Monday, September 20, 2021

जलीय खाद्यपदार्थांकडे होतेय दुर्लक्ष


अन्न हा मानवासाठी असा सर्वात महत्वाचाच विषय आहे. कारण अन्नाशिवाय मानवाचं काही चालत नाही. वनस्पतीसारखा मानव स्वयंपोशी नाही. त्यामुळे मानवाला अन्नासाठी काय काय करावं लागतं आणि कुठं कुठं जावं लागतं सांगता येत नाही. माणसाची अन्नासाठी सतत धडपड चालू असली तरीही, आपल्या जगाचे एक मोठे वास्तव असे आहे की दररोज सुमारे 70 कोटी लोक भुकेले राहतात, आणि त्यापैकी सुमारे 25 कोटी लोकांना उपासमारीसारख्या परिस्थितीत राहणं भाग पडतं.  जगात अनेक प्रयत्न करूनही अन्न असुरक्षिततेची समस्या वाढतच चालली आहे.  हवामान बदल, अतिवृष्टी किंवा कमी पावसाचा सामान्य अन्न उत्पादनावरही खोल परिणाम होतो आहे.  जगातीलबऱ्याच  मोठ्या भागातील शेतीवर याचा कायमस्वरूपी परिणाम झाला आहे.  लोकांना शेती सोडून इतर व्यवसाय करणं भाग पाडलं आहे आणि त्यामुळे शेती करणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.  कृषी उत्पादनांच्या किमती वाढत आहेत आणि मंदीचा काळही चालू आहे.  त्यामुळे एकूणच जगासाठी एक मोठी चिंता आहे की येणाऱ्या काळात वंचित किंवा भुकेल्या लोकांचे पोट कसे भरेल?  अशा परिस्थितीत 'ब्लू फूड'ची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे.  'ब्लू फूड' म्हणजे  पाण्यातील खाद्यपदार्थ.

गोड्या किंवा खाऱ्या पाण्यातून उपलब्ध होणाऱ्या जलीय खाद्यपदार्थांची आपल्याला चांगलीच माहिती आहे, यात अजिबात शंका नाही, पण माणसाची भूक भागावण्याची जलचर क्षेत्रात किती क्षमता आहे हे आपण कधीच विचारात घेतले नाही.  अन्न पुरवठ्याच्या आमच्या योजनांमध्ये मुख्यत्वे करून जमिनीवरील किंवा शेतात आणि जंगलात उगवलेली उत्पादने असतात.  मासे,झिंगे यांसारखे अनेक खाद्यपदार्थ आपल्या अन्नप्रणालींचा एक महत्त्वाचा घटक आहेत, तरीही अन्न धोरण बनवण्याकडे आपले फारसे लक्ष दिले गेले नाही.  आपण आपल्या अन्न धोरणात जलीय खाद्य पदार्थांचा समावेश करून आपली अन्नसुरक्षा वाढवली पाहिजे. मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या या खाद्य पदार्थांकडे आता जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारतात ओडिशा किंवा दक्षिण भारतातील काही भागात दुपारच्या जेवणात खास करून 'ब्लू फूड'चा वापर केला जात आहे. त्यामुळे आता निदान ज्या प्रदेशात खाद्यपदार्थ उपलब्ध असलेल्या किंवा सागर किनारी  अनेक भागात याचे प्रमाण वाढवले जाऊ शकते.  शेततळ्यासारखे प्रयोग करून अन्य भागातही या जलीय खाद्य पदार्थांचे उत्पादन वाढवले जाऊ शकते. यासाठी सरकारकडून खास सवलती दिल्या गेल्या पाहिजेत. गोडे पाणी आणि सागरी भागातून मिळणारे खाण्यालायक प्राणी, वनस्पती आणि एकपेशीय वनस्पती असे जलीय खाद्यपदार्थ जगातील 3.2 अब्जांहून अधिक लोकांना प्रथिने पुरवतात.  जगातील अनेक किनारपट्टी, ग्रामीण समुदायामध्ये हा पोषणाचा मुख्य आधार आहे.  हे देखील लपलेले नाही की 80 कोटीहून अधिक लोकांच्या उपजीविकेचा आधार जल क्षेत्र आहे.  परंतु एवढे विशाल क्षेत्र असूनही जगातील कोट्यवधी लोकांना उपाशी झोपायला भाग पाडले जाते. पोषणाचा मोठा अभाव दिसून येतो आहे. आपण भू-आधारित अन्न व्यवस्थेच्या मर्यादा आणि धोकेदेखील समजून घेतले पाहिजेत.

विचार करा, या जमिनीतून मिळणाऱ्या अन्नप्रणाली सर्व हरितगृह वायू उत्सर्जनाच्या एक चतुर्थांशसाठी जबाबदार आहेत. म्हणजे याचे धोके दुर्लक्षित करून चालणार नाहीत. त्यामुळे जलीय खाद्य पदार्थांना प्रोत्साहन देण्याबाबत आपण गांभीर्याने विचार करायला हवा.  हा एक पौष्टिक आणि शाश्वत आधार आहे.  ज्या देशांमध्ये जलीय अन्नाची उच्च क्षमता आहे, त्या देशांनी प्रथम त्यांचे अन्न स्त्रोत बदलले पाहिजेत.  या दिशेने प्रयत्न तीव्रतेने केले पाहिजेत. त्यांनी अन्य देशांना त्याची निर्यात वाढवली पाहिजे. स्टॉकहोम रेझिलियन्स सेंटर आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी यांच्यातील भागीदारीत 100 संशोधकांनी त्यावर काम करत आहेत, त्यामुळे येत्या काही काळात जगाला त्याचे फायदे पाहायला मिळतील, अशी आशा आहे.  एका सुसंस्कृत जगात, अन्नाशी जोडलेल्या नैतिक दबावांपेक्षा अधिक महत्वाचे काय आहे तर कोणत्याही मनुष्याला उपाशी झोपायला लागू नये.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

1 comment:

  1. "कोकणला ७२0 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून मुंबईसह सात सागरी जिल्ह्यात ४५६ मासेमारी करणारी गावे आहेत. मासे उतरविण्याच्या १७३ केंद्रांतून ५ लाख मेट्रिक टन मत्स्य उत्पादन केले जाते. मात्र अत्याधुनिक बोटींवरील पर्ससीन जाळ्यांद्वारे मासेमारी करण्यात येऊ लागल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे.
    पालघर जिल्ह्यातील मत्स्योत्पादनातील घट जवळपास २0 हजार टनाच्या घरात पोहोचली आहे. पालघर समुद्रातील माशांचे उत्पादन घटले असून याचा फटका स्थानिक मच्छीमार व पारंपरिक मासेमारीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना बसलेला पहायला मिळतो. तौक्ते वादळ, निसर्ग वादळ, पर्ससीन नेट मासेमारी तसेच हवामान बदलामुळे येथील माशांचे प्रमाण घटले आहे. पालघर जिल्ह्याचे मत्स्योत्पादन गत वर्षात ६0 हजार मे. टन पयर्ंत झाले आहे. पारंपरिक मच्छीमारांचे जाळे ५0 हजारांचे असते तर पर्ससीन व्यावसायिकांचे जाळे वीस ते तीस लाखांचे असते. त्यांच्याकडे असलेल्या फिश फाइंडर या यंत्राच्या आधारे दीड किलोमीटपयर्ंतच्या जाळे पसरवून मासे उचलले जातात. शासनाने पर्ससीन नेटवर अंशत: बंदी आणली असली तरी पसेर्सीन व्यावसायिक राजरोस मासेमारी करीत आहेत.
    रायगड जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात अलिबाग तालुका आघाडीवर असून गतवर्षी या तालुक्यात २७ हजार ११५ मे. टन मत्स्योत्पादन झाले आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मुरुड ३५८५, श्रीवर्धन ८६७७, उरण ५८५, पनवेल ३९३, पेण १0३, तळा ७0 व म्हसळा तालुक्यात ७३ मे.टन मत्स्योत्पादन झाले आहे.
    रायगड जिल्ह्यात एकूण ३0२५ सागरी मासेमारीच्या बोटी असून त्यापैकी २४८८ बोटी यांत्रिकी आहेत. मासे उतरवण्याची जिल्ह्याच्या किनारपट्टीत ४५ केंद्रे आहेत. मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था ९६ असून त्यामध्ये ३५ हजार ८९६ कोळी बांधव सदस्य आहेत."

    ReplyDelete