Sunday, September 19, 2021

एका रात्रीत तयार झाले चित्रपटाचे संगीत


निसर्गाने मानवाला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची अद्भुत क्षमता दिली आहे.  विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत ही क्षमता अनेक पटींनी वाढते.  जेव्हा गरज पडेल तेव्हा एका संगीतकाराने काही मिनिटांत गाण्याचे सूर तयार केले किंवा गीतकाराने चुटकी वाजताक्षणीच  गाणे लिहिले याची अशी अनेक उदाहरणे आहेत.  गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्याबाबतीतही एकदा अशीच परिस्थिती आली होती, ज्यात त्यांनी एका रात्रीत फक्त चित्रपटाची संपूर्ण नऊ गाणी लिहिली नाहीत, तर संगीतकार सी रामचंद्र यांनी त्यांना चालीही लावल्या.  ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार आणि ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांचा हा चित्रपट म्हणजे  'आझाद'. आणि हा चित्रपट अनेक प्रकारे महत्त्वाचा होता.

ही घटना 1954 ची आहे.  दक्षिणेकडील निर्माता एस.एम. श्रीरामुलु नायडू यांनी तमिळ चित्रपट 'मलाइकल्लन' बनवला आणि तो हिंदीसह आणखी पाच भाषांमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला.  हा देशातील पहिला बहुभाषिक चित्रपट होता. तेव्हा चित्रपट एक तर मुंबई, कोलकाता किंवा पुणे, कोल्हापूरमध्ये बनवले जात. त्यांनी चित्रपट कोयंबटूरमध्ये बनवल्यामुळे त्यांना 'कोयंबटूर मुव्ही मोगल' म्हटले जाऊ लागले.  मूळ तमिळ असलेल्या 'मलायकल्लन' चित्रपटाचे तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि सिंहली या चार भाषांमध्ये संगीत तयार करण्याची जबाबदारी एसएम सुबैया नायडू यांच्यावर सोपवली होती. ते हिंदी चित्रपटासाठी संगीतकाराच्या शोधात होते. एक दिवस सुटकेसमध्ये नोटांचे बंडल घेऊन श्रीरामुलु मुंबईला आले.  त्याकाळी संगीतकार नौशाद यांचा बोलबाला होता.  म्हणून ते त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की, चित्रपटाचे संगीत एका महिन्यात तयार करावे लागेल.  एकेका गाण्यासाठी महिनाभर रिहर्सल करणारे नौशाद म्हणाले की, हे अशक्य आहे. त्यांनी 'चट मंगनी पट ब्याह'वाला काम आपण करत नसल्याचे सांगितले.

मग श्रीरामुुलु पोहचले 'भोली सूरत के दिल के खोटे…’ (अलबेला) आणि 'ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया…’ (अनारकली) या गाजलेल्या गाण्यांच्या संगीतकार सी रामचंद्रकडे.

श्रीरामुलु म्हणाले की, त्यांना एका महिन्याच्या आत चित्रपटासाठी संगीत तयार करून हवे आहे. तुमच्यासाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल.  तुम्ही जे काही पैसे मागाल ते तुम्हाला दिले जाईल.  रामचंद्रांनी सहमती दर्शविली आणि ते त्यांचे आवडते गीतकार राजेंद्र कृष्ण यांना गाणी लिहिण्यासाठी सोबत घेतले.  दोघेही श्रीरामुलू यांनी ठरवलेल्या  हॉटेलमध्ये गेले.दोन-चार दिवस आराम केला आणि नंतर गाणी लिहायला  व चाली बांधायला घेतले.  राजेंद्र कृष्ण गाणी लिहित राहिले आणि ते फाडत राहिले तर सी रामचंद्र त्याच्या चाली लावत आणि बिघडत  राहिले. साहजिकच सी रामचंद्र राजेंद्र कृष्ण यांच्यावर  नाराज होत राहिले. असे करत महिना उलटून गेला.  पण एकही गाणे लिहून झाले नाही.  दुसऱ्या दिवशी श्रीरामुलुंना गाणी आणि त्यांच्या चाली ऐकवायला जायचे होते. शेवटी राजेंद्र कृष्ण यांनी एकामागून एक गाणी लिहायला सुरुवात केली आणि सी रामचंद्र त्यांना चाली लावत राहिले. अखेरीस सकाळपर्यंत राजेंद्र कृष्ण यांची फक्त नऊ गाणीच लिहून झाली नाहीत तर  सी रामचंद्र यांनीही कव्वालीसह त्याला चालीही लावल्या.  दुसऱ्या दिवशी श्रीरामुलुंनी सर्व गाणी ऐकली.फक्त ऐकल्याच नाहीत तर त्यांना ती आवडलीही.

‘आजाद’ रिलीज झाला आणि गाणीही लोकांच्या पसंदीला उतरली.ती गाणी होती- ‘जारी जारी ओ कारी बदरिया…’, ‘राधा न बोले न बोले न बोले रे…’, ‘देखो जी बहार आई बागों में खिली है कलियां…’, ‘कितना हसीं है मौसम कितना हसीं सफर है…’, ‘अपलम चपलम चपलाई रे…’, ‘बल्लिए ओ बल्लिए…’ आणि कव्वाली ‘मरना भी मोहब्बत में किसी काम न आया…’

राजेंद्र कृष्ण श्रीमंत असामी होती. वास्तविक 1980 च्या दरम्यान ते घोड्याच्या शर्यतीवर पैसा उधळत. एकदा राजेंद्र कृष्ण आणि त्यांच्या तीन मित्राना 46 लाख रुपयांचा जॅकपॉट लागला होता. पण या भौतिक श्रीमंतीपेक्षा त्यांच्याकडे गाण्यांची श्रीमंती अधिक होती.  त्यांचं  ‘तुम्ही हो माता पिता तुम्ही हो…’ (मैं चुप रहूंगी) हे गीत अजूनही शाळांमध्ये प्रार्थनागीत म्हणून गायलं जातं. त्यांचा 6 जून 1919 रोजी आजच्या तत्कालीन गुजरात राज्यातल्या  जललापूर जट्टन येथे झाला होता. आज हे गाव पाकिस्तानात आहे. त्यांचे नाव राजेंद्र कृष्णन दुग्गल असे होते. शिमला नगरपालिकेत नोकरी करणारे राजेंद्र कृष्ण यांनी जवळपास सर्वच आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी लिहिली आहेत. अशा या गीतकाराचा  मृत्यू 23 सप्टेंबर 1987 रोजी झाला. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment