Sunday, November 13, 2011

आजची सिनेमातली नायिका

एक काळ असा होता की, वेश्यासुद्धा चित्रपटात अभिनय करायला कचरायच्या. पण काळाचा महिमा आगाध आहे. पुढे अभिनय कलेला सन्मान मिळाला. चित्रपटांशी संबंधित महिलांना पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. प्रेक्षक त्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागले. आपल्या हृदयात जागा देऊ लागले. इतकेच नव्हे तर जगातले ताकदवान देशांचे शासनकर्तेसुद्धा त्यांना  आपले खास पाहुणे म्हणून सभा-सभारंभांमध्ये बोलवू लागले. मोठ-मोठे उद्योगपती, खेळाडू त्यांना आपली अर्धांगिनी बनवण्यासाठी  प्रयत्न करू लागले. त्यांच्यावर जीव टाकू लागले. अशा या  चंदेरी  पडद्यावरचा नारी प्रवास  मोठा  कठीण आणि रंजक राहिला आहे.
'लाइफ ऑफ क्राइस्ट' ( १८ ९ ६) या चित्रपटाने धुंडीराज गोविंद फाळके यांचे सारे जीवनच बदलून टाकले आणि त्याचबरोबर भारताचा मनोरंजनचा  इतिहाससुद्धा. या चित्रपटामुळे  प्रभावित झालेल्या दादासाहेब फाळके यांनी  'राजा हरिश्चंद्र' नावाचा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. ही पौराणिक कथा पडद्यावर आणण्यासठी त्यांनी साहित्याची जुळवाजुळव करायला सुरूवात केली. तयारीही जोरदार झाली. पण एका गोष्टीमुळे गाडा काही पुढे सरकेना. तो म्हणजे स्त्री पात्रासाठीची स्त्री कलाकार. त्यांनी जंग जंग पछाडले पण  चित्रपटात काम करायला स्त्री पात्रच मिळेना. त्यामुळे दादासाहेब फाळके पुरते वैतागून गेले. अगदी हताश होऊन त्यांनी वेश्यालयाचा दरवाजा ठोठावला. पण तेथेही निराशा .  इथल्या  महिलांनीसुद्धा  चक्क नकार दिला. हताश दादासाहेब हॉटेलवर आले. तिथल्या अण्णा साळुंखे नावाच्या एका वेटरला त्यांनी या पात्रासाठी गळ घातली. अण्णा साळुंखे महिलेच्या वेशभुषेत राणी तारामती म्हणून उभे राहिले. ७ मे १९१३ हा तो ऐतिहासिक दिवस होता. भारतात एक नवा सिनेमा 'राजा हरिश्चंद्र'च्या रुपात प्रदर्शित झाला होता. पण पुढच्या चित्रपटात एखादी महिलाच नायिकेच्या भूमिकेसाठी घ्यायची, असा त्यांनी  पण  केला.मराठी नाटकांमध्ये काम करणारी कमलाबाई गोखले सगळ्या विरोधांना जुगारून 'भस्मासुर मोहिनी' चित्रपटासाठी काम करायला तयार झाल्या. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे महिलांसाठी करिअर म्हणून नवे क्षेत्र खुले झाले. यथावकाश चांगल्या आणि सन्मानित कुटुंबाच्या महिला, इतकंच नव्हे तर बुरख्याआड जीवन कंठणार्‍या मुस्लिम स्त्रियासुद्धा याकडे आकृष्ट हो ऊ लागल्या. 
 या दरम्यान देशातली  परिस्थितीही मोठ्या गतीने  बदलत गेली.  महात्मा गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महिला आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या.  देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या  भावनेबरोबरच  त्यांच्या स्वतः च्या स्वातंत्र्याच्या  इच्छा- आकांक्षाही या निमिताने  व्यक्त होत होत्या.  या राजकीय-  सामाजिक परिस्थितीचा चित्रपटाच्या कथा नायिकांच्या प्रस्तुतीकरणावर व्यापक असा प्रभाव पडला. चित्रपटांमध्ये महिलांचे विषय हाताळले जाऊ लागले.  तीस आणि चाळीसच्या दशकात महिलांच्या समस्यांवार आधारित  ' दुनिया न माने', 'दहेज', आणि सिंदूर सारखे चित्रपट आले.
महिलांनी  अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले खरे, पण त्यांचा पुढचा प्रवास सहजसोपा नव्हता. त्यांच्याकडे साहस आणि अथक परिश्रमाची तयारी  असतानासुद्धा सिनेमा आणि कलाकार यांना  विशेषतः स्त्री कलाकारांना सन्मानाच्या दृष्टीकोनातून  पाहिले जात नव्हते. नार्तिका असल्यामुळे  होणारी असह्य टीका आणि सामाजिक बहिष्काराला कंटाळून दुर्गा खोटेसारख्या स्त्री कलाकाराने  आत्महत्या करण्याचाही  प्रयत्न केला होता. नसीम बानू यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले होते. कारण कॉलेजचे वातावरण खराब होईल या भीतीने  कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश नाकारला होता. पण तरीही या नायिका  हार मानून घरात बसल्या नाहीत. त्या सतत संघर्ष करत राहिल्या . आपल्याला मिळालेल्या  अनुभवाचाही पुरेपूर वापर करत त्यांनी  विविध भूमिकांद्वारे  तो  पडद्यावरसुद्धा आणला. 
स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलत गेली. पन्नासचे दशक हिंदी चित्रपटांसाठी अक्षरशः सुवर्ण्युग  बनून आले. या दरम्यान नायिकाप्रधान चित्रपटही मोठ्या संख्येने आले. या चित्रपटातील सशक्त नारी पात्रांना नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, मालासिन्हा, वहिदा रहमान आणि नूतनसारख्या दर्जेदार अभिनयाच्या  स्त्री कलाकारांनी काळावर विजय मिळवला. काळ वेगाने बदलत होता आणि परिस्थितीही. त्याचा फायदा स्त्री कलाकारांनी घेतला.
साठच्या दशकात एक महिला ( इंदिरा गांधी) जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या ( भारत) पंतप्रधान बनल्या.  इंदिरा पंतप्रधान बनल्या, तेव्हा  सार्‍या जगासह देशातल्या काही जणांच्या  भुवया उंचावल्या होत्या. ही एकटी बाई  एवढ्या मोठ्या लोकशाही असलेल्या  देशाचा कारभार कसा काय  सांभाळणार ? असा सवाल केला जात होता. पण  इंदिरा गांधी यांनी विश्वस्तरावर लोहमहिलेच्या रुपात आपली ओळख बनवली आणि विरोधकांना चारीमुंड्या चित केले. याच काळात स्त्री पात्रांना केंद्रस्थानी ठेऊन उत्कृष्ठ चित्रपत तयार झाले. '' साहब, बीवी और गुलाम ( १९६२)'', ''बंदिनी' ( १९६३)'', '' गाईड (१९६५)'', '' ममता ( १९६६)'' सारख्या चित्रपटांमध्ये सहनशीलतेच्या ठिकाणी नायिकेच्या  जीवन चरित्रात  विद्रोहाची झलक दिसायला लागली. देशात पाश्चात्य संस्कृतीचा टवटवीतपणा आणि पारंपारिक बंधनाची उसवण यामुळे नायिकांच्या चरित्रात आधुनिकपणा दिसून येऊ लागला. ''आराधना ( १९६९)''  कुमारीमाता या  कथानकावर आधारित एक सुपरहिट्ट चित्रपट  होता. तर त्याच्या पुढच्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सफर' या यशस्वी चित्रपटात नायिका लग्नानंतरही खुलेआम आपल्या प्रियकराला भेटायला जाते , असा  तो संक्रमणाचा काळ होता, जो परंपरावादी नायिकांना  पडद्यावरून विदाई देण्याचा प्रारंभ होता. 
सत्तरच्या दशकात व्यावसायिक चित्रपटांमध्ये  नायिकांना चांगल्या भूमिका साकारायला मिळाल्या नसल्या तरी १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंकुर' पासून समांतर सिनेमे पडद्यावर नारी सशक्तीकरणाची ज्योत पेटवायला लागले. या चित्रपटांमध्ये नायिकेच्या रुपात प्रेक्षकांनी पडद्यावर अशा काही  महिलांना पाहिलं की, ज्या साधारण दिसत असल्या तरी अभिनयाच्या अंगाने  असाधारण होत्या. शबाना आझमी, स्मिता पाटील, आणि  दिप्ती नवल सारख्या उत्कृष्ट स्त्री कलाकार    असाधारण स्त्रीयांच्या चेहराचे प्रतिनिधीत्व करत राहिल्या.  ही स्त्री पात्रं सिनेमासाठी कल्पीत  नव्हती तर ती थेट समाजातून  आली होती, असे  भासवत होती. या स्त्री भूमिकांनी समाजतल्या महिलांना एक नवी शक्ती दिली. विश्वस्तरावर भारतीय स्त्री आपलं एक स्वतंत्र अस्तित्व बनवू इच्छित होती. विसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणात त्यांना ही संधीही मिळाली. संचारक्रांती आणि आर्थिक उदारिकरणामुळे जग एक ग्लोबल विलेज' बनून गेलं. भारत विश्व व्यापाराचं केंद्र बनलं. देशात अचानक विश्वसुंदरींचा पूर आला. चित्रपट नायिकांचे सौंदर्याचे मापदंड राष्ट्रीय न राहता आंतरराष्ट्रीय बनून गेले. एक अशी कमोडिटी  तयार झाली की, त्यात  ग्लोबल अपील डोकावू लागलं. 
 २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या जिस्म' मुळे नायिकांच्या  विवाहित असूनही परपुरुषाच्या बाहुत रमणारी स्त्री आणि गरमागरम दृश्ये यांच्या भडकावू  सादरिकरणामुळे सार्‍या परंपरा उध्वस्त झाल्या. ''सत्ता'', '' एतराज'',  ''लीला'', ''अस्तित्व'', ''क्या कहना'', ''लज्जा'' आणि ''फॅशन''सारखे अनेक चित्रपट आले. यातली नायिका आपल्या जीवनात कुणाचाच हस्तक्षेप खपवून घ्यायला तयार नव्हती. त्यांच्या योग्य अथवा अयोग्य निर्णयासाठी फक्त आणि फक्त ती स्वतः मालकीण होती. त्याला स्वतः च जबाबदार होती.  आश्चर्याची गोष्ट अशी की, तिला  आपल्या अनैतिक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करावासा  वाटला नाही. या चित्रपटांच्या सगळ्या नकारात्मक बाजूंचा विचार करता आता स्त्रीसुद्धा पुरुषासमान आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेऊ इच्छित  असल्याचंच  अधोरेखीत करते. आजच समाजतलं वास्तव सिनेमात प्रतिबिंबीत होत आहे. 
 हीच  स्त्रीची स्वातंत्र्याची  प्रबळ  इच्छा, अशा चित्रपटांच्या निर्मितीचा  मार्ग सुकर करताना दिसतात. आपल्या  नायिकेच्या जीवनात पुरुषाची साथ  असो अथवा नसो पण  स्वतः चे आयुष्य स्वतः धुंडाळणारी आणि त्याला आकार देणारी आजची स्त्री मनाने कणखर बनत चालली आहे. तिला कुणाच्या मदतीची , दयेची भीक नको आहे.  अद्याप  किनारा अजून लांब असला तरी ही एक चांगली सुरूवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. - मच्छिंद्र ऐनापुरे   

Saturday, November 5, 2011

कविता


मी म्हणालो....
मी कळ्यांना विचारलं
जरा बालपण उधार द्याल का?
मी परतवेन संध्याकाळपर्यंत
कळ्या हसल्या, लाजल्या,
मग म्हणाल्या,
" काही वर्षांपूर्वी
तुझ्यासारखाच आला होता न्यायला
हसरं बालपण.
तो तर नाही परतवू शकला आजतागायत
तू नक्की येशील संध्याकाळ्पर्यंत ?
मी म्हणालो, तुम्ही विश्वास ठेवा
त्या म्हणाल्या,
ज्याचा स्वतः वरच विश्वास नाही
मग कसा ठेवावा विश्वास त्याच्यावर?.....
    मी फुलांना विचारलं,
जरा यौवन उधार द्याल का ?
त्या आखडल्या,
अभिमानाने फुलल्या
नी बोलल्या,
यौवन तुला देऊ ?...
तुही काही द्यायला आला असशील?
काही शोभणारी भेटवस्तू आणलीस ?
काही वेळ थांबलो मग म्हणालो,
मी जन्मजन्मांतराचा तहानलेला आहे,
जीवनात निराशलेला आहे
हसर्‍या सुमनांनी टोकलं,
कधी  पूजा-बिजा  केली असशील,
सण साजरा केला असशील एखादा अथवा
केलं असशील कुणाचं तरी अभिनंदन !
आम्हालातोडलंस, कुस्करलसं, तुडवलसं
पण ऐकलास आमचा आक्रोश ?
कसं उदवस्त केलंस जीवन ?
ज्याच्या नसा-नसात स्वार्थ भरून राहिलाय,
जो सगळ्यांच्या मार्गात काटे रचतोय
त्याला जीवनात नाही कधी
काही मिळत....
मी दिड्.मूढ हो ऊन
जड पावलांनी निघालो
हटकलं मला कुणी तरी,
वळून पाहिलं-
वटलेला वृक्ष अति विनम्र स्वरात म्हणाला,
" ये, मी देतो
अनुभवानं भरलेलं म्हातारपण"
मी पून्हा घाबरलो,
"नको रे बाबा
मला नकोय ते म्हातारपण
म्हातार्‍या वृक्षानं समजावलं, " अरे वेड्या,
 माझं वृद्धत्व मला काही जड नाही
पण इतकं लक्षात ठेव
बालपण, जवानी अथवा काहीही
कधी घेऊ नकोस उधार
आपल्याजवळच्या गोष्टींवर करावं प्रेम
जे जवळ नाही
त्याचे नको दु: ख करूस
लक्षात ठेव,
जे काही आपलं आहे
त्यातच समाधान मानावं

Friday, November 4, 2011

बालकविता

                     कावळेमामा
           कावळेमामांनी विचार केला
           आपण आता सिनेमात जाऊ
           सार्‍यांना गाणे ऐकवून
           खूपसा सन्मान मिळवू
                                  खरेच! त्याचं नशिब पालट्लं
                              एका सिनेमात काम मिळालं
                              त्याचं गाणं ऐकून
                             जग सारं बुचकाळ्यात पडलं
           शेवटी रहस्य उमगलं सार्‍यांना
           जे गाणं त्यानं होतं म्हटलं
           कोकिळेच्या गोड स्वरात
           डायरेक्टरनं चित्रीत होतं केलं         - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
                      सांगा पाहू कोण?
       काळा लांब एक चोर
       चालता चालता गायब होतो
       सभोवताली लाकडी पेहराव
       सांगा पाहू कोण तो ?      ( पेन्सिल)
                    लहान- मोठे तीन भाऊ
          दिवस-रात्र फिरत असतात
          मात्र बाहेर ते पड्त नाहीत
          जग त्यांचं चारभिंतीच्या आत     ( घड्याळ )
           काचेचा एक महाल
         त्यात जळते एक मशाल
          यात ना राजा- राणी
          सांगा पाहू कोणता माल          ( बल्ब)
   एका चोराचं शरीर हो पांढरं
   डोकं आहे हिरवंगार
   अर्धानिम्मा गाडला जातो
   मार देतो तिखटजार     ( मूळा)           - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

                          टीव्ही
       उंदराने दिला सल्ला
       थांबा , माकड्मामा जरा
       ऐका गोष्ट माझी
       सोडा आता ड्रामा सारा
                     कुठवर राहता सडे एकटे
                     ते तरी आज सांगा मला
                    गोष्ट सांगतो भल्याची
                    छानशी मामी आणा मला
              माकड म्हणाले, उंदीर बाळा
       कशी आणू रे मामी
       सारा पैसा जोडून जोडून
       कालच आणला टीव्ही              - मच्छिंद्र ऐनापुरे, जत




                            उंदीरमामाची करामत
         हत्ती तलावात
         डुंबत असतो
         मजेत तुषारे
         झेलत असतो
                        इतक्यात उंदीरमामा
                        येतात बापुडे
                       म्हणतात हत्तीदादा
                      या इकडे
   हळूच हत्तीदादा
   बाहेर येतात
   मामा म्हणतात,
   काही नाही जा परत
                    काय झालं रे ?,
                   हत्तीदादा पुसतात
                   हरवलेली चड्डी शोधतोय,
                   उंदीरमामा म्हणतात        - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

बालकविता                     खरंच जर ... . !
          खरंच जर
          चमत्कार अस्ता झाला
          खूप झाडाला लकडला पैसा
                  तोडून घ्यायचे
                  मजेत राहयचे
                खूप सारे जग फिरायचे
    
     तर्‍हेतर्‍हेची
     खेळ- खेळणी
     आणले अस्ते भरभरूनी
                    खूप सुंदर
                    बालपण अस्ते
                    उणिवांना जागा नस्ते
      मम्मी पप्पा
      रागावले नस्ते
      आपले स्वप्न भंगले नस्ते           - मच्छिंद्र ऐनापुरे
                             झाड
                       दाट झाडाची
                       अदभूत छाया !
                                 कडक उन्हात
                           आमचं रक्षण
                           थकल्या पाथकास
                           त्याचं निमंत्रण
                      हिरवीगार त्याची
                      त्याची काया !
                            सगळ्यांना ते
                            उपयोगी पडते
                            फळा-फुलांनी
                            छान दिसते
                देव समान
                त्याची माया!              - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

बालकथा सल्ला विकणारे दुकान


    एका गावात एक विचित्र असं दुकान होतं. तिथं चक्क सल्ले विकले जायचे. राजाराम नावाचा माणूस दुकान चालवायचा. ज्याला कुणाला सल्ल्याची गरज भासे, त्यांना तो सल्ला विकत देई. एका सल्ल्याची किंमत होती दोन आणे. त्याकाळात ती किंमत मोठीच होती. मात्र त्याच्या सल्ल्याचा अनेकांना लाभ झाला होता.
    एक दिवस राजारामच्या दुकानात एक व्यापारी आला. त्याने राजारामकडून तीन सल्ले विकत घेतले. त्यातला पहिला सल्ला होता, प्रवासाला निघताना  पत्नीला काहीही  सांगू नये. दुसरा होता, वाटेत काही खाऊ नये  आणि तिसरा सल्ला होता, भावनेच्या आहारी जावून कधी कुणाशी पैज लावू नये. सल्ले घेऊन व्यापारी घरी परतला. त्याने सल्ल्याची सत्यता पडताळून पाहायचे ठरवले. दुसर्‍यादिवशी तो पत्नीला काहीही न सांगता नऊ थैलांमध्ये नऊ हजार रुपये घेऊन शहरात व्यापारासाठी निघाला.
    व्यापारी बरेच अंतर चालल्यावर त्याला भूक लागली. पुढे  रस्त्याकडेला त्याला एक विहीर दृष्टीस पडली. तिथे थांबून त्याने भोजन केले आणि पुढच्या प्रवासाला निघाला. काही अंतर चालल्यावर त्याने आपल्या पैशाच्या थैल्या मोजल्या. त्या आठच निघाल्या. तो घाबरून पुन्हा माघारी परतला. सुदैवाने विहिरीजवळ  थैली तशीच  पडलेली होती. त्याने ती उचलली आणि पुन्हा आपल्या मार्गाला  लागला. इतक्यात त्याच्या पायात काटा मोडला. त्याने वाकून पायाचा काटा काढला पण काय आश्चर्य ! त्याच्या पायाला उठलेले कुरूप बरे झाले होते. बाजूलाच काट्याचे झाड होते. या काट्यांमध्ये अदभूत औषधी गुण असावा , असे त्याला वाटले. त्याने  ती जागा नीट न्याहळली व लक्षात ठेवली, जेणेकरून माघारी परतताना काटे घेऊन जाता येतील.
    व्यापारी शहरात गेला.व्यापार केला. उधारी वसूल केली. माल आणण्याची व्यवस्था लावली आणि शेवटी  माघारी परतला. मात्र येताना काट्याची गोष्ट विसरला. गावात आल्यावर त्याच्या कानी एक वार्ता पडली. गावच्या  श्रीमंत पुढार्‍याच्या पायाची जखम भलतीच वाढली असून ती कमी होण्याचे नावच घेत नव्हती. कित्येक वैद्य, हकिम झाले, पण फरक पडला नव्हता. उलट जखम वाढत चालली होती. त्यामुळे जो कोणी जखम बरी करेल, त्याला दहा हजाराचे बक्षीस मिळेल, असे जाहीर करण्यात आले होते. व्यापार्‍याच्या लक्षात काट्याची गोष्ट आली. ती येताना विसरल्याचे त्याला खूप वाईट वाटले. जाऊन काटे आणावेत आणि बक्षीस जिंकावे, असे त्याला वाटले.  
   तो पत्नीला म्हणाला," मी प्रवासात जखम बरी करणारे झुडूप पाहिले आहे. त्याच्या काट्यात अदभूत असा औषधी गुण  आहे. जखम तात्काळ बरी होते. ते आणून दहा हजाराचे बक्षीस पटकावतो."  दरम्यान तो व्यापारी राजारामचे सल्ले विसरला होता. त्याच्या बायकोला खूप आनंद झाला. तिने काटे लवकर आणायला सांगितले.  व्यापार्‍याच्या पत्नीला ही गोष्ट मोठी रहस्यमय वाटली. तिच्या पोटी ती पचली नाही. तिने ती आपल्या शेजारणीला सांगून टाकली. तिने ती आपल्या नवर्‍याला सांगितली.
    काटे आणायला निघालेल्या व्यापार्‍याला वाटेत अचानक आपला शेजारी दृष्टीस पडला. बोलता- बोलता दोघेही एकाच कामासाठी निघाल्याचे त्याच्या लक्षात आले. " धनी पुढार्‍याची जखम मीच बरी करू शकतो", व्यापार्‍याने दावा केला. " माझ्याजवळसुद्धा याच्यावर जालीम उपाय आहे", शेजारी म्हणाला.  " पण तू ती जखम बरी करू शकणार नाहीस", व्यापारी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला.
    " नक्की बरी करेन. हवं तर पैज लाव." शेजारी म्हणाला. व्यापार्‍याने सल्ले विकत घेतले होते, याचा त्याला विसर पडला होता. व्यापारी पैजेला तयार झाला. " तू पैज जिंकलीस तर माझ्या घरातील कुठल्याही वस्तूला पहिल्यांदा स्पर्श करशील ती तुझी आणि हरलास तुझ्या  घरातील .... " शेजारी त्याचे बोलणे एकदम तोडत  कबूल  झाला.
    दोघेही पुढे निघाले. वाटेत व्यापारी भोजनासाही थांबला. व्यापार्‍याला आत्मविश्वास होता, आपणच पुढार्‍याची जखम  बरी करू शकतो. त्यामुळे त्याने काही घाईगडबड केली नाही. दरम्यान शेजारी मात्र पुढे निघून गेला. भोजन झाल्यावर आरामात विहिरीजवळ गेला. झुडुपाची एक काटेरी फांदी तोडली. आणि माघारी परतला.
    गावात आला तर त्याला धनी पुढारी खडखडीत बरा झाल्याचे कळले. शेजार्‍याने काटे आणून त्याची जखम कधीच बरी केली होती.   आणि बक्षीसही पटकावले होते. व्यापार्‍याला आता दुसरीच भीती सतावू लागली. पैजेनुसार शेजारी आपल्या घरात घुसला आणि खजिन्याच्या संदूकीला स्पर्श केला तर ....  बाप रे ! आपण पुरते लुटले जाणार. त्याला काहीच सुधरेना. अचानक त्याला सल्ल्याचे दुकान आठवले. तो धावत-पळत राजारामच्या दुकानात गेला. राजारामचे  पाय धरले. आपल्यावर  गुदरलेल्या बाक्या प्रसंगाची कहानी त्याने रडवेला होऊन सांगितली. "मला असा एखादा सल्ला द्या, ज्यामुळे माझे काहीही नुकसान होणार नाही." व्यापारी काकुळतीला येऊन म्हणाला.
   " जे झालं ते झालं. तू काहीही काळजी करू नकोस. आता घरी जा.   तुझी खजिन्याची पेटी घराच्या माळवदीवर ठेव. आणि माळ्याला शिडी लावून ठेव. तोपर्यंत  मीसुद्धा   येईन." राजाराम म्हणाला. शेजारी पैजेनुसार व्यापार्‍याकडे आला. व्यापार्‍याने आपल्या काही हितचिंतकांना आणि ग्रामस्थांना अगोदरच बोलावून घेतले होते. अर्थात त्यामुळे तिथे मोठी गर्दी झाली होती. शेजारी व्यापार्‍याच्या घरात गेला. त्याला कुठेच मौल्यवान वस्तू अथवा संदूक दिसली नाही. तो बाहेर आला. माळवदीवर चढण्यासाठी शिडी लावण्याचे त्याला दिसले. शेजार्‍याने विचार केला, शेठने  कदाचित व  मौल्यवान वस्तूंची संदूक  वर लपवली असावी. त्याने पटकन  शिडी धरली आणि  वर चढू लागला. इतक्यात राजाराम म्हणाला," शेठ, याने शिडी धरली आहे. ती आता तुमची राहिलेली नाही. ती तुम्ही पैजेत हरली आहे."
   शेजार्‍याने हरकत घेण्याचा प्रयत्न केला. पण जमलेल्या लोकांनीही राजारामचेच बरोबर असल्याचे सांगितले. पैजेनुसार त्याने पहिल्यांदा  शिडीला स्पर्श  केला होता. त्यामुळे  ती त्याची  झाली आहे, असे लोकांनी सांगितले. शेजार्‍याचा नाईलाज झाला. तो गपगुमान शिडी घेऊन तो निघून गेला. व्यापार्‍याने सल्ले मानले नसल्याबद्दल राजारामची  क्षमा मागितली.  
                                                        - मच्छिंद्र ऐनापुर, जत   

Wednesday, November 2, 2011

मतदानाच्या अधिकाराचे वय २१ च असायला हवे

जची युवा पिढी नव्या तंत्रज्ञानाच्या आहारी जात असून त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होत चालली आहे. त्यातच नशेसारख्या व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्वतः च्या भवितव्याविषयी त्यांची इतकी बेफिकीरी वाढली आहे की, ते देशाचे भविष्य काय उज्ज्वल करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे देशाच्या राज्यकारभाराच्या विविध घटकांवर  निवडून जाणार्‍या लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे २१ वय वर्षे पूर्ण असलेल्या युवापिढीलाच द्यायला हवे, असे आता दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. आणि खरोखरच यावर अधिक अन व्यापक विचार व्हायला हवा आहे. अन्यथा देशाचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे नक्की समजावे.
सध्या  ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी १८ वय वर्षे पूर्ण असलेल्या युवकास मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. केवळ बारावी उत्तीर्ण झालेले युवक स्वतःच्या भवितव्याविषयी स्वतः च संभ्रात पडलेला असतो. स्वतः ची निर्णयक्षमता त्याच्यापाशी नसते. कमवायची तर अजिबात अक्कल नसते.अशा वेळेला त्याच्याजवळ " ओंजळी पाणी पिण्याशिवाय" गत्यंतर  नसते. मग अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देऊन काय साध्य होणार आहे किंवा झाले आहे ? आपले करिअर समोर पडले असताना या वयात असल्या गोष्टी का हव्या आहेत? आजकाल पक्ष, नेते युवापिढीला मोठ्या प्रमाणात  आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. त्यांना आकर्षित करण्यात त्यांचा त्यात स्वार्थ आहे. पण याहीपेक्षा दादागिरी, चैनी करायला मिळते म्हणून ही युवा पिढी अशा लोकांच्या दावणीला स्वतः हून बांधली जात आहे.
राजकीय पक्ष, नेत्यांना अशाच युवकांची गरज आहे. त्यांच्या चैनी- मौजेच्या बाजू सांभाळल्या की लाचार झालेल्या माणसाची जशी विचारशक्ती मारली जाते, तशी अवस्था युवकांची झाली आहे. त्यांच्या मेंदूला धार येण्यापूर्वीच गंज चढत चालला आहे. टांग्याला जुंपलेल्या घोड्यासारखी त्यांची लत झाली आहे. युवकांची "कमजोरी" हेरल्यावर त्यांच्यावर अंमल करायला मोकळे झाले राजकीय पक्ष, नेते मंडळी त्यांच्याकडून वाट्टेल ते करून घ्यायला मोकळे होतात. युवकही ही एक बाजू सोडली  आणि आपल्याला गॉडफादर मिळाला तर आपल्या मर्जीने वागायला मोकळे होतात. पण त्यांनी स्वतःचा आणि आपल्या भवितव्याचा विचार केला असतो का, हा प्रश्न आहे. पुढे आयुष्य पडलेले असते.  पण त्यांना शॉर्टकटने ग्रासून टाकल्याने झटके पट हाती हवे आहे, या मनोवृत्तीमुळे मती काम देत नाही. शॉर्टकटचा शेवटसुद्धा लवकर होतो, याचे भान ठेवायला नको का?
 हे वयच असं असतं की मौजमजा करावी, घुमावं-फिरावं , दादागिरी करावी, मस्ती करावी असे वाटत राहते. परंतु, त्यालासुद्धा मर्यादा आहेत. दुसर्‍याला त्रास देऊन मौजमस्ती करण्याला सार्‍यांचाच विरोध असणार आहे. ही मजा लुटत असताना आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे सुजाण नागरिक बनण्याची,  याशिवाय  घटनेने आणखी एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे, ती म्हणजे चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्याची,याचे भान सतत असायला हवे. पण बहुधा ते नसल्याचेच अधिक दिसते. कानाला मोबाईल, खिशात आयपॉड, सतत नेटशी चाळा या नव्या तंत्रज्ञानात आखंड बुडालेल्या युवापिढीचा " शॉर्ट्कट" हा नवा फार्म्युला झाला आहे. त्यांनी आपल्या समृद्धी अशा भाषेची चिरफाड चालवली आहे. लांबलचक , गहन्-गंभीर शब्दांना शॉर्टरुप देऊन त्याची अवस्था फार वाईट करून टाकली आहे. इंटरनेट, मोबाईलवर अशा शॉर्टकट शब्दांचा सर्रास वापर सुरू झाल्याने त्यांची शब्दसंपतीही घटत चालली आहे. भाषेची तर पुरती वाट लावली जात आहे.
केवळ भाषेतच  शॉर्ट़कटपणा आणला गेला नाही, तर प्रत्येक गोष्टीत त्यांना शॉर्टकट हवा असतो. शिवाय त्यांना आजूबाजूला आपल्या मनासासारखे घडायला हवे आहे. यात त्यांना तडजोड नको आहे. सगळ्या गोष्टी स्वतः च्या मर्जीने तोडायला, मोडायला निघालेल्या या पिढीला भविष्याची मात्र भ्रांत नाही. त्यांची विचारशक्ती कुंठीत झाली आहे.
देशाला, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पाहणारा चांगला लोकप्रतिनिधी शोधणार्‍या युवकामध्येसुद्धा समजूतदारपणा हवा. आपले ते खरे न मानता चार-चौघांच्या मतांचा आदर करणारा, चार अधिक उन्हाळे-पावसाळे अधिक खाल्लेल्या लोकांचा सल्ला जाणून घेणारा हवा. १८-२० वयवर्षाचा काळ 'स्ट्रगल्"चा नाही. हा शिकण्या-सवरण्याचा काळ आहे. १२ वी उत्तीर्ण झालेल्या युवकाला पुढे काय करायचे , याचीच दिशा नसते. त्यामुळे तो देशाचे प्रश्न, देशाचा विकास आणि चांगला -वाईट कोण ? याबाबत अधिक गांभिर्याने कळण्याचे हे वय नव्हे. 'बापकमाई' वर चाललेल्या  या वयात धेयच त्यांच्यासमोर असायला हवे. आज त्यांच्या हातात मतदानाचा अधिकार दिला हे, तो ' माकडाच्या हातात कोलीत' दिल्यासारखा प्रकार आहे. शिक्षण, ध्येय बाजूला सोडून राजकारणासारख्या अगम्य क्षेत्रात त्यांचा वावर त्यांचे आयुष्यच संपुष्टात आणणारा आहे.
आजच्या पिढीला फार लहान वयात व्यसने जडली आहेत. नशापान आता शाळकरी मुलेही करू लागली आहेत. मुलांच्यात समज लवकर येत असली तरी त्यांना दिशा देण्याची मोठी गरज आहे. शॉर्टकटच्या मागे धावू लागलेल्या युवकांना दीर्घ काळानंतरचे यश दीर्घकाळ टिकते, याची महती सांगण्याची गरज आहे. सगळेच युवक बिघडले आहेत, असे म्हणण्याची चूक करणार नाही, पण समाजात दिसते ते दुसर्‍या बाजूचेच अधिक दिसते. विविध संघटनांनी केलेला सर्व्हेसुद्धा तेच सांगतो. मोबाईल, एसएमएस यांमुळे युवापिढीची शब्दसंपत्ती घट चालली असल्याचा एक  सर्व्हे नुकताच जाहीर झाला आहे. हीसुद्धा धोकादायक बाब आहे. नव्या तंत्रज्ञानाने, व्यसनाने आणि मनासारखे घडण्याची अपेक्षा करण्याने बिघडत चाललेल्या युवकांना आधी चांगला नागरीक बनण्याच्या शुभेच्छा देऊया आणि त्याच्यावर टाकलेली एक मतदान अधिकाराची मोठी जबाबदारी माघारी घेऊया, असे मनापासून वाटते.              

Tuesday, November 1, 2011

बालकथा लक्षी म्हणाली मंत्र्यांना...

दरिकोणुरातल्या लक्षीला ओळखत नाही, असा इसम शोधूनही सापडायचा नाही. लक्षी मोठी हुशार, खोडकर आणि बडबडी होती. ती सतत कुणाशी ना कुणाशी , काही ना काही बोलत राहायची. अख्खे गाव तिला आणि ती अख्ख्या गावाला ओळखायची. गावात  एक जिल्हा परिषदेची शाळा होती. त्या अख्ख्या शाळेतही लक्षीची चलती होती. ती अभ्यासातही सगळ्यांच्या पुढं नंबर मारायची.
तिच्या बडबड्या स्वभावाची आईला मात्र चिंता वाटायची. ती नेहमी तिला समजावून सांगायची, " अगं लक्षे, जरा कमी बोलत जा. लोक काय विचार करत  असतील?"  लक्षी म्हणायची , " मला काय त्याचं ? ज्यांना विचार करायचाय त्यानं खुशाल विचारकरत बसावं...."
आई म्हणायची, " अगं अशानं उद्या तुझ्याशी कोण लग्न करील ? " मग लक्षी फाडकन म्हणायची,              " मुक्या-बहिर्‍याशी लग्न करीन , तुला काय त्याच्याशी ...?" तिच्या आईची बोलतीच बंद व्हायची. लक्षीकडं सगळ्या प्रश्नांची उत्तरं हजर असायची.
  पावसाळ्यात लक्षीच्या शाळेला सारखी सुट्टी असायची. तिची शाळा फार गळायची. पाणी पाणी व्हायचं. शाळेत बसायला जागाच नसायची. अशा वेळेला वाटायचं, तिच्याजवळ खूप खूप मोठी छत्री असती तर ती शाळेवर धरली असती. मग सगळे आरामात बसून शिकले असते. पण करायचं काय ? गावातच काय , त्या तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा अशी मोठी छत्री मिळत नव्हती. पावसाळ्यानंतर मात्र जास्त अभ्यास करावा लागायचा. जास्त अभ्यास केल्यानं कमी लक्षात राहायचं.  खरं तर लक्षीकडे खुपशा गोष्टींची उत्तरं होती. परंतु, या गोष्टींचं मात्र उत्तर नव्हतं. पावसाळ्यातला एवढाच एक प्रश्न नव्हता तर गावाजवळून वाहणार्‍या ओढ्याला पूर आला की, गावात एसटी यायची बंद व्हायची. त्यामुळे गावातल्या लोकांना बाजारला तालुक्याच्या गावाला जाता येत नसे. गुरुजीसुद्धा यायचे नाहीत. तोपर्यंत शाळा बंद. दरीत वसलेल्या गावातल्या लोकांचे हाल व्हायचे.
एक दिवस लक्षीच्या गावात बरीच लगबग चालली होती. लक्षीला काय भानगड आहे, कळेना. तिने थेट सरपंचांना विचारलं. सरपंचांनी सांगितलं, परवादिवशी आपल्या गावात मंत्री येणार आहेत. लोकांना भेटणार आहेत. आपल्या अडीअडचणी समजावून घेणार आहेत आणि त्याची उकलही करणार आहेत. सरपंचांनी तिला गावातल्या प्रगतशील शेतकर्‍याचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचेही सांगून टाकले. 
लक्षीलासुद्धा मोठा आनंद झाला. ही तर चांगली बातमी आहे, ती पुटपुटली. तिने गावातून फेरफटका मारला. सगळीकडे साफसफाई चालल्याचं दिसलं. मंत्र्यामुळे गावाचा काही तरी फायदा होतोय, असं तिला वाटलं. तिने आपल्या शाळेतल्या मित्रांना ही खबर सांगून टाकली.
लक्षी गुरुजींना म्हणाली, " गुरुजी, आपणसुद्धा मंत्र्यांना भेटायचं का ? आपल्या शाळेची समस्या त्यांना सांगू." मास्तर म्हणाले, " लक्षी , तुझं बरोबर आहे, गं. पण मंत्री मोठी असामी. त्यांच्याजवळ सगळ्यांसाठी वेळ नसतो. आपण आपल्या शाळेचा  प्रश्न पंचायत समितीला अनेकदा कळवला आहे. "
लक्षी म्हणाली, " गुरुजी, आपण मंत्र्यांना सांगू की अधिकार्‍यांना कळवूनही आपले काम झाले नाही. ते नक्कीच गळकं छत बंद करतील. " मास्तरांना त्या चिमुरडीचे म्हणणे पटले. त्यांनी निवेदन लिहायला घेतले. मास्तर आणि लक्षीनं मिळून निवेदन द्यायचं पक्कं झालं.
लक्षीनं घरी आल्यावर आईला ,आता आमची शाळा गळणार नसल्याचं सांगितलं. कार ती समस्या मंत्र्यांच्या कानावर घातली जाणार आहे व  ते त्यांची समस्या सोडवणार आहेत. आई म्हणाली, " जसं काही तू ठरवलसं आणि झालं, असेच बोलतेस. अगं, मंत्र्यांना भेटणं किती कठीण असतं माहीत आहे का ? ते आल्यावर काही मोजकीच माणसं त्यांना भेटू शकतील",  लक्षी नाराज झाली. ती विचार करत राहिली,  आपली शाळा गळायची थांबणारच नाही का ?... विचार करता करता कधी कोणास ठाऊक तिला झोप लागली.
मंत्री गावात येण्याचा दिवस उजाडला. गावात चावडीजवळ एक मोठं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं.त्यावर चढून जाऊन मंत्री भाषण करणार होते. काही पुरस्कारांचं वितरण करून त्यांना लागलीच दुसर्‍या गावाला जायचं होतं. शाळेतली सगळी मुलं स्वच्छ युनिफॉर्ममध्ये आली होती. गुरुजीसुद्धा सफेद, स्वच्छ कपड्यात आले होते. कारण त्यांना मंत्र्यांना भेटायचं होतं. मंत्रीमहोदय सकाळी अकरा वाजता गावात येणार होते. 
अकरा वाजले आणि गावात सायरन वाजवत पोलिसांची गाडी घुसली. पाठोपाठ मंत्र्यांची लालदिव्याची  अम्बॅसेडर कार आली. त्याच्या मागे आणखी पाच-सात गाड्यांची रांग लागली होती. लक्षीला खूप आनंद झाला कारण , मंत्रीमहोदय अगदी वेळेवर आले होते. थोड्याच वेळात व्यासपीठाभोवती गर्दी जमा झाली. आजूबाजूच्या गावचे लोकही आज लक्षीच्या गावात आले होते. कधी नव्हे इतकी मोठी गर्दी जमा झाली. मंत्र्यांसोबत त्यांचे रक्षकसुद्धा होते. त्यांनी त्यांना गराडा घातला होता.
मंत्री व्यासपीठावर पोहोचले. व्यासपीठावर सरपंच आणि गावातले काही प्रमुख, प्रतिष्टित नागरिक उपस्थित होते. मंत्रीमहोदयांचे स्वागत झाले. गुरुजी लक्षीला म्हणाले की, आता मंत्र्यांपर्यंत पोहोचणं मोठ कठीण आहे. आपण शाळेचे निवेदन त्यांना देऊ शकणार नाही. लक्षीला ऐकून धक्का बसला. सरपंच तिच्याकडे पाहात असते तर तिने इशारा केला असता. पण सरपंच इकडे पाहायलाच तयार नाहीत. शिवाय ती व्यासपीठापासून खूप दूर होती. आता काय करायचं ? गुरुजी म्हणाले, " आपले निवेदन अगोदरच सरपंचांकडे द्यायला हवे होते."  " पण आपली समस्या त्यांना कशी समजणार? ", लक्षीचं म्हणणं पडलं.
व्यासपीठावर मंत्र्यांचे स्वागत- सत्काराचे सोपस्कार पार पडले. सरपंच बोलायला उभे राहिले. आपल्या भाषणात त्यांनी गावात सारे ठीकठाक असल्याचे सांगून टाकले. लक्षीला ऐकून मोठं आश्चर्य वाटले. गावातल्या अडीअडचणी  मंत्र्यांपुढे मांडल्याच जात नव्हत्या. यानंतर मंत्र्यांनी गावातल्या श्रीपतरावांचा प्रगतशील शेतकरी म्हणून फेटा बांधून शाल-प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. नंतर त्यांनी काही घोषणा केल्या. झालं !... त्यांची जाण्याची वेळ झाली. ते व्यासपीठावरून खाली उतरू लागले.
मंत्रीमहोदय आपल्या गाडीकडे जाऊ लागले. इतक्यात लक्षी हात वरकरून मोठ्याने ओरडली," आमची एक समस्या राहिली...." मंत्र्यांनी मागे वळून पाहिले. एक छोटी मुलगी धीटाईने हात वर करून त्यांच्याकडे पाहात उभी होती. त्यांनी तिला जवळ बोलावले आणि  विचारले, " बोल, काय समस्या आहे तुझी ?" लक्षी न घाबरता सांगू लागली, " गावाजवळच्या ओढ्यामुळे पावसाळ्यात गावात एसटी येत नाही. नदीवर पूल बांधायला पाहिजे. आमची शाळा गळते. त्यामुळे शाळेला सुट्टी राहते. ... आम्ही ऑफिसला तक्रार केली आहे. पण शाळा दुरुस्त झाली नाही."
 मंत्री अगदी नवलानं तिच्याकडे पाहात राहिले. किती सफाईदारपणे आणि धिटाईने गावातल्या समस्या सांगत होती.  गावात वीज नसते. त्यामुळे आभ्यासाचे वांदे होतात, हेही लक्षीने सांगून टाकले. मंत्र्यांबरोबरचा सरकारीबाबू सारे टिपून घेत होता. लक्षीने सांगितले की, आम्ही आमची समस्या लिहून आणली आहे. तिने गुरुजींना खुणेने बोलावून घेतले. त्यांनी निवेदन मंत्र्यांकडे सुपूर्द केले. मंत्रीमहोदयांनी तिला विचारलं, " तुझं नाव काय बाळ ?"
" लक्ष्मी ", लक्षीनं धिटाईनं उत्तर दिलं. दोन महिन्यात तुझे प्रश्न सुटतील, असे म्हणत त्यांनी आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. आणि  त्यातून पेन काढून तिला देत म्हणाले," माझ्याकडून तुला बक्षीस ! गावातले खरेखुरे प्रश्न मांडल्याबद्दल." आणि मंत्रीमहोदय निघून गेले. यानंतर सगळीकडे लक्षीचीच चर्चा.
लक्षीच्या आईला ही गो ष्ट  कळली तेव्हा तिचा ऊर अगदी आनंदाने भरून आला. गुरुजींना तर तिच्याविषयी अभिमान होताच. तो आणखी दुणावला. पुढच्याच महिन्यात शाळेची दुरुस्ती झाली आणि शाळा गळायची थांबली. आता गावाजवळच्या ओढ्यावर पूल बांधण्याचे काम सुरू झालं आहे.     - मच्छिंद्र ऐनापुरे  

विश्व कल्याणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता

जगाच्या  लोकसंख्येने  ७०० कोटीचा आकडा पार केला आहे. त्यामुळे लोकसंख्येचा एवढा मोठा प्रचंड भार पृथ्वीला पेलणार कसा, या चिंतेने देशोदेशींच्या अभ्यासकांची  झोप उडाली असेल. ७ अब्जाचा आकडा पार करणे अन्नधान्य टंचाईच्या काळात  जगाला अजिबात भूषणावह नाही. लोकसंख्येच्या  विस्फोटामुळे दारिद्र्यनिर्मूलन आणि पर्यावरण संरक्षणाला सगळ्यात मोठा धोका पोहोचणार आहे. त्यामुळे आर्थिक-सामाजिक विषमतेचे अस्वस्थ पर्व आकारास येण्याची दाट शक्यता आहे. जगाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने अन्नधान्य उत्पादन वाढणे सध्या तरी अशक्य आहे. म्हणूनच लोकसंख्या आणि अन्नधान्य यांच्या व्यस्त प्रमाणामुळेच जगात यापुढील काळात दंगेधोपे, युद्ध, दुष्काळ आणि टंचाईची परिस्थिती उद्भवण्याचे इशारे देण्यात येत  आहेत. मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानात अचाट  प्रगती साधली आणि त्याच बळावर हरितक्रांती घडवून आणली असली आता पुन्हा एअकदा एका हरितक्रांतीची   गरज निर्माण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सकस, भरपेट अन्न देण्याची ताकद पृथ्वीची असूनही ती निर्माण करण्यात अपयश आले आहे. वैश्विकीकरणामुळे अनेक देशांमध्ये पडलेला दुष्काळ, अन्नधान्य टंचाई दूर करण्यात यश येत असले तरी अजूनही " अन्नाला महाग " असलेल्या देशांची संख्या कमी नाही. हरितक्रांतीमुळे  अन्नधान्याची, दैनंदिन गरजांची भूक भागवण्याइतकी क्षमता मानवामध्ये आली; पण दुष्काळ, वादळे अशा नैसर्गिक आपत्ती आणि युद्धे संपलेली नाहीत.  जीवनावश्यक वस्तूंची टंचाई काही कमी झाली नाही. उलट ती काळागणिक वाढतच गेली. वाढत्या लोकसंख्येपेक्षाही नैसर्गिक साधन-संपत्तीचे विषम वाटप, ऊर्जेचे असमान वाटप हा मुद्दाही महत्त्वाचा आहे.  माणसा-माणसांतील संघर्ष टाळण्यासाठी, मानव आणि निसर्ग यांच्यातील सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी ही विषमता दूर करण्याची  गरज आहे.  ही विषमता केवळ राज्य, देश नव्हे तर वैश्विक पातळीवर संपायला हवी आहे. शेतीयोग्य जमीन, उत्पादन सुविधा आणि पिण्याच्या पाण्याचे आवश्यकतेनुसार वाटप हे वैश्विक नियोजनाचे निकष प्रत्यक्षात आणावे लागणार आहेत.  विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वापराचे मुक्त पण जबाबदारीचे भान देणारे धोरण जागतिक पातळीवर अवलंबावे लागेल. म्हणजेच विश्व कल्याणाला यापुढील काळात प्राधान्य देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.