Friday, October 20, 2017

मुलगी झाल्यावर 111 झाडे लावणारे गाव:पिपलांत्री

     मुलगी जन्मली की, या गावात 111 झाडं लावली जातात. जसजशी झाडं वाढतात, तसतशा मुलीही मोठ्या होत असतात. आज हे गाव हिरवेगार बनले आहे. आज या गावात कोणतीच समस्या नाही. इथले लोक अगदी सुखी-समाधानी आहेत.या गावाचे नाव आहे,पिपलांत्री. राजस्थानमधल्या उदयपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. सातत्याने पडणारा दुष्काळ आणि संगमरवरीचे खनन या कारणांमुळे पाण्याची पातळी 400 फूट खाली गेली होती.शेती जवळजवळ संपल्यात जमा होती.गावातलेच शामसुंदर पालीवाल यांनी यासाठी काही तरी करायला हवे, याचा विचार सुरू केला. तेव्हा त्यांना एक कल्पना आली. राजस्थानसह देशातल्या अन्य राज्यांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यावरण संरक्षण आणि मुलींची सुरक्षा हे दोन्ही मुद्दे एकत्र घेऊन नवी सुरुवात करण्याचा विचार त्यांच्या मनाने घेतला. यानंतर त्यांनी त्यांच्या मृत्यू पावलेल्या मुलीच्या नावाने त्यांनी गावात किरण निधी योजना सुरू केली. आता गावात कुठल्याही घरात मुलगी जन्माला आली की, 111 रोपे लावली जातात. कुणाचा मृत्यू झाला तरी त्यांच्या कुटुंबातील लोक झाडे लावतात. झाडे लावण्याचा या उपक्रमाने आता चांगलेच मोठे स्वरुप धारण केले आहे.वृक्षारोपणाबरोबरच मुलीच्या उत्तम भविष्यासाठी गावातील लोक वर्गणी गोळा करून 21 हजार रुपये गोळा करतात आणि मुलीच्या कुटुंबाकडून 10 हजार रुपये घेतात आणि 31 हजार रुपये मुलीच्या नावाने बँकेत वीस वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट करतात.
     या बदल्यात मुलीच्या पालकांना एक शपथपत्र लिहून द्यावे लागते. मुलीला योग्य शिक्षण दिले जाईल, मुलीचा विवाह तिला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर केला जाईल आणि कुटुंबातील कोणतीही व्यक्ती स्त्री भ्रूणहत्येचे समर्थन करणार नाही, असे हे शपथपत्र आहे.मुलीच्या जन्मानंतर जी झाडे लावलेली आहेत,त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारीदेखील मुलीच्या घरच्यानी करायचा असतो. हे पिपलांत्री गाव राजस्थानमधल्या राजसमंद जिल्ह्यात येते. गेल्या दहा वर्षात या गावात तब्बल तीन लाख झाडे लावण्यात आली आहेत. हिरवळ वाढली आहे आणि पाण्याची पातळीदेखील. मुलींची संख्या आता मुलांच्या तुलनेत अधिक आहे. रोजगार हमी योजना,वाटरशेड योजना, दुष्काळ निवारण योजना आणि ग्रामपंचायतीला मिळणार्या अन्य योजना या माध्यमातून अनेक कामे गावात झाली आहेत. तलाव,धरण यासह गावात जल संरक्षणासाठी तब्बल 1800 योजना राबवण्यात आल्या आहेत. झाडांच्या संरक्षणासाठी एलोवेराची लागवड करण्यात आली आहे. आता तर इथे काही स्वयं-सहायता समुहांची स्थापनाही करण्यात आली आहे. यांच्यामाध्यमातून विविध प्रसाधने बनविण्यात येतात. पन्नास हजार बांबू (वेळू)ची व 25 हजार आवळ्यांची लागवड करण्यात आली आहे. बांबू आणि आवळा यांपासून गावातच विविध प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत.मधाच्या उत्पादनाचेही काम सुरू झाले आहे.
     पिपलांत्री ग्रामपंचायतीला राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला आहे.गावाची स्वत:ची वेबसाइट आहे.यावर गावात चाललेल्या विकास कार्यक्रमांची आणि भविष्यातील योजनांची माहिती मिळते. वातानुकुलीत ग्रामपंचायत भवन आहे.गावात पक्के रस्ते आहेत. प्रत्येक घराला पाण्याचे कनेक्शन आहे.स्ट्रीट लाइटने गल्ल्या अगदी उजळून निघतात. गावात प्राथमिक ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.चौका-चौकात महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. गावात बाहेरून आलेले लोक हे सगळे पाहिल्यावर चकित झाल्याशिवाय राहत नाहीत. मुलगी, झाड आणि भूमीचे रक्षण हे गावातल्या लोकांचे आता ध्येयच बनले आहे. अशा गावाचे अनुकरण प्रत्येक गावाने केल्यास देशात समृद्धी नांदल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment