Sunday, September 19, 2021

रादुकानू नावाचा झंझावात


ग्रँड स्लॅम ही टेनिसमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी होणे आणि जिंकणे ही प्रत्येक खेळाडूची आकांक्षा असते.  यावेळी अमेरिकन ओपन टेनिसमध्ये नवाच इतिहास घडला आहे.  ब्रिटनच्या एम्मा रादुकानूने कॅनडाच्या लीलाचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे.  या विजेतेपदामुळे ती 53 वर्षात ब्रिटनसाठी यूएस ओपन जिंकणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे.  एवढेच नव्हे तर 1999 नंतर प्रथमच ही  यूएस ओपन स्पर्धा दोन तरुण आणि बिगरमानांकित खेळाडूंमध्ये खेळली गेली आहे.  याआधी 1999 मध्ये 17 वर्षीय सेरेना विल्यम्स आणि 18 वर्षीय मार्टिना हिंगिस यांच्यात सामना झाला होता.  यावेळी 18 वर्षीय एम्मा रादुकानू चॅम्पियन बनली आहे.

ब्रिटिश खेळाडू चॅम्पियन बनण्याची ही घटना सामान्य नाही.  रादुकानू  ही चॅम्पियन बनणे म्हणजे  टेनिसमधील ताज्या हवेची एक लहर आहे.  यूएस ओपनमध्ये ती बिगरमानांकित खेळाडू होती.  पात्रता शर्यतीतून ती मुख्य फेरीत आली.  तिने मुख्य फेरीत प्रवेश केला तरी 18 वर्षीय एम्मा चॅम्पियन होईल असे कुणालाच वाटले नव्हते. तिने एकदा का मुख्य ड्रॉ मध्ये सुरुवात केली आणि मग तिने तिथून नंतर मागे वळून बघितलेच नाही.  संपूर्ण स्पर्धेत तिने एकही सेट गमावला नाही.  अंतिम सामन्यात लीलाशी सामना झाला.  अंतिम फेरीत तिला चुरशीची दमदार लढत मिळेल असे वाटत होते.  पण तिने फायनलदेखील अगदी आरामात जिंकली.  अंतिम सामन्यात पायाला दुखापत झाली असली तरी तिने लीलाचा अगदी सहजपणे 6-4, 6-3 असा पराभव केला.

ती  हिंगिससारखी खेळत टेनिस विश्वाची नवीन 'क्वीन' बनली आहे.  ती संपूर्ण सामन्यात कोर्टवर विजेसारखी सळसळत राहिली.  तिने एकप्रकारे कलात्मक टेनिस सादर केले.  ती आत्मविश्वासाने परिपूर्ण होती.  यासह, ती ग्रँड स्लॅम जिंकणारी मारिया शारापोव्हा नंतर सर्वात तरुण खेळाडू बनली आहे.  यापूर्वी 2004 मध्ये मारियाने वयाच्या 17 व्या वर्षी विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते.  53 वर्षात यूएस ओपन जिंकणारी रदुकानू ही पहिली ब्रिटिश महिला खेळाडू ठरली आहे.

रादुकानू तशी मूळची ब्रिटिश नाही. ती मूळची रोमानियन आहे. तिचा जन्म टोरंटो कॅनडा येथे झाला.  तिच्या जन्माच्या  दुसऱ्या वर्षी तिचे आईवडील ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. तिने वयाच्या पाचव्या वर्षांपासून टेनिस खेळायला सुरुवात केली.  ती खरे तर नंबर वन खेळाडू सिमोना हालेपने प्रभावित झाली आहे. ती तिचा आदर्श होती. हालेपच्या खेळाची तिच्यात झलक दिसून येते. ती सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते.  यूएस ओपनमधील तिच्या कामगिरीवरून हे स्पष्ट होते.  यूएस ओपनमध्ये तिने एकही सेट न गमावता सर्व सामने जिंकले आहेत.  अंतिम सामनाही सरळ सेटमध्ये जिंकला.

अंतिम सामन्यात संघर्षपूर्ण गुण पाहायला मिळतात. अटीतटीच्या, रोमहर्षक सामान्यांची प्रेक्षकांना अपेक्षा असते. पण इथे मात्र असे घडले नाही.  विजेच्या चपळाईने रादुकानूने येथे सेट आणि जेतेपद पटकावले.  आता टेनिसमधील या युवा खेळाडूच्या नावाने झंझावात वाहणार आहे.  आशा आहे की या विजयामुळे टेनिसमध्ये बदलाचे वारे शिरेल. 1999 नंतर प्रथमच युवा खेळाडूंमध्ये जेतेपदाचा सामना घडला आहे.  म्हणूनच यावेळी महिला चॅम्पियन महत्त्वाच्या आहेत.  टेनिसच्या नवीन सनासनी गोष्टींवर चर्चा करणे आवश्यक आहे, कारण यामुळे केवळ खेळ तरुण होणार नाही, तर येत्या काळात टेनिस विश्वावरही तरुणांचे राज्य असेल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment