Wednesday, June 7, 2017

किल्ल्यांचे संवर्धन व्हावे

     नुकताच शिवराज्यभिषेक सोहळा पार पडला. रायगडावर झालेल्या एका विशेष कार्यक्रमाप्रसंगी शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी किल्ले रायगडावर 32 मण सोन्याचे सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प सोडला आहे. विशेष म्हणजे हा संकल्प शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय परवानगीशिवाय साकारला जाणार आहे. त्यामुळे या संकल्पाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंहासनाच्या संरक्षणाची जबाबदारीदेखील प्रतिष्ठानच उचलणार आहे. वास्तविक फक्त सिंहासन सोन्याचे बनवून भागणार नाही तर किल्ल्याच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी सगळ्यांनीच घेण्याची गरज आहे. आणि फक्त रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांची संवर्धनाची गरज आहे. किल्ल्यांची फारच वाताहात होत आहे. ती थांबायला हवी आहे. राज्यात फारशी प्रकाशित नसलेल्या किल्ल्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्याकडे ना शासनाचे लक्ष आहे, ना पुरातत्व विभागाचे. त्यामुळे असे किल्ले अडगळीत पडले आहेत. दुर्गप्रेमी, शासन आणि सामाजिक संस्था यांनी मिळून या किल्ल्यांना उर्जितावस्था आणण्याची गरज आहे.

     छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. यानंतर एकापाठोपाठ एक असे शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात या किल्ल्यांचा सिंहाचा वाटा आहे. हे किल्ले जिंकण्यासाठी,बाजीप्रभू देशपांडे,तानाजी मालुसरेंसारखे अनेक मावळे धारातीर्थी पडले. शिवरायांचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवाच; परंतु 350 वर्षांनंतर यातील अनेक किल्ल्यांची आज पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून यातील काही किल्ले रोल मॉडेल म्हणून पुढे यावेत, अशी दुर्ग अभ्यासकांची अपेक्षा आहे. शिवकाळात किल्ल्यावर कित्येक महिने पुरेल अशी अन्नधान्याची व्यवस्था होती, तसेच मंदिर, पाण्याचे तळे, घोड्याची पागा, दारूकोठार अशी स्वतंत्र व्यवस्था होती. महाराष्ट्रात सध्या 410 पेक्षा जास्त ऐतिहासिक किल्ले आहेत. आजही हे किल्ले शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. काही किल्ले चांगल्या अवस्थेत आहेत,तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जतमधला रामगड,भूपाळगड असे अनेक किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.  अनेक किल्ल्यांच्या तटबंदी, बुरूज कोसळलेले आहेत. हा ऐतिहासिक ठेवा जपणे शासनासह सर्वांची जबाबदारी आहे.
     किल्ल्यांच्या संवर्धनातून पर्यटकांची संख्या वाढणार आहे.काही मोजक्याच किल्ल्यांना पर्यटनाच्यादृष्टीने प्रकाशात आणण्यात आले आहे. तसे न करता सगळ्याच किल्ल्यांना शासनाने भरीव सहाय्यता करून त्यांची डागडुजी करण्यावर भर द्यावा. पर्यटनातून उत्पन्न मिळेल.पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटनासाठी जाणार्‍या लोकांनीही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्याठिकाणी गेल्यानंतर काही अतिउत्साही मंडळी स्वत: ची नावे तेथे कोरण्याची मर्दुमकी दाखवितात. परंतु शिवरायांनी आपल्या हयातीत एकाही किल्ल्याला स्वत:चे व आपल्या कुटुंबियांचे नाव दिले नाही, हे किल्ल्यावर नाव कोरणार्‍यांनी लक्षात घ्यावे. किल्ल्यांच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाकडे आहे. परंतु त्या विभागाला मिळणारा निधी तुटपुंजा असल्याने मर्यादा येतात. शासनाचे उपेक्षित खाते अशी या विभागाची ओळख बनली आहे. राजस्थान व गुजरात सरकारने किल्लेसंवर्धनातून पर्यावरणवाढीस चालना दिली आहे. मात्र महाराष्ट्राला एवढा मोठा इतिहास असूनही शासनाची याबाबत उदासीन भूमिका असलेली दिसून येते. इथून पुढच्या अनेक पिढ्यांसाठी किल्ल्यांचे जतन करणे गरजेचे आहे.
पर्यटनाच्यादृष्टीने किल्ल्यावर शिवसृष्टी तयार व्हावी, जेणेकरून परदेशी पर्यटक अशा ठिकाणी भेट देतील. सध्या गडकोट किल्ल्यांविषयी लोकांना आपुलकी निर्माण झाली आहे. परंतु किल्ल्यांचे पावित्र्य राखणे तितकेच आवश्यक आहे. अनेक स्वयंसेवी संस्था स्वत: किल्लेसंवर्धनासाठी पुढे येऊन किल्ल्यांची स्वच्छता करत आहेत. शिवनेरी किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाने चांगले काम केले आहे. त्याचप्रमाणे इतर किल्ल्यांकडेही लक्ष द्यायला हवे. सर्व किल्ल्यांची डागडुजी करणे शासनाला शक्य नसले सामाजिक सहभागातून या गोष्टी शक्य आहेत.  रायगड, पन्हाळगड, प्रतापगड,राजगड अशा महत्त्वाच्या किल्ल्यांचे जतन करून हे किल्ले रोल मॉडेल म्हणून पुढे येतील, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.
     किल्ले नैसर्गिक अवस्थेत जतन व्हायला हवे आहेत, अशी दुर्गप्रेमींची अपेक्षा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गवेध परिवार संस्थेने किल्ले सफाईची मोहीम हाती घेतली आहे.रांगणा किल्ला दत्तक घेतला असून याठिकाणी स्वच्छतेची कामे नित्यनेमाने केली जातात. शासनाने 10 किल्ले निवडून त्याठिकाणी नैसर्गिक अवस्थेत किल्ल्यांचे जतन करावे, यासाठी शाश्‍वत गोष्टींवर भर द्यायला हवा.तसेच पर्यटन आणि पुरातत्त्व या दोन खात्यांत समन्वय आवश्यक आहे. पुरातत्त्व खात्यामार्फत पडझड झालेल्या पुरातन वास्तूंचे आहे त्या अवस्थेत जतन केले जाते. पुरातत्त्व खाते व पर्यटन विभाग या दोहोंमध्ये समन्वय गरजेचा आहे. या दोन्ही खात्यांनी शासनाकडे निधीची मागणी करून किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे जतन करणे गरजेचे आहे. तरच शिवरायांचा इतिहास जिवंत राहणार आहे.

Monday, June 5, 2017

आनंदी जीवन जगण्यासाठी...

      जीवनात खूप काही असे आहे की,जे तुम्ही करता स्वत:साठी,पण त्याचा परिणाम तुमच्याबरोबरच दुसर्‍यांवरही होत असतो.त्यामुळे या काही टिप्स आहेत,त्याचे अनुसरण करा आणि आनंदी जीवन जगा.
सात तास झोप घ्या,सुंदर दिसण्यासाठी
विविध प्रकारच्या संशोधनांनी हे सिद्ध झाले आहे की, तुमच्या आयुष्यात तुमच्या झोपेचा प्रोब्लेम झाला असेल. तुमच्या झोपेचे खोबरे झाले असेल तर तुम्ही अकाली म्हातारे दिसायला लागता.30 ते 49 दरम्यानच्या वयाच्या महिलांच्या झोपेसंदर्भात एक शोध घेतला गेला,त्यानुसार ज्या महिला पूर्ण झोप घेत नाहीत, त्यांच्या चेहर्‍यावर सुरकुत्या,डाग-धब्बे दिसायला लागतात. चेहर्‍यावर अकाली वृद्धत्व दिसायला लागतं. त्वचेवरचा मुलायमपणाही कमी व्हायला लागतो.वास्तविक झोप चेहर्‍याच्या दुरुस्तीचे काम करते.त्यामुळे पूर्ण सात तास झोप घ्या आणि सुंदर दिसा.
अंघोळ करा, राग शांत करण्यासाठी
राग काहींना आवरता आवरत नाही. त्यामुळे त्याचा स्वत:ला तर त्रास होतोच शिवाय दुसर्‍यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यावर अंघोळ करणे, हा एक चांगला उपाय आहे. अंघोळ केल्याने चिंतामुक्त व्हायला आणि रांग शांत करायला मदत होते.पाणी तणावपूर्ण मांसपेशींना रिलॅक्स करण्याचे काम करते. या अंघोळ करण्याबरोबरच तुम्ही गुणगुणतसुद्धा त्याचा आणखी चांगला परिणाम होऊन तणाव कमी करणारे हार्मोन हायड्रोकॉर्टिसोन उत्तेजित होतात. त्यामुळे रिलॅक्स व्हायला होतं.
सकारात्मक रहा, वैवाहिक जीवनासाठी
माणूस सुखासाठी सतत धडपडत असतो. काहींच्या सुखी कुटुंबाच्या काही कल्पना असतात. मात्र आपले वैवाहिक जीवन आंनदी आणि मस्त मजेत ठेवायचं असेल तर आपण आपल्या जोडीदारासोबत सकारात्मक व्यवहार करायला हवं. दोघांदरम्यानचा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जीवनातला कडवटपणा कमी करण्यास मदत करतो.त्यामुळे सकारात्मकता जीवनात ठेवण्याचा प्रयत्न करा.
हसा, आनंद विखुरण्यासाठी
आनंद वाटल्याने आनंद वाढतो, याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे एखाद्याला आनंदी ठेवायचे असेल तर त्याला सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे त्याच्यासमोर तुम्ही खूश रहा, आनंदी रहा. दोघेही एकमेकांसाठी अनोळखी असलात तरी  एक हास्य दोघांमधला दुरावा कमी करतं आणि दोघांमध्ये  मैत्री धागा विणायला  मदत करतं.
मदत करा, दीर्घ आयुष्यासाठी
एकमेकाला मदत केल्याने अनेक गोष्टी साध्य होतात. दीर्घायुष्यासाठी ही मदत उपयोगी ठरते. जर तुम्ही नि:स्वार्थ भावनेने एखाद्याला मदत करत असाल किंवा एखाद्याला त्याच्या  कामात हातभार लावत असाल तर ही गोष्ट तुमच्या दोघांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी चांगली असते. ही गोष्ट 30 पेक्षा अधिक संशोधनाने सिद्ध झालेली आहे.



Sunday, June 4, 2017

हे आहे यांच्या यशाचं रहस्य


प्रत्येक महिलांच्या यशाची त्यांची अशी एक वेगळीच परिभाषा असते.पण जगातल्या यशस्वी महिलांच्या यशाच्या रहस्यांमध्ये काही कॉमन गोष्टी असतात. या गोष्टींमुळेच त्या यशाच्या शिखरावर पोहचलेल्या असतात.काय आहेत,या कॉमन गोष्टी? पाहूया तर...
नेहमी उत्साही
प्रत्येकाची काही स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा असतात.त्यांचा पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात आणायची असतील,तर त्याची सुरुवात कुठेतरी करावी लागते.ही सुरुवात आपल्याला त्या स्वप्नांत किती उत्साह आहे यावर ठरते. का उत्साह तात्कालिक असून चालत नाही. तर तो टिकाऊ असायला लागतो. आपण जे काम करतो, ते मनापासून करत असेल त्यात उत्साह आपोआप येतो. ज्या यशस्वी महिला आहेत, त्या आपले काम अगदी मनापासून करत असतात,म्हणून त्या नेहमी उत्साही असतात.
आदर्शतेची इच्छा नाही
अशा काही महिला आहेत की, त्या आपल्यापुढे काही आदर्श ठेऊन काम करतात.मात्र त्या आपल्या कामात यशस्वी होताना दिसत नाही. आपण आदर्श असल्याचे ग्रहीत धरून चालताना या महिलांना असंख्य अडचणी येतात. कारण समोर आदर्श असताना त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करताना स्वत: मधील कमीपणा पाहात राहतात. मात्र ज्या महिला पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात,त्यात फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात. ते आपल्या मनाप्रमाणे,मनासारखं काम करताना स्वत:च एक आदर्श निर्माण करतात. कामाला शंभर टक्के महत्त्व देणार्‍या महिला कुठल्या आदर्श गोष्टीत अडकून पडत नाहीत.
यशाची खात्री
काही माणसे काम करीत असतात,मात्र त्यांचा त्यांच्या स्वत:वर विश्‍वास नसतो. त्यामुळे साहजिकच ते यशस्वी पायरी चढताना अडखळतात. आणि मागे राहतात. मात्र ज्यांना यशाची खात्री असते. ते अगदी आत्मविश्‍वासाने पुढे जातात आणि यश पदरात पाडून घेतात. अशा विश्‍वासपूर्ण महिलांना तुम्ही यशस्वी होणार का?, असा प्रश्‍न केलात तर त्यांच्याकडून तात्काळ होय उत्तर येते. स्वत:वर आणि कामावर विश्‍वास असणारी माणसं नक्कीच यशस्वी होतात.
रिस्कशिवाय यश नाही
जगभरातल्या यशस्वी महिला यशाचे हे सूत्र जाणतात की, रिस्कशिवाय यश नाही. जोखीम घेतल्याशिवाय कुठलेही काम सुरू केले जाऊ शकत नाही आणि त्याशिवाय यशदेखील मिळत नाही. त्यामुळे अशा महिला कधी कधी जोखीम उठवताना मागे-पुढे पाहात नाही.कारण त्यांना माहित असतं की, जोखीममध्ये अपयशाची भिती लपलेली असते, तसेच तिथे यशाचा आनंदही दडलेला असतो. शिवाय यशासाठी स्वत:वरच  अवलंबून राहावं लागतं,कारण यामुळेच एकप्रकारची मजबुती मिळते.
सगळ्याच गोष्टी पूर्ण होत नाहीत
आयुष्यात अनेक अशा काही गोष्टी असतात की, त्या महिलांच्या प्राधान्यक्रमात अगदी सर्वात वरच्या पातळीवर असतात. पण सगळ्याच गोष्टी आपल्याकडून पूर्ण व्हाव्यात, असे काही नाही. सामान्यपणे काही महिला एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही तर उदास होतात. त्यांना नैराश्य येते. पण यशस्वी महिलांना माहित असतं की, सगळ्याच गोष्टी पूर्ण करणं शक्य नाही. त्यामुळे काही गोष्टी अपूर्ण राहिल्या तर त्या निराश होत नाहीत. त्या अपुरेपणाला त्या स्वीकारतात.



Saturday, June 3, 2017

तन,मन,धन पर्यावरणासाठी वाहिले पाहिजे

     आपल्या देशात अलिकडच्या काही वर्षात पर्यावरण हा विषय थोडा गंभीरपणे घेतला जात आहे. झाडे लावण्याची गरज आता शासकीय पातळीवर लक्षात आली आहे.त्यामुळे झाडांच्या लागवडीसाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. वास्तविक आपल्या देशात पर्यावरणाची हानी प्रचंड प्रमाणात होत आहे. आजही ती काही कमी झालेली नाही. आपल्याकडे पर्यावरण आणि भ्रष्टाचार याबाबतीतच अधिक चर्चा होत आली आहे. कारण जंगल, वने,वनीकरण योजना,प्राणी,पक्षी या गोष्टी तस्करी,भ्रष्टाचार यांच्या भोवतीच फिरत असतात. आपल्या देशात पर्यावरण मंत्रालय कधी मन लावून काम केल्याचे ऐकिवात नाही. मागे आघाडीच्या काळातले पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांची काय ती कारर्किर्द ठळकपणे दिसून आली.विशेष म्हणजे ज्यांना पर्यावरणाचा अजिबात गंध नाही, अशीच माणसे या संबंधित पदावर बसविण्यात आली. त्यामुळे ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीने पर्यावरणसंबंधि काम व्हायला पाहिजे ते आपल्या देशात झाले नाही. त्यामुळे अनेक प्रश्‍न आपल्यापुढे आ वासून उभे आहेत.

     आपल्या देशातील शहरांना वायू प्रदुषणाचा जीवघेणा विळा बसू लागला आहे. या प्रदुणामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. विविध संस्थांचे अहवाल वारंवार इशारा देत असतानाही त्याकडे कानाडोळा करण्यात आला.आजही फारसे गंभीरपणे त्याकडे पाहिले जात नाही.  त्यामुळे सध्या मोठी भयंकर परिस्थिती बनली आहे. याकडे काही प्रमाणात लक्ष प्रशासन,लोकप्रतिनिधी यांचे गेले आहे. तुरळकपणे त्यावर उपाययोजनाही चालल्या आहेत,मात्र म्हणावे असे प्रयत्न होत नसल्याने गंभीर धोके टळलेले नाहीत. शहरातले प्रदुषण कमी होण्यासाठी कडक कायद्यांबरोबरच त्यांची तितक्याच कडकपणे अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. वाहनांबाबत कडक धोरण राबवण्याची गरज आहे. उद्योगधंदे,कारखाने यांची खुशमस्करी करण्याचे आणि त्यांना हवे ते देण्याचे आंदण थांबले पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनीही याबाबतीत भारताला कडक इशारे दिले आहे. प्रदुषणमुक्तीसाठी भारत काहीच करत नाही, असा त्यांचा आरोप आहे. आणि त्यात तथ्य आहे.
     पर्यावरण हा विषय आपल्याकडे भ्रष्टाचाराचे कुरण बनलेला दिसतो. पर्यावरणमंत्री असलेल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना पदावरून दूर व्हावे लागल्याचे आपण पाहिले आहे. पर्यावरणसंबंधी परवानग्या देताना अनेक प्रकारचा गैरव्यवहार देशभरात होत असतो. उद्योगधार्जिणे बदल कायद्यात करून पर्यावरणाची हानी हा एककलमी कार्यक्रम आजपर्यंत राबवण्यात आला आहे. त्यावरून राजकारण तापले आणि तापवलेही जाते. म्हणजेच, आपल्याकडे पर्यावरणहिताचे किंवा पर्यावरणपूरक सकारात्मक राजकारण होण्याऐवजी पर्यावरणावरून होणारे आर्थिक स्वरुपाचे राजकारण दिसून येते, ही एक दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे. विज्ञानाने सर्व समस्यांचे निराकरण होते, असे आपण मानतो. विज्ञान ही विशिष्ट प्रकारे, विशिष्ट दिशेने विचार करावयाची गोष्ट आहे. कोणत्या प्रक्रियेतून विचार करायचा याची दृष्टी विज्ञानातून मिळते. या परिप्रेक्ष्यातून पाहिल्यास पर्यावरण हा आपल्या जीवनातील अनेक गोष्टींना स्पर्श करणारा विषय आहे.मात्र  पर्यावरण विज्ञानाविषयीचे आकलनच आपल्याला योग्य प्रकारे झालेले नाही. वैज्ञानिक विचार पद्धतीच्या अभावामुळे काही भयंकर प्रकार घडत आहेत.  हा अभाव राजकीय मंडळींपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांमध्येच कमी-अधिक फरकाने दिसून येतो.
     परदेशामध्ये धर्मस्वातंत्र्य मान्य केलेले आहे; मात्र ते पर्यावरणाला इजा करणारे असता कामा नये, याबाबत तेथे कटाक्षाने काळजी घेतली जाते. नदीप्रदूषण करणार्‍या कोणत्याही गोष्टी तेथे अमान्य असल्याने तेथील प्रशासन पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता दाखवून देते. आपल्याकडे नेमक्या याच गोष्टीचा अभाव आहे. दुष्काळाच्या काळात पाण्यावरून आणि पाणी सोडण्यावरून वाद होतात, आंदोलने होतात; मग हेच पाणी आपण कोणत्याही कारणासाठी वाया घालवतो. आज ध्वनिप्रदूषणासारख्या प्रश्‍नाबाबत तर आपल्याकडे चर्चा करण्यासही फारशी उत्सुकता दाखवली जात नाही. वास्तविक, गणेशोत्सवात होणारे ध्वनिप्रदूषण, मशिदींवरील भोंग्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण या सर्वांवर न्यायालयानेही आक्षेप घेतले आहेत; पण धार्मिक भावना दुखावल्या जातील या भीतीमुळे याबाबत कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. आणि केलीच तर ती अगदीच जुजबी होते. वास्तविक, आज आपल्याला विवेकनिष्ठ पद्धतीने या सर्वांचा विचार करावा लागणार आहे. संस्कृती धार्मिकता यांमधील पर्यावरणाची हानी करणार्‍या गोष्टी वगळून त्या परंपरा जोपासण्याचा कालसुसंगत विचार केला पाहिजे.
     पर्यावरणामध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका असते ती वनांची. मात्र वनक्षेत्राबाबत आपल्याकडे चिंताजनक स्थिती आहे. जंगलांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूडतोड सुरू आहे. त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष कऱण्याचा वन विभागाच्या अधिकार्‍यांचा आतापर्यंतचा दृष्टिकोन होता. झाडे तोडू नये, परवानगीने तोडल्यास त्याबदल्यात किती झाडे लावावीत याविषयी लक्ष देणारी कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नाही. त्यामुळे बेकायदेशीर वृक्षतोड, जमिनींचे सपाटीकरण, वनजमिनींचे खासगीकरण वेगाने होत आहे. अलीकडील काळात जंगलांना वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. संपूर्ण पृथ्वीला आणि मानवजातीला ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या वृक्षांबाबत, वनांबाबत आपण फारच असंवेदनशील आहोत. आज बांधकामा साठी पर्यावरण परवानगी घेण्याचा कायदा तर सर्रास पायदळी तुडवला जातो. 
     नद्यांना जीवनवाहिनी म्हटले जाते. पण आज नद्यांचे प्रश्‍नही गंभीर बनले आहेत. नद्यांच्या प्रदुषणामुळे माणसाचे आरोग्य बिघडून गेले आहे. माणूस आपले आरोग्य सहिसलामत राहावे,यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करत आहे. साठ ते सत्तर टक्के आजार पाण्यामुळे होतात, ही भिती बाळगून माणूस पाण्यासाठी वारेमाप खर्च करत आहे. वास्तविक प्रदुषण पाण्याचा किती इश्यू करावा, यालाही मर्यादा आहे, पण हा बाटलीबंद पाण्याचा किंवा पाणी शुद्धीकरणाच्या घरगुती प्रकल्पांचा विस्तार वाढतच चालला आहे. जे करायला नको ते आपण करत चाललो आहोत.
     वायू,जल आणि ध्वनी प्रदूषण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरी व्यवस्था तर पार कोलमडून गेली आहे,त्यात ग्रामीण भागही होरपळून चालला आहे. प्रदुषमुक्तीसाठी जलद गतीने व मोठ्या दमदारपणे पावले पडताना दिसत नाहीत. झाडे लावण्याबाबत जनजागृती होत आहे. झाडे लावली जात आहेत, मात्र त्यांचे संवर्धन होताना दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी झाडे लावण्याचे फर्मान निघते. जुन्याच खड्यात नव्याने झाड लावले जाते, असा प्रकार सातत्याने होत आहे. हा प्रकार आता थांबायला हवा. नाही तरी नेमिचि येतो पावसाळा याप्रमाणे दरवर्षी चाललेच आहे.

मुलांच्या पिछेहाटीचे चिंतन व्हायला हवे

     नुकताच बारावीचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली. गेल्या काही वर्षात दहावी-बारावी बोर्डांच्या परीक्षेत मुलीच आपला अधिकार गाजवू लागल्या आहेत. त्यामुळे साहजिकच मुलांना घरोघरी बोल बसत आहेत. तर काही लोक मुलांची हेटाळणी करत आहेत. गावभर उनाडक्या मारत किंवा मुलींच्या मागे फिरत राहणार्‍या मुलांना ही अशीच शिक्षा मिळणार असे बोलले जाऊ लागले आहे.वास्तविक प्रत्येक घरात मुलींपेक्षा अनेक बाबतीत मुलांना मोठी सूट किंवा मोकळिक असते. मुलींना मात्र घरातील झाडलोट,धुणी-भांडी घासणे, अशा प्रकारची कामे त्या बोर्डाच्या परी
क्षा देत असतानाही लावली जात असतात. तरीही मुली आपला ठसा परीक्षेत उमठवतात.याची चर्चाही होत राहतेच.मात्र मुलांच्या अपयशाची कारणे शोधली जात नाहीत. त्यांना बोल लावले जात नाही.
     वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहताना त्यांच्या अनेक चुकांवर पांघरुण घातले जाते. त्यांच्यावर सक्ती,जोर-जबरदस्ती घरच्याकडून होताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे मुली जात्याच हुशार असतात असा एक निष्कर्ष काढून रिकामे होणारे खूप आहेत. तर कांहीना वाटते पालकांनी मुलांच्याकडे जितक्या प्रमाणात लक्ष द्यावयाला पाहिजे तितके देत नाहीत. अर्थात या दोन्ही विधानांना फारसा अर्थ नाही. या विषयाकडे गांभीर्याने पाहता मुलं ही शिक्षणापेक्षा अन्य गोष्टींकडे अधिक लक्ष देतात. ती हुशार नसतात असे विधान धाडसाचे ठरेल. शिक्षणाविषयक चिंतन- मनन आणि प्रयत्न या बाबतीत मुलांच्या बाबतीत कमतरता आढळून येते. आजकाल मुले टोळक्याने राहण्याला पसंदी देत आहेत. सिनेमा वैगेरे पाहून त्यांचे रक्त सळसळते,कुठेतरी साधा इगो दुखवला तर समोरच्यावर वस्सकन अंगावर जाताना दिसतात. असल्या छातूर-माथूर विषयांमध्ये गुंतल्याने मुले अभ्यासात मागे राहत आहेत.
     मुलींना जितक्या सूचना दिल्या जातात, तशा सूचना,ताकीद मुलांना दिली जात नाही. खरे तर पालकच मुलांना घाबरत असतात. काही म्हटले तर घर सोडून पळून जाईल, उलटे बोलेल.काही तरी करून घेईल, असा समज घेऊन पालक मुलांना काही बोलण्यापासून थोडे लांबतच राहतात. ग्रामीण ते शहरी भागात मुलगा नापास झाला तर पुढले शिक्षण बंद करण्यात येईल, अशी साधी लक्षवेधी सूचनाही मुलांना दिली जात नाही. या उलट मुलींच्या बाबतीत कमी गुण पडले तर तिला सूचना केली जाते. गुण चांगले पडले नाहीत किंवा पास झाली नाहीस तर तुझे शिक्षण बंद करण्यात येईल अशा सक्त सूचना, ताकीद, इशारा, भय दाखवले जाते. इथेच त्या मुलींची मानसिकता तयार होते की आपण कोणत्याही प्रकारे परीक्षेत यशस्वी व्हायलाच हवे नाही तर शाळा बंद, शिक्षण बंद आणि पूर्ण वेळ घरच्या कामासाठी, शिवाय घरातच आहे तर लग्न उरकून टाकू या अशा अनेक प्रकारच्या अभिप्रायामुळे मुली मन लावून अभ्यास करतात मनस्वी अभ्यास हेच त्यांच्या यशाचे गमक असते. एखादी मुलगी नापास झाली तर तिला घरातून मिळणारी वर्तणूक याची अनेक उदाहरणे त्याना परिचित असतात आणि नापास झालेल्या मुलाची समजूत काढून त्यास पुनः शिकावयालाच पाहिजे असा अट्टाहास असा प्रयोग मुलांना जागं करण्याऐवजी अभ्यासाकडे दुर्लक्ष करावयाला कारणीभूत ठरत असतात. शिवाय आता समाजातील अशिक्षित स्त्रियांनासुद्धा शिक्षणाचे महत्व आणि महात्म्य महिला आग्रहाने करीत आहेत. आणि आज समाजातील अनेक मुली शिक्षणाच्या जोरावर प्रगतीच्या, यशाच्या शिखरावर पोहचतानाचे दृश्य इतर मुलींना प्रेरणादायी ठरते आहे. तसं अलिकडे मुलांच्या गगनभरारीची आणि यशाची अत्युच्च शिखरे गाठणार्‍यांची संख्या मुलींच्या पेक्षा कमी प्रमाणात आढळत आहे. खर्‍या अर्थानं या यशस्वी मुलीचं कौतुक व्हायलाच हवे. मात्र मुलांच्या या अपयशाकडे,घसरणीकडे शाळा,पालक आणि समाज यापतळीवर गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुलांनीही आपल्या गुणवत्तेकडे गांभिर्याने पाहताना मुलांच्या सामुदायिक हाराकिरीचे चिंतन करायला हवे.
      मुलींची संख्या आधीच कमी होत चालली आहे. वधू म्हणून मुलींचा शोध घेताना मुलांच्या नाकीनऊ येत आहे. आता तर शैक्षणिक गुणवत्तेत मुलीच आघाडीवर असल्याने त्यांना आपल्यापेक्षा कमी शिकलेली आणि कमी हुशार असलेल्या मुली मिळणार नाहीत. त्यामुळे हाही एक सामाजिक गुंता आगामी काळात समाजापुढे येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाला या गोष्टींची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे.

शेतकरी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही

     फडणवीस सरकारला आता अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत.  गेल्या साठ वर्षांतील काँग्रेसची सत्ता उलथविण्यासाठी शेतकर्‍यांनी  भाजपला हातभार लावला. आघाडी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी याच भाजपने शेतकर्‍यांची  बैलगाडी वापरून पुरावे घेऊन मिरविले. पंधरा वर्षांतील राज्यातील भ्रष्ट सत्ता नेस्तानाबूत करण्यासाठी शेतकर्‍यांची चळवळ हाताशी धरली. या चळवळीतील शेतकर्‍यांनीही केंद्रात आणि राज्यातील भाजपला भरभरून मतांचे दान दिले. यातून भाजप सत्तेच्या सोपानापर्यंत पोहचू शकला. मात्र आता गेल्या अडीच वर्षात या सरकारने शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’ येईल, अशा आणाभाका घेऊन  भुलविले आहे. शेतकर्‍यांच्या मदतीने  भाजपने आघाडी सरकारला चारीमुंड्या चीत केले. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आल्यानंतर शेतकर्‍यांच्या बाहुत ‘बळ’ आल्यासारखे झाले. शेतकर्‍यांच्या डोक्यावरील मळभ दूर होईल, अशी आस निर्माण झाली. कारण शेतकर्‍यांनी आपल्या मताचे दान त्यांच्या पारड्यात भरभरून टाकले. केंद्रातील नरेंद्र सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे झाली. मोदी सरकारला रुळायला अजून वेळ लागेल, म्हणून शेतकर्‍यांनी दोन वर्ष सबुरीने घेतले. परंतु मोदींचे सरकारचे चलनवलन वेगळेच जाणवायला लागले. ते उद्योगपतींच्या बाजूने गेले.

     लोकसभेच्या निवडणुकीच्या  प्रचारावेळी मोठ्या पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी आणि भाजपने आश्‍वासनाची गाजरे दाखविली. त्यामुळे  जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्यांच्या आश्‍वासनाला भुलला आणि लोकसभा निवडणुकीत शेतकर्‍यांनी भाजपला झाडून मते दिली. लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. पंधरा वर्षे सत्ता भोगलेल्या आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराला आधीच शेतकरी वैतागला होता. याचा चांगला लाभ उठवत भाजपने गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी आरोळी ठोकून रान तापवले. त्यात भाजपने शिवसेनेसारख्या  मित्रपक्षाला डावलून वेगळी चूल मांडली. कारण शेतकर्‍यांच्या जीवावर आपण सत्तेवर येणार अशी त्यांना खात्री झाली होती. इतर पक्षांतील नेत्यांना घेऊन त्यांना पावन केले. शेतकर्‍यांची चळवळ म्हणून प्रकाशझोतात आलेली स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत  वळचणीला आले.  देवेंद्र सरकार म्हणून सत्ता सोपानावर विराजमान झाले. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने राज्यात देवेंद्रराज येईल, अशी भोळीभाबडी आशा  पोशिंद्याला निर्माण झाली. शिवरायांच्या स्वराज्यात शेतकरी भुकेला नव्हता. तसेच राजाप्रमाणे बळीराजाच होता. शिवशाहीत शेतकर्‍यांची कधी अन्नासाठी दशा झाली नव्हती. त्यानंतर दीडशे वर्षांपासून आजतागायत शेतकरी गुलामगिरीत खितपत पडला होता. परंतु स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारनेही शेतकर्‍यांची वाट लावली. शेतकर्‍यांचे पोषण करण्यापेक्षा शोषण पद्धती आत्मसात केली. त्याच पावलावर पाऊल ठेऊन आता भाजप सरकार वाटचाल करीत आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
      शेतकरी संघटनेचे जनक शरद जोशी यांनी शेतकर्‍यांना लेखाजोखा मांडायला शिकविले. त्यातून लाखों शेतकरी शहाणे झाले. यातून गेल्या पंधरा वर्षांत शेतकरी चळवळ फोफावली. या चळवळीला भाजपनेही खतपाणी घातले होते,हे विसरून चालणार नाही. हा पक्ष  शेतकर्‍यांच्या बाजूने  रस्त्यावर उतरला. त्यातून शेतकर्‍यांची तळमळ जाणवली, असा नाटकी भास केला असल्याचे आता जाणवत आहे. ‘शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो, कर्जात मरतो, असे यापूर्वी ऐकवले जाते. परंतु राज्यकर्त्यांनी शेतकर्‍यांची मुस्कटदाबीच केली आहे. आता तोच कित्ता भाजपदेखील सत्तेवर आल्यावर गिरवित आहे. शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी अनेक शेतकर्‍यांनी गोळीबार झेलला. लाठ्याचा मार खाल्ला. शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यातून शेतकर्‍यांची गळचेपी केली. परंतु जिगरबाज शेतकरी हरला नाही. घामाच्या पैशासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकर्‍यांना कस्पटासमान किंमत दिली जात आहे. शेतकरी पोरीच्या लग्नासाठी जमीन गहाण ठेऊन घरासमोर लग्नाचे मांडव घालतो. सावकाराच्या दारात दिनवाणीपणे बसून जादा व्याजाने कर्ज घेतो. परंतु कोठे लाचार होत नाही. ऋण काढून सण करणारा शेतकरीच असतो. कारण शहरातील चाकरमान्याप्रमाणे महिन्याला त्याच्याकडे दुभती गाय नसते. खरीप हंगामात त्याच्याकडे मशागतीला पैका नसला तरी सोसायटी, बँका, हातउसने घेऊन खरीपाची जमीन तयार करतो. निसर्गाच्या भरोशावर पेरणी करतो. कुटुंबाचा गाडा ओढण्याची जीवघेणी कसरत त्याच्या मानगुटीवर लटकवलेली असते. खरीप, रब्बी हंगामातील पेरण्या झाल्यानंतर त्याला निसर्ग किती साथ देईल, याची खात्री नसते. परंतु या पिकांवर तो कुटुंबातील उदरनिवार्हाचे इमले पीक येण्यापूर्वीच बांधत असतो. त्याला राबराब राबायचे, हेच त्याच्या भाळी कोरलेली आहे. पूर्वीच्या राज्यकर्त्यांचा तोच कित्ता आता हे फडणवीस सरकार गिरवित आहे.
     शेतकरी चळवळीतील तगडा कार्यकर्ता सदाभाऊ पण सरकारच्या मांडीला मांडी लाऊन सत्तेची चव चाखत आहे. त्यालाही आता      शेतकर्‍यांचे काही देणेघेणे पडलेले नाही. कारण सदाभाऊंनी काठ्या झेलून आंदोलन केली आहेत म्हणे. शेतकरी चळवळीची वळवळ  सरकारने थांबविण्याचा डाव आखला आहे, असे मत शेतकर्‍यांचे झाले आहे. मात्र, एक सदाभाऊ घेऊन गेला तरी हजारो सदाभाऊ चळवळीतून तयार होत असतात, हा चळवळीच्या  निसर्गाचा नियम आहे. हे सरकारने ध्यानात घ्यायला हवे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतोय. याची सरकारला  जाणीवच झाली नाही. विरोधकांच्या भूमिकेत असताना याच पक्षाला शेतकर्‍यांचा कळवळा होता. पण तो नाटकी होता,हे जाणवायला लागले आहे. शेतकर्‍यांविषयी याच सरकारातले वाचाळवीर काहीबाही बोलत सुटले आहेत. कर्जमाफीच्या मुद्यावर या पक्षाने आत्महत्या करणार नसल्याची गॅरंटी मागितली. भाजप पक्षातील दानवे शेतकर्‍यांना ‘साले’ म्हणतात. गडकरी,भंडारी, कांबळे ही मंडळीही काहीबाही बोलत सुटले आहेत, यावरून पक्षात आता ताळमेळ राहिला नाही, असे दिसत आहे.  शेतीमालाला हमीभाव द्या, असा शेतकरी टाहो फोडतोय,मात्र सरकारला  पाझर फुटत नाही. शेतकर्‍यांचे सरकार म्हणून शेतकर्‍यांनीच डोक्यावर घेतले. अशीच शेतकर्‍यांविरोधात भूमिका राहिली तर पुन्हा शेतकरी त्यांच्या भूलथापांना भूलणार नाही. आपला हिसका तो दाखवेलच. आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवली गेली आहे,हे त्यांनी विसरू नये.



Friday, June 2, 2017

बालविवाहाची कुप्रथा कशी थांबणार?

     बालविवाह ही कुप्रथा कडक कायदे करूनही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मोठ्या सुरू असल्याचा निर्वाळा यंग लाइव्हज इंडिया या स्वयंसेवी संस्थेने राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या मदतीने केलेल्या अभ्यासाने दिला आहे. विशेष म्हणजे बालविवाह करण्यात आघाडीवर फक्त ग्रामीण भागच नाही तर मुंबई,पुणे,ठाणेसारखी शहरी जिल्हेदेखील आहेत. त्यामुळे इतके कडक कायदे आणि जनजागृती करूनदेखील बालविवाह थांबत नाही,याचा अर्थ ही कुप्रथा माणसाच्या तना-मनात चांगलीच भिनलेली आहे, असा त्याचा सरळ अर्थ होतो. त्यातही पुरोगामी महाराष्ट्रात ही संख्या लाक्षणीय आहे,याचा अर्थच असा होतो की, पुरोगामीत्व हा नुसता तोंडावळा आहे. खायचे दात तर वेगळेच आहेत.मुलगी नको म्हणणारा आणि तिला गर्भातच मारून टाकणारा याच मातीत पोसला जातो आहे. महिला संरक्षण, गर्भचाचणी,गर्भपात,बालविवाह असे स्त्रियांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले.मात्र तरीही कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार हे होत आहेतच. गर्भात मुलींचा खून करण्याचा प्रकार घडतच आहेत. आणि जागृत समाज अवतीभोवती असतानाही अल्पवयीन मुलींची लग्ने लावून देण्याच्या घटना सर्रास घडत आहेत,हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हटले पाहिजे.
     यंग लाइव्हज इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यास पाहणीत देशभरातल्या 640 पैकी 70 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेधडक बालविवाह होत असल्याचे आढळून आले आहे. आणि आपल्या दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या तब्बल 16 जिल्ल्ह्यांचा त्यात समावेश आहे. मुंबई,ठाणे,पुण्यासारख्या शहरी जिल्ह्यांपासून ते धुळे,भंडारा,चंद्रपूरसारख्या ग्रामीण तोंडावळ्याच्या जिल्ह्यांपर्यंत सर्वत्र बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम भयानक असल्याचे माहित असूनही आपल्याकडे सर्रास बालविवाह अजूनही होत आहेत.म्हणजे कायद्याची अंमलबाजणी काटेकोरपणे होत नाही आणि शासन, समाज अजूनही याबाबतीत कमी पडत असल्याचेच हे निर्देश आहे. एकिकडे बापाकडे हुंडा द्यायला पैसा नाही,म्हणून मुली आत्महत्या करत आहेत. त्याच धर्तीवर बापाचा नाईलाज आहे,म्हणून मुली बालविवाहाच्या बंधनात अडकत आहेत. मुली वाचाव्यात,शिकाव्यात म्हणून बेटी बचाओ,बेटी पढाओसारखे अभियान राबवले जात असताना मुलींची फिकिर कुणालाच नाही. ही अभियाने फक्त कागदावरच दाखवायला बरे दिसतात.
बालविवाह या कुप्रथेला प्रतिबंधित करण्यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी गावातल्या ग्रामसेवकापासून पोलिसांपर्यंत स्थानिक पातळीवरील सगळ्यांवर सोपवण्यात आली आहे. मात्र यांच्याकडून कसलाच पुढाकार घेतला जात नाही. वास्तविका आता ज्या गावात,परिसरात बालविवाह होतील,तिथल्या जबाबदार घटकाला जबाबदार धरून त्यांना शिक्षा ठोठवायला हवी आहे.कारवाई करायला हवी आहे. कायद्याचे संरक्षण पाठीशी असताना खरे तर त्यांनी भिण्याची गरज नाही. कायद्याची कडक अंमलबजावणी होत राहिली तरच आपोआप कायद्याचा धाक राहणार आहे. मुलींची शिक्षणातील गळतीही मोठ्या प्रमाणात आहे. मुलीची शाळा सोडण्यास भाग पाडणार्‍या पालकांवरही कायद्याने कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून व्हायला हवा आहे.       कपडेलत्ते,भोजन,पाठ्यपुस्तके,शैक्षणिक साहित्य शासन मोफत पुरवत असताना फक्त मुलींना शिकवण्याची जबाबदारी पालकाची आहे,तीही त्याला नीट सांभाळता येत नसेल तर पालकावरच कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.
     या बालविवाह प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी गावागावात व्यापक जनजागृती करतानाच कायद्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात केल्यास एक प्रकारे धाक निर्माण होवून बालविवाहाला आळा बसण्यास मदत होणार आहे. आजचा मुलींविषयीचा वाईटकाळ पाहता आपल्या मुली सुरक्षित त्यांच्या नवर्‍याच्या घरी जाव्यात, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीने बदलण्याची गरज आहे.शिवाय मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी समाजाने उचलण्याची गरज आहे. सामुदायिक विवाहांनाही मोठ्या प्रमाणात चालना देण्याची आवश्यकता आहे. त्याच्याने पालकावर मुलीच्या विवाहाचा आर्थिक ताण पडणार नाही. शासनाने यासाठी भरीव आर्थिक मदतीची तरतूद करायला हवी.