सध्याच्या गतीमान
जगात शेजारी-पाजारी,नातेवाईक यांची विचारपूस करायला माणसाला वेळ नाही. शेजारच्या
घरात काय चालले आहे,याचा सुगावादेखील कधी शेजारच्याला लागत नाही.
इतकेच नव्हे तर आपल्याच घरात मुलांचे काय चालले आहे, याचा पत्ता कुटुंबातल्या मोठ्यांना नसतो. इतका माणूस
आपल्या कामाच्या व्यापात बिझी झाला आहे. आपल्या कुटुंबाकडे अथवा
आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नसला तरी त्याला महागडे शिक्षण द्यायला
पालक एका पायावर तयार आहे. त्याच्यासाठी कितीही पैसे खर्च करायला
तयार आहे.मात्र त्याच्याशी घडीभर बोलायला,त्याचा अभ्यास पाहायला,त्याच्या आवडी-निवडीनुसार त्याला सोबत घेऊन कंपनी द्यायला तयार नाही. मात्र आपला मुलागा शाळेत पहिला आला पाहिजे, त्यांना अमूक
अमूकच अभ्यासक्रम निवडला पाहिजे, असा अट्टाहास केला जात आहे.
त्यासाठी पालकांची काहीही करण्याची तयारी आहे.
शहरात विभक्त कुटुंब संस्कृती
वाढीस लागली आहे, ती आता अगदी
मध्यम शहरांमध्येदेखील येऊन पोहचली आहे. मुलाला दिवसभर गुंतवून
ठेवण्यासाठी त्याला विविध क्लासेसमध्ये अडकवले जात आहे. त्यामुळे
निमशहरी भागातदेखील क्लासेस,अॅ़केडमीसारखे
खूळ वाढीस लागले आहेत. शिक्षण आणि त्या अनुषंगणाने इतर कला प्रकारांचे
क्लासेस वाढत चालले आहेत. मात्र या मुलांना इतके भरपूर शिक्षण
देऊनही मुले शिकतात का, असा प्रश्न पडला
आहे. पाहिजे ते तात्काळ आणून देण्याची पालकाची मनोवृत्ती त्यांनाच
भारी पडू लागल्याची उदाहरणे आहेत. मात्र तरीही त्यांचे लाड पुरवण्याचा
प्रयत्न करतातच. यामुळे मुलांमध्ये नाही हा शब्द ऐकण्याची वृत्ती
नाहिशी झाली आहे. त्यामुळे अगदी लहान वयात मुले आक्रमक बनली आहेत.
याला आवर घातले गेले नाही तर मुले पुढे गुन्हेगारीकडे वळतात.
पुढे पालक त्याच्या इच्छा पुरवण्यात अपयश ठरले तर ते मिळवण्यासाठी मुले
कुठल्याही थराला जाऊ शकतात. शेवटी हा मार्ग गुन्हेगारीकडे जातो.
त्यामुळे पालकांनी किती संपत्तीचा हव्यास करायचा, याचा विचार करायला हवा आहे. मुलांवर नियंत्रण वाढत्या
वयात नसेल तर ती भटकली जाण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे आहे त्यात
समाधानी माणून पालकांनीदेखील आपले घर,कुटुंब सगळ्याबाबतीत कसे
समृद्ध होईल, याकडे पाहिले पाहिजे. घरात
एकादी वस्तू नसली तरी चालेल,मात्र संस्कार महत्त्वाचे आहेत.
संस्कारावर बर्याच गोष्टी जिंकता येतात.
चांगल्या संस्कारामुळे हव्यासाला आपोआपच आळा बसतो. त्यामुळे मुलांना संस्कार देण्याकडे पालकांनी अधिक लक्ष द्यायला हवे.
पालकांचे आणखी एक मत असते, आपण लहान असताना ज्या सुविधा मिळाल्या नाही
त्या सुविधा आपल्या मुलांना पुरावायच्या. त्यासाठी पालक मुल मागेल
ते आणून देतात. त्यासाठी पालक वाटेल तेवढा पैसा खर्च करतात.
पालकाने आपल्या मुलांकडून अपेक्षा करणे योग्य आहे, परंतु नुसत्या अपेक्षा करुनही चालणार नाही, तर आपल्या
पाल्यात खरोखरच क्षमता आहे की नाही, याची खात्री पालकांनी करुन
घेतली पाहिजे. प्रत्येक बालक हा वेगळा असतो. काही मुले अभ्यासात हुशार असतात, तर काही खेळात,
काही सांस्कृतिक क्षेत्रात तर काही कला क्षेत्रात. हे गुण मुलात उपजत स्वरुपात आढळतात. ते गुण लक्षात घेऊन
पालकांनी जर मुलांना प्रोत्साहन दिले तर मुले चांगल्या प्रकारे यश संपादन करतील.
प्रत्येक मुलाचा बुध्यांक वेगळा असतो. आपल्या मुलाची
आवड लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन देणे हे पालकाचे कर्तव्य आहे. पण तसेही घडताना दिसत नाही. आजूबाजूला काय काय आहे,
ते सगळे देण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे
काही कुटुंबात मूल सकाळी क्लासला जातो, दुपारी शाळा आणि संध्याकाळी
कराटे, चित्रकला,गायन,नृत्य अशा क्लासला जातो. त्याला घरी यायला आठ वाजतात.
तो खाऊन झोपीच जातो. त्यामुळे त्याला शाळेत,
क्लासमध्ये शिकलेल्या गोष्टींची उजळणी करायलाच वेळ मिळत नाही.
एक ना धड भाराभर चिंध्या, अशी अवस्था मुलांची झाली
आहे. याला कुठे तरी आवर घातला पाहिजे.
मुले ही देशाची संपत्ती आहे.
जशा पालकांना मुलांकडून अपेक्षा असतात. तशाच अपेक्षा
प्रत्येक मुलाकडून देशाला पण असतात. कारण मुलांच्या विकासावरच
राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. आज देशात शैक्षणिक क्रांती घडून
येत आहे. शहरातील पालकांप्रमाणेच खेड्यातील पालकही जागृत बनत
आहेत. शैक्षणिक क्रांती जरी घडत असली तरी मुलांच्या वयाचा कोणताच
विचार करत नाही. काही पालकांना मुल केंव्हा शाळेत जाईल याचीच
घाई झालेली असते. मुलाचे वय सहा वर्ष होण्याआधीच शाळांची चर्चा
सुरू होते. आपले मुल स्पर्धे च्या युगात कोठेच मागे राहू नये,
असे पालकाला सारखे वाटत असते. अगदी लहान मुल पाळण्यातून
केंव्हा बाहेर येईल आणि त्याला कधी शाळेत घालीन इतकी घाई होत असते. मुल तीन वर्षाची झाल्याबरोबर त्याला शिकवायला सुरुवात करणारे पालक या छोट्या
मुलांचे नुकसान करत असतात. त्याला शाळेत जाण्यासाठी नवीन दप्तर,
जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, छान गणवेश या सर्व सुविधांसह बसमध्ये किंवा रिक्षामध्ये बसवून विविध शाळांमध्ये
दाखल केले जाते. त्याच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन जास्त असते.
बालवयात आई-वडिल भावंडे यांच्या बरोबर किंवा त्याच्या
बालमित्रांबरोबर खेळावे, बागडावे, उड्या
माराव्यात त्यामुळे त्याच्या शरीराला बळकटी येते. ज्ञानेंद्रियांचा
विकास होतो. प्रतिकार शक्ती वाढते. त्याच्या
क्षमतांचा विकास होतो. त्यामुळे सहा वर्ष वय झाल्यावरच त्याच्या
शिक्षणाला सुरुवात करावी. बालक मानसिक शारिरीक व भावनिक दृष्टीने
सक्षम झाल्यावरच अध्ययनाच्या तोंडी द्यायला हवे.
पाचिमात्य देशात सुध्दा औपचारीक शिक्षण
सहा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय सुरू करत नाही. त्याआधी लहान वयात
बालकाच्या कोवळ्या मनावर आणि मेंदूवर प्रमाणापेक्षा जास्त ताण पडला तर ती मुले प्रकृतिने
दुर्बल बनतात. त्यांची पुढील वर्गातील प्रगती अपेक्षेनुसार आढळून
येईलच असे नाही. पाचव्या वर्षापर्यंत बालकाने शारिरीक वाढीचा
एक टप्पा पूर्ण केलेला असतो. सहाव्या वर्षात दुसरा टप्पा सुरु
होतो. खर तर हा संक्रमणाचा काळा असतो. त्यामुळे
बालकाची योग्य घडी बसणे महत्वाचे आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गाचे
बारकाईने निरीक्षण केले तर असे आढळून येते की, आपल्या मुलाचे
वय त्याच्या वर्गातील मुला- मुलींच्या वयापेक्षा कमी असेल तर
त्याची समजही कमी असते. ज्याचे वय सहा वर्ष असेल तो ज्ञान पटकन
ग्रहण करतो, कारण त्याचा बौद्धीक विकास चांगलाच झालेला असतो.
म्हणून औपचारीक शिक्षणाची सुरुवात सहा वर्षापेक्षा खूपच लवकर करणे हा
बालकावर अन्याय ठरेल. मुलांच्या आयुष्यातील आनंदमय बालपण तसेच
त्याचे खेळकर जीवन आपण लवकरच हिरावून घेतो. त्याच्या अकाळी पडलेल्या
ताणाचा परिणाम काही वर्षांनंतर अध्ययनावर, शारिरीक आणि मानसिक
विकासावर परीणाम दिसून येतो. कधी कधी मुलांमध्ये नैराश्य येते.
मुलाला योग्य वेळी शाळेत घाला त्याच्यावर कोणतेही दडपण नको. दररोजचा किमान एक तास वेळ तरी आपल्या पाल्यासाठी राखून ठेवायलाच हवा.
शाळेत सरांनी कोणता पाठ शिकवला, गृहपाठ याविषयी
मनमोकळे पणाने मुलांबरोबर गप्पा मारा त्यामुळे मुलांचा ताणतणाव कमी होईल. आपल्या मुलाला कधीच कमी लेखू नका किंबहुना आपल्या मुलांची तुलना इतर मुलांबरोबर
कधीच करू नका. विनाकारण मुलांच्या मनामध्ये न्यूनगुंड निर्माण
करणे योग्य नाही. कुटुंब हीच मुलांची पहिली शाळा आहे.ही शाळा सर्व बाजूने समृद्ध असायला हवी. महत्त्वाचे म्हणजे
इथले आई-बाबा हे गुरु मुलांसाठी फ्री असायला हवेत.
No comments:
Post a Comment