Wednesday, October 25, 2017

पेन्शनच्या पैशांतून खड्डे मुजवणारा अवलिया

     आपल्याला माहिती आहे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपल्या देशातील शहरांची अवस्था काय झाली आहे. आपल्या देशात सगळ्यात अधिक अपघात रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे होत आहेत. या अपघातामुळे मृत्यू पावणार्यांची संख्याही काही कमी नाही. जखमींची तर गणतीच नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांची एक मोठी समस्याच आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था अथवा पाटबंधारे विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे या खड्ड्यांचे करायचे काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. (सध्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत यावर बराच गदारोळ उठला आहे. नागरिक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आंदोलन करीत आहेत.) मात्र हैद्राबादमधल्या निवृत्त रेल्वे इंजिनिअरने यावर तोडगा काढला आहे. त्याने चक्क आपल्या मासिक पेन्शनमधून रस्त्यांवरील खड्डे मुजवण्याचा विढा उचलला आहे. आतापर्यंत त्याने हजाराहून अधिक खड्डे बुजवले आहेत. आता तर ते यासाठी पूर्ण वेळ काम करीत असून त्यांच्या अमेरिकेतल्या मुलानेदेखील त्यांना द्यायला सुरुवात केली आहे.

     अशा या अवलियाचे नाव आहे,गंगाधर टिळक कटनम.त्यांचा जन्म सध्याच्या तेलंगणा राज्यातील येर्नाद्यूम नावाच्या गावात शेतकरी कुटुंबात झाला.त्यांनी आपल्या आयुष्यातील 35 वर्षे रेल्वेमध्ये वरिष्ठ इंजिनिअर पदावर काम करत घालवले.2008 मध्ये सेवेतून निवृत्त झाल्यावर आपल्या मुलाकडे अमेरिकेला राहायला गेले. पण तिथल्या वातावरणात रमले नाहीत. दोन वर्षातच ते माघारी मायदेशात आले. इथे आल्यावर त्यांनी हैद्राबादमधल्या एका सॉफ्टवेअर एजन्सी कंपनीत सल्लागार म्हणून काम करू लागले. याच दरम्यान एकदा त्यांच्या गाडीतून ऑफिसला जाताना त्यांच्या मनाला स्पर्शून जाणारी एक घटना घडली. त्या घटनेने त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली.
     झाले होते असे, रस्त्यावरून गादीतून जाताना खड्ड्यातल्या पाण्यात चाक गेले आणि त्यातले चिखलमय पाणी शेजारून चाललेल्या शाळकरी मुलांवर उडाले.या घटनेने ते अस्वस्थ झाले. पुढे अशीच घटना त्यांच्यासोबतही घडली. अशा घटना पुन्हाही त्यांच्याबाबतीत घडल्या. शिवाय एका रस्ता अपघातात एका अॅटो रिक्षावाल्याचा जीव गेला.त्याला वेगात असलेल्या बसने ठोकर मारली. त्यामुळे मात्र त्यांनी याबाबतीत काही तरी करावे हवे, याचा विचार करायला सुरुवात केली. आणि शेवट आपण स्वत:च खड्डे बुजवायचे या निर्णयावर झाला. आपल्या पेन्शनच्या पैशांतून खड्डे बुजवायलादेखील त्यांनी सुरुवात केली. अर्थात असले काम त्यांच्या बायकोला आवडले नाही. त्यांनी असले काम करण्यास मज्जाव करूनही गंगाधर आपले काम करीत राहिल्याने शेवटी त्यांच्या पत्नीने आपल्याला मुलाला अमेरिकेतून बोलावून घेतले. मुलगा अमेरिकेतून आला खरा,पण त्याने आपल्या वडिलांना समजावून सांगण्यापेक्षा आपल्या आईलाच समजावून सांगू लागला. उलट त्याने वडिलांचे कौतुक केलेच शिवाय त्यांच्या कामाला हातभार लावायला तयार झाला.मुलाचा हा व्यवहार त्यांना आणखी उत्साह देणारा ठरला.
     महापालिकेच्या प्रशासनाला अथवा सरकारला सांगून सगळ्या प्रश्नांची सोडवणूक होणार नव्हती. त्यामुळे हे खड्डे आपणच मुजवायचे असा निर्णय पक्का झाल्यावर ते जिथे कुठे जात, तिथे जाताना आपल्या गाडीत खड्डा मुजवण्याचे आवश्यक साहित्य सोबत घेऊन जाऊ लागले. सुरुवातीला ते जिथे कुठे रस्त्याचे काम सुरू होते, तिथून खडी वगैरे घेऊन जाऊ लागले. नंतर ते साहित्य मिळेनासे झाले. त्यामुळे त्याची खरेदी करून रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम सुरु ठेवले. त्यांना रेल्वेकडून बर्यापैकी पेन्शन मिळत होती, त्यामुळे त्यांनी नंतर खड्डे मुजवण्याचा पेशा म्हणूनच पत्करला. ॠल्लागाराची नोकरीदेखील त्यांनी सोडली. ही नोकरी त्यांनी त्यांचा वेळ जावा,यासाठी पत्करली होती. 2010 पासून सुरू झालेली ही खड्डे मुजवण्याची मोहीम अजूनही सुरू आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक खड्डे मुजवण्याचे काम केले. दरवर्षी ते खड्डे मुजवून आपली दिवाळी साजरी करतात.यंदाही त्यांनी अशीच दिवाळी साजरी केली.

No comments:

Post a Comment