
एकट्याने
एकटे गर्दीत चालावे, एकट्याने आपल्याशी फक्त बोलावे, अशी अनेक गाणी आपण हिंदी, मराठी चित्रपटातून ऐकतो.
कधी निसर्ग गीतातून, कधी जीवनविषयक तत्वज्ञान सांगणार्या
गीतातून आपल्याला असा दिलासा देणारी गीते ऐकायला मिळतात. संतसाहित्यातदेखील
ओवीरूपाने, अभंगरूपाने,भारुड, कीर्तनरूपाने आपण हेच ऐकतो. ’मै जिंदगी का साथ निभाता
चला गया, हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया’, असे म्हणत एखादा हिम्मतवान माणूस आयुष्यातील सगळ्या कटकटींना, संकटांना चिल्लर समजून उडवून लावतो. परिस्थिती बदलणार
नाही आपणच काहीतरी हालचाल करून सगळे चित्र बदलवले पाहिजे. ही
भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेगवेगळे भावतरंग निर्माण करते. कोणी बेफिकिरीने सगळ्या गोष्टी क्षुल्लक समजून उडवून लावतो, तर कोणी धाडसाने, धीराने संकटांना सामोरे जातो आणि परिस्थितीशी
दोन हात करतो. कोणी एखादी व्यक्ती जीवनगाणे गातच रहावे,
झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे असे म्हणत
आपल्याला त्रास देणार्या व्यक्तीला मोठया दिलदारपणे माफ करून टाकते, आणि जीवनाची यात्रा सुरू ठेवते. कोणी संकटाचे दिवस संपून
आपल्या मनासारखी परिस्थिती येण्याची वाट बघत बसतो.
कधी
अत्यंत सहृदय, निकटच्या व्यक्तीचे आपल्याविषयी गैरसमज होतात.
ती व्यक्ती आपल्यासाठी तिच्या मनाचे दरवाजे बंद करते. त्याच्या मनात डोकावण्यास आपल्याला मज्जाव करते, अश्यावेळेस
जीव तुटतो, पण यावरही मात करून, पुढे चालत
राहणे स्वीकारावेच लागते. आपल्याला मन खंबीर करून चालायला सुरुवात
करायची. आपल्या आतल्या आवाजाला कौल विचारत, त्याच्या हाकेला ओ देऊन निरंतर पुढे जात राहणे हे कधी प्राक्तन होऊन बसते.
हीच तर खरी जीवन जगण्याची कला उत्तम प्रकारे आत्मसात केल्याची खूण आहे.
खरं
तर, आपले संपूर्ण आयुष्यच अंधारयात्रा आहे.
आईच्या गर्भातून बाहेर उजेडात आलो तरी आपण काळोखातच चालत असतो.
भौतिक सुखे, लौकिक मिळवूनसुद्धा आपण मनाच्या एका
कोपर्यात एकटेच असतो. आपल्या अंतर्मनाचा एक कोपरा कायमस्वरूपी
अंधाराच राहतो. तरीही हताश न होता आपली आत्मज्योत तेवत ठेवून
चालत राहायचे, तेच आपल्या आयुष्याचे खरे यश आहे. हसत जगावे हसत मरावे हे तर आपुले गाणे असे गीताचे बोल आपल्याला सकारात्मकपणे
जगायला शिकवतात आणि कठिण प्रसंगातही यशस्वीपणे पुढे जायला शिकवतात.
No comments:
Post a Comment