काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मालदा येथे गौर एक्स्प्रेसच्या स्वच्छतेदरम्यान एका महिला सफाई कामगाराला प्रथम श्रेणीच्या डब्यात एका सीटखाली 23 लाख रुपये सापडले. तिने लगेच ही माहिती आपल्या अधिकाऱ्यांना दिली. पूर्व रेल्वेने या महिला कर्मचाऱ्याला तिच्या प्रामाणिकपणाबद्दल सन्मानित केले. देशातील भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकपणाच्या बातम्या वाचताना आणि पाहताना अशा चांगल्या बातम्याही वेळोवेळी वाचायला मिळतात. अशा घटना केवळ प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे, असे दाखवत नाहीत तर हेही दर्शवतात की प्रामाणिकपणाला कोणत्याही मोठ्या आध्यात्मिक साधनेची आवश्यकता नसते.
हे माणसाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. ही गोष्ट वेगळी की आपण जसजसे जगाच्या जंजाळात अडकत जातो,तसतसे आपल्या प्रामाणिकपणावर अप्रामाणिकतेचा एक थर जमा होत जातो. अशा परिस्थितीत अप्रामाणिकपणा आपल्या सवयीचा भाग बनतो आणि आपण प्रामाणिकपणाकडेही आश्चर्याने पाहायला लागतो.
आपल्यामध्ये अप्रामाणिकपणा का येतो याचे अचूक उत्तर शोधणे कठीण आहे. प्रामाणिकपणापासून अप्रामाणिकपणापर्यंतच्या या प्रवासात अनेक थांबे आहेत. कधीकधी आपल्याला खूप विचार करायला भाग पाडले जाते पण आपला लोभ आपल्या विचारांवर मात करतो. आपल्या मनाला समजावून सांगण्यासाठी आणि बेईमानीच्या प्रवासाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी जेव्हा समाजात आजूबाजूला घडणाऱ्या अप्रामाणिकपणाचे उदाहरण दिले जाते, तेव्हा या प्रवासातील आपली पावले आणखी अधिक वेगाने पुढे जाऊ लागतात.
काही लोकांचा असा विश्वास आहे की जोपर्यंत आपल्याला अप्रामाणिकपणाची संधी मिळत नाही, तोपर्यंत आपण प्रामाणिक असतो. अप्रामाणिकपणाची किंवा बेमानीची संधी मिळताच आपला प्रामाणिकपणा नाहीसा होतो. यात काही प्रमाणात सत्य असू शकते, परंतु ते सार्वत्रिक सत्य नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत जी अस्तित्वात आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या पदावर कार्यरत होती तिथे तो अनेक फायदे घेऊ शकला असता, परंतु त्याने तसे केले नाही.तो आयुष्यभर सचोटीचे आयुष्य जगला.
त्याचप्रमाणे अशी उदाहरणेदेखील सापडतील की जेव्हा एखादी व्यक्ती असे पद धारण करेल जिथे लाभ मिळण्याची शक्यता फार कमी असते, परंतु त्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अप्रामाणिकपणा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे अप्रामाणिकपणा किंवा प्रामाणिकपणा मुख्यत्वे आपल्या परिसर आणि गुणसूत्रांवर अवलंबून असतो.
जर तुम्ही एखाद्या प्रामाणिक व्यक्तीला अप्रामाणिक होण्यास सांगितले तर तो ते अजिबात करणार नाही. त्याचप्रमाणे, जर तुम्ही एखाद्या अप्रामाणिक व्यक्तीला प्रामाणिक राहण्यास सांगितले तर तो तुमचे अजिबात ऐकणार नाही. वास्तविक, आपण आपली सवय सोडत नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी जीवनाचा अर्थ वेगळा असतो.
काही लोकांचा असं वाटतं की घरात पैसा कोणत्याही प्रकारे आला पाहिजे. अशा लोकांच्या आतील भीती नाहीशी होते आणि ते पैसे कमवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. जेव्हा पैसे कमावण्याचे भूत आपल्या डोक्यात शिरलेले असते, तेव्हा योग्य काय आणि अयोग्य काय यांकडे आपले लक्ष नसते आणि आपण अशा अंधारबुडूक बोगद्यात प्रवेश करतो तेव्हा तिथे आपल्याला पैशांशिवाय दुसरे काहीही दिसत नाही.
दुःखाची गोष्ट म्हणजे साधनसंपन्न लोकही पैशाच्या मागे धावताना दिसतात. हेच कारण आहे की प्रामाणिक,आदरणीय माणसेदेखील पैशाच्या लोभामध्ये अडकून असे गुन्हे करतात, साहजिकच यामुळे त्यांची फक्त प्रतिमाच खराब होत नाही, तर त्यांच्याविषयीचा समाजातील विश्वासही कमी होतो. हाच लोभ आपले संपूर्ण आयुष्यासाठी केलेल्या कार्यावर पाणी फिरवतो आणि आपले संपूर्ण आयुष्य कलंकित होऊन जाते.आपल्यात लोभ निर्माण होणार नाही,असे शक्यच नाही. आपल्याकडे जितका कमी लोभ असेल तितके आपले जीवन अधिक प्रामाणिक आणि चांगले होईल. प्रामाणिकपणाचा मार्ग नक्कीच काट्यांनी भरलेला आहे, पण हा मार्गच आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मसंतुष्टता देईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment