सांगली किती चांगली, असे एकेकाळी म्हटले जायचे.पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. शिक्षण क्षेत्रात
आघाडीवर असलेली सांगली गुंडांच्या तावडीत सापडली आहे. इथे दिवसा-ढवळ्या मुडदे पडत आहेत. खून,मारामार्या, चोर्या या नित्याच्या बाबी
झाल्या आहेत. गुंडांची वर्चस्वासाठी टोळीयुद्धे होऊ लागली आहेत.त्यामुळे पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. पिस्तूल तर आता लहान मुलांच्या हातातल्या खेळण्यासारखे युवकांच्या हातात दिसायला
लागले आहे. त्याची तस्करी जोमात सुरू आहे. परवाच सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सातारा जिल्ह्यातल्या दोघांना
अटक करताना त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि 27 काडतुसे जप्त केली
होती. यावरून आता पोलिसांनी पिस्तुलांची तस्करी करणार्या टोळीचा पर्दापाश करण्याचा विढा उचलला आहे,त्यातून
सांगलीचे एक पथक मध्यप्रदेशातल्या तस्करांना पकडायला तिथे गेले होते. तिथे त्यांनी दोघा तस्करांना पकडले मात्र कारवाई करताना तस्करांनीच या पथकावर
हल्ला केला. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला तरीही पोलिसांनी
दोघा तस्करांना पकडण्यात यश मिळवले, यासाठी सांगली पोलिसांचे
अभिनंदन करायला हवे.
पिस्तुलांची तस्करी
फक्त सांगली जिल्ह्यातच होत नाही तर त्याची पाळेमुळे कोल्हापूर,सोलापूर आणि सातारा जिल्ह्यापर्यंत
पोहचली आहेत.त्यामुळे राज्यातला पश्चिम
महाराष्ट्र पिस्तूल तस्करीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या भागात
ऊसक्षेत्र अधिक आहे, तशी श्रीमंतीही बहरली आहे.त्यामुळे साहजिकच गुंडगिरी यान त्या कारणाने पोसली जात आहे. राजकीय आश्रय त्यांना मिळत असल्याने त्यात सातत्याने वाढ होत आहे. मात्र यामुळे क्रातिकारकांचे हे जिल्हे आता गुंडांच्या तावडीत सापडले आहेत.ही खरे तर मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हटली पाहिजे.राजकीय
वर्चस्व, अवैध धंदे पोसण्यासाठी गुंडांचा मोठ्या प्रमाणात वापर
वाढायला लागला आहे. सावकारीतही आता यांच्याशिवाय चालत नाही,
अशा परिस्थितीमुळे गावागावात गुंड निपजायला लागले आहेत. माणसांचा जीव स्वस्त झाला आहे. काही हजार ते काही लाखासाठी
माणसांचे खून व्हायला लागले आहेत. माणसाच्या जीवाला जनावरापेक्षाही
कवडीमोलाची किंमत आली आहे. छोट्या-मोठ्या
कामांसाठी गुंडांचा वापर मोठा धक्कादायक असून यामुळे अशांतता तर नांदत आहेच,पण याकडे आजची तरुण पिढीही आकर्षित होत आहे, ही मोठी
चिंताजनक गोष्ट आहे. या तरुणांना भविष्य काय आहे, याची चिंताच नाही.
आजकाल काम करून
पोट भरण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. सहजासहजी सगळे कसे मिळेल,याकडे तरुणपिढी
आकर्षित होत आहे. चैनीत गुरफटलेल्या तरुणांना हेरून काही लोक
(यात राजकीय लोक आघाडीवर आहेत)त्यांचा वापर आपल्या
स्वार्थासाठी करत आहेत. चैनीला चटावलेल्या तरुणांना दुसर्यांवर दमबाजी करणे, मारहाण करणे,खून करणे अशा गोष्टी सोप्या वाटत आहेत. कारण त्यांचा
गॉडफादर त्यांना सोडवायला बसला आहे. त्यामुळे पुढची कसलीच चिंता
अशा तरुणांना राहिलेली नाही. गुंडगिरीचे लोण पार आता ग्रामीण
स्तरावर पोहचले आहे. गावागावात अशा लोकांकडून दहशत माजवली जात
आहे. ही अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यकाळ मोठा कठीण आहे,एवढेच म्हणावे लागेल.
सांगली पोलिसांनी
या आठवड्याभरात तब्बल 16 पिस्तूल जप्त केले आहेत. अशी किती तरी हत्यारे बिनधास्त
वापरणारे असतील.कारण गेल्या काही वर्षात सातत्याने विनापरवाना
पिस्तूल, हत्यारे बाळगणार्यांना पोलिसांनी
अटक केल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. आठवड्यात एक-दोन सारख्या घटना घडतान दिसत आहेत. मग न सापडलेल्यांची
संख्या किती असेल? विशेष म्हणजे ही हत्यारे सहजासहजी कशी मिळतात,
हेच मोठे कोडे आहे. हत्यारे बाळगणे हा काहीजणांच्या
हातचा मख झाला असावा, असेच सध्याच्या परिस्थितीवरून वाटत राहते.
विनापरवाना हत्यार हाताळणे,हा गुन्हा असताना सहजासहजी
लोक ही हत्यारे वापरत आहेत.अशा लोकांना पोलिसांचा नव्हे कशाचाच
धाक राहिलेला नाही, हेच यावरून दिसते.खंडण्या,
अपहरण,खून आदी गुन्ह्यांची वाढ चिंताजनक असून कायद्याच्या
माध्यमातून अशा खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.
चैनीखोरवृत्ती,काम करण्याची सवय संपलेली आणि त्यात
वाढती बेरोजगारी यामुळे आजची तरुण भरकटत चालली आहे.घरचे संस्कार
संपले आहेत. आज आई-बापाचे मुले ऐकत नाहीत.
छोट्या-छोट्या गोष्टीतून या तरुणांची माथी भडकत
आहेत. सहनशील देशातील या पिढीला सहनशीलताच राहिली नाही.साधे केस का कापले नाहीस,म्हणून विचारणार्या शिक्षकावरच चाकू हल्ला करणारे विद्यार्थी पुढे आपले भविष्य काय घडवणार आहेत,
असा प्रश्न आहे.संस्कार,मूल्ये ही फक्त शाळेत वाचण्यापुरती राहिली आहेत. ही मूल्ये
घराघरात रुजायला हवीत,तरच संस्कारशील पिढी घडणार आहे,
अन्यथा सरळ नाकासमोर चालणार्यालाही चाकूच्या धाकाखाली
जगावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment