Saturday, December 21, 2013

बँकांनी एटीएम च्या सुरक्षेचा खर्च ग्राहकाच्या माथी मारू न

ये
  जनता किंवा ग्राहक आपला पैसा सुरक्षित राहावा म्हणून बँकेचा आधार घेतो. त्यामुळे त्यांच्या पैशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी बँकांची आहे. अलिकडच्या काळात ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम बँकांनी सुरू केली आहेत. आणि त्यासाठी बँका नाममात्र शुल्क आकारतात. परंतु अलिकडच्या काळात एटीएमची सुरक्षा धोक्यात आली आहे. एटीएम फोडून पैसे लुटण्याचे, पासवर्डमध्ये घोळ घालून  अथवा अन्य मार्गाने एटीएमची सुरक्षा धोक्यात आली आहे. ग्राहकांसाठी ही योजना लाभाची असली तरी त्याचे मोठे धोकेही दिसत आहेत. सुरक्षा गार्ड असतानाही दिवसाढवळ्या चोर्या किंवा लुटीचे प्रकार होत आहेत. ही बाब मोठी चिंताजनक आहे. आता या एटीएमची सुरक्षा वाढवण्यासाठी म्हणजे सीसी टीव्ही बसवण्यासाठी वेगैरे लागणारा खर्च जो आहे तो बँका ग्राहकांच्याच माथी मारणार आहे. यासाठी आता ग्राहकाला प्रत्येक व्यवहारामागे 6 रुपये मोजावे लागणार आहेत. खरे तर हा ग्राहकांवर अन्याय तर आहेच पण उलट तो ग्राहकांच्या खिशावर दिवसाढवळ्या मारलेला डल्ला आहे. हा डल्ला मारण्याचे पाप बँकांनी करू नये.


ग्राहकाच्या पैशाच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी बँकेची आहे. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बँका वाट्टेल त्या क्लृप्त्या करत असतात. योजना राबवत असतात. एकदा का ग्राहक जाळ्यात अडकला की, त्या योजनांचा भुर्दंड बँका ग्राहकाच्या माथी मारत असतात. आताही हाच प्रकार सुरू आहे असे म्हणावे लागेल. प्रारंभी काही काही  बँकांनी नाममात्र दरात तर काही बँकांनी शून्य बॅलेंन्सच्या दरात एटीएमची कार्डे दिली. नंतर मात्र त्यांनी ग्राहकांचे खिसे मारण्याचे धोरण स्वीकारले आहे. याला ग्राहकांकडून कडाडून विरोध व्हायला हवा. एटीएम केंद्राची सुरक्षा ठेवण्याची किंवा तिथे सुरक्षारक्षक वाढवण्याची अथवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सगली जबाबदारी बँकीची आहे. बँका नफा कमवत असतात. हा नफा स्टाफ वाढवण्याबरोबरच बँकांच्या भौतिक सुविधा आणि रक्षणासाठीच वापरायला हवा.यातूनची याही गोष्टी कराव्यातग्राहकाच्या खिशातून पैसा काढणे, हे प्रणत: चुकीचे आहे. एटीएमच्या प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकाच्या खिशाला सहा रुपयाची कात्री लावण्याचा हा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या पटलावर असला तरी रिझर्व्ह बँकेने त्याचा स्वीकार करू नये. ग्राहकाला लुटण्याच्या या प्रकाराला आळा घातला जायला हवा. ग्राहकांनी या प्रस्तावाविरोधात आवाज उठवून आपली होणारी लूट थांबबावी. आताच याला विरोध केला तर काळ सोकावणार आहे, याची जाणीव सर्वच बँक ग्राहकांनी ठेवायला हवी.

बालकथा जिद्द आणि मेहनत


     फिलिफिन्सच्या  एका महत्त्वाच्या धरण कामासाठी  एका  अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली होतीतो अगदी मन लावून धरण कामात गुंतला होता. विशेष म्हणजे त्या धरणाची आवश्यकता तातडीची होती. तो अभियंताही आपल्या पदाची पर्वा  न करता  स्वत: मजुरांबरोबर काम करत होता.   रेमन मॅगसेसे हे त्यावेळचे फिलिफिन्सचे राष्ट्रपती होते. त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या धरणाची पाहणी करण्याचे ठरवले. एके दिवशी ते धरणाच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहचले. त्यांनी संपूर्ण धरणाची पाहणी केली आणि ते आश्चर्यात पडले. काम ठरलेल्या वेळेच्याआदी पार पडले होते. इतकंच नव्हे तर  त्याचा दर्जाही उत्तम होतात्यांनी या सगळ्या उत्तम कामगिरीची चौकशी केली, तेव्हा त्यांना  कळले की, या धरणाचा अभियंता स्वत; मजूर म्हणून काम करत होता. त्यांना फार आनंद झाला. ते  तेथील इतर  माहिती जाणून घेऊन  अगदी प्रसन्न चित्ताने माघारी परतले.
     धरणाच्या उदघाटनाची वेळ आली तेव्हा रेमन मॅगसेसे यांनी  तिथे सगळ्या कर्मचार्यांना बोलावून घेतले आणि त्यांना म्हटले, “ मी हे धरण अगदी लवकरात लवकर पूर्ण  करणार्या  अभियंत्यांच्या जिद्द, चिकाटीमेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गोष्टींना   सलाम करतो. मी त्यांच्या या कामागिरीवर खूप प्रसन्न आहे. मला या  सगळ्या गोष्टीवरून खात्रीशीर वाटतं कीतो फक्त   अभियंता म्हणून नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक लायकीचा  आहेत्यामुळे त्याची मी देशाचा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रीपदी   नियुक्ती करतो आहे. “  ही घोषणा ऐकून तो अभियंता पुढे आलाआणि  म्हणाला, “ मला माझ्या कामाच्यावेळी   फक्त एकच विचार येतो, माझ्यावर सोपवलेलं  काम सर्वश्रेष्ठ झालं पाहिजे.  “

 तात्पर्य: आपलं काम अगदी मनापासून करा. त्याचा तुम्हाला योग्य तो लाभ मिळून जाईल.

Wednesday, December 4, 2013

बालकथा सावकार


         एक फार गरीब शेतकरी होता. तो आपल्या पत्नीसोबत एका छोट्याशा गावात राहात होता. त्याला चार मुलं होती- दोन मुली आणि दोन मुलगे. शेतकर्‍याजवळ एक छोटासा जमिनीचा तुकडा होता. पण जमिनीचा तो तुकडा इतका छोटा होता की, त्यात कुटुंबाला पुरेल इतकं पीक येत नव्हतं. त्यामुळे गरीब शेतकर्‍याला दुसर्‍याच्या शेतावर मजुरीही करावी लागे. अशाप्रकारे मजुरीतून मिळणारे पैसे आणि शेतातून मिळणारे धान्य यातून कसे तरी तो आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होता.
 शेतकर्‍याची मोठी मुलगी जशी वयात येऊ लागली, तशी त्याला चिंता सतावू लागली. मुलीला योग्य वर मिळायचा, पण ते खूप ज्यादा हुंडा मागायचे. त्यामुळे तो मन मारून राहायचा.
 एक दिवस शेतकर्‍याची पत्नी म्हणाली, “ काय हो, तुम्हाला दिसत नाही का, मुलगी उपवर झाली ती. तिच्यासाठी मुलगा कधी शोधणार?”
 “ मी तर त्याच खटपटीला लागलो आहे, पण आपल्याकडे मुलीचा लग्न करून देण्याइतपत  पैसेच नाहीत. मग काय करणार?” त्याने उत्तर दिले.
 “ मला माहित आहे, आपल्याकडे पैसा-अडका नाही तो. पण मग  तिला अशीच लग्नावाचून ठेवायची का? तिचं लग्न तर केलं पाहिजेच. तिच्या लग्नाचं बघा. त्यासाठी आपल्याला जमीन किंवा  घर विकावं लागलं तरी चालेल.” शेतकर्‍याची पत्नी म्हणाली.
      शेतकरी हे ऐकून फार उदास झाला.  त्याने जमीन विकली तर तो खाणार काय? आणि जर घर विकलं तर तो राहणार कुठे? त्या रात्री त्याला जेवण गेलं नाही.  काही न खाता  तसाच अंथरुणावर जाऊन  पडला. पण त्याला झोप आली नाही. त्याला मुलीच्या लग्नाचा प्रश्‍न सतावत राहिला. तो तसाच  रात्रभर तळमळत राहिला.
 दुसर्‍यादिवशी शेतकरी घराबाहेर पडणार तोच पत्नी म्हणाली,” काय हो? मी रात्री काय म्हटले ते लक्षात आहे ना? मुलीच्या लग्नाचं मनावर घ्या. त्यासाठी जमीन आणि घर विकावं लागलं तरी चालेल.”
 शेतकरी काही न बोलताच घराबाहेर पडला. पत्नीने विचार केला की,  पती तिच्या बोलण्याकडे लक्षच देत नाहीए. त्यासाठी ती उठून उंबर्‍याजवळ आली आणो ओरडून म्हणाली, “ ठीक आहे, तुमची मर्जी. पण एक लक्षात ठेवा, जो पर्यंत मुलीचा विवाह पक्का होत नाही, तोपर्यंत मी अन्न-पाणी ग्रहण करणार नाही.”
      शेतकरी यावरही काही बोलला नाही. तो पुढे  निघाला. अशा परिस्थितीत त्याला गावातला एकच माणूस मदत करू शकत होता, तो म्हणजे गावातला सावकार. परंतु, त्याला सावकाराकडे जायची इच्छा नव्हती. सावकार ज्याला कुणाला कर्ज  द्यायचा, त्याने कर्ज  चुकते केले नाही तर तो त्याच्या जमिनीवर किंवा घरावर कब्जा करायचा.
      उधार घेण्यासाठी सोन्या-चांदीची दागिने किंवा जनावरे सावकाराजवळ गहाण ठेवावी लागत असत. गावातला प्रत्येक माणूस जाणत होता की  एकदा का  एखादी वस्तू सावकाराकडे गहाण ठेवली तर ती पुन्हा कधी परत मिळत नाही.  सावकार इतका  ज्यादा व्याज लावायचा की त्यामुळे कुठलाही गाववासी  मूळधन आणि व्याज परत करण्याची उम्मीद ठेवत नसे.
      सगळे गाववासी सावकाराचा तिरस्कार करत , पण ज्यावेळेला रुपये-पैशांची गरज पडे, त्यावेळेला त्यांना सावकाराकडेच जावे लागे. दुसरा कोणीही त्यांची गरज भागवू शकत नव्हता.
 गरीब शेतकर्‍याने शेवटी निर्णय घेतला की, सावकाराकडेच जायला हवं. सावकाराच्या घरी गेला. दरवाजा ठोठावून आत गेला.
 सावकार गरीब शेतकर्‍याला पाहून हसला. मग मोठ्या आवाजात म्हणाला, “ ये ये. बस. मोठ्या काळजीत दिसतो आहेस. मी  तुझ्या कुठल्या कामाला येऊ शकतो का ते सांग?”
 “ होय, शेठजी. आता तुम्हीच आमचे आश्रयदाता.” शेतकरी हात जोडून म्हणाला.
 “ बोल, काय काम आहे? तुला तर माहीतच आहे,माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी आयुष्यभर गाववाल्यांची सेवा केली. मीदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून  चालण्याचा प्रयत्न करतो आहे.” सावकर म्हणाला.
 “ माझी मोठी मुलगी लग्नायोग्य झाली आहे, पण माझ्याकडे तिचे लग्न करण्यासाठी पैसा-अडका नाही. आज पत्नीने निक्षून सांगितलं की, जोपर्यंत मुलीचा विवाह पक्का होत नाही, तोपर्यंत अन्न-पाणी ग्रहण करणार नाही. शेठजी, अशा अडचणीच्या वेळेला तुम्हीच माझ्या उपयोगाला पडाल.” शेतकरी म्हणाला.
 सावकार हे ऐकून हसायला लागला. तो म्हणाला, “ अरे एवढंच! अरे बाबा, ही तर क्षुल्लक गोष्ट आहे. तू काही घाबरू नकोस. मी करीन तुला मदत.”
 “ शेठजी, आपले फार उपकार होतील.” शेतकरी समाधानाने म्हणाला.
 “ अरे, सांगितलं ना! मदत करीन म्हणून. मी तर गावातल्या कित्येक तरुण मुला-मुलींच्या लग्नाला मदत केली आहे. पण तुला एक काम करावं लागेल. तुला काही तरी वस्तू गहाण ठेवावी  लागेल. तुला जितके पैसे लागतील, तितके  घे. आणि मुलीचे मोठ्या  थाटामाटात  लग्न कर.” सावकार म्हणाला.
 “पण शेठजी, आपल्याला तर ठाऊक आहे, माझ्याजवळ फक्त दोन एकर जमीन.  झोपडीवजा घर  आणि एक बैलजोडी आहे. जर जमीन गहाण ठेवली तर आम्ही जगायचं कसं? आणि घर गहाण ठेवलं तर राहायचं कुठं? आणि जर बैल दिले तर शेतीवाडी कशी करणार? ’’ शेतकर्‍याने आपली अडचण सांगितली.
 “ तुला तर नियम ठाऊक आहे. रुपये घेण्याअगोदर तुला काही ना काही गहाण ठेवावं लागेल.” सावकार म्हणाला.
 सावकाराची पत्नी आत दाराआड  बसली होती. ती सगळं काही ऐकत होती. शेतकरी उत्तरादाखल काही बोलणार तोच, तिने आपल्या नवर्‍याला आत बोलावून घेतले. आणि म्हणाली, “अहो, तुम्हाला  काही  डोक्याचा वापर करता  येतो की नाही?”
 “ का? काय झालं?” सावकारने विचारलं.
 “ का काय? इकडे कान द्या. आपल्याकडे जमीन-जुमला आहे.घरदार आहे. त्याची निगा राखणं अवघड जातं आहे. आता आपल्याला काही जमीन नको की घर! आपल्याला तर असा चाकर हवा, जो पैशाशिवाय काम करू शकेल.” सावकाराची पत्नी त्याला समजावत म्हणाली.
 “ तर मग सांग. अशा चाकराचा शोध कुठं घेऊ?” सावकाराने विचारले.
 “ शोध काय घेत बसताय. तो शेतकरी आलाय ना! त्याला दोन मुलं आहेत. त्याला पैसे हवे आहेत.  त्यातल्या एका मुलाला घ्या ना ठेवून! जो पर्यंत शेतकरी व्याजासह पैसे चुकते करत नाही, तोपर्यंत त्याचा मुलगा आपल्याकडे गहाण राहील. आपल्यालाही स्वस्तात एक चाकर मिळून जाईल.” सावकाराची पत्नी म्हणाली.
      सावकार परत बैठकीच्या खोलीत येत शेतकर्‍याला म्हणाला,” आजचा दिवस तुझ्यासाठी चांगला  फायदेशीर आहे. आत बसलेल्या शेठानीला  तुझी दु:खद कहानी ऐकून रडूच कोसळलं. तिने मला आत बोलावलं.  तिचं म्हणणं असं की, आपल्याला गावातल्या प्रत्येक उपवर मुलीला आपली मुलगी मानली पाहिजे. त्यासाठी आपण  जमीन-जुमला,  झोपडी,  बैलं गहाण ठेवून घ्यायची नाहीत. त्यांना तसंच कर्ज देऊ.”
 शेतकर्‍याचा  आपल्या कानांवर विश्‍वास बसेना. तो म्हणाला,“ शेठजी, आपण तर मला मोठं जीवनदान दिलंत. मी तुम्हाला वचन देतो, आपले पैसे मी व्याजासह चुकते करीन.”
 “ अरे, हो हो. मला ठाऊक आहे. पण तरीही तुला काही ना काही तरी रुपयांच्या बदल्यात  गहाण ठेवावं लागेल.”
 शेतकर्‍याला काहीच उमजेना. तो म्हणाला, “ शेठजी, माझ्याजवळ  जमिनीच्या तुकड्याशिवाय आणि  घर - बैलजोडीशिवाय दुसरं काहीच नाही. दैवानं सोन्या-चांदीचं दर्शनही कधी करू दिलं नाही. तुम्हीच सांगा, मी आणखी काय ठेवू शकतो आपल्याजवळ?”
       “ माझ्या पत्नीने यावर एक उपाय सांगितला आहे. तू तुझ्या मोठ्या मुलाला माझ्याकडे ठेव. तो आमच्यासोबत राहील. त्याच्या खाण्या-पिण्याची आणि कपड्यालत्त्याचीही सगळी सोय करू.  राहायला जागा देऊ. तुझ्यावरचं ओझंही कमी होईल. ज्यादिवशी तू व्याजासह पैसे परत करशील, त्यादिवशी तू आपल्या मुलाला परत घेऊन जाऊ शकतोस.” सावकाराने समजावलं.
      शेतकर्‍याचं आपल्या सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम होतं. त्यामुळे आपल्या मुलाला सावकाराजवळ गहाण ठेवण्याच्या विचारानं त्याचं मन हडबडून गेलं. पण त्याच्याजवळ दुसरा कुठला पर्याय नव्हता.
      गरीब शेतकरी घरी आला. त्याने आपल्या पत्नीला मुलीच्या लग्नाला पैसे मिळण्यासाठीचा पर्याय सांगितला.  त्याच्या पत्नीला गलबलून आलं. पण त्याशिवाय आणखी कोणता मार्ग नव्हताच. शेवटी ती या गोष्टीला तयार झाली.
      मग शेतकरी आपल्या मोठ्या मुलाला सोबत घेऊन सावकाराच्या घरी आला. तिथे सावकाराने रुपये देण्याअगोदर शेतकर्‍याच्या अंगठ्याचा ठसा एका कागदावर उठवून घेतला.शेतकर्‍याने मोठ्या मुलाला सावकाराकडे सोडलं आणि मुलीच्या लग्नासाठी खुपसे रुपये  घेऊन घरी आला. या पैशांच्या मदतीने त्याने योग्य अशा मुलाशी त्याच्या मुलीचा विवाह लावून दिला.
      सावकाराच्या घरी शेतकर्‍याच्या मुलाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोठे कष्ट उपसावे लागायचे. चुलीसाठी लाकडं फोडणं, जनावरांना चारा घालणं, त्यांना बाहेर चरायला नेणं, गोठा-घर यांची साफसफाई करणं अशी सगळी कामं त्याला करावी लागायची. जेवायला सकाळी, दुपारी आणि  संध्याकाळी दोन पातळ चपात्या आणि थोडी चटणी मिळायची.
 मुलाला कपड्याची आवश्यकता असायची, त्यावेळेला सावकार त्याला आपले फाटके, जीर्ण झालेले कपडे घालायला द्यायचा.
      काही दिवसांतच मुलाची तब्येत उतरली.  मरतुकड्यासारखा दिसू लागला. त्याची हाडं दिसू लागली. अशक्तपणा आल्यानं त्याला पहिल्यासारखे कामही करता ये ईना. मग सावकार आणि त्याची पत्नी त्याला आळशी म्हणून हिणवत आणि मारझोड करीत.
 गरीब शेतकरी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाची ही अवस्था पाहून दु:खी राहू लागले. ते सावकाराला विनंती करायचे, “मुलावर दया करा. त्याला इतके मारू नका.”
 “ तो आळशी आहे. कुठलं काम वेळेवर करत नाही. मग त्याला शिक्षा तर मिळणारच.” सावकार म्हणायचा.
 “ नाही नाही शेठजी, तो चांगला मुलगा आहे. मेहनती आहे. तो फार अशक्त झाला आहे. त्याला थोडं अधिक जेवण द्या. त्याची तब्येत सुधारेल. मग तो चांगली मेहनत करेल.” शेतकरी म्हणायचा.
 सावकार ओरडून म्हणायचा, “ तू मला काय समजतोस? मूर्ख? मी मुलाची किंमत तुला आदीच चुकती केली आहे. आणि तो जितकं खातो, तितकं कामदेखील करत नाही. मग त्याला का देऊ जादा अन्न?’’
 “पण शेठजी, आपल्या घरचं शिळंपाकं खाऊनही मुलगा ठणठणीत होता. मग आता...? ” शेतकरी फिरून म्हणायचा.
 “ तुला जर  त्याची इतकीच फिकीर असेल तर माझे पैसे टाक आणि घेऊन जा तुझ्या पोराला. तोपर्यंत माझ्याशी बोलूदेखीलनकोस. समजलास?” एक लक्षात ठेव, तू मुलगा देताना कागदावर अंगठा उठवला आहेस.” सावकार अर्थपूर्ण ढंगात म्हणायचा.
 हे ऐकून गरीब शेतकरी गप्प मान खाली घालून निघून यायचा. या निर्दयी माणसाच्या हातून मुलाची सुटका कशी करायची आणि त्यासाठी इतके पैसे कोठून आणायचे, असा प्रश्‍न त्याला पडायचा.
 एक दिवस शेतकर्‍याच्या मुलाच्या सहनशक्तीचा अंत झाला. तो सावकाराच्या घरातून पळाला ते तो थेट राजाच्या दरबारात पोहचला.  राजासमोर उभा राहिला आणि आपली दु:खद कहानी राजाला ऐकवू लागला.
 राजा फार दयाळू आणि बुद्धिमान होता. मुलाची सगळी कहानी ऐकल्यावर त्याने सिपायांकरवी सावकाराला दरबारात बोलावून घेतले.
 सावकार दरबारात हजर झाला आणि म्हणाला, “ महाराज, या मुलाने आपल्याला अर्धवट कहानी सांगितली आहे.याच्या वडिलाने व्याजाने घेतलेल्या रुपयांच्या बदल्यात याला माझ्याकडे गहाण ठेवले आहे. कायद्यानुसार जोपर्यंत माझे पैसे चुकते होत नाहीत, तोपर्यंत या मुलाला माझ्याकडे ठेवण्याचा मला अधिकार आहे.”
 सावकाराने शेतकर्‍याच्या अङठ्याचा ठसा असलेला तो कागद राजाला दाखवला. राजाने तो कागद वाचला आणि म्हणाला,       “ बरोबर शेठजी,तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण कागदावर लिहिलं आहे की, तुम्ही मुला खाण्यासाठी अन्न देणार. तुम्ही त्याला अन्न देत होतात का?”
 “ हो, महाराज!” सावकार म्हणाला.
 “ तुम्ही रोज मुलाला किती भोजन देत होतात?’’ राजाने विचारलं.
 “ दोन-दोन चपत्या आणि चटणी. सकाळी, दुपारी आणि रात्री, तीन वेळ.” सावकाराने उत्तर दिलं.
 सावकाराकडे पाहात राजा हसला आणि म्हणाला, “ मस्तच! आजपासून तुम्ही माझे अतिथी आहात.”
      सावकाराला वाटलं की राजा त्याच्यावर खूश आहे. त्याला  महालातल्या अतिथीगृाहाच्या एका खोलीत  राहायला दिलं. तिथे तो राहू लागला. राजाने शेतकर्‍याच्या मुलालाही आपला अतिथी बनवलं.
      शेतकर्‍याच्या मुलाला रोज स्वादिष्ट आणि पौष्टिक भोजन मिळत होतं. पण सावकाराला रोज सकाळी दुपारी आणि रात्री तिन्ही वेळेला दोन दोन चपाती आणि थोडी चटणी मिळत होती.
      काही दिवसांतच शेतकर्‍याच्या मुलाची तब्येत सुधारली. तो पहिल्यासारखा धष्टपुष्ट बनला. मेहनतीला तयार झाला. पण इकडे सावकाराची तब्येत उतरली. तो हडकुळा दिसू लागला. त्याचे कपडे त्याला ढिले पडू लागले. एक दिवस तो इतका अशक्त बनला की, त्याला चालता- बोलताही येईना.
       ज्यावेळेला सावकार हे सगळे सहन करू शकेना, त्यावेळेला  त्याने राजाचे जाऊन पाय धरले आणि म्हणाला, “ महाराज! मला क्षमा करा. आता मला कळलंय की मी किती चुकीने आणि निर्दयीपणे वागत होतो ते. जर आपण मला क्षमा केलीत तर मी सगळे अंगठे उठवलेले कागद जाळून टाकीन. ज्यांनी माझ्याकडून रुपये घेतले आहेत, ते सगळे लोक स्वतंत्र होतील.”
      बुद्धिमान राजाने सावकाराला माफ केलं. सावकाराने व्याजाने रुपये देताना गरीब लोकांचे अंगठे उठवून घेतले होते, ते सगळे कागद आणले आणि ते सगळे कागद राजा व मंत्र्यांसमक्ष जाळून टाकले.
 सगळे कागद जळाल्यावर राजा म्हणाला,“ यामुळे फक्त एका गावाचा प्रश्‍न सुटला आहे. अशी अजून किती तरी गावं  असतील...”
 “ होय महाराज!” मंत्री म्हणाले.
 “ आणि शेतकर्‍याच्या मुलाला जो त्रास झाला , त्याला कारण आहे हुंडा. या मुलाच्या बहिणीच्या  लग्नात हुंडा द्यावा लागला, म्हणून याला सावकाराकडे चाकरी करावी लागली. बरोबर ना?” राजानं विचारलं.
 “ आपण म्हणता ते बरोबर आहे, महाराज. “ तिथे उपस्थित असलेले सगळ्यांनी सहमती दर्शवली.
 “तर मग ठीक आहे. आजपासून जोकोणी  हुंडा घेईल, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाईल.” राजाने घोषणा केली.
 “ ... मंत्रीमहोदय, तशी दवंडी राज्यभर  पिटवा.”
       शेतकर्‍याचा मुलगा आपल्या आईवडिलांकडे परतला. सोबत त्याला राजाने पुष्कळ भेटवस्तू दिल्या. गावातले सगळे लोक सावकाराच्या तावडीतून सुटका झाल्याने आनंदी होते.सावकारालादेखील समजून चुकलं की, सगळ्यांशी व्यवहारानं वागलं पाहिजे. आणि आता राज्यातल्या कुठल्याही गावात कोणत्याही  बापाला मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागत नाही. (बुंदेली लोकथेवर आधारित)
                                                                                                                               

Monday, November 18, 2013

लेख नट्यांचं वाढतं वय आणि त्यांच्या लग्नाची चर्चा



     नुकतीच एक बातमी आली होती की, आपल्या राणी मुखर्जीचा  तिचा विवाहीत दोस्त आदित्य चोप्राबरोबर साखरपुडा झाला आहे आणि ते लवकरच लग्न करणार आहेत. अर्थात तथ्य किती आहे, हे अद्याप बाहेर आले नाही, पण त्यामुळे आपल्या बॉलीवूड नट्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा रंग भरला आहे. तुलसी विवाह संपन्न झाल्याने सगळीकडे लग्नाचे बार उडत असताना आता या बॉलीवूडमधल्या सिंगल सुंदर्यांच्या लग्नाच्या चर्चेचीही त्यात भर पडली आहे. राणी मुखर्जी आता 36 वर्षांची झाली आहे. कित्येक वर्षांपासून तिचे  यशराज बॅनरचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राशी प्रेमसंबंध सुरू आहेत. 1997 मध्ये राजा की आयेगी बारात या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एंट्री केलेल्या राणीला मध्यंतरीच्या काळात बॉलीवूडची सम्राज्ञी म्हणूनही संबोधले जात होते. ब्लॅक, हम तुम, बंटी और बबली सारखे हिट चित्रपट दिलेल्या राणीचे  अलिकडच्या चार-पाच वर्षात फारच कमी चित्रपट आले आनि जे आले ते साफ कोसळले. मात्र तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या प्रेमसंबंधाची आणि लग्नाचीच चर्चा अधिक ऐकायला मिळाली. मध्यंतरी दोघांनी गुपचुप लग्नही केल्याच्या वावड्या उठल्या होत्या, परंतु त्यावेळी राणीने त्याचे खंडन केले होते. काही महिन्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हाने म्हणे एका कार्यक्रमात राणी मुखर्जी असा उल्लेख न करता तिचा राणी चोप्रा असा उल्लेख केला होता. काहीही असले तरी हे दोघेही अद्याप मिडियासमोर एकत्र न आल्याने तिच्या विवाहाबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता मात्र लागून राहिली आहे.
      37 वर्षाची विश्व सुंदरी सुष्मिता सेन अजूनही अविवाहित आहे. ब्युटी वुथ ब्रेन असे संबोधल्या जाणार्या सुश्मिता सेनच्या सौंदर्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी चाहत्यांमध्ये  तिच्याविषयी अजूनही आकर्षण कायम आहेआपल्या फिल्मी कारकीर्दीला दस्तक चित्रपटाद्वारे सुरुवात केलेल्या सुश्मिताने सिर्फ तुम, बीवी नं 1, आँखे सारखे चांगले चित्रपट दिले.दिग्दर्शक विक्रम भट्ट,अभिनेता रणदीप हुड्डा नंतर त्चे नाव पकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमशी तिचे नाव जोडले गेले, पण सुश्मिताने या सगळ्या बाष्कळ गप्पा असल्याचे म्हटले. लग्नाशिवाय दत्तक घेतलेल्या दोन मुलांच्या संगोपनात सध्या ती गुंतली आहे. तिने एके ठिकाणी म्हटलंय की, माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे.मला उशिर लागत असला तरी मी लवकरच या बंधनात अडकणार आहे.
      सुश्मिताबरोबरच तब्बूदेखील अद्याप अविवाहित आहे. माचिस, विरासत, हु तू तू, अस्तित्व, चांदणी बार, मकबूल, चिनी कम आणि मीरा नायरचा द नेमसेकसारख्या चित्रपटांमध्ये काम एक परिपक्व विचाराची आणि दमदार अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या तब्बू आपली चित्रपट कारकीर्द देव आनंद यांच्या हम नौजवान या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सुरू केली होती. गेल्या वर्षीच्या ऑस्कर विजेत्या लाईफ ऑफ पाइ या चित्रपटातही ती होती. हैद्राबादच्या या सुंदर ललनेचे वय 41 आहे. मात्र तिच्याकडे पाहिल्यावर तसे वाटत नाही. आजदेखील तरुणीसारखीच दिसते. कधी निर्माता साजिद नाडियादवाला तर कधी तेलगु सुपरस्टार नागार्जूनसोबत तिचे अफेयर असल्याचे बोलले जात होते. पण ती अजूनही सिंगल आहे.
      जवळपास नऊ वर्षे जॉन अब्राहमसोबत सिरियस रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या बिपाशा बसूचे  आता त्याच्याशी ब्रेक अप झाले आहे. बारा वर्षांपूर्वी अजनबीद्वारा फिल्म इंडस्ट्रीत आलेल्या बिपाशाच्या खात्यावर जिस्म,राज,धूम 2, ओमकारा, नो एंट्री, अपहरणसारखे अनेक हिट चित्रपट आहेत. 34 वर्षाची ही बंगाली कन्या जॉनच्या अगोदर डिनो मोरियोसोबतही काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. मात्र आजही ती सिंगल आहे. सध्या तिचे नाव हरमन बावेजाशी घेतले जात आहे. पण तिला विचारल्यावर ती म्हणते, हरमन फक्त माझा दोस्त आहे.
      33 वर्षाच्या नेहा धुपियाला देखील लग्नची प्रतीक्षा आहे. 12 वर्षांपासून  फॅशन आणि चित्रपटांमध्ये सक्रिय राहिलेल्या नेहाला वैयक्तिक आयुष्यात मात्र अपयशच मिळाले आहे. त्यामुळे रिलेशन निर्माण करण्याच्याबाबतीत ती सावध आहे. योग्य असा जोडीदार मिळाला की, आपण विवाह बंधनात अडकू, असं ती ठामपणे सांगते. नेहाबरोबरच इंडियन क्रिकेट लीगच्या निमिताने पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेली प्रिती झिंटादेखील अजून अविवाहित आहे. बर्याच कालावधीनंतर अलिकडचेच तिचा एक सिनेमा आला पण चालला नाही. नेस वाडियासोबतचे अनेक वर्षांपासूनचे रिलेशनशिप तुटल्यानंतर सध्या तरी तिचे नाव कुणाशी जोडले गेलेले नाही. 1998 मध्ये दिल से चित्रपटाद्वारा बॉलीवूडमध्ये पर्दापण केलेल्या प्रितीच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत.सोल्जर, क्या कहना, सलाम नमस्ते, वीर झारा आदी चित्रपटांचा त्यात समावेश आहे.35 वर्षाच्या डिम्पलगर्ललामात्र लग्नाची फारशी घाई नाहीए. हजरजबाबी आणि बिझनेसचे पक्के सेन्स  असलेल्या प्रितीने  सध्या चित्रपट आणि बिझनेसवर  आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

     वय  वाढत चालले असले तरी या अभिनेत्रींना त्याची पर्वा नाही. त्यांची चिंता मात्र त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. चित्रपट इंडस्ट्रीला लागली आहे. नट्यांच्या लग्नाच्या चर्चेचा  विषय केवळ आजचा नाही. त्यांची वयं वाढत चालली की, त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण येते. सध्याही तसेच वातावरण आहे. नुकतेच मल्लिका शेरावतने एम टीव्हीच्या बॅचलरेट इंडिया या स्वयंवरावर आधारित असलेल्या कार्यक्रमाद्वारा 29 पुरुषांमधून विजय सिंह याला आपला जोडीदार म्हणून निवडला आहे. या घडामोडी घडत असतानाच मल्लिकाचे बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीच विवाह झाला होता आणि पहिल्या नवर्यापासून तिला एक मुलगाही आहे, ही बातमी थडकली. पण काही का असेना तिने दुसरा जोडीदार निवडला आहे, त्याच्याशी तिचा किती दिवस संसार चालतो, ते आपल्याला पाहायला मिळलेच.


लेख डॉक्टरांची जीवघेणी लिखणावळ



     डॉक्टरांच्या गिचमिड, घसरड्या आणि घाणेरड्या अक्षरांमुळे दरवर्षी सात हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो, यावर आपला विश्वास बसेल का? नाही ना? पण ही वस्तुस्थिती आहे. एका सरकारी रिपोर्टनुसार डॉक्टरांच्या अशा घसरड्या, न वाचता येणार्या हस्ताक्षरांमुळे दरवर्षी जवळपास सात हजार रुग्णांना आपले प्राण गमवावे  लागतात. इतकी या डॉक्टर मंडळींची लिखणावळ खराब आहे. त्यांच्या या लिखणावळीमुळे लोकांचा जीव जात असेल तर त्यांच्यात आणि जल्लाद यांच्यात काय फरक आहे, असे समजायचे? आपल्या घरातली किंवा खिशातली डॉक्टरांची औषधांची चिठ्ठी  काढून पहातुमच्याही लक्षात ही गोष्ट येईल. शेवटी ही माणसं अशी का करतात बरं?
      अशाच हस्ताक्षरात त्यांनी डॉक्टरकीच्या डिग्रीची परीक्षा दिली असती तर ही मंडळी पास झाली असती का? आणि अशी दुकाने थाटल्यासारखी दवाखाने उघडली असती किंवा सरकारी रुग्णालयात नोकरीला लागली असती का? डॉक्टर झाल्यावरच  त्यांचे हस्ताक्षर का बिघडते? याचा सरळ अर्थ निघतो. तो म्हणजे ते केवळ पैसे कमवायला बसले आहेत. रुग्णांना झिडकारल्यासारखे करत ही माणसे औषधाची चिठ्ठी लिहितात. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, हे वचन ही मंडळी विसरूनच जातात. कित्येक डॉक्टर तर फक्त पहिले अक्षर तेवढे स्पष्ट लिहितात. बाकी पुढे नुसती आढवी रेघ असते. कित्येकांना त्यांनी काय लिहिलं आहे, असं विचारलं तर सांगून टाकतात, मेडिकलमध्ये जा, तो वाचून गोळ्या-औषध दे ईल. म्हणजे त्यांना पुन्हा विचारायला गेले तर त्यांचे त्यांना लिहिलेले वाचता येत नाही, अशी ही तर्हा. मग मेडिकल दुकानदाराला तर काय कप्पाळ कळणार त्याचे हस्ताक्षर! तो पहिल्या अक्षरावरून अंदाजित गोळ्या लिहून देतो. मग होतात चुका. चुकीचा डोस दिला गेल्याने रुग्णाच्या जीवावर बेततं.
      जग जिंकायला निघालेल्या सिंकदरचे अक्षर फारच वाईट होते. तो स्वारीवर असल्यावर आपल्या बायकोला पत्रं लिहायचा. बिचारी ती पत्रं वाचूच   शकत नव्हती. तो स्वारीवरून परत आल्यावर तिने ती सगळी पत्रं त्याच्यापुढे टाकली आणि म्हणाली, यात काय लिहिलात मला वाचून दाखवा. तो म्हणाला, ही पत्रं  लिहून मला खूप दिवस झाले. आता ही पत्रं मी आता कशी वाचू शकतो? पुढे इतिहासात  सिंकदर महान (?) ठरला. मग त्याच्या समर्थकांनी एक सिद्धांत मांडला, महान लोकांची अक्षरे खराबच असतात. आता या महानतेच्या पलिकडे आपली ही डॉक्टर मंडळी गेली आहेत. कारण यांची हस्ताक्षरे नुसते खराबच नाहीत तर जीवघेणीही आहेत.
      डॉक्टरांचा दवाखान्याचा उंबरा उलांडायचा म्हणजे खिशात भरपूर पैसे असायला हवा. त्यांच्या अशा हस्ताक्षरांचा विचार केला आणि एखाद्याचे ऑपरेशन झाले तर मग त्याने पिशवी भरूनच पैसे न्यायला हवेत. एक तर डॉक्टर वेळेत सापडत नाहीत किंवा जाग्यावर नसतात म्हणून अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यात डॉक्टर लोक जाणूनबोझुन रुग्णांना मारत असतील, हा प्रकार  मोठा चिंताजनक म्हटला पाहिजे. आपल्या मेडिकल कायद्यात अशी काही तरतुद नाही की, त्यांनी स्वच्छ अक्षरात औषधांची चिठ्ठी लिहून द्यावी. मात्र सरकारने किंवा सामाजिक संस्थांकडून याची दखल घेतली जायला हवी. चुकीच्या डोसने जीव गमावणार्यांची ही आकडेवारी मोठी चिंताजनक आहेच, पण त्यातही अशा चुकीच्या औषधांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होणार्यांची संख्याही कमी असणार नाही. त्यामुळे  याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे. डॉक्टरांनी रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणून काम करायला हवे. औषधांची चिठ्ठी लिहून देताना औषधांची नवे व डोसेचे प्रमाण स्वच्छ अक्षरात लिहून द्यायला हवेत्यांचे खराब अक्षर हे त्यांच्या असंवेदनशीलता आणि  असामाजिकतेच लक्षण मानले पाहिजे. सुंदर  हस्ताक्षर हाच खरा दागिना आहे, असा एक सुविचार प्रसिद्ध आहेसुंदर अक्षरात त्याचे व्यक्तिमत्त्व डोकावते, म्हणतात. तर मग डॉक्टरांच्या या औषधांच्या चिठ्ठ्यांवर लिहिलेली अक्षरे त्यांच्या कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक म्हणायचे, याचा विचार केला गेला पाहिजेआता कॉम्प्युटरचे युग  आहे, त्याचा लाभ उठवत डॉक्टरांनी औषधांच्या चिठ्ठ्या कॉम्प्युटर प्रिंट द्याव्यात, त्यामुळे असे धोके राहणार नाही. शिवाय त्यांचा  लिहिण्याच्या कंटाळ्यापासून बचावही होईल.

Saturday, October 12, 2013

बालकथा कष्टाचे मोल



      गोष्ट फार जुनी आहे. अमृतपूर  नावाच्या छोट्याशा गावात गोरखनाथ नावाचा एक शेतकरी राहात होता. त्याला केदार नावा मुलगा होतात्याच्याकडे एक अवगुण होता, तो म्हणजे वायफट पैसे खर्च करण्याचा. त्याच्या हातात लक्ष्मी ठरतच नव्हती. वडिलांकडून पैसे मागून घ्यायचा आणि उधळायचा. साहजिकच वडिलांना त्याच्या खर्चिकपणाची मोठी चिंता वाटत होती. हा असाच पैसे उधळत राहिला तर याला पैशाची किंमत कळणार नाही   आणि हा  भविष्यात दरिद्री बनून जाईल.
      एक दिवस गोरखनाहाने आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि समजावलं, “बाबा रे, मी एका गरीब घरात जन्माला आलो. माझे बाबा शेळ्या चारवत. दूध, बकर्यांची विक्री यातून चार पैसे मिळत. त्यात कशी-बशी घराची गुजराण होई. मला फार शाळा शिकता आली नाही. मी वडिलांना कामात मदत करू लागलो. वडिलांनी मग अधिक शेळ्या घेतल्या. थोडा फार पैसा येऊ लागला. ते पैसे खर्च न करता साठवून ठेवू लागलो. वडिलांच्या मृत्यूनंतर मी त्या पैशांतून थोडी जमीन घेतली. त्यात भाजीपाला पिकवून विकू लागलो. पैसे वाचवून पुढे त्यातून एक छोट्ंस घर खरेदी केलं. मी तुझ्यासारखे पैसे उधळत राहिलो असतो तर आज मी गरीबच राहिलो असतो.”
      केदारवर  याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. तो पैसे उधळतच राहिला. एकदा गोरखनाथ विचार करीत बसला असताना त्याच्या मित्रानं-मंजूनाथनं कारण  विचारलंगोरखनाथने कारण सांगितलं.मंजूनाथने एक योजना सांगितली. ती गाेरखनाथला विलक्षण  आवडली. त्याने एक दिवस केदारला बोलावून सांगितले, “ मी बाजारला भाजीपाला विकायला जातो आहे. आता रोज मी भाजीपाला विकून आलो की, तुला दहा रुपये देत जाईन. त्यातले पाच रुपये तू खर्च करायचे  आणि पाच रुपये आपल्या शेतातल्या झाडीतल्या  विहिरीत फेकून द्यायचे. ”
      केदारला तेवढेच पाहिजे होते. रोज दोन रुपयाच्या जागी पाच रुपये मिळणार असतील तर कोणाला नको आहे? तो वडील सांगतील तसेच करू लागला. एक दिवस ठरल्यानुसार गोरखनाथने आजारी पडल्याचा बहाणा केला. केदारला जवळ बोलावून म्हणाला, “ बाबा रे, माझ्या अंगात ताप भरला आहे. अशक्तपणाही  आला आहे. उद्यापासून काही दिवस तुलाच बाजारला जावं लागेल. शेताचीही काम करावी लागतील. नाही तर मग  मी तुला पैसे कोठून आणून  देणार? ”
      दुसर्या दिवशी केदार शेतावर गेलाभाजी तोडली. त्याच्या पेंड्या बांधल्या. हे करताना त्याला खूप कष्ट पडलेभाज्याचे गाठोडे  बांधून बाजारात गेला.   संध्याकाळी घरी आला तो फार थकून. एवढे करूनही तो फक्त दहा रुपयेच कमवू शकला होता. त्याने अगोदरच पाच रुपये खर्च केले होते. उरलेले पाच रुपये विहिरीत टाकायला गेला. चालता चालता विचार करू लागला, एवढे कष्ट करून मिळवलेले पैसे विहिरीत कसे टाकायचे? तरीही मन मारून त्याने पाच रुपये विहिरीत टाकले.
      पुढच्या दिवशीही असेच घडले. पण विहिरीत पैसे फेकायला त्याचे मन तयार होईना. बराच वेळ विचार करत उभा राहिला आणि शेवटी मनाचा हिय्या करून पाच रुपये विहिरीत फेकून माघारी परतला. तिसर्या दिवशी मात्र त्याचे धाडस झाले नाही. विहिरीत पैसे न फेकताच तो माघारी फिरला. वडिलांना म्हणाला, “ बाबा, एवढे मोठे कष्ट उपसून पैसे कमावयचे आणि ते विहिरीत फेकायचे? जर हेच पैसे साठवले तर भविष्यात आपल्या कामाला येतील. ”
      गोरखनाथ म्हणाला, “केदारबाळा, मी रोज तुला दहा रुपये देत होतो, त्यावेळेला तू असा  का विचार केला नाहीस? ”
      “  बाबा, माझी चूक झाली. त्यावेळेला मला कष्टाचे मोल माहित नव्हते. पण आता समजून चुकलो आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही. ”
      गोरखनाथ हसला. म्हणाला, “बाळ  जा, ती विहीर कोरडी आहे. तिला पायर्याही आहेत. त्यात फेकलेले पैसे काढून घेऊन ये. आता तुला पैशाचे मोल कळले ना, हेच मला हवे होते. ”  केदार आनंदला. तो धावतच विहिरीकडे गेला. विहिरीत उतरल्यावर पैशांचा ढीग पाहून चकीत झाला. ते सगळे पैसे गोळा करून घरी परतू लागला. वाटेत विचार करू लागला, आपण उगाचच पैसे खर्च करत होतोे. ते पैसे साठवले असते, तर सायकल घेण्याइतपत पैसे जमले असते. अजूनदेखील वेळ गेली नाही. हे पैसे आणि आणखी थोडे पैसे जमवून उपयोगाच्या काही गोष्टी करता येतील. ही  योजना त्याने आपल्या बाबांना सांगितली. गोरखनाथने त्याला गळ्याशी धरलं आणि म्हणाला, “ आता तुला पैशाची किंमत कळाली, माझ्या मनावरचं फार मोठं ओझं कमी झालं. मी निर्धास्त झालो. मुलं शहाणी  झाली की, मोठ्यांची काही काम उरत नाहीत. आता मी तीर्थयात्रा करून येतो. तू तुझा व्यवसाय सांभाळ. ”
      खरोखरच केदारने   व्यवसाय चांगला सांभाळलावाढविला आणि फुलविला. गोरखनाथ कृतकृत्य झाला.
kilbil.prahaar 2013
kilbil.mahasatta 2017


बालकथा अंधश्रद्धाळू आकाश




       संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्या आकाशानं विचारलं, “बाबा, माझा पेन आणलात?”
 “हो, आणलाय,” असे म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून एक पेन काढला आणि आकाशच्या हातात टेकवला.
 पेन पाहताच आकाशचा चेहरा उतरला.तो म्हणाला, “ हे काय हो बाबा, मी तुम्हाला निळ्या रंगाचा पेन आणायला सांगितला होता, तुम्ही हिरव्या रंगाचा आणलात. निळा रंग यश देतो, माहित नाही का तुम्हाला? ”
 “हे  कुणी सांगितलं तुला? ” बाबांनी चकित हो ऊन विचारलं.
 “नितीन म्हणाला असं!”आकाश म्हणाला.
 “कोण नितीन? ”बाबा
 “माझ्या वर्गात आहे तो! ”आकाश
 “असं काही नसतं! परीक्षेची तयारी कर. ” बाबा म्हणाले.
 “नाही बाबा, हिरव्या रंगाच्या पेनने परीक्षा दिली तर चांगले मार्क पडत नाहीत. ”आकाश म्हणाला.
 “आकाश, या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. हिरव्या-निळ्या रंगानं काही घडत नसतं. तू परीक्षेची चांगली तयारी केली असशील तर चांगले मार्क मिळतीलच. ” बाबांनी समजावलं.
 पण आकाश ऐकायला तयार नव्हताच. तो बाबांकडे निळ्या रंगासाठी हट्ट धरून बसला. तेव्हा बाबा म्हणाले, “आता सगळी दुकानं बंद झाली असतील.आता कोठून निळ्या रंगाचा पेन आणणार? ”
 पेन शोधता शोधता  बरीच रात्र झाली. शेवटी एकदाचा निळ्या रंगाचा पेन मिळाला. अजून त्याला परीक्षेची तयारी करायची होती. पण त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने आईला पहाटे पाच वाजता उठवायला सांगून झोपी गेला.
 पहाटे आईने त्याला उठवले. तो बेडवरून खाली उतरत होता, तोच आईला शिंक आली. तो पुन्हा बेडवर जाऊन पडला.
 आईने तो परत फिरून झोपल्याचे पाहून त्याला उठायला सांगून ती आपल्या कामाला निघून गेली. बाबांना तर त्याचा रागच आला. ते आकाशला म्हणाले, “आकाश, काल तू निळ्या पेनच्या भानगडीत अभ्यास केला नाहीस. आता उठतोस की नाही? साडेसहापर्यंतच तुला वेळ आहे. ”
 तेव्हा आकाश म्हणाला, “बाबा, नितीनने सांगितलंय की, कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुणी शिंकलं तर लगेच कामाला सुरूवात करायची नाही. ”
 बाबा म्हणाले, “अरे व्वा! आमचा आकाश तर चक्क अंधश्रद्धाळू बनला आहे. पण याच्याने तुझं नुकसानच होणार आहे. ” तरीही आकाश टाळत राहिला. दहा मिनिटांनंतरच तो अंथरुणातून उठला.
 परीक्षेच्या तयारीसाठी त्याच्याकडे फक्त साडेसहापर्यंतच वेळ होता.सातला तर त्याची स्कूलबस यायची. काल रात्री निळ्या पेनच्या शोधात आणि आज सकाळी शिंकेच्या भानगडीत  त्याची परीक्षेची तयारी काही म्हणावी अशी झाली नाही. त्यामुळे त्याला शालेला जाण्यासाठी तयार व्हायलाही वेळ झाला. बाबा आणि आकाश रस्त्यावर येताच त्यांना एक मांजर आडवं गेलं. आकाशने बाबांना थांबवले. एक मोटरसायकल पुढे गेल्यावर मग तो निघाला. स्कूलबस कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर येऊन थांबायची. पण तिथे गाडी होती ना मुलं! म्हणजे स्कूलबस निघून गेली होती. आकाशला शाळेत पोहचणं आवश्यक होतं, कारण आज परीक्षा होती.
 एक रिक्षा आली. बाबांनी त्याला हाक दिली. दोघेही रिक्षात बसायला पुढे निघाले, तोच आकाश जागच्या जागी थांबला. बाबांनी विचारल्यावर आकाश म्हणाला, “बाबा, गाडीचा नंबर 1301 आहे. तेरा हा अंक अशुभ असतो. या रिक्षाने गेलो तर परीक्षा चांगली जाणार नाही. आपण दुसर्या रिक्षाने जाऊ.”
 आकाशची गोष्ट ऐकून बाबांना भलताच राग आला. ते म्हणाले, “तुझे डोके-बिके फिरलेय का काय? कुठल्या अंधश्रद्धेच्या बाता मारतोयस तू? या घडीला तुला शाळेत पोहचणं, महत्त्वाचं आहे. चल, रिक्षात बस बघू.आधीच उशीर झाला आहे. ”
 पण आकाश आपल्या गोष्टीवर अडून राहिला. रिक्षावाल्याला दुसरे भाडे मिळाले. तो निघून गेला. बर्याच उशीराने एक रिक्षा आली.
 दोघे शाळेत पोहचले. परीक्षा सुरू होऊन अर्धा तास झाला होता. आकाश वर्गात गेला. त्याचे बाबा घरी आले. दुसरा शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती.
 दुपारी आकाश शाळेतून घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई-बाबांनी त्याला विचारल्यावर त्याने पेपर खूपच कठीण गेल्याचे सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, “बघितलसं,अंधश्रद्धेच्या आहारी गेलं की काय होतं ते! मी तुला अगोदरच सांगितलं होतं, असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस म्हणून! ”
 बहुतेक ही गोष्ट आकाशच्या लक्षात आली असावी.त्याने हो म्हणत मान हलवली होती.तेवढ्यात आई म्हणाली,असू दे, आता हात-पाय धुवून घे. काही तरी खा. आणि पुढच्या पेपरच्या तयारीला लाग. ”
 आईची गोष्ट ऐकून आकाश हात-पाय धुवायला उठणार तोच, बाबांना शिंक आली. बाबा म्हणाले, “आकाश, मला शिंक आली. आता तू दहा मिनिटे असाच बसणार का? हात-पाय धुवायला जाणार नाहीस काय?”
 “नाही बाबा, आता या भानगडीत पडणार नाही. मला सगळं काही समजून चुकलं आहे. या सगळ्या गोष्टी बेकार आहेत. ” असे म्हणून आकाश हात-पाय धुवायला बाथरुममध्ये गेला.