Sunday, November 20, 2011

संताप आहेच कुठे?

काही वेळेला समजूतदार माणसं असा काही सवाल करतात की, हसू फुटल्याशिवाय राहत नाही. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्या घरात दोन मांजरी होत्या. एक मोठी आणि दुसरी छोटी. एक दिवस त्यांनी सुताराला बोलावून घेतलं आणि म्हणाले, ‘‘बाबा रे! दरवाज्याला दोन छिद्रं पाड, ज्यातून या मांजरी बाहेर पडतील. मोठ्या मांजरीसाठी मोठं आणि छोटीसाठी छोटं...!
बिच्चारा सुतार त्यांच्याकडे पाहतच राहिला. कारण त्याच्या समजुतीनुसार एक मोठं छिद्रं पुष्कळ होतं. त्यातून लहान मांजरीसुद्धा सहज जाऊ शकत होती. जवळजवळ असाच एक प्रश्‍न कॉंग्रेसचे कर्णधार आणि भावी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात आहे, त्या राहुल गांधींनी गरीब ग्रामस्थांना केला. हस्तीनापूरची दुर्दशा पाहून त्यांनी ग्रामस्थांना विचारलं, ‘‘तुम्हाला तुमच्या या दुर्दशेचा संतापबिंताप येतो की नाही?’’ किती मासूम प्रश्‍न. असाच प्रश्‍न त्यांच्या वडिलांनी- राजीव गांधींनी विचारला होता. अर्थात ग्रामस्थांनी राहुल गांधींना काय उत्तर दिलं ते समजलं नाही, पण त्यांनी असाच प्रश्‍न आम्हाला विचारला असता तर...! समजून चला, त्यांनी विचारलं, ‘‘इतका भ्रष्टाचार, इतकी लाचखोरी, इतकी दुर्दशा, घाणीचे साम्राज्य समाजात पसरले असताना तुम्हाला संताप वगैरे येत नाही का?’’ आम्ही म्हटलं असतं की, अजिबात नाही. संताप का यावा? राग, क्रोध, संताप हे सारं 1947 मध्येच संपले. तेव्हा आम्ही अशा एका ताकदीविरोधात संताप केला होता. जे त्यांच्या साम्राज्यात सूर्य कधी बुडत नाही म्हणायचे. पण तेव्हा आमच्या क्रांतिकारकांनी त्यांचा सूर्य बुडविला. झालं. त्यानंतर थोडाफार संताप आणीबाणीच्या काळात आला होता. तेव्हा आम्ही लोकनायकाच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींना सत्तेबाहेर केलं होतं. आता कसला आलाय संताप आणि काय? आता कुणी अण्णा हजारे भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन करतो तेव्हा आमच्या अंगात थोडंफार रक्त पेटतं, पण लगेच आमच्या डोक्यात दुसरा प्रश्‍न पेटतो, सुपरस्टार कोण शाहरुख खान की सलमान खान? मग आम्ही या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी सार्‍या समाजाला यात ओढून घेतो आणि काथ्याकूट करीत बसतो. आम्ही स्वीकारलंय की, आपलं काम लवकर साधून घ्यायचं असेल तर लाच द्यावीच लागेल. आम्ही मान्य करून टाकलंय की आमचा जन्म घाणीतला. त्यामुळे अख्खा जन्मसुद्धा याच घाणीत घालवावा लागणार आहे. कारण स्वच्छता-बिच्छता हे जे काही आहे ते अधिकारी - पदाधिकार्‍यांसाठी राखीव आहेत. आता बघा अडीच वर्षांपूर्वी पेट्रोल लिटरमागे चाळीस रुपये होतं, आता ते सत्तर रुपयांवर गेलंय. येतोय आम्हाला गुस्सा? नाहीच ना?
आम्ही आता विसरून गेलोय गुस्सा-संताप वगैरे करायचं. अहो, आम्हाला संताप आला असता तर आतापर्यंत सरकार उलथलं असतं. जनतेच्या संतापापुढे भल्याभल्यांची गादी आणि डोक्यावरची सत्तेची टोपी कधीच हवेत उडाली असती, पण संताप आहेच कुठे?
- मच्छिंद्र ऐनापुरे
ainapuram-2190@rediffmail.com
samana-utsav 20-11-2011

No comments:

Post a Comment