आजच्या तरुण पिढीबद्दल
सगळीकडेच प्रचंड नाराजीचा आणि काळजीचा सूर ऐकायला मिळतो.आजचा तरुण भरकटला आहे,व्यसनाधीन झाला आहे.संतापी बनला आहे, असे म्हटले जाते. अभ्यासूवृत्ती, संशोधनवृत्ती त्याच्यात उरली नाही.पहिल्यासारखी प्रगती
त्याच्यात दिसत नाही.त्यामुळे या पिढीचे कसे होणार, याची काळजी करताना लोक दिसतात.वास्तविक यात काही चुकीचे
नाही. आज होणारे खून-हाणामार्या यात तरुणांचा सहभाग अधिक आहे,हे नाकारून चालत नाही.
वर्तमानपत्रात कुठे तरी एकादी बातमी एकाद्या तरुणाने कसल्यातरी परीक्षेत
यश मिळवल्याचे वाचायला मिळते,मात्र त्याच पेपरात खून,मारामार्याच्या बातम्या अनेक असतात आणि त्या घटनेत तरुणांचा
सहभाग अधिक असतो. हा विरोधाभास विचार करायला लावणारा आहे.
परवा दोब दुचाकी
वाहनांची धडक होता होता वाचली. यात दोन युवक सुपरफास्ट वाहन चालवत होते, तर दुसरा वाहन
चालक ज्येष्ठ होता. ते तरुण अपघात झाला नाही,हे सुदैव पण त्या ज्येष्ठ माणसावर ओरडत होते,शिवीगाळ
करत होते.म्हणजे चूक या तरुणांची होती तरीही चोर ते चोर वर शिरजोर
होत त्या ज्येष्ठ माणसाच्या अंगावर धावून जात होते. शेवटी त्या
ज्येष्ठ माणसाने ओळखले की, याचा तोंडाला लागण्यात अर्थ नाही.
त्यामुळे आपली गाडी सुरू केली आणि गपगुमान निघून गेला. काय चाललंय काय या तरुणांच? यांना कुणी सांगणारं आहे
की नाही, असा प्रश्न पडतो.ही पिढी अशीच वागत राहिली तर या देशाचं कसं होणार,हा
काळजीचा सूर देशाच्या भवितव्यासाठी आहे. उद्या ज्यांच्या हातात
आपला देश सोपवणार आहोत,त्यांचे वागणेच असे बेफिकीरीचे असेल तर
देशदेखील बेफिकीरच राहणार आहे. मागच्या पिढीच्या जोरावर फार दिवस
जगता येत नाही. त्यामुळे आजच्या पिढीने आता स्वत:साठी स्वत:च एक आचारसंहिता आखून घ्यायला हवी आहे.
युवकांसाठी काही
विचार त्यांच्याच आवडीच्या सोशल मिडियावर पाहायला मिळाले.तेच त्यांच्यासाठी इथे देत आहे.
चांगले विचार वाचून सोडायचे नसतात,ते आत्मसात करायचे
असतात. आज अशा चांगल्या विचारांचा वॉट्स अॅपवर,फेसबूकवर रतीबच घातला जात आहे,मात्र त्यांचा फारसा उपयोग होत नाही, असेच दिसते.ती वाचली जातात आणि सोडून दिली जातात.पण त्या विचारांवर
गांभिर्याने विचार करायला सुरुवात केली तर फार चांगला फायदा युवकांचा होणार आहे.त्यासाठीच काही विचार इथे देत आहे.
मघाशी ज्येष्ठाशी
दोन तरुण कशी वागली,हे मी सांगितले आहे, त्यावरच हा विचार आहे.
तरुण पिढीने ज्येष्ठांचा आदर करायला हवा, कारण
काळासोबत तेही नंतर ज्येष्ठ होणार आहेत. उद्या ते म्हातारे
झाल्यावर याहीपेक्षा वाईट वागणूक त्यांना त्यांची पिढी देणार आहे.त्यामुळे आज आपण सुधारलो तर अशा पद्धतीने उद्याची पिढी वागणार नाही,याचा विचार आताच्या पिढीने करायला हवा. तरुण मित्रानो, तुम्हाला हे माहित आहे का की, तुमच्यात जितकी क्षमता
आहे, तितके अधिकार तुम्हाला प्राप्त आहेत किंवा पुढे प्राप्त
होणार आहेत. जर माहित नसेल तर, ते जाणून
घेण्यासाठी कामाला लागा. यातच तुमचे भले आहे.
तरुण पिढी
देश, समाज आणि जगाची आशा असते,कारण एके दिवशी संपूर्ण जगालाच
त्यांच्यावर अवलंबून राहावे लागत असते. मोठी जबाबदारी या युवकांवर आहे,त्यामुळे आजच्या युवकांनी फार मोठ्या जबाबदारीने वागले पाहिजे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, तरुणांनी नेहमी सतर्क
राहिले पाहिजे,कारण ही सतर्कताच त्यांना आयुष्यात यशस्वी होण्याचा
मार्ग दाखवत असते. खरे तर आपल्या जीवनासाठी आवश्यक
असलेले सर्व काही व्यक्ती तरुणपणीच मिळवित असते. ती व्यक्ती जर असे करू शकली नाही,तर समजून घ्या की,
गरजांची आंधळी स्पर्धा आणि शर्यत यामध्ये ती मागे पडली आहे.
शेवटी एकच सांगायचे
आहे, जो कोणी असो, त्याच्या आयुष्याचा तोच शिल्पकार असतो.त्यानेच
ठरवायचे आहे,त्याने कसे जगायचे. कोणी तरी
म्हटले आहे, तरुण आशादायी असतात, त्यामुळे त्यांनी इतके सतर्क राहण्याची आवश्यकता असते की सहजपणे त्यांना कोणी
फसवू नये.या जगात सक्षमपणे जगायचे असेल तर सावधपणे जगायला
शिकले पाहिजे. नाही तर फसवायला माणसे टपूनच बसली आहेत.त्यामुळे आततायीपणा न करता चांगले आयुष्य जगायला शिका,कारण तुमच्यावर तुमच्या कुटुंबाचे,समाजाचे,देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
No comments:
Post a Comment