Tuesday, October 10, 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या कामगिरीने आशा उंचावल्या

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे देशवासीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. असं म्हटलं जातं की नशीब शूरांना साथ देतं. या म्हणीचा उलटा अर्थदेखील तितकाच खरा आहे.  म्हणजे भ्याडांच्या मागे दुर्दैव लागतं. आपलं सुदैव असं की, चीनच्या भूमीवर आपल्या खेळाडूंनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत पदकांची कमाई केली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिल्यांदाच आमच्या खेळाडूंनी 107 पदके जिंकून सुवर्ण इतिहास रचला.यापूर्वी 2018 मध्ये इंडोनेशियामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सर्वाधिक 70 पदके जिंकली होती.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पदकांचे शतक ही भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी आहे. 'खेलो इंडिया' मोहिमेचे परिणाम आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दिसू लागले आहेत, हेही या यशावरून सूचित होते.भारत हा सध्या जगात फक्त क्रिकेटसाठी ओळखला जातो. इतर खेळांमध्येही भारत जगावर वर्चस्व गाजवू शकतो हे या वेळी आशियाई खेळांनी दाखवून दिले. भारतीय पुरुषांबरोबरच महिलाही या क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करत आहेत, हेही उल्लेखनीय आहे. महिला कबड्डी संघाने सुवर्ण जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात ऐतिहासिक 100 वे पदक जमा केले.भालाफेक, लांब पल्ल्याची शर्यत, तलवारबाजी, तिरंदाजी, नेमबाजी, टेबल टेनिस इत्यादींमध्येही महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या ऐतिहासिक कामगिरीमध्ये ग्रामीण भागातून पुढे आलेल्या महिलांचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, अनु राणी ही गावातल्या शेतात ऊसाला भाला समजून फेकायची, तर पारुल चौधरी ही खेळाडू गावातील कच्च्या रस्त्यावर धावण्याचा सराव करायची. दोघांच्या साधनेचे सार्थक झाले. साहजिकच, भारतातील शहरांबरोबरच गावांमध्येही क्रीडा प्रतिभेची कमतरता नाही, हे अधोरेखित झाले.प्रेरणा, प्रोत्साहन आणि प्रशिक्षण अशा कलागुणांना वाव देऊ शकतात.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने पुढील वर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आशेचे नवे दरवाजे उघडले आहेत. ऑलिम्पिकमधील भारताच्या पदकांची संख्या सातच्या पुढे वाढलेली नाही. आता येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपण पदकांचा दुहेरी आकडा गाठू शकतो, अशी आशा बाळगायला हरकत नाही. ज्याप्रमाणे प्रवाशांना अवकाशात पाठवण्यापूर्वी नासाच्या प्रयोगशाळेत अवकाशाशी जुळवून घ्यायला लावले जाते, तशीच तयारी आणि सुविधा आपल्या क्रीडा संस्थांनी खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या तर ते ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी दाखवू शकतात.मैदान भारतीय असो की विदेशी, त्याचा आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर फारसा परिणाम होत नाही, हे चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून स्पष्ट झाले आहे. या खेळांमध्ये आमच्या खेळाडूंनी जो  उत्साह, धाडस आणि जोश दाखवला आहे, तो भविष्यातही कायम ठेवण्याची गरज आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली (आयर्विन टाइम्स अग्रलेख)

No comments:

Post a Comment