विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांकडे अनेक आयामांनी पाहावे लागेल.थ्री इडियट्स या चित्रपटात हा मुद्दा चांगल्या प्रकारे मांडण्यात आला आहे. मुलांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार त्यांचे भविष्य निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हा संदेश या चित्रपटातून मिळतो. मात्र समस्या अशी आहे की पालक आपल्या महत्त्वाकांक्षा मुलांवर लादताना दिसतात. त्यामुळे मुलांना हे समजत नाही की ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असलेले ध्येय त्यांच्या हिताचे आहे की त्यांच्यावर लादलेले ओझे आहे.
उच्च माध्यमिक परीक्षेनंतर विद्यार्थी निवडू शकतील अशा तांत्रिक अभ्यासक्रमांसाठीच्या उच्चस्तरीय संस्था देशात फार कमी आहेत. मागणी आणि पुरवठ्याचा समतोल साधण्यासाठी दर्जेदार अशा उच्च शिक्षण केंद्रांची संख्या वाढवली पाहिजे. तसेच, शिक्षकांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी फॅकल्टी समृद्धी (संकाय अभिवर्धन) कार्यक्रम तीव्रतेने चालवले जाऊ शकतात. याशिवाय देशातील उच्चस्तरीय शिक्षकांना राष्ट्रीय संपत्ती मानून त्यांची व्याख्याने इतर संस्थांना ऑनलाइन उपलब्ध करून देता येऊ शकते. ज्या उच्च स्तरीय शैक्षणिक संस्था आहेत, त्यांचा अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धती इतर संस्थांमध्ये सक्तीने लागू केल्या पाहिजेत.
स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमातही बदल आवश्यक आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. संशोधन अभ्यास दर्शवितो की जे विद्यार्थी खेळापासून दूर राहतात ते तणाव नीटपणे हाताळू शकत नाहीत. जे विद्यार्थी क्रीडा उपक्रमात सहभागी असतात त्यांना पराभव कसा पचवायचा हे माहीत असते. याशिवाय 10वी आणि 12वी मध्ये मिळालेल्या गुणांना स्पर्धा परीक्षांमध्येही महत्त्व दिले पाहिजे. यासाठी सीबीएसई आणि राज्य बोर्डाच्या परीक्षा समप्रमाणात घेतल्या जाऊ शकतात. वास्तविक आता संपूर्ण देशात एनसीईआरटी (NCERT) पुस्तके लागू झाली आहेत. त्यामुळे देशभरात एकच परीक्षा प्रणाली लागू करणे व्यावहारिक ठरेल. शालेय शिक्षणादरम्यान नैतिक शिक्षणाकडेही लक्ष दिले पाहिजे. कोचिंग संस्थांनीही पालक आणि विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करायला हवी.
सध्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे 10वी, 12वी बोर्ड परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची पातळी आणि पॅटर्नही सारखाच असायला हवा. असे केल्याने सर्वात मोठा फायदा म्हणजे शाळेतील शिक्षकांचा शैक्षणिक स्तर आपोआप वाढेल. शाळेतील शिक्षकांची गुणवत्ता पातळी वाढली की कोचिंग संस्थांची मागणी नक्कीच कमी होईल. कोचिंगमध्ये शिकणारे विद्यार्थी इतके एकाकी, अलिप्त पडतात की आजूबाजूला काय चालले आहे याकडे ते फारसे लक्ष देत नाहीत. साहजिकच त्यांच्या विचाराची व्याप्तीही संकुचित होत जाते. त्यामुळे या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात सामान्य ज्ञानाचाही भाग असायला हवा. त्यात विद्यार्थ्यांचे वर्तमान ज्ञान आणि क्रीडा उपक्रमांची माहिती देखील समाविष्ट असायला हवी. दबावावर मात करण्यासाठी शाळांमध्ये मनोरंजनाशी संबंधित उपक्रम आयोजित करण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. लक्षात ठेवा, शिक्षण आणि करिअर महत्त्वाचे आहेत, परंतु ते जीवनापेक्षा अधिक महत्त्वाचे नाहीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment