Tuesday, October 17, 2017

क्रीडाक्षेत्रात पिछेहाट

     जतच्या क्रीडाक्षेत्राला मोठी परंपरा आहे. जतची कुस्ती एकेकाळी नावाजलेली आहे. इथे भरमसाठ धावपटू निर्माण झाले आहेत. खो खो, कब्बडीसारख्या सांघिक संघांची कामगिरी राष्ट्रीय स्तरापर्यंत गाजवलेली आहे. अशा या क्रीडाक्षेत्रात सातत्याने आघाडीवर राहिलेल्या जत तालुक्याची सध्या मात्र वाताहत होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशपातळीवर खेळाला प्राधान्य दिले  जात असताना आणि मुले,मुली या खेळाकडे करिअर म्हणून पाहात असताना जत तालुक्यात मात्र हेच मागे पडत आहे. यंदाच्या मैदानी, सांघिक खेळांमध्ये तालुक्याची कामगिरी फारच सुमार झाली आहे. जिल्ह्यात एकही सांघिक संघ आपला ठसा उमटवू शकला नाही. वैयक्तिक खेळात फक्त एक-दोन खेळाडू राज्यापर्यंत खेळून आले.खरे तर शाळांनी याबाबतीत चिंतन करण्याची गरज आहे.

     जत शहरात काही नावाजलेल्या शाळा आहेत. इथे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आहे. प्राध्यापकांची अलिकडे भरतीच नसल्याने नव्या पाच-सात हजार रुपयांवर राबणार्‍या शिक्षकांकडून सध्या अध्यापन सुरू आहे. एवढ्यात काही भागत नाही,म्हणून ही मंडळी क्लास जॉईन करून आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करत आहेत. इथेपर्यंत ठिक आहे.पण विद्यार्थ्याने आपल्याच क्लासला यावे,नाही तर अंतर्गत गुण मिळणार नाहीत, असा सज्जड दम द्यायला लागल्यावर मात्र प्रश्‍न उपस्थित होतो. अशा शिक्षकाची शाळांनी हयगय करता कामा नये. पण तसे दिसत नाही. कारण पहिल्यासारखे प्रशासन चालवणार्‍या मुख्याद्यापक,प्राचार्यांंचा वट राहिलेला नाही. साहजिकच शैक्षणिक गुणवत्ता ढासळली आहे. अलिकडे काही पालक येथील शैक्षणिक परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या पाल्याला परगावी शिकायला धाडत आहेत.हे इथल्या शाळांसाठी चिंताजनक आहे. शिक्षक टिकवण्यासाठी प्राथमिक शाळांच्या दारोदारी हिंडणारे शिक्षक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी का प्रयत्न करीत नाहीत, असा सवाल पालकांचा आहे.
     शैक्षणिक गुणवत्ता, खेळातले तालुक्याचे वर्चस्व कमी होऊ लागले आहे,याकडे शाळांच्या संस्थाप्रमुखांनी खरे तर लक्ष देण्याची गरज आहे. खेळात तालुक्यातल्या शाळांनी जिल्ह्यात आपला ठसा उमटवू नये,इतकी सुमार कामगिरी खरे तर काळजीचे कारण ठरावे. अर्थात त्याला पालकांचाही दोष कारणीभूत आहे. कारण पालक मुलाच्या अभ्यासाकडे जेवढे लक्ष देतात,तेवढे त्याच्या खेळाकडे देताना दिसत नाहीत.खेळाडू घडवणे,तितके सोपे नाही. मुलांचा फिटनेस,त्याचा खुराक याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते.या बाबतीत पालकांकडून निराशाच हाती येते. सध्या खेळात करिअर करणार्‍यासाठी संधी चांगली आहे.मेहनत,जिद्द,चिकाटी कायम ठेवल्यास यश काही दूर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाकडे आकर्षित होण्याला हरकत नाही. सध्या जे देशपातळीवर चांगली कामगिरी करत आहेत,ते खेळाडू ग्रामीण भागातून आलेले आहेत.चांगली कामगिरी करणार्‍याला दिवस चांगले आहे. मान,पैसा,नोकरी या सगळ्या गोष्टी मिळत आहेत,त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहायला हरकत नाही. (संकेत टाइम्स: संपादकीय)

No comments:

Post a Comment