांना बस स्टॉपवर सोडायला आले होते. जतला पोहचल्यावर तिला आजीला भेटल्यावर फार आनंद झाला. अंकिताची संगीतामावशी आणि तिचा मुलगा आशुतोषदेखील आला होता.
दुसर्यादिवशी आजीचा वाढदिवस होता. सगळ्यांनी सकाळी उठल्यावर आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आजोबांनी सगळ्यांना आपापले गिफ्ट आणायला सांगितले. अंकिता आपल्या आणलेल्या बॅगेतून जुने कपडे घेऊन आली. तिने विचार केला मावशीच्या मुलाने आशुतोषने नक्कीच आजीसाठी छानसे तसेच महागडे गिफ्ट आणले असतील. पण त्याच्याही हातात जुन्या कपड्यांची पिशवी होती. आजीने थँक यू म्हणत हातातून गिफ्ट घेतले आणि टेबलावर ठेवले.
तेवढ्यात अंकिता मागे वळाली आणि पळत जाऊन आपल्या सॅकमध्ये ठेवलेले कार्ड घेऊन आली. “हॅप्पी बर्थ डे, आऽऽ ज्जी. ” ती ओरडून म्हणाली.
“पण मी तुला नको म्हटले होते ना गिफ्ट आणायला... ” आजी रागात आल्यासारखे करत बोलली.
“ पण यात माझा एक पैसादेखील खर्च झाला नाही, आजी. हे तर मी माझ्या हाताने बनवले आहे. ” हे ऐकाताच आजीने अंकिताला आपल्या पुढ्यात घेतले आणि तिच्या कपाळाचा पापा घेतला.
“ पण आजी, तू या कपड्यांचे काय करणाराहेस? ” आशुतोष अगदी उतावीळपणे म्हणाला.
“ हो आजी! सांग ना! ” अंकिताही म्हणाली.
“ आपण हे सगळे कपडे गरजू, गरीब मुलांना वाटून येऊ. चला , फटाफट तयार व्हा आणि नाश्ता करून घ्या. ” आजी म्हणाली.
“ मग एक तास स्वयंपाकासाठी द्या. आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी खायलाही करू. ” आजोबा म्हणाले.
सगळ्यांनी नाश्ता केला. आता अंकिता, आशुतोष, संगीतामावशी, आजी आणि आजोबा सगळ्यांनी मिळून बटाटे वडे बनवले.सगळ्यांनी या कामाला हात लावला. अंकिता आणि आशुतोष दोघांनी वडा-पावची पाकिटे बनवली. हे सगळे घेऊन अंकिता, आशुतोष, आजी- आजोबांसोबत विठ्ठलनगर वस्तीमध्ये गेले. आजी- आजोबांनी तिथल्या काही मोठ्या लोकांशी चर्चा केली आणि तिथल्या मुलांना कपडे वाटले. सोबत आणलेली वडा-पावची पाकिटेही वाटली. कपडे आणि खाऊ पाहून मुलांना झालेला आनंद पाहण्यासारखा होता. आजी म्हणाली, “ बघितलंत, जे कपडे तुम्ही न वापरता विनाकारण तुमच्या कपाटात ठेवत होतात, ते कुणाच्या तरी उपयोगाला आले. ही किती आनंदाची गोष्ट आहे. ”
“ शिवाय तुम्ही तुमचा टीव्ही बघण्याचा वेळदेखील खाऊ बनवण्यासाठी दिलात आणि यांचे पोट भरले. ” जवळच उभे असलेले आजोबा म्हणाले.
अंकिता आणि आशुतोष मान डोलावत होते. अंकिता विचार करत होती, “ आजीचा वाढदिवस किती वेगळ्याप्रकारे आणि छान साजरा केला आम्ही. ”
No comments:
Post a Comment