Sunday, June 4, 2017

हे आहे यांच्या यशाचं रहस्य


प्रत्येक महिलांच्या यशाची त्यांची अशी एक वेगळीच परिभाषा असते.पण जगातल्या यशस्वी महिलांच्या यशाच्या रहस्यांमध्ये काही कॉमन गोष्टी असतात. या गोष्टींमुळेच त्या यशाच्या शिखरावर पोहचलेल्या असतात.काय आहेत,या कॉमन गोष्टी? पाहूया तर...
नेहमी उत्साही
प्रत्येकाची काही स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा असतात.त्यांचा पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात आणायची असतील,तर त्याची सुरुवात कुठेतरी करावी लागते.ही सुरुवात आपल्याला त्या स्वप्नांत किती उत्साह आहे यावर ठरते. का उत्साह तात्कालिक असून चालत नाही. तर तो टिकाऊ असायला लागतो. आपण जे काम करतो, ते मनापासून करत असेल त्यात उत्साह आपोआप येतो. ज्या यशस्वी महिला आहेत, त्या आपले काम अगदी मनापासून करत असतात,म्हणून त्या नेहमी उत्साही असतात.
आदर्शतेची इच्छा नाही
अशा काही महिला आहेत की, त्या आपल्यापुढे काही आदर्श ठेऊन काम करतात.मात्र त्या आपल्या कामात यशस्वी होताना दिसत नाही. आपण आदर्श असल्याचे ग्रहीत धरून चालताना या महिलांना असंख्य अडचणी येतात. कारण समोर आदर्श असताना त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करताना स्वत: मधील कमीपणा पाहात राहतात. मात्र ज्या महिला पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात,त्यात फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात. ते आपल्या मनाप्रमाणे,मनासारखं काम करताना स्वत:च एक आदर्श निर्माण करतात. कामाला शंभर टक्के महत्त्व देणार्या महिला कुठल्या आदर्श गोष्टीत अडकून पडत नाहीत.
यशाची खात्री
काही माणसे काम करीत असतात,मात्र त्यांचा त्यांच्या स्वत:वर विश्वास नसतो. त्यामुळे साहजिकच ते यशस्वी पायरी चढताना अडखळतात. आणि मागे राहतात. मात्र ज्यांना यशाची खात्री असते. ते अगदी आत्मविश्वासाने पुढे जातात आणि यश पदरात पाडून घेतात. अशा विश्वासपूर्ण महिलांना तुम्ही यशस्वी होणार का?, असा प्रश्न केलात तर त्यांच्याकडून तात्काळ होय उत्तर येते. स्वत:वर आणि कामावर विश्वास असणारी माणसं नक्कीच यशस्वी होतात.
रिस्कशिवाय यश नाही
जगभरातल्या यशस्वी महिला यशाचे हे सूत्र जाणतात की, रिस्कशिवाय यश नाही. जोखीम घेतल्याशिवाय कुठलेही काम सुरू केले जाऊ शकत नाही आणि त्याशिवाय यशदेखील मिळत नाही. त्यामुळे अशा महिला कधी कधी जोखीम उठवताना मागे-पुढे पाहात नाही.कारण त्यांना माहित असतं की, जोखीममध्ये अपयशाची भिती लपलेली असते, तसेच तिथे यशाचा आनंदही दडलेला असतो. शिवाय यशासाठी स्वत:वरच  अवलंबून राहावं लागतं,कारण यामुळेच एकप्रकारची मजबुती मिळते.
सगळ्याच गोष्टी पूर्ण होत नाहीत
आयुष्यात अनेक अशा काही गोष्टी असतात की, त्या महिलांच्या प्राधान्यक्रमात अगदी सर्वात वरच्या पातळीवर असतात. पण सगळ्याच गोष्टी आपल्याकडून पूर्ण व्हाव्यात, असे काही नाही. सामान्यपणे काही महिला एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही तर उदास होतात. त्यांना नैराश्य येते. पण यशस्वी महिलांना माहित असतं की, सगळ्याच गोष्टी पूर्ण करणं शक्य नाही. त्यामुळे काही गोष्टी अपूर्ण राहिल्या तर त्या निराश होत नाहीत. त्या अपुरेपणाला त्या स्वीकारतात.



No comments:

Post a Comment