एका गावात एक विचित्र असं दुकान होतं. तिथं चक्क सल्ले विकले जायचे. राजाराम नावाचा माणूस दुकान चालवायचा. ज्याला कुणाला सल्ल्याची गरज भासे, त्यांना तो सल्ला विकत देई. एका सल्ल्याची किंमत होती दोन आणे. त्याकाळात ती किंमत मोठीच होती. मात्र त्याच्या सल्ल्याचा अनेकांना लाभ झाला होता.
एक दिवस राजारामच्या दुकानात एक व्यापारी आला. त्याने राजारामकडून तीन सल्ले विकत घेतले. त्यातला पहिला सल्ला होता, प्रवासाला निघताना पत्नीला काहीही सांगू नये. दुसरा होता, वाटेत काही खाऊ नये आणि तिसरा सल्ला होता, भावनेच्या आहारी जावून कधी कुणाशी पैज लावू नये. सल्ले घेऊन व्यापारी घरी परतला. त्याने सल्ल्याची सत्यता पडताळून पाहायचे ठरवले. दुसर्यादिवशी तो पत्नीला काहीही न सांगता नऊ थैलांमध्ये नऊ हजार रुपये घेऊन शहरात व्यापारासाठी निघाला.
व्यापारी बरेच अंतर चालल्यावर त्याला भूक लागली. पुढे रस्त्याकडेला त्याला एक विहीर दृष्टीस पडली. तिथे थांबून त्याने भोजन केले आणि पुढच्या प्रवासाला निघाला. काही अंतर चालल्यावर त्याने आपल्या पैशाच्या थैल्या मोजल्या. त्या आठच निघाल्या. तो घाबरून पुन्हा माघारी परतला. सुदैवाने विहिरीजवळ थैली तशीच पडलेली होती. त्याने ती उचलली आणि पुन्हा आपल्या मार्गाला लागला. इतक्यात त्याच्या पायात काटा मोडला. त्याने वाकून पायाचा काटा काढला पण काय आश्चर्य ! त्याच्या पायाला उठलेले कुरूप बरे झाले होते. बाजूलाच काट्याचे झाड होते. या काट्यांमध्ये अदभूत औषधी गुण असावा , असे त्याला वाटले. त्याने ती जागा नीट न्याहळली व लक्षात ठेवली, जेणेकरून माघारी परतताना काटे घेऊन जाता येतील.
व्यापारी शहरात गेला.व्यापार केला. उधारी वसूल केली. माल आणण्याची व्यवस्था लावली आणि शेवटी माघारी परतला. मात्र येताना काट्याची गोष्ट विसरला. गावात आल्यावर त्याच्या कानी एक वार्ता पडली. गावच्या श्रीमंत पुढार्याच्या पायाची जखम भलतीच वाढली असून ती कमी होण्याचे नावच घेत नव्हती. कित्येक वैद्य, हकिम झाले, पण फरक पडला नव्हता. उलट जखम वाढत चालली होती. त्यामुळे जो कोणी जखम बरी करेल, त्याला दहा हजाराचे बक्षीस मिळेल, असे जाहीर करण्यात आले होते. व्यापार्याच्या लक्षात काट्याची गोष्ट आली. ती येताना विसरल्याचे त्याला खूप वाईट वाटले. जाऊन काटे आणावेत आणि बक्षीस जिंकावे, असे त्याला वाटले.
तो पत्नीला म्हणाला," मी प्रवासात जखम बरी करणारे झुडूप पाहिले आहे. त्याच्या काट्यात अदभूत असा औषधी गुण आहे. जखम तात्काळ बरी होते. ते आणून दहा हजाराचे बक्षीस पटकावतो." दरम्यान तो व्यापारी राजारामचे सल्ले विसरला होता. त्याच्या बायकोला खूप आनंद झाला. तिने काटे लवकर आणायला सांगितले. व्यापार्याच्या पत्नीला ही गोष्ट मोठी रहस्यमय वाटली. तिच्या पोटी ती पचली नाही. तिने ती आपल्या शेजारणीला सांगून टाकली. तिने ती आपल्या नवर्याला सांगितली.
काटे आणायला निघालेल्या व्यापार्याला वाटेत अचानक आपला शेजारी दृष्टीस पडला. बोलता- बोलता दोघेही एकाच कामासाठी निघाल्याचे त्याच्या लक्षात आले. " धनी पुढार्याची जखम मीच बरी करू शकतो", व्यापार्याने दावा केला. " माझ्याजवळसुद्धा याच्यावर जालीम उपाय आहे", शेजारी म्हणाला. " पण तू ती जखम बरी करू शकणार नाहीस", व्यापारी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला.
" नक्की बरी करेन. हवं तर पैज लाव." शेजारी म्हणाला. व्यापार्याने सल्ले विकत घेतले होते, याचा त्याला विसर पडला होता. व्यापारी पैजेला तयार झाला. " तू पैज जिंकलीस तर माझ्या घरातील कुठल्याही वस्तूला पहिल्यांदा स्पर्श करशील ती तुझी आणि हरलास तुझ्या घरातील .... " शेजारी त्याचे बोलणे एकदम तोडत कबूल झाला.
दोघेही पुढे निघाले. वाटेत व्यापारी भोजनासाही थांबला. व्यापार्याला आत्मविश्वास होता, आपणच पुढार्याची जखम बरी करू शकतो. त्यामुळे त्याने काही घाईगडबड केली नाही. दरम्यान शेजारी मात्र पुढे निघून गेला. भोजन झाल्यावर आरामात विहिरीजवळ गेला. झुडुपाची एक काटेरी फांदी तोडली. आणि माघारी परतला.
गावात आला तर त्याला धनी पुढारी खडखडीत बरा झाल्याचे कळले. शेजार्याने काटे आणून त्याची जखम कधीच बरी केली होती. आणि बक्षीसही पटकावले होते. व्यापार्याला आता दुसरीच भीती सतावू लागली. पैजेनुसार शेजारी आपल्या घरात घुसला आणि खजिन्याच्या संदूकीला स्पर्श केला तर .... बाप रे ! आपण पुरते लुटले जाणार. त्याला काहीच सुधरेना. अचानक त्याला सल्ल्याचे दुकान आठवले. तो धावत-पळत राजारामच्या दुकानात गेला. राजारामचे पाय धरले. आपल्यावर गुदरलेल्या बाक्या प्रसंगाची कहानी त्याने रडवेला होऊन सांगितली. "मला असा एखादा सल्ला द्या, ज्यामुळे माझे काहीही नुकसान होणार नाही." व्यापारी काकुळतीला येऊन म्हणाला.
" जे झालं ते झालं. तू काहीही काळजी करू नकोस. आता घरी जा. तुझी खजिन्याची पेटी घराच्या माळवदीवर ठेव. आणि माळ्याला शिडी लावून ठेव. तोपर्यंत मीसुद्धा येईन." राजाराम म्हणाला. शेजारी पैजेनुसार व्यापार्याकडे आला. व्यापार्याने आपल्या काही हितचिंतकांना आणि ग्रामस्थांना अगोदरच बोलावून घेतले होते. अर्थात त्यामुळे तिथे मोठी गर्दी झाली होती. शेजारी व्यापार्याच्या घरात गेला. त्याला कुठेच मौल्यवान वस्तू अथवा संदूक दिसली नाही. तो बाहेर आला. माळवदीवर चढण्यासाठी शिडी लावण्याचे त्याला दिसले. शेजार्याने विचार केला, शेठने कदाचित व मौल्यवान वस्तूंची संदूक वर लपवली असावी. त्याने पटकन शिडी धरली आणि वर चढू लागला. इतक्यात राजाराम म्हणाला," शेठ, याने शिडी धरली आहे. ती आता तुमची राहिलेली नाही. ती तुम्ही पैजेत हरली आहे."
शेजार्याने हरकत घेण्याचा प्रयत्न केला. पण जमलेल्या लोकांनीही राजारामचेच बरोबर असल्याचे सांगितले. पैजेनुसार त्याने पहिल्यांदा शिडीला स्पर्श केला होता. त्यामुळे ती त्याची झाली आहे, असे लोकांनी सांगितले. शेजार्याचा नाईलाज झाला. तो गपगुमान शिडी घेऊन तो निघून गेला. व्यापार्याने सल्ले मानले नसल्याबद्दल राजारामची क्षमा मागितली.
- मच्छिंद्र ऐनापुर, जत
No comments:
Post a Comment