Monday, September 6, 2021

श्रीलंकेत अन्नआणीबाणी


अलीकडे अफगाणिस्तान भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात  सतत चर्चेत आला आहे. तसं कारणही मोठं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने  सत्ता काबिज केली आहे. पण याच दरम्यान आपल्या शेजारच्या एका देशात  आणीबाणी निर्माण झाली आहे, पण याकडे आपले क्वचितच लक्ष गेले आहे.  ही आणीबाणी अन्नाची असून आपल्या शेजारील श्रीलंकेतील लोकांना अन्न समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.   श्रीलंका सरकारने अन्नपदार्थांच्या साठवण आणि नफेखोरीविरोधात कठोर उपाययोजनांची घोषणा केली आहे.  तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे केवळ अन्नसंकटच नाही तर श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठ्या अडचणीचे लक्षण आहे आणि प्रत्यक्षात आर्थिक आणीबाणीची घोषणा आहे.

प्रामाणिकपणे सांगायचे तर, जे कोरोनाचा इशारा हलक्याने घेत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी धोक्याची घंटा आहे.  कोरोनाच्या काळात श्रीलंकेचा पर्यटन उद्योग जवळजवळ ठप्प झाला होता आणि निर्यातीसाठी ज्या गोष्टींवर ती अवलंबून होती त्यातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  फक्त परकीय गुंतवणूक कमी झाली नाही, तर परदेशी गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतले आहेत.  या दोन्ही गोष्टींचा परिणाम असा झाला की परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन ​​रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली आहे.  या वर्षी आतापर्यंत श्रीलंकेत अमेरिकन डॉलर  7.5 टक्क्यांहून अधिक महाग झाला आहे.  दुसरीकडे, एकट्या ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेत महागाई दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

बाजारात किंमतीचा आढावा घेण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की,एका भारतीय रुपयात 2.75 श्रीलंकन रुपये येतात आणि श्रीलंकेत एका डॉलरचे मूल्य दोनशे रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. तिथल्या वस्तूंच्या किंमती पार हाताबाहेर गेल्या आहेत. कोलंबोच्या एका संकेतस्थळाने महागाईची परिस्थिती दर्शवण्यासाठी काही गोष्टींच्या ऑगस्ट 2020 आणि ऑगस्ट 2021 च्या किंमती दिल्या आहेत.  तेथे एक किलो हिरवा मूग 341 ते 828 रुपयांवर पोहोचला आहे, तर कांदा 219 ते 322 रुपये, मलकाची डाळ 167 ते 250 रुपये, साखर 135 ते 220 रुपये, चिकू 240 ते 314 रुपये आणि सुक्या मासळी 688 वरून 926 रुपयांवर पोहोचला आहे.  साहजिकच बहुतांश वस्तूंच्या किमती 30 ते 200 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

किंमती वाढल्याने वस्तूंचा तुटवडाही निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आपली निरीक्षणे नोंदवली असून  तिथे दुकानाबाहेर वस्तू मिळवण्यासाठी लांबच्या लांब रांगा दिसत आहेत. वस्तूंच्या कमतरतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे श्रीलंका आपला बहुतेक माल आयात करतो आणि यावेळी त्याच्याकडे आयातीसाठी खूप कमी परकीय चलन उपलब्ध आहे.  नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा राजपक्षे सरकार स्थापन झाले, तेव्हा देशाकडे सुमारे 7.5 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा होता, या वर्षी जुलै अखेरीस तो फक्त 2.8 अब्ज डॉलरवर आला आहे. त्यानंतरही देशातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सरकारच्या काळात श्रीलंकेच्या चलनाचे मूल्य सुमारे 20 टक्क्यांनी घसरले आहे.  त्यात भरीस भर म्हणजे जगभरातील बाजारपेठांमध्येच वस्तूंच्या किमती वाढत आहेत.

याचा परिणाम म्हणून तिथल्या बँकांवरही झाला आहे. तिथल्या देशातील खाजगी बँकांनी म्हटले आहे की त्यांच्याकडे आता आयातदारांना देण्यासाठी डॉलर शिल्लक नाहीत. शिवाय गेल्या दोन आठवड्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांनी धान्य आणि साखरेच्या गोडाऊनवर छापे टाकणे आणि त्यांचा साठा जप्त करणे सुरू केले आहे.  आतापर्यंत एक हजाराहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.  यासोबतच रेशनची किंमतही निश्चित केली जात आहे. मागच्याच आठवड्यात राष्ट्रपती राजपक्षे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

 हे संकट कोरोनासोबत आले आहे.  आताही 2.1 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात दररोज सुमारे 200 कोरोना प्रकरणे समोर येत आहेत.  सध्या देशात 16 दिवसांचा कोरोना कर्फ्यू आहे.  कोरोनाच्या काळातच देशातून होणाऱ्या निर्यातीवरही विपरीत परिणाम झाला आहे.  तथापि जुलै महिन्यात देशातील निर्यात कोरोनापूर्व स्थितीत पोहोचली होती, परंतु चलनाच्या घसरलेल्या किंमतीमुळे, त्याचा पूर्ण लाभ मिळू शकला नाही.  दुसरीकडे परदेशातून येणाऱ्या मालाचे बिल चुकते करणे देखील खूप कठीण झाले आहे.  म्हणूनच कोरोना संकटाच्या प्रारंभाबरोबरच बहुतेक अनावश्यक वस्तू आणि काही खाद्यपदार्थांच्या आयातीवरही बंदी घालण्यात आली आहे.  अलीकडेच सरकारच्या एका मंत्र्याने इंधन तेलाची बचत करण्यासाठी लोकांनी वाहनांचा वापर कमी प्रमाणात करावा, असे आवाहन केले आहे.

श्रीलंकेवरचे संकट फक्त एवढ्यावरच थांबले नाहीतर हा देश देखील खूप कर्जबाजारी झाला आहे. मूडीजद्वारे त्याचे निरीक्षण केले जात आहे.  पुढील चार-पाच वर्षांसाठी श्रीलंकेला फक्त कर्ज आणि त्याचे व्याज भरण्यासाठी वर्षाला चार ते पाच अब्ज डॉलर्सची गरज  भासणार आहे. ही रक्कम उभी करण्यास श्रीलंका सक्षम असेल की नाही,याची भीतीही  मूडीज व्यक्त करत आहे.

अशा परिस्थितीत भारतासह शेजारील देशांकडून श्रीलंकेला मोठा दिलासा मिळाला आहे.  इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशने श्रीलंकेला परकीय चलन साठ्यातून चलन देऊन आर्थिक मदत केली आहे.  यापूर्वी श्रीलंकेने दक्षिण कोरिया आणि चीनकडून 50- 50 कोटींचे कर्ज घेतले आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने बांगलादेशाप्रमाणेच 1.5 अब्ज डॉलर्सचा चलन स्वॅप करार केला आहे.  श्रीलंकेने जूनमध्ये भारताकडून 10 कोटी डॉलर्सचे कर्ज घेतले तसेच ऑगस्टमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या 40 कोटी डॉलरचे चलन स्वॅपबरोबरच आणखी एक अब्ज डॉलर्सची मागणी केली.  श्रीलंका गंभीर संकटात आहे आणि कोणत्याही चांगल्या शेजारधर्माप्रमाणे भारताने यावेळी त्याला मदत केली पाहिजे.  हे देखील विसरता कामा नये की जर भारताच्या बाजूने त्यांना मदत करण्यास टाळाटाळ केली तर चीन या संधीचा फायदा उठवल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लवकरच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधूनही अशाच प्रकारच्या अन्नसंकटाच्या बातम्या येऊ शकतात.  मग अशा वेळी काय करावे लागेल, हे आताच ठरवले पाहिजे कारण आपल्याला त्यासाठी आता संधी उपलब्ध झाली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

No comments:

Post a Comment