Thursday, September 28, 2023

विश्वचषक तयारी: ऑस्ट्रेलियावरील विजयाने आत्मविश्वास बळावला


पुढील आठवड्यापासून वातावरण क्रिकेटमय होणार आहे.50 षटकांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे.जेव्हा-जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची कोणतीही मोठी स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा टीम इंडियाकडून विजेतेपदाची अपेक्षा केली जाते. महत्त्वाचे म्हणजे यंदाचा यजमान भारत असल्याने यावेळी अपेक्षाही जास्त आहेत. तसेच सध्या एकदिवसीय, टी२० आणि कसोटी सामना या तिन्ही प्रकारामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आशिया चषकातील विजय आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील नुकतीच झालेली कामगिरीदेखील भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याची साक्ष देत आहे. पण आव्हान सोपे नाही. जवळपास प्रत्येक संघातील महान खेळाडूंना भारतीय परिस्थितीची चांगली जाणीव आहे.

इंडियन प्रीमियर लीगने केवळ भारतीय क्रिकेटचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आताच्या विश्वचषकातील सहभागी संघांमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या कामगिरीमुळे आयपीएल सुपरस्टारचा दर्जा मिळवला आहे.या खेळाडूंना भारतातील जवळपास प्रत्येक खेळपट्टीचे वर्तन कसे आहे, हे चांगलेच माहीत आहे. फ्रँचायझी संघांच्या विजयात हे खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. फक्त पाकिस्तान आणि नेदरलँड्स सारखे संघ अपवाद असतील. भारत-पाक संबंध बिघडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा मिळत नाही. अर्थात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या 13व्या क्रिकेट विश्वचषकासाठी दहाही संघ दावा करत आहेत. विश्वचषकाच्या ताकदीच्या कसोटीवर म्हटलं तर कोणताही संघ लहान किंवा मोठा नसतो. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं आणि याचा फटका मोठ्या संघांनादेखील बसला आहे. आणि याचा इतिहास साक्षी आहे. सामन्याच्या दिवशी जो चांगला खेळेल तो जिंकेल.  अफगाणिस्तान असो की श्रीलंका किंवा बांगलादेश, सगळेच समीकरण बदलवू शकतात.

पण भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रार्थना एकच असणार की भारताने केवळ फायनलच खेळू नये नाही तर तो जिंकावा. पूर्वी जिंकण्यासाठी संघ आपल्या मोठ्या,स्टार खेळाडूंवर अवलंबून असायचे. पण आता खास गोष्ट अशी आहे की प्रत्येक संघातील टॅलेंटदेखील आपला चमत्कार दाखवत आहेत. विश्वचषक संघात ज्यांना स्थान मिळाले नाही त्यांनीदेखील आपली उपस्थितीची जाणीव निवड समितीला करून दिली आहे. भारताने ज्या स्फोटक पद्धतीने आशिया चषक जिंकला त्यामुळे इतर संघांवर नक्कीच दडपण असणार आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारख्या दिग्गज खेळाडूंना बाहेर ठेवूनही आम्ही जिंकत आहोत. भारतासाठी स्वतःच्या मैदानावर आणि स्वतःच्या प्रेक्षकांमध्ये ही सुवर्णसंधी आहे.  2011 च्या विश्वचषक विजेतेपदाच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी! 

28 वर्षांनंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतासाठी मोठे यश वाट पाहत आहे. रोहित शर्माला संतुलित संघ मिळाला आहे.  संघाकडे अनुभवासोबतच आश्वासक प्रतिभाही आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडच्या काही दिवसांपासून वेगवान गोलंदाजदेखील सर्व परिस्थितींमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाने संघाचे आक्रमण अधिक धारदार झाले.  मोहम्मद शमीने आशिया कपमध्ये आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद सिराजने आपली क्षमता दाखवली आहे. शार्दुल ठाकूरही संघात आहे.  पण त्यात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल, अशी अपेक्षा असणार आहे. भारताने कुलदीप यादव, रविंदर जडेजा आणि अक्षर पटेल यांना संघात ठेवले होते.  मात्र अक्षर दुखापतग्रस्त असल्याने ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला त्याची जागा मिळू शकते. प्रतिस्पर्धी संघांमध्ये अनुभवी फलंदाजांची मुबलकता लक्षात घेता त्यांचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. 

शुभमन गिल गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे.  त्याने सलामीवीराची समस्या सोडवली आहे. यावर्षी तो पाच शतके झळकावत शानदार फलंदाजी करत  आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतक झळकावून श्रेयस अय्यरनेही संघात आपली दावेदारी वाढवली आहे. रोहित, विराट आणि केएल राहुल हे संघाचे आधारस्तंभ आहेत.  फिटनेसच्या समस्येनंतर परतल्यानंतर राहुलने काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. हार्दिक पांड्या आणि रविंदर जडेजा अष्टपैलू म्हणून कायम राहतील. 

 28 वर्षीय बाबर आझमच्या पाकिस्तान संघाची कामगिरी त्याच्या भक्कम इराद्यांवर अवलंबून आहे. गोलंदाजीतील आक्रमकता हे पाकिस्तानचे बलस्थान आहे.  शाहीन आफ्रिदी, रौफ आणि अनुभवी हसन अली हे त्रिकूट कोणत्याही फलंदाजाला अडचणीत आणू शकते. मात्र नसीम शाहच्या दुखापतीमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम त्यांच्या संभावनांवरही होणार आहे. शादाब, नवाज आणि इमाम हे त्यांचे महत्त्वाचे फिरकीपटू आहेत.  जर खेळपट्ट्या मदत करत असतील तर ते कमाल करू शकतात.पण पाकिस्तानला पुढे जाण्यासाठी बाबरचा स्वतःचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे.  आशिया चषक स्पर्धेत रिकाम्या हाताने मायदेशी परतल्याने संघ निराश झाला असणार आहे.

या विश्वचषकासाठी सर्वात दुःखद बातमी म्हणजे वेस्ट इंडिज पात्र ठरू शकला नाही. पहिले दोन विश्वचषक जिंकणाऱ्या संघाने क्रिकेटला नेहमीच भक्कम फलंदाज आणि प्रतिस्पर्ध्याच्या उरात धडकी बसवणारे,  भितीदायक गोलंदाज दिले आहेत. आता त्याच्या गोलंदाजीची भीती तितकीशी राहिली नसली तरी त्याच्याकडे हेटमायर, रसेल, लुईससारखे मॅचविनिंग फलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका हे सर्व बलाढ्य संघ आहेत.  त्यांच्या खेळाडूंचा भारतात खेळण्याचा अनुभव प्रभावी ठरू शकतो. सर्व संघांना एकमेकांशी खेळावे लागणार आहे, त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी रोमांचकता अनुभवण्यासाठी तयार राहावे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment