Wednesday, September 8, 2021

पंजशीर आणि तालिबान सरकार


तालिबानने आता पंजशीरवरही कब्जा केल्याचा दावा केला आहे.  तालिबान आणि नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान (एनआरएफए) सैन्य यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून नियंत्रण लढाई सुरू आहे. हा एकच प्रांत  राहिला,जिथे अजून तालिबानने कब्जा केलेला नाही. NRFA चे अध्यक्ष अहमद मसूद आहेत.  मसूद यांनी तालिबानचा पंजाशिरवर ताबा मिळवण्याचा दावा फेटाळून लावला असून आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ, असे म्हटले आहे.  पंजशीरमधील परिस्थितीबाबत येणाऱ्या बातम्या गंभीर संकटाचे संकेत देत आहेत.  असेही सांगितले जात आहे की पाकिस्तानने तालिबानला मदत करण्यासाठी व पंजशीर काबीज करण्यासाठी लढाऊ सैनिक पाठवले आहेत.  एनआरएफए सध्या तालिबानसाठी सर्वात मोठा काटा ठरत आहे, यात शंका नाही.  म्हणूनच तालिबानला ती उखडून फेकून द्यायची आहे.  पण तेही तितके सोपे नाही.  असे म्हटले जात आहे की,पंजशीर काबीज करण्याचे युद्ध म्हणजे देशाला गृहयुद्धाकडे ढकलण्याची सुरुवात आहे.

मात्र, आता अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.  परंतु ज्या पद्धतीने सरकार स्थापनेची कसरत चालली आहे, ते स्पष्टपणे सूचित करते की तालिबानमध्ये सत्ता वाटपावर बरेच मतभेद आहेत.  चार दिवसांपूर्वी तालिबानने हिबतुल्ला अखुंदजादाला देशाचे सर्वोच्च नेते म्हणून घोषित केले.  पण त्याला इतर गटांनी त्याला विरोध केला.  त्यामुळे आता अंतरिम सरकारची कमान मुल्ला हसन अखुंद यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.  त्यांना पंतप्रधान करण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे तालिबानने यापूर्वी मुल्ला बरादर यांना देशाचे राष्ट्रपती म्हणून घोषित केले होते.  पण आता बरदार उपपंतप्रधान असणार आहेत. अंतर्गत कलह हे एक संकट असून यामुळे स्पष्ट दिसते की, तालिबान सरकारला अफगाणिस्तानमध्ये सर्वकाही सुरळीत चालू देणार नाही. शिवाय या सत्ता कमानीत पाकिस्तानची भूमिकादेखील महत्त्वाची ठरत आहे. पाकिस्तानने तालिबानच्या सत्तेत हक्कानी नेटवर्कची मजबूत उपस्थिती कायम ठेवण्याची इच्छा आहे.  त्याच्या दबावाखाली तालिबानने हक्कानी नेटवर्कचे प्रमुख, सिराजुद्दीन हक्कानी यांना देशाचे गृहमंत्री बनवले आहे.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकीकडे तालिबान म्हणत आहे की तो कोणत्याही देशाचा त्यांच्या देशा अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप सहन करणार नाही आणि दुसरीकडे पाकिस्तानच्या हस्तक्षेपाशिवाय एक पाऊलही टाकू शकत नाही.  अशा परिस्थितीत तालिबानचे अंतरिम सरकार पंजशीरच्या बाबतीत कसे कसे पुढे सरकते, हे पाहणे बाकी आहे.

तालिबान पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा करत असला तरी, सध्याची परिस्थिती असे दाखवत आहे की पंजशीरची लढाई अजून थांबलेली नाही.  पंजशीरचा इतिहासही या वस्तुस्थितीचा साक्षीदार आहे.  रशियासारखा देश एका दशकाच्या लढाईनंतरही पंजशीर काबीज करू शकला नाही.  अहमद शाह मसूदच्या सैन्याने रशियन सैन्याला हाकलून लावले.  तालिबान सुद्धा दोन दशकांपूर्वी पंजशीर काबीज करू शकला नाही.  अहमद मसूद आता तालिबानविरुद्धच्या लढाईत अमेरिकेसह इतर देशांची मदत घेत आहे.  स्वाभाविकच, पाश्चिमात्य सैन्य तालिबानच्या विरोधात अप्रत्यक्षपणे मसूदच्या बाजूने उभे राहतील आणि पंजशीर युद्धभूमीच राहील.  इराणने तालिबान्यांनी पंजशीरवर केलेल्या कब्जावरून आपले डोळे वटारले आहेत.  इराणने स्पष्ट संकेत दिले आहेत, एका मर्यादेनंतर तो गप्प बसणार नाही.  अशा परिस्थितीत तालिबानने उदारमतवादी भूमिका दाखवली आणि पंजशीर नेते मसूद यांच्याशी चर्चेचा आणि कराराचा हात पुढे केला तर बरे होईल.  यावेळी अफगाणिस्तानातील सर्वात मोठी गरज म्हणजे देशाला रक्तपात आणि अराजकापासून वाचवणे.  हे अंतरिम सरकारचे प्राधान्य असले पाहिजे. मात्र पुढे काय घडणार आहे,हे पाहावे लागेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday, September 7, 2021

मध्यमवर्गीयांची घटती संख्या चिंताजनक


भारत हा सर्वात जास्त मध्यमवर्गीय लोकसंख्या असलेला देश आहे.  आणि हेही तितकेच खरे आहे की सर्वात गरीब लोकदेखील इथेच आहेत.  अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, कोविड साथीच्या काळात जगभरात गरिबीच्या पातळीवर गेलेले साठ टक्के लोक भारतीय आहेत.  या काळात भारतातील मध्यमवर्गीय लोकसंख्येत तीन कोटींहून अधिक घट झाली आहे. कोरोनाच्या आधी मध्यमवर्गाची लोकसंख्या सुमारे दहा कोटी होती.  दुसरीकडे, गरिबांची लोकसंख्या साडे सात कोटींनी वाढली आहे.

अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या अहवालानुसार भारतातील ग्रामीण गरिबीचे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.  शहरी गरिबीचा दर सुमारे 20 टक्क्यांवर पोहोचला आहे.  ही आकडेवारी इतकी भयावह आहे की यावरून भविष्यातील संकट आणि आव्हानांचा अंदाज लागू शकतो.  वाढत्या गरिबीमुळे लोकसंख्येचा एक मोठा वर्ग निराशेच्या गर्तेत गेला आहे.  रोजगार गमावणे, उत्पन्नात कपात, ठेवी कमी होणे, आरोग्याचा अभाव आणि इतर आवश्यक मूलभूत साधनांमुळे लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे.

मध्यमवर्गीय म्हणजे दररोज दहा ते वीस डॉलर्स (रुपये साडेसातशे ते दीड हजार रुपये) कमावणारे.  विकसनशील देशांतील सुमारे दोन तृतीयांश कुटुंबांच्या उत्पन्नात कोरोना काळात मोठे नुकसान झाले आहे.  नव्वदच्या दशकानंतर जगातील मध्यमवर्गीय लोकसंख्या इतक्या मोठ्या वेगाने कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  प्यूच्या अहवालानुसार, 2011 मध्ये जगातील मध्यमवर्गीय लोकसंख्या तेरा टक्के होती ,जी 2019 मध्ये वाढून एकोणीस टक्के झाली.  भारताच्या संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की, कोरोना महामारीच्या काळात मध्यमवर्गीय वर्गातून 3.2 कोटी लोकांना बाहेर काढले जाणे ही केवळ चिंतेची बाब नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एक गंभीर आव्हानही आहे.  कारण मध्यम वर्ग हा सर्वात मोठा ग्राहक वर्ग आहे जो बाजाराची दिशा सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावतो.  म्हणून मध्यमवर्गाचे संकुचन किंवा त्यांच्यातील घट केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय आव्हाने देखील निर्माण करत आहे.

एक गोष्ट नाकारता येत नाही,ती म्हणजे शेती आणि वीज वगळता सर्व क्षेत्र जसे व्यापार, बांधकाम, खाण, उत्पादन क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र 2021 मध्ये कोरोना महामारीने  मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहेत.  एका अहवालानुसार, भारतातील असंघटित क्षेत्रातील 40 कोटी कामगारांपैकी बहुतेकजण या क्षेत्रांमध्येच काम करतात.  असंघटित क्षेत्रातील लोकसंख्येचा मोठा भाग सध्या बेरोजगारीला सामोरे जात आहे.  या संकटाच्या काळात उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद केल्यामुळे हा वर्ग एकतर दारिद्र्याच्या गर्देत गेला आहे किंवा जाणार आहे.  सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या आकडेवारीनुसार देशात सध्या बेरोजगारीचे प्रमाण 11 टक्क्यांहून अधिक आहे.

असेही नाही की कोरोना महामारीने जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम केला नाही.  परंतु शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या पायाभूत सुविधांवर कमी खर्च केल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर महामारीचा परिणाम अधिक वेगाने झाला आहे.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) हे देखील मान्य केले आहे की साथीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था साडेचार टक्क्यांहून अधिक संकुचित होण्याचा अंदाज आहे.  हे देखील एक सत्य आहे की कोरोना महामारीपूर्वीही व्यापक आर्थिक विषमता आणि मंदी सारखी संकटे होती.

वर्ष 2018 मध्ये देशाच्या एकूण संपत्तीपैकी त्र्याहत्तर टक्के संपत्ती फक्त एक टक्के श्रीमंतांकडे होती, जी 2017 मध्ये ऐंशी टक्के होती.  एका वर्षात एकूण संपत्तीच्या पंधरा टक्के आणि एक टक्के संपत्ती श्रीमंतांच्या पारड्यात पोहोचली हे धक्कादायक सत्य आहे.  आज भारताचा मध्यम वर्ग संकुचित होत आहे, द्रारिद्र्याखालचा वर्ग विस्तारत आहे आणि अशा प्रकारे भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये पस्तीसने वाढ झाली आहे.  म्हणजेच अमेरिका, चीन, जर्मनी, रशिया आणि फ्रान्स नंतर अब्जाधीशांच्या संपत्तीच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आला आहे.  साहजिकच, महामारीमध्येही श्रीमंत वर्गावर कोणताही परिणाम झाला नाही, परंतु त्याची संपत्ती मात्र वाढली आहे.  या असमानतेचे मूळ आपल्या आर्थिक धोरणांमध्ये आहेत, हे सांगायला कसलाच संकोच वाटण्याची गरज नाही. 

कोविड -19 पूर्वी भारतातील महिलांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण पंधरा टक्के होते, ते वाढून आता अठरा टक्के झाले आहे. ज्या महिलांनी नोकऱ्या गमावल्या नाहीत त्यांनाही त्यांच्या उत्पन्नात 83 टक्क्यांपर्यंत कपातीचा सामना करावा लागला आहे.  म्हणजेच, या महामारीच्या प्रभावामुळे स्त्रियांविषयीची असमानता अधिकच गडद झाली आहे.  या वस्तुस्थितीकडेही दुर्लक्ष करता येत नाही की मध्यमवर्गीय स्त्रिया देखील कुटुंबाला आर्थिक योगदान देतात.  म्हणूनच, हे देखील एक मोठे कारण आहे की महिलांच्या रोजगारावर झालेल्या कपातीमुळे कुटुंबाच्या उत्पन्नावरदेखील मोठा परिणाम झाला, ज्यामुळे मध्यमवर्गाचा संख्येत घट झाली आहे.

खरं तर ग्राहक संस्कृतीच्या विस्तारानंतरच मध्यमवर्गीयांच्या राहणीमानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत.  जसे की व्यक्तिवादाचे वर्चस्व, एकल कुटुंब, दिखाऊपणा, उच्च प्राप्तीची लालसा इ.  यामुळे मध्यमवर्गीयांच्या सामाजिक चिंताही बदलल्या आहेत.  आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सर्वात जास्त असंवेदनशील झाला आहे.  याचे उदाहरण समोरच आहे.  शेतकरी चळवळ, विद्यार्थी आणि शिक्षक चळवळ, राजकीय निषेध, सामाजिक-आर्थिक प्रश्नांवर चर्चा यासारख्या बाबींकडे दुर्लक्ष किंवा मौन बाळगण्याच्या संस्कृतीचे समर्थन करणे आता मध्यमवर्गीयांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आवश्यक भाग बनला आहे.  कदाचित यामुळेच सध्याच्या संकटाच्या काळातही त्याने मौन पाळले आहे.  आताही महागाईसारख्या मुद्द्यावर, मध्यमवर्गाकडून कोणतीही हालचाल होत नाही, तरीही तो सर्वात जास्त त्रस्त आहे आणि याचा सर्वात मोठा धोकादेखील याच मध्यम वर्गाला आहे.

प्रश्न असा आहे की, सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या मध्यमवर्गीयांनी सामाजिक चिंतेच्या बाबतीतही का मौन बाळगण्याची संस्कृती स्वीकारली आहे.  तो यापुढे केवळ इतरांशी घडणाऱ्या घटनांनाच नव्हे तर स्वतःला किंवा स्वतःच्या गटांना/समुदायाला घडणाऱ्या घटनांनाही विरोध दर्शवत नाही किंवा नोंदवत नाही.  हे धक्कादायक आहे. वाढती महागाई, संसाधनांची अनुपलब्धता, आरोग्य सुविधांची कमतरता, बेरोजगारी, शिक्षणाची घसरलेली पातळी आणि भविष्याबद्दल अनिश्चितता, वेतनात मनमानी कपात, महिला आणि दलितांसाठी असुरक्षित वातावरण, हिंसक घटनांमध्ये वाढ इ. अशा महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत.  पण तरीही हा मध्यमवर्ग मूळ गिळून गप्प आहे.  अशी परिस्थिती मोठी गंभीर आहे आणि यावर समाजातील बुद्धिजीवींनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे.

ताकदीच्या संदर्भात विचार केला तर देशातला सर्वात गरीब  गट कमजोर आणि असुरक्षित गट आहे.  प्रत्येक प्रकारची वंचितता त्याला उपेक्षित करत राहते, मग ती नैसर्गिक आपत्ती असो, साथीचे रोग असो किंवा समाजाने निर्माण केलेली आर्थिक विषमता असो.  खरं तर गरिबीला असमानतेशी जोडून पाहण्याची गरज आहे.  गरिबी जसजशी विस्तारत जाते तसतशी विषमता अधिक गुंतागुंतीची बनते आणि यामुळे राष्ट्राच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

खास खेळाडूंची प्रेरणादायी कामगिरी


भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी नव्या युगाची ही सुरुवात म्हणकावी लागेल. ऑलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीनंतर आता पॅरालिम्पिकमध्येही भारताने ऐतिहासिक कामगिरीने जगाला आश्चर्यचकित करून टाकले आहे.  भारतातल्याच लोकांना इतक्या पदकांची अपेक्षा नव्हती.  आजपर्यंत झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाला 12 पदके मिळाली होती.परंतु यावेळी टोकियोमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाला 19 पदके आणण्यात यश मिळाले आहे.  यापूर्वी पॅरालिम्पिकबद्दल एक प्रकारची उदासीनता होती, परंतु या वेळी ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी या खेळांबद्दल उत्साह दाखवला आहे, ते खरोखर अभिनंदनास पात्र आहेत.

पॅरालिम्पिकसाठी भारतातून तुलनेने मोठी तुकडी पाठवून आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला.  आमचे 54 खेळाडू नऊ प्रकारच्या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी गेले आणि 19 पदकांसह परतले, त्यामुळे अर्थातच हे प्रमाणही खूप मोठे आणि उत्साहवर्धक आहे.  सुमारे दहा खेळाडू पदकांच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले आहेत, जर त्यांची मानसिक पातळी मजबूत असती , तर भारताचे निम्मे खेळाडू पदके जिंकून भारतात परतले असते.  पॅरालिम्पिकचा विजय आणखी एका कारणाने महत्त्वाचा आहे ,तो म्हणजे आपल्या देशातील अनेक लोक अजूनही अपंगांना महत्त्व देत नाहीत. त्यांचे अस्तित्व नाकारतात. त्यामुळे आज असे लोक त्यांच्या मागासलेल्या विचारसरणीचा नक्कीच पुनर्विचार करत असतील.

खेळाडूंनी हे सिद्ध केले आहे की जर त्यांच्यावर विश्वास टाकला गेला तर भविष्यात आणखी पदके हासिल केली जातील आणि भारत आजच्या तुलनेत आणखी अनेक पटीने चांगली कामगिरी करू शकेल.  भारताकडे पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदके आहेत आणि भारत आज जगात 24 व्या क्रमांकावर आहे.  मागच्या वेळी भारताला फक्त चार पदके मिळाली होती.  या विशेष खेळाडूंनी त्यांच्या नावावर अशा काही ऐतिहासिक कामगिरी केल्या आहेत की त्या कायम स्मरणात राहतील.  गौतमबुद्ध नगरचे डीएम सुहास यतीराज यांचे यश भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठीही विशेष प्रेरणादायी आहे.  यतीराज हे पहिले आयएएस आहेत, ज्यांनी केवळ पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भाग घेतला नाही, तर रौप्यपदकही पटकावले.  आज ते नायकपेक्षाही कमी नाही.  त्याचे यश तरुणांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल.  या खेळाडूंना कमी लेखू नये हे प्रथमच सर्वांना स्पष्ट झाले आहे.

टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंकून भाविनाबेन पटेलने भारताला शानदार सुरुवात करून दिली होती.  नेमबाज अवनी लेखरा हिने 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्टँडिंग इव्हेंटमध्ये सुवर्ण जिंकले.  तसेच 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्येही कांस्यपदक जिंकले.  याशिवाय मनीष नरवाल आणि प्रमोद भगत यांनी आपले अव्वल स्थान राखले. सुमित अँटिलने तर अनेक विक्रम मोडीत काढून त्यावर आपले नाव कोरले. शेवटच्या दिवशी कृष्णा नागरने बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकले.  निषाद कुमार, देवेंद्र झाझरिया, सुंदरसिंह गुर्जर हेही यशस्वी झाले.  विशेषतः देवेंद्रने आपल्या पॅरालिम्पिक कारकिर्दीतील दोन सुवर्णांमध्ये रौप्य पदकाची भर घातली आहे.  योगेश कठुनिया, सिंहराज अधना, मरिअप्पन थंगावेलू, शरद कुमार इत्यादी अनेक नावे आहेत जे भारताला पॅरालिम्पिकमध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील. असे वाटते की खेळांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आता बदलला आहे.  सरकारने या विशेष खेळाडूंच्या जीवन शक्य ते सर्व प्रकारे सुरक्षित केले पाहिजे.  हरियाणा सरकारने सुरुवात केली आहे. आता अन्य राज्यांनीही पुढे आले पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday, September 6, 2021

श्रीलंकेत अन्नआणीबाणी


अलीकडे अफगाणिस्तान भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात  सतत चर्चेत आला आहे. तसं कारणही मोठं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने  सत्ता काबिज केली आहे. पण याच दरम्यान आपल्या शेजारच्या एका देशात  आणीबाणी निर्माण झाली आहे, पण याकडे आपले क्वचितच लक्ष गेले आहे.  ही आणीबाणी अन्नाची असून आपल्या शेजारील श्रीलंकेतील लोकांना अन्न समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.   श्रीलंका सरकारने अन्नपदार्थांच्या साठवण आणि नफेखोरीविरोधात कठोर उपाययोजनांची घोषणा केली आहे.  तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे केवळ अन्नसंकटच नाही तर श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठ्या अडचणीचे लक्षण आहे आणि प्रत्यक्षात आर्थिक आणीबाणीची घोषणा आहे.

प्रामाणिकपणे सांगायचे तर, जे कोरोनाचा इशारा हलक्याने घेत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी धोक्याची घंटा आहे.  कोरोनाच्या काळात श्रीलंकेचा पर्यटन उद्योग जवळजवळ ठप्प झाला होता आणि निर्यातीसाठी ज्या गोष्टींवर ती अवलंबून होती त्यातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  फक्त परकीय गुंतवणूक कमी झाली नाही, तर परदेशी गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतले आहेत.  या दोन्ही गोष्टींचा परिणाम असा झाला की परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन ​​रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली आहे.  या वर्षी आतापर्यंत श्रीलंकेत अमेरिकन डॉलर  7.5 टक्क्यांहून अधिक महाग झाला आहे.  दुसरीकडे, एकट्या ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेत महागाई दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

बाजारात किंमतीचा आढावा घेण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की,एका भारतीय रुपयात 2.75 श्रीलंकन रुपये येतात आणि श्रीलंकेत एका डॉलरचे मूल्य दोनशे रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. तिथल्या वस्तूंच्या किंमती पार हाताबाहेर गेल्या आहेत. कोलंबोच्या एका संकेतस्थळाने महागाईची परिस्थिती दर्शवण्यासाठी काही गोष्टींच्या ऑगस्ट 2020 आणि ऑगस्ट 2021 च्या किंमती दिल्या आहेत.  तेथे एक किलो हिरवा मूग 341 ते 828 रुपयांवर पोहोचला आहे, तर कांदा 219 ते 322 रुपये, मलकाची डाळ 167 ते 250 रुपये, साखर 135 ते 220 रुपये, चिकू 240 ते 314 रुपये आणि सुक्या मासळी 688 वरून 926 रुपयांवर पोहोचला आहे.  साहजिकच बहुतांश वस्तूंच्या किमती 30 ते 200 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

किंमती वाढल्याने वस्तूंचा तुटवडाही निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आपली निरीक्षणे नोंदवली असून  तिथे दुकानाबाहेर वस्तू मिळवण्यासाठी लांबच्या लांब रांगा दिसत आहेत. वस्तूंच्या कमतरतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे श्रीलंका आपला बहुतेक माल आयात करतो आणि यावेळी त्याच्याकडे आयातीसाठी खूप कमी परकीय चलन उपलब्ध आहे.  नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा राजपक्षे सरकार स्थापन झाले, तेव्हा देशाकडे सुमारे 7.5 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा होता, या वर्षी जुलै अखेरीस तो फक्त 2.8 अब्ज डॉलरवर आला आहे. त्यानंतरही देशातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सरकारच्या काळात श्रीलंकेच्या चलनाचे मूल्य सुमारे 20 टक्क्यांनी घसरले आहे.  त्यात भरीस भर म्हणजे जगभरातील बाजारपेठांमध्येच वस्तूंच्या किमती वाढत आहेत.

याचा परिणाम म्हणून तिथल्या बँकांवरही झाला आहे. तिथल्या देशातील खाजगी बँकांनी म्हटले आहे की त्यांच्याकडे आता आयातदारांना देण्यासाठी डॉलर शिल्लक नाहीत. शिवाय गेल्या दोन आठवड्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांनी धान्य आणि साखरेच्या गोडाऊनवर छापे टाकणे आणि त्यांचा साठा जप्त करणे सुरू केले आहे.  आतापर्यंत एक हजाराहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.  यासोबतच रेशनची किंमतही निश्चित केली जात आहे. मागच्याच आठवड्यात राष्ट्रपती राजपक्षे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

 हे संकट कोरोनासोबत आले आहे.  आताही 2.1 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात दररोज सुमारे 200 कोरोना प्रकरणे समोर येत आहेत.  सध्या देशात 16 दिवसांचा कोरोना कर्फ्यू आहे.  कोरोनाच्या काळातच देशातून होणाऱ्या निर्यातीवरही विपरीत परिणाम झाला आहे.  तथापि जुलै महिन्यात देशातील निर्यात कोरोनापूर्व स्थितीत पोहोचली होती, परंतु चलनाच्या घसरलेल्या किंमतीमुळे, त्याचा पूर्ण लाभ मिळू शकला नाही.  दुसरीकडे परदेशातून येणाऱ्या मालाचे बिल चुकते करणे देखील खूप कठीण झाले आहे.  म्हणूनच कोरोना संकटाच्या प्रारंभाबरोबरच बहुतेक अनावश्यक वस्तू आणि काही खाद्यपदार्थांच्या आयातीवरही बंदी घालण्यात आली आहे.  अलीकडेच सरकारच्या एका मंत्र्याने इंधन तेलाची बचत करण्यासाठी लोकांनी वाहनांचा वापर कमी प्रमाणात करावा, असे आवाहन केले आहे.

श्रीलंकेवरचे संकट फक्त एवढ्यावरच थांबले नाहीतर हा देश देखील खूप कर्जबाजारी झाला आहे. मूडीजद्वारे त्याचे निरीक्षण केले जात आहे.  पुढील चार-पाच वर्षांसाठी श्रीलंकेला फक्त कर्ज आणि त्याचे व्याज भरण्यासाठी वर्षाला चार ते पाच अब्ज डॉलर्सची गरज  भासणार आहे. ही रक्कम उभी करण्यास श्रीलंका सक्षम असेल की नाही,याची भीतीही  मूडीज व्यक्त करत आहे.

अशा परिस्थितीत भारतासह शेजारील देशांकडून श्रीलंकेला मोठा दिलासा मिळाला आहे.  इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशने श्रीलंकेला परकीय चलन साठ्यातून चलन देऊन आर्थिक मदत केली आहे.  यापूर्वी श्रीलंकेने दक्षिण कोरिया आणि चीनकडून 50- 50 कोटींचे कर्ज घेतले आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने बांगलादेशाप्रमाणेच 1.5 अब्ज डॉलर्सचा चलन स्वॅप करार केला आहे.  श्रीलंकेने जूनमध्ये भारताकडून 10 कोटी डॉलर्सचे कर्ज घेतले तसेच ऑगस्टमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या 40 कोटी डॉलरचे चलन स्वॅपबरोबरच आणखी एक अब्ज डॉलर्सची मागणी केली.  श्रीलंका गंभीर संकटात आहे आणि कोणत्याही चांगल्या शेजारधर्माप्रमाणे भारताने यावेळी त्याला मदत केली पाहिजे.  हे देखील विसरता कामा नये की जर भारताच्या बाजूने त्यांना मदत करण्यास टाळाटाळ केली तर चीन या संधीचा फायदा उठवल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लवकरच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधूनही अशाच प्रकारच्या अन्नसंकटाच्या बातम्या येऊ शकतात.  मग अशा वेळी काय करावे लागेल, हे आताच ठरवले पाहिजे कारण आपल्याला त्यासाठी आता संधी उपलब्ध झाली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

उत्तर प्रदेशातील गूढ तापाचा प्रकोप


उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या गूढ आजारामुळे तिथल्या राज्यसरकारची झोप उडाली आहे.  जरी त्याला डेंग्यू ताप असे म्हटले जात असले किंवा काही प्रमाणात त्याची लक्षणे डेंग्यू सारखी असले तरी वास्तविक  हा रोग नक्की काय आहे हे ओळखण्यात अद्याप यश आलेले नाही.  जर रोगाचे खरे कारण माहित नसेल तर उपचार करणे कठीण होते.  हेच कारण आहे की या आजारामुळे, सरकारी आकडेवारीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत अडीचशेहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.  यात मुलांची संख्या जास्त आहे.  तथापि, पूर्व उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्षे एन्सेफलायटीस (एन्सेफलायटीस) चा उद्रेक होत आहे.

या तापामुळे दरवर्षी शेकडो मुले आपला जीव गमावत आहेत.  परंतु यावर्षी त्याची व्याप्ती पूर्व उत्तर प्रदेशच्याही पलीकडे वाढली आहे.  त्याचा प्रसार फिरोजाबाद, कानपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे.  या आजारावर मात करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचा सरकारचा दावा असला तरी किंवा विशेष शिबिरे लावून उपचार केले जात असले तरीही या सर्व व्यवस्था प्रभावी ठरताना दिसत नाहीत.

 दरवर्षी उत्तर प्रदेशात पावसानंतर पुराचे पाणी आल्यानंतर आणि जागोजागी पाणी साठल्यानंतर या एन्सेफलायटीसचा प्रादुर्भाव दिसून येतो.  जपानी ताप किंवा मेंदूचा ताप जसा वाढतो तसाच हा ताप अशा काळात मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतो. सध्या पुराचे पाणी ओसरत आहे आणि विविध ठिकाणी पाणी साचले आहे.  हा रोग पावसाच्या पाण्यात प्रजनन करणाऱ्या डासांमुळे पसरतो.

म्हणूनच जेव्हा फिरोजाबादमध्ये गूढ ताप पसरू लागला, तेव्हा तेथील प्रशासनाने लोकांना कुलर स्वच्छ करून  बंद ठेवण्याचे आवाहन केले.  डेंग्यूच्या डासांची वाढ थांबवण्यासाठी फवारणी सुरू करण्यात आली.  सुमारे पंधरा वर्षांपूर्वी, जेव्हा गोरखपूरमध्ये एन्सेफलायटीसचा उद्रेक झाला होता आणि त्यात चार हजारांहून अधिक मुलांच्या मृत्यूची आकडेवारी होती, तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेची टीम तेथे पोहोचली.  दीर्घ अभ्यासानंतर त्यांनी सांगितले होते की हा रोग त्या भागात पसरलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या डासांमुळे पसरतो.  मग त्यावर मात करण्यासाठी औषधे निश्चित करण्यात आली.  तेव्हापासून उपचारांची तीच पद्धत अवलंबली जात आहे.  या वेळी जेव्हा हा गूढ ताप पसरू लागला, त्याच प्रक्रियेअंतर्गत उपचार सुरू करण्यात आले.  परंतु बदलत्या परिस्थितीनुसार, व्हायरस त्याचे स्वरूप बदलत राहतो आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली स्वरूपात दिसून येत आहे,याचा विचार करून  तशी त्याची काळजी घेतली जाताना दिसत नाही. यावर अधिक अध्ययन करून त्यावर उपचार शोधले जायला हवे आहेत.

उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यांमध्ये जेव्हा असे रोग पसरतात, तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते कारण ग्रामीण भागात योग्य उपचार सुविधा उपलब्ध नाहीत. लोकसंख्येची घनता जास्त आहे.  म्हणूनच बहुतेक लोक प्रथम पारंपारिक उपचार पद्धतीचा अवलंब करतात.  मग जेव्हा आजार हाताबाहेर जायला लागतो,तेव्हा मग रुग्णांना ब्लॉक किंवा लहान शहरांमधील रुग्णालयात नेले जाते.  तपासणी वगैरेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय किंवा कोणत्याही मोठ्या खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितले जाते.  तोपर्यंत अनेक रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडतात.  यावेळची परिस्थिती अशीच अधिक दिसून येत आहे.  जर उपचाराच्या अभावामुळे एका जरी नागरिकाचा मृत्यू झाला तरी त्याची नैतिक जबाबदारी सरकारवरच आहे, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. राज्य सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday, September 4, 2021

या प्रदूषणाचं काय करायचं?


हवा, पाणी, माती अशा प्रत्येक ठिकाणी वाढत्या प्रदूषणाबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केली जात आहे.  विविध संशोधन संस्था याबाबतीत सतत संशोधन करत असतात आणि त्यांच्या आधारे त्यांचे संशोधन प्रकाशित करत असतात.  याच मालिकेत शिकागो विद्यापीठाच्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स अंतर्गत केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की प्रदूषणाच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर आहे आणि येथील वाढत्या वायू प्रदूषणामुळे लोकांचे आयुर्मान सातत्याने कमी होत आहे.  हा अभ्यास म्हणतो की जर वायू प्रदूषण नियंत्रित करण्यात यश मिळाले  तर लोकांचे आयुष्य पाच ते सहा वर्षांनी वाढू शकते.

असे इशारे देऊन दरवर्षी अनेक अभ्यास प्रकाशित केले जातात, मग असे वाटते की याचा गांभीर्याने विचार करून  सरकार या दिशेने काही ठोस व्यावहारिक पावले उचलेल, परंतु वास्तव हे  की इतर माहितीप्रमाणे या अभ्यासाचा डेटा फक्त थोडा वेळ चर्चेत राहतो आणि नंतर नाहीसा होतो. मात्र हिवाळा आल्यावर  दिल्ली आणि इतर काही महानगरांमध्ये प्रदूषण पृथ्वीच्या पृष्ठभागाभोवती दाट होते आणि लोकांचा श्वासोच्छवास वाढायला लागतो तेव्हा कुठे सरकार थोडे फार हात -पाय हलवायला लागते.

आपल्या देशात प्रदूषणाची कारणे लपलेली नाहीत, परंतु सत्य हे आहे की सरकारांना ते दूर करण्याची इच्छाशक्ती नाही.  केवळ महानगरांमध्येच नाही, तर आता लहान शहरांपासून ते खेड्यांमध्येदेखील हवेचे प्रदूषण प्रमाण पातळीपेक्षा बरेच जास्त राहू लागले आहे.  याचे पहिले मोठे कारण म्हणजे वाहनांमधून निघणारा धूर.  वाहनांच्या विक्री आणि खरेदीवर नियंत्रण ठेवावे, असा सल्ला अनेक वेळा देण्यात आला आहे.  सार्वजनिक वाहने अधिक सुलभ आणि व्यावहारिक बनवा, असे सांगण्यात आले आहे. पण कोणत्याही सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही.  जेव्हा वायू प्रदूषण घातक ठरू लागते, तेव्हा दिल्ली सरकार निश्चितपणे विषम-समान योजना लागू करते. बाकी कुठल्याच मोठ्या शहरांमध्ये याबाबत कसलेच प्रयत्न केले जात नाहीत.

या व्यतिरिक्त वायू प्रदूषणाचे दुसरे प्रमुख कारण कारखान्यांमधील, वीटभट्ट्यांमधून निघणारा धूर आहे.  भारतात अजूनही विकसनशील अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे विकास कामे, औद्योगिक उत्पादन यावर विशेष भर आहे.  जरी कारखान्यांसाठी प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित नियम आणि कायदे आहेत, परंतु त्यांच्यावर कठोर दक्षता न ठेवली जात नसल्यामुळे ते त्यांना टाळत राहतात.  जरी आता बॅटरी आणि नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले जात असले आणि वाहनांमध्ये धुराचे पाण्यामध्ये रूपांतरित करणारी  साधने बसवली जात असले तरी आता हे उपाय देखील प्रभावी सिद्ध होताना दिसत नाहीत.

आपले आयुर्मान कमी होण्यामागे फक्त वायू प्रदूषण हे एकमेव कारण नाही.  ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.  मातीमध्ये विरघळलेले विष, धान्य, फळे आणि भाजीपालाद्वारे आपल्या शरीरापर्यंत पोहचत आहेत आणि अनेक प्राणघातक रोगांना जन्म देत आहे.  पाणी तर स्वच्छ केल्याशिवाय पिता येत नाही कारण आता देशात कुठेही पिण्यायोग्य पाणी राहिलेले नाही.  वर्षानुवर्षे नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना चालू आहेत, पण त्यांचा काही विशेष परिणाम होताना दिसत नाही.  या सर्व प्रकारच्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारांची उदासीनता आणि संबंधित विभागांची भ्रष्ट प्रथा.  वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारची दक्षता मुख्यतः फक्त पालापाचोळा जळणाऱ्या शेतकऱ्यांना आणि वाहनांच्या प्रदूषणाची पातळी तपासून त्यावर दंड आकारण्यापुरतीच मर्यादित दिसून येते.  त्याची कृपादृष्टी मात्र मोठ्या प्रमाणात धुराची आग ओकणाऱ्या कारखान्यांवर राहत असते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

Friday, September 3, 2021

कायदेशीर युक्त्यांवर आधारित चित्रपट


कोर्टरुम ड्रामावर बनवलेल्या चित्रपटांना चित्रपट रसिकांकडून दाद मिळत आहे.  सामाजिक चिंतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा आणि तर्क वितर्कांद्वारे पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न हिंदी चित्रपटसृष्टीत बराच काळापासून सुरू आहे.  1960  मध्ये फाशीच्या शिक्षेच्या विरोधात बनवलेल्या बीआर चोप्रा यांच्या 'कानून' चे खूप कौतुक झाले.  1983 मध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्या 'आंधा कानून' चित्रपटामध्ये एकाच अपराधासाठी दोनदा शिक्षेचा मुद्दा उपस्थित केला.  हा चित्रपटही चांगला चालला.  अलिकडेच रिलीज झालेला अमिताभ बच्चन यांचा 'चेहरे' हा चित्रपटदेखील कायदेशीर युक्त्यांवर बनला आहे, ज्याला यश मिळाले नाही पण त्याचे कौतुक होत आहे. कोरोना ताळेबंदीमुळे गेली दोन वर्षे चित्रपटगृहे बंद असल्याने चांगल्या आणि स्टार कलाकारांच्या चित्रपटांनाही मोठा फटका बसला आहे. कायद्याचा किस पाडणाऱ्या अशाच काही चित्रपटांच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकूया.

कायदेशीर डावपेच आणि न्यायालयात वकिलांचे युक्तिवाद ऐकणे हा एक वेगळाच रोमांच आहे.  लोकप्रिय कलाकार आपल्या चाहत्यांना वकिलांचा काळा कोट घालून वाद घालताना दिसतात.  अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी यांच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'चेहरे' चित्रपटातील दमदार अभिनयासह त्यांच्या युक्तिवादांनाही प्रेक्षकांनी दाद दिली.  त्याचप्रमाणे 'नेल पॉलिश' चित्रपटाचे कोर्टरुम ड्रामा देखील सिनेमा प्रेमींना चांगलेच पसंद पडले.  'सेक्सन 375' नावाच्या चित्रपटाची कथा बलात्काराच्या खोट्या प्रकरणावर आधारित होती.  मुख्य अभिनेते अक्षय खन्ना आणि ऋचा चड्ढा यांच्या वकीलाच्या सशक्त अभिनयाचेही खूप कौतुक झाले.

आर. माधवन स्टारर 'रॉकेट्री द नम्बी इफेक्ट' हा चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि तमिळ भाषेत बनत आहे.  चित्रपटाची कथा शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्याशी संबंधित कथेवर आधारित आहे, ज्यांच्यावर गुप्तहेर असल्याचा खोटा आरोप आहे.  या चित्रपटात शास्त्रज्ञाला खोट्या आरोपांपासून वाचवण्यासाठी अनेक कायदेशीर युक्त्या वापरण्यात आल्या आहेत, जेणेकरून सत्य बाहेर येईल. हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे.  याशिवाय अजय देवगण स्टारर 'दृष्यम 2' मध्ये कोर्टरुम ड्रामादेखील दाखवण्यात आला आहे. हा चित्रपटदेखील सिनेरसिकांच्या पसंदीला उतरला होता.

सनी देओल यांच्या कधीकाळी गाजलेल्या 'दामिनी' चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा प्रेक्षकांसमोर येणार आहे, ज्यात सनी देओल आणि त्याचा मुलगा करण देओल दिसणार आहेत.  'दामिनी 2' देखील न्यायालयाच्या पार्श्वभूमीवरच आधारलेला आहे.  'दामिनी' मध्ये, सनी देओल वकील म्हणून वाद घालताना दिसला होता.या चित्रपटातील त्याचा " जब ये ढाई किलो का हाथ किसी पर पड़ता है न तो आदमी उठता नहीं उठ जाता है।"   कायदेशीर युक्त्यांवर आधारित चित्रपट यशस्वी होत आहेत. आयुष्मान खुराना अभिनीत 'आर्टिकल 15' चे यश पाहून 'सॅक्सन', 'धारा' आणि 'आर्टिकल' सारख्या कायदेशीर शब्दांच्या नावांवर आधारित चित्रपटांची निर्मिती सुरू झाली आहे.  त्याच्यासाठी खास कथाही लिहिल्या जात आहेत.  चित्रपट कंपन्यांनी त्यांच्या संस्थांमार्फत  कायद्याशी संबंधित अनेक नावांचे चित्रपट नोंदणी संस्थेकडे नोंदवून सर्टिफिकेट मिळवू लागले आहेत.  नोंदणीकृत झालेल्या काही चित्रपटांची नावे अशी: कलम 37, कलम 376, कलम 302, अनुच्छेद 302, अनुच्छेद 14, अनुच्छेद 35 अ, कलम 420 

1960 मध्ये बनलेला 'कानून' हा चित्रपट प्रचंड हिट झाला.  रजनीकांत यांच्या 'आंधा कानून' या पहिल्या हिंदी चित्रपटामध्ये एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा भोगल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.  अनिल कपूर अभिनीत 'मेरी जंग' चा नायक, एक वकील, गरज पडल्यावर भरलेल्या कोर्टातही विष सेवन करतो.  'ऐतराज' मध्ये करीना कपूर ही वकीलाच्या भूमिकेत येते. या चित्रपटात एक पत्नी स्वतः तिच्या पतीला बलात्काराच्या आरोपापासून वाचवण्यासाठी काळा कोट परिधान करून कोर्टात जाते आणि तिच्या युक्तिवादाने खटल्याची दिशा बदलते.  परेश रावल अभिनीत 'ओ माय गॉड' मध्ये, देवाच्या अस्तित्वाला थेट न्यायालयात आव्हान दिले जाते.  या व्यतिरिक्त, डॅनी, सुरेश ओबेरॉयचा 'कौनन क्या करेगा', राणी मुखर्जी आणि विद्या बालनचा 'नो वन किल्ड जेसिका', अर्शद वारसीचा 'जॉली एलएलबी', आणि अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 2' या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंदी मिळाली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली