आयुष्यात यशस्वी
व्हायचे असेल तर कोणते तरी एक ध्येय निश्चित केले पाहिजे. त्याशिवाय आयुष्याला दिशा
मिळत नाही. अभ्यास करताना किंवा करिअरच्या वाटा शोधताना ध्येय
निश्चित असेल तर मार्गक्रमण करताना कोणतीही अडचण येत नाही.
एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार झाला तर आयुष्यात काहीच करता येत
नाही. त्यामुळे शाळा-कॉलेजपासूनची आपले
एक ध्येय निश्चित केले पाहिजे. यात आपल्या
आवडीला प्राधान्य दिल्यास सोन्याहून पिवळे! कारण आवड ध्येय गाठायला
मदत करते. आवडीने काम करत राहिल्यास ते करताना कंटाळा येत नाही.
आजवर जे प्रतिष्ठित,मान्यवर आपल्या आयुष्यात श्रीमंत
झाले आहेत किंवा मोठ्या हुद्द्यावर पोहचले आहेत,त्यांनी आपल्या
आवडीला प्राधान्य दिले आणि त्यात करिअर केले.त्यामुळे ध्येय निश्चित करताना आवडीकडे अधिक लक्ष द्यायला हवे.
आपण एकदा का ध्येय
निश्चित केले तर यश तुमच्यापासून लांब
नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.पुढे ध्येय
गाठण्यासाठी विचार आणि परिश्रमपूर्वक प्रयत्न करायला हवा, हे
खरे तर सांगण्याची गरज नाही. आपल्याकडे असलेल्या वैयक्तिक क्षमता
आणि योग्यता यांच्यानुसार आपले जीवन चकाकू शकणारे आपले ध्येय असायला हवे. मार्गक्रमण करीत असताना आपल्या ध्येयाचा कधीही विसर पडता कामा नये,त्याच्यापासून भटकू नये, नाही तर ध्येयहीन झाल्यावर तुम्हाला
जे काही मिळेल,त्यावरच समाधान मानावे लागेल. ध्येय मिळण्यासाठी आपल्या कामाला एका शिस्तबद्ध चौकटीत बांधून घ्या.
योजना तयार करा. शिवाय वेळोवेळी आपल्या प्रगतीचे
मूल्यमापन करा. कारण आवश्यक वाटल्यास आपल्या कार्यपद्धतीत बदल,
सुधारणा करायच्या असतील,तर त्या करायला संधी मिळते.
बारीक सारीक अपयशामुळे
खचून जाऊ नये,यासाठी प्रामाणिकपणे
आपल्या ध्येयाशी चिकटून राहा. कामाला प्राधान्य द्या.
निराशा येईल, असे विचार मनात आणून नका.कायम सकारात्मक दृष्टीकोण ठेवा. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे
तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर तुमच्यात आत्मविश्वास
ठासून भरलेला असला पाहिजे.त्याचबरोबर उत्साह आणि साहसदेखील असायला
हवे. यातले एकही कमी होता कामा नये, नाहीत
मग तुम्ही आपले ध्येय कधीच गाठू शकणार नाही. आपली नजर नेहमी आपल्या
ध्येयावर खिळवून ठेवली पाहिजे. ज्याप्रमाणे अर्जुनाने माशाच्या
डोळ्यावर आपला डोळा केंद्रीत केला होता तसे!
ज्या व्यक्तीच्या
जीवनात काहीही ध्येय नाही,त्या व्यक्तीचे जीवन झाडाच्या त्या तुटलेल्या फांदीसारखे असते, जे इकडे तिकडे भटकत तर असतेच,पण आयुष्यभर यशस्वी होत
नाही. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, ध्येय
ठरविताना सकारात्मक विचारासोबत आपल्या शारीरिक,मानसिक आणि आर्थिक
क्षमतेचे आकलन आवश्य करायला हवे. नाही तर मग तुमच्या वास्तविक
क्षमतांच्या खूप पलिकडे असलेले तुमचे ध्येय असेल. कुबेराच्या
संपत्तीप्रमाणे या संपूर्ण विश्वात इतरही विविध प्रकारची संपत्ती
आहे. त्या संपत्तीची कवाडे तुमच्या योग्य ध्येय आणि समजूतदारपणा
यामुळेच उघडू शकतात. एक लक्षात ठेवा कुणाला उत्तर देण्यासारखे
आपल्याकडे काही आहे,म्हणून पक्षी गात नाहीत. तर त्यांच्याकडे गाण्यासारखे काही तरी आहे, म्हणूनच ते
गात असतात. आपल्याकडे जे काही आहे,ते शोधता
आले पाहिजे.
No comments:
Post a Comment