Friday, June 23, 2017

फायदेशीर पान विड्याची शेती

     भारतीय संस्कृतीमध्ये व समाजजीवनात विड्याच्या पानाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधी, लग्न समारंभ आणि कोणत्याही सोहळ्याची शोभा वाढविणारे तसेच औषधी गुणधर्म असणार्‍या पान विड्याच्या शेतीला रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसाने चांगलेच तारलेले आहे.यंदा पान विड्याची शेती करणारा समाधानी आहे.
      भारतामध्ये पानाच्या एकूण बारा जाती असून त्यातल्या काहींना बनारस, कलकत्ता व साधे अथवा गावरान पान म्हणून ओळखले जाते. पान टपरीवर पान बनवून खाण्यासाठी सध्या अनेक पाने उपलब्ध आहेत. यामध्ये मसाला पान, खुशबू पान, चटणी पान, गुलकंद पान, साधा पान यासह अन्य रसदार पाने खवय्याची पसंदी आहेत. तसेच ही पाने औषधी गुणधर्म असल्याने ग्रामीण भागात अजूनही आजारी व्यक्तीला पानविड्यातून औषध दिले जाते. जेवणानंतर पान खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. तसेच कोणतेही शुभकार्य पानाशिवाय पूर्ण होत नाही. असे बहुगुणी व मानाचे स्थान मिळविलेल्या पानाची शेती अलीकडच्या काळात पाणी व पानावरील कीटकांमुळे संकटात सापडली आहे. 
अक्कलकोट तालुक्यातील पानमंगळूर, दुधनी, मैंदर्गी, सातनदुधनी, हन्नूर, तडवळ तसेच सोलापूर जिल्ह्यात काही भागात साधे (गावरान), कळीचे, सरपटी, फापडा अशा तीन जातींच्या पानाची शेती अधिक केली जाते. पानाच्या शेतीला कसदार जमीन, चांगल्या प्रमाणात सावलीची व्यवस्था, मुबलक प्रमाणात पाणी, तसेच पानाची तोडणी करून ती डालीत (करंडा) विशिष्ट पध्दतीने भरण्यासाठी प्रशिक्षित मजुरांची नितांत जरूरी असते. पानाची लागवड केलेल्या पहिल्या वर्षी उत्पन्न काहीच मिळत नसते. दुसर्‍या वर्षापासून पहिले उत्पन मिळण्यास सुरूवात होते. एक दिवसाआड नियमितपणे एक एकरला तीन तास पाटाने अथवा एक तास ठिंबक सिंचनने पाणी द्यावे लागते. यात पाणी कमी पडल्यास पाने दुमडून जातात. अति उष्णता झाल्यास पानमळे वाळून जातात. 
      एक एकर पानमळा उभारणी व त्यांची संपूर्ण पानाची तोडणी याकरिता खर्च अंदाजे दोन लाख रूपये येतो. पहिल्या वर्षी उत्पन मिळत नाही. शासन द्राक्षे व डाळिंब बागांचे नुकसान झाल्यास मदत करते. मात्र पानशेतीस मदत करीत नाही. ही शेती वाढण्यासाठी शासकीय मदतीची गरज असल्याचे माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे यांनी सांगितले. तसेच धार्मिक विधी, लग्न समारंभ आणि कोणत्याही सोहळ्याची शोभा वाढविणारे तसेच औषधी गुणधर्म असणार्‍या पान विड्याच्या शेतीला रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसाने चांगलेच तारलेले आहे.
सध्या आमची एक एकर पानशेती असून या शेतीला एकदिवसाआड तीन तास अथवा ठिबक सिंचनने एक तास पाणी द्यावे लागते. मात्र उन्हाळ्यात बोअर व विहिरीचे पाणी घटल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागल्याचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुरेश कुमठेकर यांनी सांगितले. शासनाने पानशेतीला अनुदान व मदत दिल्यास दक्षिण व अक्कलकोट तालुक्यात वाव आहे, असे या परिसरातील शेतकरी सांगतात.



No comments:

Post a Comment