Wednesday, November 30, 2011

बालकथा चतुर कोल्हा

     जारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा जंगलात राहणारे सगळे प्राणी शुद्ध शाकाहारी होते.अगदी वाघ- सिंह आणि आपला भित्रा ससासुद्धा ! दक्षिण अफ्रिकेतल्या जंगलात इतरांसारखाच सोनू नावाचा कोल्हाही होता. तो मोठा चतुर म्हणून ओळखला जात होता. तो भूक लागली की, मोठ्या चतुराईने भोजन मिळवायचा आणि आपली भूक भागवायचा. तो जंगलातल्या सगळ्यांची फिरकी घ्यायचा, शिवाय सिंहराजला सोडून ! सिंहराजला दबकून असायचा. बाकी कुणाला घाबरायचा प्रश्न नव्हता.
     सिंहराज कुणाचे ऐकायचा नाही. आपल्या मनाला पटेल तसे वागायचा. त्यामुळे सहसा कुणी त्याच्या वाटेला जात नसे. एकदा सोनू कोल्ह्याला प्रचंड भूक लागली. अन्नाच्या शोधात जंगलभर भटकत राहिला. एके ठिकाणी मात्र त्याला फळांनी लगडलेले झाड दिसले. ताज्या- ताज्या लालबूंद फळांचा सुवास दरवळत होता. असे झाड तो पहिल्यांच पाहात होता. भुकेल्या कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले.त्याने पटापट खुपशी फळे तोडली आणि आरामात खाऊ लागला. रसरशीत फळांचा स्वाद मस्तच होता. इतक्यात सिंहराजाची गर्जना ऐकू आली. सिंहराज जवळच कुठे तरी होता. त्याचा आवाज त्याच्याकडेच येत होता.
     सोनू विचारात पडला. बहुतेक सिंहराज भुकेला असावा. तो इ़कडे आला आणि ही रसरशीत, गोड फळे पाहिली तर.....? सारी फळे हिरावून घेईल. आता काय करायचं? आता त्याचं विचारचक्र वेगात चालू लागलं. सिंहराज जंगलाचा राजा. त्यामुळे त्याची भूकही मोठी. सगळ्यांचे भोजन हिरावून खाण्याचा त्याचा हक्कच आहे. त्याला मनाई करण्याची हिंमत कोणात असणार? इकडे सिंहराजची गर्जना अगदी जवळ येऊन ठेपली होती. सोनू  कोल्ह्याला सिंहराजपासून ही ताजी , रसरशीत फळे वाचवायची होती. आणि ...आणि कोल्ह्याला युक्ती सुचली.
     सिंहराज आता दृष्टीक्षेपात आला होता. सिंहराज जसजसा जवळ येत होता, तसतसा सोनू फळे अधाशासारखा खाऊ लागला. कोल्हा काय हावरट आहे, अशी सिंहराजाची समजूत व्हावी, अशा पद्धतीने तो फळांवर ताव मारत होता. सिंहराजही त्याच्याकडे पाहात होता. कोल्हा खाता-खाता अचानक जमिनीवर पडला. आणि तडपडू लागला. विवळायला लागला. काही वेळ तडफडू लागला  आणि एकदम शांत झाला.    अगदी मेलेल्या प्राण्यासारखा. निपचिप पडला. डोळेसुद्धा एका जागी स्थीर ठेवले.
     इकडे सिंहराज त्याची सारी हालचाल पाहात होता. त्याने विचार केला, नक्कीच ती फळे विषारी असली पाहिजेत. नाही तरी तो मूर्ख कोल्हा मरून पडला नसता. सिंहराज त्याच्याकडे न जाताच आपल्या वाटेला लागला. तो खूप दूर गेल्यावर सोनू उठला आणि राहिलेली फळे आरामात खाऊ लागला. खाता- खाता त्याला आठवले. नदी कडेला दुसर्‍या एका कोल्ह्याचे कातडे पडले आहे. ते त्याने उचलून आणले. त्याने जिथे मरून पडल्याचे सोंग केले होते, त्याठिकाणी टाकून दिले. जवळ फळाच्या साली पडल्या होत्या.आपल्या युक्तीवर जाम खूश होऊन सोनू आपल्या गुहेत परतला.
     काही दिवसांनी सिंहराज त्या फळांच्या झाडाजवळून निघाला होता. त्याने झाडावर रशरशीत , लालबूंद फळे लगडलेली पाहिली. ती पाहून त्याची भूक चाळवली. ती खाण्याच्या इराद्याने तो काही पावले पुढे गेला. पण अचानक जागीच थबकला. समोरच बिचार्‍या हवर्‍या कोल्ह्याचे कातडे पडले होते. कोल्हा त्याच्यासमोरच कसा मरून पडला, ते सारे त्याला आठवले. त्याने तिथेच शपथ घेतली. यापुढे कधीच कुठली फळे खाणार नाही.
     तेव्हापासून आतापर्यंत सिंहराज तसाच आहे. सिंहराजने कुठल्याच झाडाची फळे खाल्ली नाहीत. मात्र  त्यामुळे कोल्हा आणि अन्य छोट्या- छोट्या प्राण्यांना मोठा आनंद झाला. आता ते  हवी तितकी फळे मनसोक्त खाऊ शकतात.             ( आफ्रिकन लोककथा)                                                                   - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment