Thursday, September 21, 2023

आभासी जग: लहान मुलांना मोठा धोका

सोशल मीडियाचा वापर जितका कमी होईल तितके चांगले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुलांच्या बाबतीत तर या सूचनेची अंमलबजावणी करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सोशल मीडिया वापरण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करावी. ही मर्यादा किमान २१ वर्षे असावी, असेही न्यायालयाने आपल्या तोंडी टिपण्णीत म्हटले आहे.न्यायालयाची चिंता रास्त आहे, कारण आजच्या युगात लहान मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या हातात स्मार्टफोन्स येण्याचे प्रमाण वाढत आहे. मुलांच्या सोशल मीडियाच्या व्यसनामुळे जगभरातील पालकही चिंतेत आहेत.

खर्‍या अर्थाने आजच्या युगात सामान्य माणूस खाता, पिता, उठता-बसता मोबाईलला डोळे लावून बसलेला असतो. कारण काय तर! विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीतरी नवीन पाहण्याची इच्छा! ही इच्छा मुलांमध्येदेखील व्यसनाचे रूप धारण करू लागली आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांच्या वापरासाठीच्या वयोमर्यादेबाबत मौन बाळगून आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. जिथे वयाचे बंधन आहे तिथे ते केवळ दिखावटी आहे. कारण वयाच्या पडताळणीसाठी कुठेही योग्य यंत्रणा नाही. त्यामुळे खोट्या जन्मतारखेवर सोशल मीडियावर अनेक खाती तयार केली जात आहेत.तथापि, इंटरनेटच्या जगात असे दिसून येत नाही की सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या वयाच्या आधारावर सामग्री पुरवली जाते. तसेच तसे होईल अशी शक्यताही दिसत  नाही. इथे जे काही उपलब्ध आहे ते प्रत्येकासाठी खुले आहे, जर वापरकर्ते मुले असले तरीही त्यांना ते सगळे बघायला मोकळीक आहे. सोशल मीडियाच्या गैरवापराचे धोके वेगळे आहेत. मुलांनाही यात सहभागी करून घेतले तर ते समाजासाठी मोठा धोका बनण्यास वेळ लागणार नाही.मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे आरोग्यविषयीचे धोके आताच समोर येऊ लागले आहेत. अमेरिकेतील डॉक्टरांनी एका संशोधनाद्वारे स्पष्ट केले आहे की, जी मुले सोशल मीडिया खाते वारंवार तपासत राहतात त्यांच्या मेंदूचा आकार लहान होऊ लागतो.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या चिंतेवर फक्त सरकारने  निर्णय घेणे पुरेसे नाही. सर्वात मोठी जबाबदारी पालकांवरदेखील आहे. पालकांना आपल्या मुलांनी सोशल मीडियापासून दूर राहावे असे वाटत असेल तर आधी त्यांनी स्वतःला याबाबतीत शिस्त लावली पाहिजे. पालकांनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह दिसणे आणि  मुलांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देणे शक्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सदस्यत्व देण्यासाठी केवळ ठोस नियम आणि कायदे बनवू नयेत तर त्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तरच आभासी जगातून जो धोका मुलांवर ओढवलेला आहे तो टळू शकेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment