Monday, September 20, 2021

हवामान बदलामुळे निर्वासित होण्याची वेळ


जग आज अनेक संकटांशी लढा देत आहे.  हिंसा, दहशतवाद आणि आर्थिक संकटापासूनते साथीच्या आजारांपर्यंत अनेक प्रकारच्या समस्या आपल्यासमोर आहेत.  तथापि, या सर्व धोक्यांदरम्यान, सर्वात वेगवान गहन होणारी चिंता म्हणजे हवामान संकट.  या संदर्भात, जगातील अनेक देशांनी एक सर्वमान्य उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे खरा, परंतु हे देश एकमेकांवर जबाबदारी टाकण्याचा खेळ करत आहेत.  अशी ही बेजबाबदार प्रवृत्ती भविष्यात प्रत्येकाला महागात पडणार आहे,हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही.  हवामान संकटाबाबत बरेच अभ्यास, संशोधन झाले आहेत, जे सूचित करतात की जर पुढील काही वर्षांमध्ये अर्थपूर्ण आणि ठोस पुढाकार घेतला गेला नाही तर जगातील मानवीसह सर्वच जीवनाचे संकट लक्षणीय वाढेल.  मग विकासाचा कोणताही दावा आणि वैज्ञानिक समज आपल्याला क्वचितच मदत करेल.  परिस्थिती अशी आहे की हवामानाची बदललेली लक्षणे आणि हवामानाच्या परिणामांमुळे विविध देशांची मोठी लोकसंख्या आज विस्थापित झाली आहे.  निर्वासितांची समस्या आणि हवामानाचे संकट हे एक आव्हान आहे ज्यावर अद्याप जागतिक व्यासपीठावर चर्चा झालेली नाही.

हवामान बदलाचे धोके पूर्वीपेक्षा आज अधिक जाणवत आहे. तसेच हे धोके एकाच भागात किंवा खंडात नाही तर जगाच्या सर्वच भागात एकाच वेळी निर्माण होत आहेत.  बदलणारा मोसम आणि बदलत्या हवामानाच्या पद्धतींमुळे, जगभरातील अनेक देशांना आता हवामान निर्वासितांच्या समस्येला कसे सामोरे जावे याची वेगळी समज विकसित करण्याची नैतिक आणि राजकीय धोरणात्मक गरज निर्माण झाली आहे.  हवामान निर्वासितांच्या समस्येला इतर निर्वासितांच्या समस्येशी जोडून सरलीकृत पद्धतीने पाहिले जाऊ शकत नाही.

वास्तविक, हवामान बदलामुळे  निर्वासित झालेले हे असे लोक आहेत ज्यांना हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे आपले मूळ क्षेत्र, समुदाय किंवा प्रदेश सोडून रोजगारासाठी इतरत्र जावे लागत आहे.  जगातील पहिल्या हवामान निर्वासित गटामध्ये पापुआ न्यू गिनीमधील कार्टेरेट बेटावरील चाळीस कुटुंबांचा समावेश आहे, ज्यांची एकूण लोकसंख्या 2000 आहे.  2009 पासून त्या भागात समुद्राची पातळी लक्षणीय वाढली आहे.  मात्र त्यांनी याबाबत आवाजही उठवला होता.  परंतु 2013 पर्यंत त्यांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष दिले गेले नाही.  अशा दुर्लक्षित परिस्थितीमुळे, शेवटी त्यांना ते क्षेत्र सोडावे लागले.  त्यांना भीती होती की एप्रिल 2014 मध्ये ते पूर्णपणे पाण्यात बुडतील.  जर आपण या अशा संकटाकडे उदासीन पद्धतीने बघितले तर त्याची विशालता अधिक तीव्रपणे वाढत राहील. एक धोक्याची घंटा लक्षात घेतली पाहिजे की, जगात राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण वाढण्याऐवजी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या अंदाजानुसार 1990 ते 2100 दरम्यान समुद्र पातळी 0.18 ते 0.6 मीटर वाढेल.  याचा अर्थ बांगलादेशसारखे देश 2050 पर्यंत या समुद्राच्या महापुरामुळे त्यांची एकूण 17 टक्के जमीन गमावतील.  याचाच अर्थ असा की नंतर 20 कोटी हवामान निर्वासित फक्त बांगलादेशात जन्म घेतील.

हवामान निर्वासित लोकांना हवामान बदलाच्या परिणामांव्यतिरिक्त, इतर अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते.  राजकीय समस्या त्यांच्यापेक्षा इतरांसाठी जास्त त्रासदायक असतात.  बऱ्याचदा असे दिसून येते की त्यांना त्यांच्या जागी परत जाण्यास भाग पाडले जाते कारण त्यांना नवीन ठिकाणी राहण्याचा किंवा स्थायिक होण्याचा कायदेशीर अधिकार नसतो.त्यामुळे त्यांचे कुत्रे हाल खात नाही. साहजिकच मोठ्यांनी देशांनी हवामान बदलाची जबाबदारी एकमेकांवर टाकण्यापेक्षा जगाला यातून सुरक्षितपणे कसे बाहेर काढता येईल हे पाहायला हवे आणि यासाठी तात्काळ पावले उचलायला हवीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment