Sunday, September 12, 2021

'या' मंदिरात मिळतो प्रेमी युगलांना आश्रय


हिमाचल प्रदेशात असंख्य मंदिरे आहेत, ज्यात अनेक प्राचीन मंदिरांचा समावेश आहे.  कुल्लू जिल्ह्यातील सैंज खोऱ्यात (घाटी) एक असे मंदिर आहे जे प्रेमी युगलांसाठी वरदान आहे.  वाचून आश्चर्य वाटलं ना!पण हे खरं आहे.  कुल्लूच्या शांगड गावातील देवता शांगचूल महादेवाचे मंदिर घरातून पळून गेलेल्या प्रेमींना आश्रय देते असे मानले जाते. अशा जोडप्यांसाठी हे मंदिर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.

  जे प्रेमीयुगल समाज आणि बंधुत्वाचे रीतिरिवाज मोडून लग्न करतात,त्यांच्यासाठी शांगड गावातील शांगचुल महादेव हे रक्षक आहेत. येथे फक्त देवतेचा कायदा चालतो आणि पोलिसांना यायला या भागात पूर्ण बंदी आहे.  महादेव देवता अनेक शतकांपासून आश्रयाला आलेल्या प्रेमी युगलांचे रक्षण करत आला आहे.  महाभारत काळातील  हे शांगचुल महादेव मंदिर   शांगड गावात आहे.  असे म्हटले जाते की मंदिरातील प्रेमींना कोणीही हानी पोहोचवू शकत नाही, मग ते पोलीस असो किंवा त्यांचे नातेवाईक.

शांगचूल महादेव मंदिराची हद्द शंभर हेक्टरावर पसरलेली आहे. प्रेमळ जोडपी या क्षेत्रात आले की, ते देवतेच्या आश्रयाखाली आले आहेत असे मानले जाते.  दोघांच्या लग्नासाठी कुटुंब सहमत होईपर्यंत मंदिराचे पुजारी त्यांची काळजी घेतात.  पळून आलेल्या प्रेमीयुगुलांचे खटले मिटत नाहीत तोपर्यंत मंदिरातील पंडित प्रेमींची काळजी घेतात.  या भागात पोलिसांना यायला बंदी आहे.

या गावात प्रत्येक नियम आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जाते.  या गावातील नियम आणि कायद्यांनुसार, कोणतीही व्यक्ती मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, किंवा या गावात कोणत्याही प्रकारची भांडण किंवा लढाई करू शकत नाहीत.  याशिवाय येथे दारू, सिगारेट आणि चामड्याच्या वस्तू आणण्यासही मनाई आहे.  येथे पोहोचल्यावर तुम्हाला या भागात फक्त प्रेमी जोडपीच दिसतील.  या मंदिरात अशी जोडपी नवस मागायला येतात, ज्यांच्या लग्नात अडथळा आणि अडचण निर्माण झाली आहे.

द्वापर युगातील पांडवांच्या काळात बांधलेले हे मंदिर 2015 मध्ये जळून खाक झाले होते, त्यानंतर ते पुन्हा बांधण्यात आले.

 उत्तर भारताच्या सर्व भागातून हजारो लोक दरवर्षी या मंदिराला भेट द्यायला येतात.  पांडवांनी वनवासात येथे काही काळ घालवला होता,असे सांगितले जाते.  स्थानिक कथांमध्ये असे म्हटले आहे की, वनवासात राहिलेल्या पांडवांचा पाठलाग करून कौरवही तेथे पोहोचले.  या काळात, शांगचूल महादेवने कौरवांना थोपवले होते आणि पांडवांना असा आशीर्वाद दिला होता की जो कोणी या मंदिराच्या आश्रयाला येईल त्याला समाज हानी पोहोचवू शकणार नाही.

इथे कोणीही कोणत्याही प्रकारचे शस्त्र,हत्यार घेऊन जाऊ शकत नाही.  जर कोणी असे केले किंवा मोठ्या आवाजात बोलले तर स्थानिक लोक त्यांना इथून हाकलून देतात.

पोलीस इथे येऊ शकत नाहीत

 तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की येथे पोलिसांना प्रवेश प्रतिबंधित आहे.  पोलिस आजपर्यंत इथे कधीच आले नाहीत.  तसेच स्थानिक लोक त्यांना कधी येऊ देत नाहीत. इथे केवळ घरातून नाकारलेले लोकच येतात, परंतु हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळदेखील आहे.  येथे दारू, सिगारेट आणि कोणत्याही चामड्याच्या वस्तू नेण्यास मनाई आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment