Saturday, July 1, 2017

बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक

     आपल्या देशात अत्याधुनिक उपचार पद्धतीने  असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो आहे. देशात अजूनही दर हजारामारे सरासरी 37 बालकांचा मृत्यू होत असून, महाराष्ट्रात हेच प्रमाण 21 इतके आहे.ही बाब आपल्या देशासाठी मोठी दुर्दैवी आहे. मूल जन्माला आल्यानंतर एक वर्षांच्या आत जर विविध वैद्यकीय कारणांनी बालकाचा मृत्यू झाल्यास त्याला बालमृत्यू मानला जातो. त्यात अर्भकाला झालेला संसर्ग, विविध आजारांना बळी पडणे आणि इतर वैद्यकीय कारणांचा यात समावेश होतो. प्रसूती दरम्यान अथवा नंतरही योग्य काळजी न घेतल्यास बालके जंतुसंसर्गाला बळी पडण्याची शक्यता असते. पोषण आहारांच्या कमतरतेमुळे विविध रोगांना बालक बळी पडू शकते.

     2001 ते 2015 दरम्यानच्या बालमृत्यूच्या आकडेवारीनुसार बालमृत्यूच्या प्रमाणात निम्म्याने घट झाली असली तरी अद्यापही दरहजारी बालकांममागे मृत्यू पडणार्या बालकांची संख्या ही वैद्यकीय सेवा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत गंभीर विचार करायला लावणारी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण जवळपास दुप्पटी जवळ जाणारे असल्याचे वास्तव आहे. देशात 2001 साली देशात ग्रामीण भागात दर हजारी बालकांमागे 72 आणि श्हरी भागात 42 बालकांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे. त्या वेळी राज्यात दर हजारी जन्मामागे ग्रामीण भागात 55, तर शहरी भागात 27 बालकांचा मृत्यू होत होता. या संख्येत 2015 पर्यंत ग्रामीण भागात 41 आणि श्हरी भागात 25 पर्यंत घट झालीी आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ग्रामीण भागात 26 आणि शहरी भागात 14 इतके आहे. संख्येत निम्मी घट दिसत असली तरी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा अजूनही बरीच मागे असल्याचे स्पष्ट होत आहे. जन्मावेळी मुलाचे वजन खूप कमी असणे, प्रसूतीनंतर जंतूसंसर्ग होणे अशा विविध कारणांमुळे बालमृत्यू होत आहे. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास बालमृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. राज्यात आदिवासी भागात हे प्रमाण अधिक आहे.
      बालहक्कासाठी जागतिक पातळीवर गेली चार दशके अविरत प्रयत्न करणार्यायुनिसेफया संस्थेने भारतातीलबालमृत्यूबद्दल सखोल अभ्यास करून अत्यंत खेदजनक, लाजिरवाणी आणि बोलती बंद करणारी माहिती प्रकाशित केली आहे. वृत्तपत्रांच्या तसेच अन्य माध्यमांमार्फत ही माहिती जनतेपर्यंत पोहोचली तर काही अंशी परिस्थिती बदलण्यास त्याचा उपयोग होईल. भारतातील 90 टक्के बालमृत्यू कुपोषणामुळे होतात असे सांगितले जाते, ते खरेही आहे; परंतु कुपोषणामुळे मृत्यू होण्यामागे बाळाची रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे हे महत्त्वाचे कारण असते.   बालमृत्यू होण्याची शृंखला बाळाला वारंवार होणार्या डायरियासारख्या रोगांपासून आणि श्वसन विकारांपासून सुरू होते. पुरेसे अन्न न मिळणे व रोग प्रतिकारक शक्तीचा सातत्याने र्हास होणे याचा एकत्रित परिणाम होऊन बालमृत्यू घडतो.
     ‘युनिसेफने केलेल्या पाहणी अहवालात नमूद केलेल्या गोष्टी अशा आहेत. भारतातील 40 टक्के, म्हणजेच 50 कोटी लोक आजही उघड्यावर प्रातर्विधीस जातात. 44 टक्के महिला मुलांची विष्ठा उघड्यावर टाकतात. याचा थेट परिणाम म्हणजे अमिबा, व्हायरस अथवा जीवघेण्या बँक्टेरिया यांसारख्या सूक्ष्म जंतूंचा होणारा प्रसार. बालकांची स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असल्याने हे सूक्ष्म जंतू त्यांच्यावर थेट अतिक्रमण करून त्यांना डायरिया व श्वसनविकारास बळी पाडतात. परिणामतः एक तर खाल्लेले अन्न न पचल्यामुळे अथवा खायला अन्नच नसल्यामुळे ही बालके दगावतात. ‘युनिसेफच्या निरीक्षणात असे नोंदविले आहे की उघड्यावरील प्रातर्विधी इतकेच वाईट आहे, त्यानंतर हात साबणाने न धुणे. साबणाने हात धुतल्यास जंतू प्रसारास मोठा आळा बसतो. साबणाने हात धुतल्यास रोगप्रसारावर 44 टक्केपर्यंत नियंत्रण येते. भारतात फक्त 53 टक्के लोक नैसर्गिक विधीनंतर हात धुतात, 38 टक्के लोक जेवणापूर्वी हात धुतात, तर केवळ 30 टक्के लोक अन्न बनविण्यापूर्वी हात धुतात. यात साबणाचा वापर अतिशय अत्यल्प असतो. (कित्येक हॉटेल कामगार अन्न बनविण्यापूर्वी हात धूतच नाहीत). ग्रामीण भागात फक्त 11 टक्के महिला मुलांची विष्ठा वाहत्या गटारीत टाकतात, 71 टक्के महिला उघड्यावर टाकतात तर 18 टक्के महिला कचर्यातच टाकतात. ग्रामीण भागातील पाच वर्षाखालील केवळ पाच टक्के मुले बंद स्वच्छतागृह वापरतात. ग्रामीण भागातील दाईने एखाद्या महिलेच्या प्रसूतीपूर्वी साबणाने स्वच्छ हात धुतलेले असले पाहिजेत, तसेच नवजात बालकाला हाताळणार्या आईचेही हात स्वच्छ असले पाहिजेत, हे खरे असले तरी 95 टक्के दाई व 92 टक्के आईकडून हे पाळले जात नाही. उघड्या गटारींमुळे फार मोठ्या प्रमाणावर अनारोग्य पसरते व रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या बालकांवर त्याचा थेट परिणाम होतो. भारतातील संपूर्ण ग्रामीण भागात आजही दुर्गंधी व रोगजंतू पसरविणार्या उघड्या गटारी आहेत. तालुक्याच्या व कित्येक शहरांच्या भागातही मोठ्या प्रमाणावर उघड्या गटारी आहेत. त्यातून केवळ माणसांचेच नव्हे तर जनावरांचे मलमूत्रही वाहून नेले जाते.
     बालमृत्यूमध्ये उघड्या गटारींचे मोठे योगदान आहे. सहज संपर्काच्या अंतरावर आरोग्यकेंद्र किंवा दवाखाना नसणे, अज्ञानी लोकांच्या पालापाचोळा, मुळ्या इत्यादी औषधांचा वापर करणे, गंडे-दोरे किंवा मंत्र-तंत्र यावर विश्वास ठेवून वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करणे, बाळ आजारी असताना त्याचा आजार वाढण्यास कारणीभूत होतील अशा वस्तूंचे बाळास सेवन करावयास देणे, कुठून तरी गोळा करून आणलेले शिळे अन्न व मिळेल ते दूषित पाणी बाळास देणे, अशा अनेक कारणांमुळे भारतात बालमृत्यू घडत असतात. या प्रत्येक निरीक्षणाचा अभ्यास करून त्यावर मात करणे सहज शक्य आहे. दाम्पत्याने मूल हवय असा विचार केल्यानंतर, आईची ववैद्यकीय तपासणी प्रथम केली पाहीजे. जर संबंधित महिलेला थायरॉईड, रक्तदाब असे काही आजार असल्यास त्यावर उपचार करुन मग आई होण्याचा निर्णय घेणे बाळ आणि आईसाठी चांगले असते. अन्यथा बाळाला धोका होण्याचा संभव असतो. गर्भधारणेनंतर आहार आणि औषधोपचार योग्य होतो की नाही यावरही बरेचकाही अवलंबून असते. तसेच, बाळाच्या जन्मानंतर त्याला वेळच्या वेळेवर डॉक्टरांच्या निगरानीखाली औषधोपचार झाला पाहीजे. अनेकदा सरकारी रुग्णालयात बाळाला औषधांचा डोस दिल्यास पुरेसे असे अनेक पालक मानतात. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी असते. कारण या दरम्यान डॉक्टर बाळाची प्रकृती देखील तपासत असतो.
     ‘युनिसेफच्या निरीक्षणानुसार भारतात जन्माला येणार्या दर हजार मुलांमागे 53 मुले विविध कारणांनी दगावतात. जगातील अनेक विकसनशील देशांत याच्या आसपासच हे प्रमाण आहे, मात्र विकसित देशांमध्ये हे प्रमाण अत्यल्प आहे. अमेरिकेत हजार मुलांमागे 6, कॅनडात 5, तर इंग्लंड मध्ये 4.5 बाल मृत्यू होतात. शिक्षणाबरोबरच दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यात केरळा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. येथील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणचा बालमृत्यूचा दर देशात कमी आहे. गेल्या पंधरा वर्षांत येथील शहरी आणि ग्रामीण भागातील दरहजारी मृत्यूचे प्रमाण 12 ते 15 दरम्यान राखण्यात येथील वैद्यकीय व्यवस्थेला यश आले आहे.

No comments:

Post a Comment