Saturday, October 15, 2016

फिरकी भारताचे मोठे शस्त्र


     क्रिकेटची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या लॉडर्स मैदानावर एक फलक लावलेला आहे. त्या फलकावर ज्या ज्या विदेशी गोलंदाजांनी डावात पाच- पाच बळी मिळवले आहेत किंवा फलंदाजांनी 100- 100 धावा कुटल्या आहेत, त्या सगळ्यांची नावे लिहिलेली आहेत. एखाद्या फलंदाजाने काढलेल्या 100 धावा किंवा गोलंदाजाने घेतलेले पाच बळी क्रिकेटमध्ये इक्वल किंवा समसमान समजले जातात.हीच गोष्ट इंदोरमधल्या कसोटी सामन्यावेळी आर. अश्विनच्या डोक्यात होती. त्यामुळेच तो म्हणाला होता, मला भारतीय गोलंदाजांचा विराट कोहली व्हायचं आहे.याचा अर्थ असा की, विराट कोहलीला प्रत्येक डावात शतक ठोकायचं असतं.तसंच आर. अश्विनला प्रत्येक डावात पाच विकेट मिळवायचे असतात. इंदोर कसोटीत स्थीरस्थावर झालेल्या न्युझिलंडच्याबाबतीत आश्विनने हेच केले. त्याने टॉम लॅथमला आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन बाद केले आणि त्याच्या पुढची फळी त्याने सपासप कापून काढली.118 धावांवर पहिली विकेट गमावलेल्या न्युझिलंडची पुरी टिमच्या टिम 299 धावांत गारद झाली. या पहिल्या डावात अश्विनने सहा गडी बाद केले. तर दुसर्या डावात सात विकेट घेऊन त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वात चांगलं प्रदर्शन केलं.
     आर. अश्विनने एका डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी 20 वेळा केली आहे.20 वेळा एकाच डावात पाच वेळा गडी बाद करण्याच्या विक्रमात आर. अश्विन शेन वॉर्न,मुथय्या मुरलीधारन,अनिल कुंबळे आणि हरभन सिंह अशा दिग्गज गोलंदाजांच्या पुढे आहे. आपल्या कारकीर्दीच्या सुरवातीला 39 कसोटी सामन्यात शेन वॉर्न याने 167, मुथय्या मुरलीधरनने 177 आणि हरभजसिंहने 172 बळी मिळवले होते. हरभजसिंहने 59 कसोटी सामन्यांमधून ही संधी मिळवली होती. त्यांच्यापेक्षा कमी कसोटी सामन्यात ही कामगिरी करणारे जगात दोघेच गोलंदाज आहेत. सिडनी बार्न्स  आणि कॅलरी ग्रिमेट ही ती दोन गोलंदाज. दोन्हीही गोलंदाज 19व्या शतकाच्या प्रारंभी क्रिकेट खेळत होते. आजच्या आधुनिक क्रिकेटचा विचार केला तर अश्विनने ही कामगिरी कमी कालावधीत केली आहे, असे म्हणायला हरकत नाही. तो सव्वा दोनशे बळी घेण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे.त्याने आतापर्यंत मिळवलेल्या 213 बळींपैकी निम्म्यापेक्षा जास्त बळी विरोधी संघाच्या टॉप फलंदाजांचे घेतलेले आहेत. यापैकी 15 टक्के बळी तर त्याने अशा फलंदाजांचे घेतले आहेत, जे मैदानावर  स्थिरावलेले होते. म्हणजेच त्यांनी पन्नासपेक्षा अधिक धाव्या काढलेल्या होत्या.

     फलंदाजाला चकवा देऊन बाद करण्याची अश्विनची खासियत आहे. आपल्या लाईन, लेंथ आणि टर्न यावर अधिक विश्वास ठेवणार्या अश्विनने इंदोरमध्ये फलंदाजांना फ्रंटफुट किंवा बॅकफुटवर  खेळवून संभ्रमात टाकत बळी मिळवले आहेत.ही कुठल्याही गोलंदाजासाठी मोठी उपलब्धी आहे. ती आर. अश्विनला साधली आहे. गोलंदाजीबरोबरच अश्विनने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे.चार कसोटी शतकांसह सहा अर्धशतकेही त्याने झळकावली आहेत. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी भारत संकटात असताना केली आहे.तो संघात दाखल झाला तेव्हा तो अष्टपैलूच होता, पण त्याच्यावर लोकांची दृष्टी उशिराने पडली, असं त्याचं म्हणणं आहे.

Wednesday, October 12, 2016

सकारात्मक विचार



     21 वे शतक हे संधीचे आणि आव्हानाचे आहे. विज्ञानाने लावलेले शोध आणि तंत्रज्ञानात झालेल्या अदभूत बदलांमुळे मानवी जीवन पार ढवळून निघालं आहे. अर्थात तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुखकर झालं आहे. मात्र ते अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. संधी, आव्हान यामुळे जीवनात ताणतणाव वाढले आहेत. त्यामुळे नैराश्य माणसाला येऊन चिटकलं आहे. त्यातून ब्लडप्रेशर,हृदयविकार यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. किडनी,कॅन्सरसारखे जीवघेणे आजार बळावले आहेत.यात माणूस पार खचून जातो.त्याच्यातला जगण्याचा आनंद निघून जातो.
     पण सकारात्मक विचार अशा लोकांचं आयुष्य बदलू शकतो. त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवू शकतो. जीवनाविषयी एक आनंदी आणि आशावादी दृष्टिकोन तयार करू शकतो. सकारात्मक दृष्टीनं आपलं शरीर आणि मन आनंदी ठेवू शकतो. त्यांच्यातले आजार पळवून लावू शकतो.अशी कितीतरी उदाहरणं या जगात आहेत. सकारात्मक विचार आणि सतत सकारात्मक शब्दांचा वापर त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे.
     एका रुग्णाची कथा.त्याने सकारात्मक विचाराची अदभूत शक्ती जाणली होती.तो गेल्या पाच वर्षांपासून किडनी आणि हृदयरोगाने आजारी आहे. अचानक एक दिवस त्याने आपला विचार बदलला. आणि आपल्या आरोग्याविषयी तो स्वास्थ्यवर्द्धक शब्दांचा वापर करत उत्साहपूर्ण जीवन जगू लागला.विचार आपला स्वभावच नाही तर आपले आरोग्यदेखील सुधारतो आणि बिघडवतोही.याची त्याला प्रचिती आली.
     अमेरिकेचा प्रसिद्ध मनोवैज्ञानिक व मेडिसीन विशेषज्ञ जॉर्ज डब्लू क्रेन म्हणतो, आधुनिक उपचार पद्धतीच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारानुसार मला असं वाटतं की,सकारात्मक विचारांचा शरीरिक अंगांवर चांगला प्रभाव पडतो.तर नकारात्मक विचार शरीरातल्या आंतरिक अंगांवर आणि स्वास्थ्यवर्धक हार्मोन्सच्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण करतो.
     विन्सेंट पील एक प्रसिद्ध मनोविश्लेषक आहे.तोदेखील म्हणतो की, औषधे मस्तीष्क आणि ग्रंथींना प्रभावित करतात.पण निरंतर सकारात्मक विचार केल्याने शरीराला निरोगी ठेवणार्या हार्मोन्सचं उत्सर्जन होतं आणि आंतरिक अंग सुदृढ व्हायला लागतात. कॅन्सरवर विजय मिळवणार्या क्रिकेटपटू युवराजसिंगचं म्हणणं आहे की, जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन आणि जिजीविषाचं फलस्वरुप यामुळेच तो या घातक रोगाचा सामना करू शकला आणि त्यात यशस्वी झाला.
     ॅकेडमिक ऑफ सायकोसोमेटिक मेडिसीनचे माजी अध्यक्ष अल्फ्रेड जे कँटर यांचं म्हणणं असं आहे की,सकारात्मक शब्दांचा सहजगत्या वापर केल्यानेदेखील आरोग्य सुदृढ बनतं. त्यांच्या मते, मी आजारी पडणार नाही, हे एक अर्ध-सकारात्मक कथन आहे. यापेक्षा सहजगत्या असं म्हणत चला की, आज मी छान राहीन. माझं संपूर्ण अस्तित्व स्वास्थ्यवर्धक राहील. के वाक्य पूर्ण सकारात्मक आहे. म्हणून अधिक क्रियाशील आहे.
   तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही होता, हा निसर्गनियम आहे.त्यामुळे नेहमी मुखात,मनात सकारात्मक विचार, शब्द असायला हवेत. सकारात्मक विचार, वाक्यांच्या सततच्या वापरामुळे शारीरिक आणि मानसिक स्थिती आरोग्यपूर्ण ठेवली जाऊ शकते.                                           




Monday, October 10, 2016

चिनी वस्तू: भारतीय नागरिकांची जबाबदारी


      सध्या चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा मेसेज  सोशल मिडियावर फिरत आहे. कुठल्या तरी अख्ख्या गावाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घातले असल्याचे त्यातून सांगितले जात आहे. जरा विचार केला तर खरेच यातून आपण घेऊ शकतो. सध्या भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूने धुमाकूळ घातला आहे. स्वस्त वस्तू म्हणून त्याची आपण खरेदी करत आहे. पण यातून आपण आपला पैसा चीनला देतो आहे. त्यामुळे साहजिकच त्यांची अर्थव्यवस्था आपण बळकट करत आहोत. वास्तविक चीन आपला मित्रदेश कधीच राहिला नाही. आपल्या देशाची प्रगती त्याला खुपते आहे. त्यामुळे अनेक स्तरावर तो देश आपल्या भारताला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा देशातील वस्तू खरेदी करून आपण त्यालाच पाठबळ देत आहोत. देशात, राज्यात जाती-धर्मासाठी लोक एकत्र येत आहेत. मोर्चे काढत आहेत. एकीचे प्रदर्शन करत आहेत. याच लोकांनी देशासाठी एकी दाखवून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा. देशातील एकजुटीचे प्रदर्शन दाखवावे.
     चीनने 1962 साली आपल्याशी युद्ध केले. त्यावेळी आपली सैन्य संख्या उत्तरभागात तोकडी म्हणजे  10 ते 12 हजार होती. ती संख्या चीनच्या विशाल 80 हजार सैन्यासमोर फारच छोटी होती. युद्धात आपले 1047 सैनिक घायाळ झाले तर 1383 सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. 1269 सैनिक बेपत्ता झाले तर 3968 सैनिक बंदी झाले. युद्धात आपला पराजय झाला. परिणामी चीनने तिबेट काबीज केला व आपला बराचसा भूभाग बळकावला. त्या युद्धात आपण धडा घेतला.पुढे पाकिस्तान-भारत यांच्यात सहा वर्षांनी म्हणजे 1971 मध्ये युद्ध झाले. तेव्हा मात्र पूर्व पाकिस्तान नष्ट झाला. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बांगला देश घोषित केला. तेव्हापासून पाकिस्तान भारतावर अधिकच आक्रमक होत गेला. भारताचा सर्वनाश हा एकच उद्देश लक्षात ठेवून त्याने चीनचे सहाय्य घेतले व स्वत: अण्वस्त्रधारी बनला.
      आजही पाकची मदत घेत आहे. पूर्व पाकिस्तानचा बदला घ्यायचा आहेच. तेव्हा काश्मीर हे भारतापासून वेगळे केल्याशिवाय गत्यंतर नाही. याच भूमिकेत पाकिस्तानात सरकार कार्यरत असते. आजही त्याच्या कुरबुर्या सुरूच आहेत. यात चीन त्याला सहाय्य करतो आहे. पाकिस्तानने चीनला पाकव्याप्त काश्मीरमधील काही भूभाग दिला आहे. तिथे चीन रस्ते बांधत आहे. चीनला सीयाचीनच्या वरच्या भागातून पाकिस्तामध्ये प्रवेश मिळतो. तो बलुचिस्तानमार्गे जातो. म्हणजे या मार्गाने प्रवेश करून अरबी समुद्रात त्याला स्वत:च्या युद्धनौका प्रस्थापित करून तिथे स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे म्हणून पाकिस्तान-चीन मैत्री दिसून येते. भारताच्या वाढत्या प्रभावावर चीन खूष कसा राहणार? म्हणून भारताच्या युनोमधील स्थायी सदस्यावर चीनचा नेहमी आक्षेप असतो. एवढेच नव्हे तर मध्ये (एनएसजी) एन.एस.जी. च्या मुद्यावरसुद्धा सगळे अण्वस्त्रधारी देशभारताला पाठिंबा देत असताना चीनने विरोधच केला. न्युक्लीअर सप्लाय ग्रुप मध्ये फक्त निवडक देश आहेत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन यांच्या भारताला पाठिंबा आहे.
     आता नुकतेच पाकिस्तानने काश्मीरमध्ये उरी कॅम्प मध्ये दहशतवादी हल्ला करून 18 भारतीय सैनिक मारले. या भ्याड हल्ल्याच्या विरोधात केंद्र सरकारने भूमिका घेतली होती कीखून और पानी एकसाथ बहाया नहीं जायेगाम्हणजे काश्मीर मधून सिंधू नदीचे ज ेपाणी पाकिस्तानला फुकट जाते त्या पाण्यावर सिंधू कराराप्रमाणे अंकुश घालण्यात यावा. कराराप्रमाणे भारताच्या हिस्स्यातील 20 टक्के पाणी भारत रोखू शकतो. पाकिस्तान घाबरला. परंतु त्याला लगेच चीनने साथदिली. चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखले. हा चीन भारताचा कधीच मित्र म्हणून राहिला नाही.
     भारत व चीन लोकसंख्येने आता जवळ जवळ आले आहेत. भारत हा विकसनशील म्हणून झपाट्याने प्रगती करत आहे. भारत म्हणजे मोठी व्यापारपेठ आहे. जगाच्या बाजारपेठेच्या मानाने भारताची मोठी बाजारपेठ म्हणून गणल्या जाते. येथे अमेरिका, चीन, जापान, सारखे देश वस्तू पाठवून पैसा कमवतात. चीनची सुद्धा अर्थव्यवस्था भारताच्या बाजार पेठेवर काही प्रमाणात नक्कीच अवलंबून आहे. अशा वेळी आपण सारे नागरिक मिळून चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करू शकतो. चीनच्या वस्तू स्वस्त मिळतात म्हणून आपण वापरतो. चायनीज वस्तूंवर पूर्णणे बहिष्कार टाकणे, ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. विद्युत उपकरणे, मोबाईल, बॅटरी, फटाके, डेकोरेशन, खेळणी वगैरे कितीतरी वस्तू बाजारात दिसतात. यासर्व गोष्टींवर बंदी आणायला हवी. आपले सैनिक रात्रंदिवस चीनच्या सीमेवर पहारा देतात. एवढया थंडीत, पाण्यात, बर्फात ते कुटुंबापासून दूर राहून स्वत:चा जीव धोक्यात टाकून आपले रक्षण करतात. त्यांच्यामुळेच आपण सुखी जीवन जगत असतो. याची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हायला पाहिजे.
     आता दसरा-दिवाळी जवळयेत आहे. आपण दरवर्षीप्रमाणे आपले घर रंगवून सजावट करतो. विद्युत रोशणाई करतो. त्यावेळी प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे की चीनच्या वस्तू गांभीर्याने नाकारायला हव्या. रोशणाईसाठी भरपूर चायनीच दिवे बाजारात असतील. दोन दिवे कमी वापरले तरीही चालेल पण चीनच्या बनावटीचे दिवे नको, ही भूमिका घ्यायला हवी. याचा परिणाम नक्कीच होईल. चीनलासुद्धा वाटायला पाहिजे की भारतात त्याच्याविरुद्ध लाट आहे. या लेखाचा उद्देश हाच की मोठया व्यापारांनीच याची दखल घ्यायला हवी. म्हणजे चीनी वस्तू खुल्या बाजारात उपलब्ध राहणारच नाहीत. ही एकप्रकारची देशसेवाच होय. चीनी वस्तूंवर बहिष्कार म्हणजे आपण आपल्या सैनिकांना आतून सहाय्य करतो. याउलट चीनी वस्तूंचा वापार म्हणजे आपल्या सैनिकांचा अपमान करण्यासारखे होईल. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.         




Monday, October 3, 2016

भावनांवर नियंत्रण आवश्यक

    सामाजिक, सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे शहरात प्रेमभंग आणि घरच्यांना प्रेम संबंधाची माहिती समजेल, या भीतीने तीन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली. सुमारे महिनाभरापूर्वी दोन शालेय विद्यार्थिनींनीसुद्धा स्वत:चे हात बांधून नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांमुळे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.
     प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेमविषयक भावनांची माहिती प्राप्त होते. मुलांच्या तारुण्याबद्दल असणार्या संकल्पना आणि पालकांचा विचार याबाबत मोठी तफावत आहे. किशोरवयात होणारे मानसिक आणि शारीरिक बदल, त्याचवेळी वाढती स्पर्धा आणि आयुष्याच्या बदलत असलेल्या संकल्पना यांचा मेळ घालणे विद्यार्थ्यांना अनेकदा कठीण होत आहे. . किशोरवयीन मुलांमध्ये प्रेमप्रकरण, करियरची चिंता, व्यसनाधीनता, प्रेमप्रकरणांमध्ये स्वाभिमान आणि पराभव एकत्र आल्याने मुला-मुलींकडून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो. आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असून, सामाजिक, सांस्कृतिक, नातेसंबंध, तत्कालीन किंवा दीर्घकालीन राग आणि भ्रमनिरास अशी कारणे असू शकतात. प्रत्येक आत्महत्या टाळता येत नाही; मात्र समुपदेशन, योग्य पद्धतीने संवाद याने हे प्रमाण निश्चित कमी करता येऊ शकते; तसेच आत्महत्या करणार्या व्यक्तीनंतर मागे राहणार्या व्यक्तींनी स्वत:ला दोषी धरू नये. समाजानेही आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती, प्रेमप्रकरणातील जोडीदार इत्यादींना दूषणे न देता त्यांचा समाजाने योग्य पद्धतीने स्वीकार करावा.
     सुरुवातीपासूनच संस्कृतीच्या नावाखाली समाजाने लैंगिक शिक्षणाला विरोध केला. मात्र, डॉक्टर, समुपदेशक आणि स्वयंसेवी संस्थांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहायला हवे. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्व टप्प्यांवर समुपदेशन करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी घरात व घराबाहेर काय करतात, याकडे लक्ष द्यायला हवे. भारतीय समाज हा मुळातच भावनाप्रधान असल्याने मुलांमध्ये भावनेच्या भरात वाहून जाण्यामुळे आत्महत्येच्या प्रसंगांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहेकिशोरवयीन मुलांमध्ये अनेकदा मी म्हणेन तसेच झाले पाहिजे, असा अट्टहास असतो. तसे न झाल्यास येणार्या रागातून कोणाला तरी शिक्षा झाली पाहिजे, या एकाच उद्देशाने आत्महत्या केली जाते. ही शिक्षा स्वत:ला करणे म्हणजेच आत्महत्या. मात्र भावनांवर योग्य पद्धतीने नियंत्रण मिळविण्याची शक्ती या तरुणांमध्ये नसल्याने आत्महत्या हा टोकाचा मार्ग ते स्वीकारताना दिसतात. प्रेमभंग, करियरमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने आलेली निराशा, स्वत:बद्दल असणार्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न होणे अशा आयुष्याच्या टप्प्यावरील एखाद्या घटनेवरून जीवनाला नापास करणे अतिशय चुकीचे आहे.
     किशोरवयीन मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदलाच्या कालावधीत पालकांशी संवाद तुटल्यामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या उभ्या राहू लागल्या आहेत; तसेच वाढत्या वयात भुलविणारे प्रसंग, प्रेमाचे आकर्षण, स्वत:च्या महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक, कौटुंबिक दबावामुळेकोवळ्या कळ्याउमलण्याआधीच आत्महत्येचा मार्ग स्वीकारून स्वत:ला चुरगाळून टाकत आहेत. त्यामुळे जग समजण्याआधीच, जग सोडण्याच्या निर्णयाप्रत जाणार्या मुला-मुलींना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची वेळ आली आहे. भविष्यात ही समस्या आणखी तीव्र होण्यापूर्वी समाजातील सर्व घटकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.                    


Wednesday, September 28, 2016

विद्यार्थ्यांना मजदूर बनवायचे आहे का?

      शालेय स्तरावर गणित आणि इंग्रजी या विषयांना नवा पर्याय देण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.तावडे यांनी शाळांचा विचार केला आहे,मुलांचा नाही, असेच यावरून दिसून येते.आज ज्या विषयांची गरज आहे, त्याच विषयांना तिलांजली देण्यास शिक्षणमंत्री तयार झाले आहेत. तसा निर्णय झाल्यास तो दूरगामी परिणाम करणारा ठरेल. यातून निकालाची टक्केवारी वाढू शकेल. मात्र विद्यार्थ्यांची संख्या महत्त्वाच्या विषयापासून दूर राहून अधिकार्याऐवजी राज्यात मजदूर तयार होतील. दहावी असो की बारावी, सर्वाधिक विद्यार्थी गणित अथवा इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण होतात,ही वस्तुस्थिती आहे. मात्र या विषयांची गरजही लक्षात घेतली पाहिजे.
      शिक्षणमंत्र्यांनी शैक्षणिक वस्तुस्थिती जाणून विद्यार्थ्यांना इंग्रजीगणित विषयाला पर्याय देण्याचे संकेत दिले असावेइयत्ता दहावीत इंग्रजीगणित विषयात 10 ते 20 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण होतातया 20 टक्के अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विषय पर्याय निवडीचा 80टक्के विद्यार्थ्यांचा नुकसान होईलपुढील येणारी पिढी अधिकारी न होता मजूर निर्माण होतीलगणित व इंग्रजी विषयाला पर्याय शोधण्यापेक्षा या पद्धतीवर प्रभुत्व कसे मिळवता येईल हा खरा प्रश्न आहे.विद्यार्थ्यांना शाळेत खरेच शिक्षण घेण्यासाठी टाकले काअसा प्रश्न निर्माण होतोसामाजिकशैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहेगणित आणि इंग्रजी विषयाला पर्याय हा विचार करणे देखील चुकीचे आहेयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता टाळता येत नाहीपुढील करिअरसाठी इंग्रजी व गणित हे विषय महत्त्वाचे आहेतहे विषय नसतील तर करिअर करणे अवघड आहेआपल्या पाल्यांसाठी कोणते विषय निवडायचे हेदेखील पालकांना अवघड जाईल,त्यामुळे हा निर्णय घेणे व विचार करणेदेखील अवघड आहे.
     गणित आणि इंग्रजी तर सोडाचपण हल्ली मराठीतही अनेक विद्यार्थी नापास होत आहेतमग आपण मराठीही काढून टाकणार का ? अशाच प्रकारे आपण संस्कृतही घालवून टाकली आहेजर काही बदलायचे असेल तर शिक्षण देण्याची पद्धती आणि पाठ्यपुस्तके बदलायला हवीतविद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या गणिताच्या भीतीला शासनाने खतपाणी घालत त्यांच्या आयुष्यातून गणित हद्दपार करण्यापेक्षा त्याची भीती कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
     या विषयांना पर्याय देण्यापेक्षा मुलांना त्यांचा कल पाहून शिक्षण द्यायला हवेव त्यावर अधिक भर द्यायला हवामुलांचा कल निश्चित करणे आणि त्यानुसार किमान पाचवीपासून व्यवसाय कौशल्याचे धडे देण्यास हरकत नाहीआता त्यासाठीआयटीआय’ ही स्वतंत्र व्यवस्था आहेती व्यवस्था शाळांशी संलग्न करता येईल का याचा विचार व्हावासुतार कामगवंडी कामवेल्डिंगचे काम,संगणक-मोबाईल दुरुस्ती यासाठी तेथे प्रवेशास दहावी उत्तीर्णची अट नाहीअशावेळी शाळांमधूनच त्या कौशल्याबद्दल मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास ही मुले किमान दहावीचा उंबरठा ओलांडून जाऊ शकतील.
     बदलत्या काळात जसे व्यवसाय कौशल्य महत्वाचे आहे तसेच भाषा कौशल्याला देखील पर्याय नाही.व्यावसायिक कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना आज भारतापेक्षा भारताबाहेर संधी अधिक आहेतइंग्रजीचे किमान ज्ञान नसेल तर अशा विद्यार्थ्यांच्या संधी केवळ त्या प्रांतापुरत्याच राहतीलहेही लक्षात घेतले पाहिजेगणित-इंग्रजीत अनुत्तीर्ण होण्यास विद्यार्थी जबाबदारअसेच मानले जातेमग शिक्षकांचे कायसातत्याने एक-दोन विषयांमधील अनुत्तीर्णतेचा प्रश्न आहेतर अध्यापनाच्या रूढ पद्धतीचा फेरविचार केव्हा होणारकाठिण्य पातळीसंदर्भात एकवेळ लवचिकता चालू शकेलपण मुख्य विषयांना दूर ठेवणे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे होईल असे वाटत नाही.  
                              

Sunday, September 4, 2016

शिक्षण आयोग नेमण्याची गरज

     शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वांचा गौरव करण्याचा हा दिवस. त्यांचा सन्मान राखला जावा यासाठी केंद्र आणि राज्य शिक्षण विभागाकडून वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. पण शिक्षक दिनादिवशी हे जे कार्यक्रम होत आहेत,हे सगळे सोपस्कार आहेत, अशी आता खात्री व्हायला लागली आहे. कारण शासन,संस्थाचालक,समाज आता शिक्षकाला पूर्वी दिलं जात होतं ते स्थान देत नाही. त्यातच ज्ञानदानाचे पवित्र कार्य म्हणून पाहण्याची दृष्टी ही लोप पावली पावत चालली आहे.शिक्षकाला पोटार्थी शिक्षक म्हणून पाहिले जात आहे. शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक राज्यांमधे नवीन शिक्षकांची भरती थांबवण्यात आली. त्याऐवजी दहा महिन्यांच्या करारावर कंत्राटी शिक्षक नेमले गेले. ह्या शिक्षकांच्या शिक्षण, पगार यासंबंधी ‘मिळेल तो  तरुण’ एवढीच अट राहिली. गेल्या पाच वर्षांत भारतभरात पाच लाखांच्यावर असे शिक्षक नेमले गेले. त्यांना ‘शिक्षक’ न म्हणता गुरुजी, शिक्षामित्र, शिक्षाकर्मी, शिक्षण-सेवक अशी गोंडस नावं दिली गेली. आणि ‘शिक्षक’ म्हटल्यानं येणाऱ्या कायदेशीर जबाबदारीतून सरकार बाहेर पडलं. शिक्षकासाठी कराराची ही पद्धती कायमची बंद केली तर चांगले शिक्षक देशाचे भविष्य घडवण्यासाठी योगदान देऊ शकतील. आजही आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांना रस्त्यावर यावे लागते, मोर्चे काढावे लागतात, संप करून सरकार आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरावे लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
जगभरातील प्रगत देशांमध्ये शिक्षणासाठी सुरू असलेल्या यंत्रणेकडे डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. युरोपीय देशात फिनलॅँडसारख्या देशाने शिक्षणात केलेली प्रगती लक्षात घेतली तर शिक्षक, विद्यार्थी आणि समाजविकासाचे उद्दिष्टय़े काय असायला हवे, हे लक्षात येईल. बारावीपर्यंतचे सर्वाना शिक्षण सक्तीचे व समान करणे आणि खासगी शाळा संस्था सरकारच्या ताब्यात घेणे, हा यावरील एकमेव उपाय आहे. एकीकडे पहिलीपासून ते पदवीपर्यंत एका वर्गात २० विद्यार्थ्यांचे स्टॅँडर्ड युरोपीय देशांनी मान्य केले असून जगभरात हा मापदंड वापरला जातो. आपल्याकडे मात्र शिक्षण हक्क कायद्याच्या आड दडून प्राथमिक,माध्यमिक शाळेतील वर्गात विद्यार्थी अक्षरशा:कोंबले जातात. इतक्या विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक हा केवळ रखवालदार बनतो, शिक्षक नाही. मेंढरांसारखे विद्यार्थ्यांना सांभाळणे इतकेच तो करू शकतो. त्यात बदल केले तर शिक्षकांवरील ताण कमी होऊन संस्कारमय शिक्षण मिळेल.   देशातील एकूणच शिक्षणव्यवस्थेची दुरवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण आयोग नेमण्याची गरज आहे. ज्या आयोगाला न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता असणे गरजेचे आहे. केवळ शिक्षण क्षेत्रातीलच व्यक्ती या आयोगाचे सदस्य असतील, याची खबरदारी त्या-त्या सरकारने घेतली पाहिजे. मात्र हे सदस्य गुणवत्तेवर आणि त्यांनी निर्माण केलेल्या योगदानावर असावेत.
जगभरातील शिक्षण व्यवस्था झपाटय़ाने बदलत चाललेली असताना आपल्याकडे मात्र गुणवत्तेच्या नावाखाली केवळ बाजारीकरण करण्यात येत आहे. यात ना शिक्षकांची ना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संरक्षण, सुरक्षा राखणे दुरापास्त होऊन बसले आहे. देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न  पाहत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष घालण्याची गरज होती; परंतु  सरकारने आहे त्या तरतुदींनाही कात्री लावून एकूणच शिक्षणव्यवस्था अडचणीत आणली आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के निधीच्या तरतुदींची गरज असताना  सरकारने मात्र केवळ २.९ टक्के तरतूद ठेवून आपली शिक्षणाप्रती उदासीन भूमिकाच स्पष्ट केली आहे.  सरकारने ही उदासीनता हटवल्याशिवाय त्यांच्याकडून  शिक्षकांचा आजच्या दिवशी होणारा गौरव हा बेगडी आहे, असेच  म्हणावे लागेल.

पोलिसांवरील हल्ले ही व्यवस्थेविरुद्धची चीड

        मुंबईतील वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा हल्ल्यात मृत्यु झाला.याची तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटली.असे असले तरी पोलिसांवरील हल्ले थांबता थांबेनात.पोलिसांवर हल्ले करणारे सराइत गुन्हेगार नाहीत.सामान्य नागरिक आहेत. त्यामुळे ही माणसे इतकी  हिंस्त्र का वागत आहेत,याचा विचार व्हायला हवा.पोलिसांवर हल्ले होतात याची अनेक कारणे आहेत. यातले पहिले कारण म्हणजे त्यांचा वचक कमी झाला आहे, दरारा संपला आहे, अशी एक  समाजमनात  भावना निर्माण झाली  आहे आणि यातून आणखी एक लोकांच्या मनात  भयशंका निर्माण झाली आहे,ती म्हणजे जेथे पोलीसच असुरक्षित आहेत तेथे सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित असणार ? अलीकडे पोलीस हा आपल्या व्यवस्थेत नेहमीच टिंगलटवाळीचा विषय राहिलेला आहे. आगोदरही पोलीस टिंगलटवाळीचा विषय होता,पण त्यावेळेस त्याच्या हातातल्या दंडुक्याचा दरारा होता. आज हातात बंदूक असलेल्या पोलिसांचा आदर, वचकदेखील  वाटेनासा झाला आहे. राजकारणी तर या पोलीसांना आपल्या हातचे बाहुले असल्यासारखे वागवतात .आणि पोलीसदेखील तसे वागतात. अर्थात ते मजबूर असतात,कायद्याने आणि नैतीकतेने. मागे एकदा  ठाण्यामध्ये एका उद्दाम राजकीय कार्यकर्त्यांने एका महिला पोलिसास भररस्त्यात मारहाण केली. विलास शिंदे यांना अशाच एका हल्ल्यामध्ये आपले प्राण गमवावे लागले. शिंदे यांच्या हल्ल्यानंतर या घटना सुरूच आहेत. कायद्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे आणि त्याकरिता कोणत्याही नागरिकावर कारवाई करण्याची शक्ती ज्यांच्या हाती आहे अशा पोलिसांवर आपण हात टाकू शकतो असे कोणालाही वाटू लागले आहे,हे वाटणे आणि तशी प्रत्यक्षात कृती होवू लागणे,ही समाजाच्यादृष्टीने भयंकर घातक आणि भीतीदायक आहे. राजकारण्यांसमोर नांगी टाकणारे पोलीस सर्वसामान्यांसमोर वाघ होतात आणि त्यांना वाटेल तशी वागणूक देतात हा पोलिसांबाबत राग आहे.  एरवी सराईत गुन्हेगार नसलेली माणसेही किरकोळ कारणावरून  हल्ले करायला लागले आहेत. या प्रश्नचिन्हाला कारणीभूत आपली राजकीय व सामाजिक व्यवस्था आहे हे नीट लक्षात घेतले पाहिजे. पोलिसांवर हल्ले होण्याला आता दूसरे कारण आहे,ते म्हणजे भ्रष्ट पोलीस आणि त्यांची यंत्रणा. चिरीमिरीसाठी प्रत्येकापुढे हात पुढे करणारे पोलीस त्यांच्याविषयीचा आदर नाहीसा करत आहेत,हे  सर्वात मोठे कारण आहे. पोलीस दलात चिरीमिरी संस्कृती फोफावली  आहे. पोलीस दलातील भ्रष्ट प्रवृत्ती  राजकारण्यांच्या फायद्याच्याच असतात. तेव्हा त्यांचे व्यवस्थित साटेलोटे चाललेले आहे,असा समज सर्वसामान्यांचा झाला आहे,असे म्हणायला जागा आहे.आणि त्यातून सर्वच पोलिसांची प्रतिमा ढागाळत चालली आहे.पण पोलीस चिरिमिरी खातात, भ्रष्टाचार करतात, निरपराधांना छळतात म्हणून त्यांची ‘इज्जत’ राहिलेली नाही आणि म्हणून त्यांच्यावर हल्ले केले जातात  किंवा केवळ पोलिसांबद्दलच्या अनादरातून वा द्वेषातून हल्ल्यांचे प्रकार घडतात,असे नव्हे .ते पोलिसांना दिलेले आणि म्हणून राज्यव्यवस्थेला दिलेले आव्हान आहे. गल्लीतल्या टपोरी तरुणांमध्येच नव्हे, तर क्वचितप्रसंगी सर्वसामान्य गणल्या जाणाऱ्या माणसांमध्येही असे आव्हान देण्याचे धाडस यायला लागले आहे,याचा खरेच विचार व्हायला हवा आहे. माणसे व्यवस्थेप्रति हिंस्र बनत  तर नाहीत ना,हे तपासून पाहण्याची वेळ आता आली आहे.