Saturday, July 15, 2017

चीनी मालावर बहिष्कार

     चीन भारतावर गुरगुरायला लागला आहे. चीन 1962 चा राहिला नसल्याचे सांगत युद्ध झाले तर भरताचे मोठे नुकसान होईल, असा इशाराही दिला आहे. शिवाय आम्ही पाकिस्तानने मदत मागितल्यास आमचे सैन्य काश्मिरमध्ये घुसवू अशी तंबीही दिली आहे. त्यामुळे चीनला किती मस्ती आहे, हे यावरून दिसून येत आहे. साहजिकच याचे पडसाद देशभर उमटत आहेत. चीनी मालावर बहिष्कार घालण्याचा इशारा आणि आवाहन केले जात आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यात याबाबत उत्स्फुर्त प्रतिसाद उमटत आहे. चीन सातत्याने काही ना काही अगळीक करत आहे. त्यामुळे अलिकडे चीनी मालावर बहिष्कार घालण्याबाबत सातत्याने काही संघटनांकडून उत्स्फुर्त  आवाहन केले जात आहे. राजकीयदृष्ट्या याला जाहीर प्रतिसाद मिळणार नसला तरी त्याबाबत कोणतीच प्रक्रिया कोणाकडून आली नाही. अर्थात सरकारकडूनही असे काही आवाहन येणार नाही. पण लोकांनी घेतलेला पवित्रा त्यांनाही मनोमन पसंद पडणारच आहे. चीनी बनावटीच्या वस्तूंवर खरे तर बहिष्कार अपेक्षित आहे. कारण काही वस्तू सोडल्या तर त्यात गॅरंटी सांगावी असे काही नाही. स्वस्त वस्तू असल्या तरी त्या टिकावूही नाहीत. भारतीयांनी अशा वस्तू खरेदी करणे टाळायलाच हवे.

     चीनसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शिवाय स्वस्तातला माल असल्याने सर्वसामान्य भारतीय त्याच्याकडेच आकृष्ट होत आहे. कसेही केले तरी चीनी मालाला उठाव हा आहेच. त्यामुळेच चीनच्या कुरापती वाढणार असतील तर त्यांच्या मालावर बहिष्कार टाकून चीनचे नाक काही प्रमाणात आपण  दाबू शकतो. भारतीयांनी चिनी वस्तूंपेक्षा देशप्रेम आम्हाला महत्त्वाचे आहे, हा संदेश मनावर घेऊन तो  कृतीत आणला तर बरेच काही साध्य होणार आहे. यासाठी देशप्रेम महत्त्वाचे आहे. शिवाय  भारतातल्या बहुतांश शहरांतून ग्राहक आणि व्यापार्यांनी बहिष्काराचे असेच पाऊल उचलले तर चीनला पळता भुई थोडी झाल्याखेरीज राहणार नाही. चीनमधून चोरट्या मार्गाने खेळणी, ट्रांझिस्टर, टेपरेकॉर्डर, सायकली, फोन, फटाके, रोषणाईसाठी लागणार्या विजेच्या माळा अशा प्रकारचा माल येतो. भारतीय बनावटीच्या वस्तूंपेक्षा किमतीनेही तो स्वस्त असतो. अर्थात स्वस्त असला तरी त्या वस्तूंचा दर्जाही तसाच असतो. या उलट भारतीय बनावटीच्या वस्तू अधिक दर्जेदार आणि टिकावू असतात. गेल्या काही वर्षात चीनने आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने भरीव कामगिरी केली आहे. याचे कारण म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेची 1990च्या सुमारास सुरू झालेली फेररचना. त्यामुळेच चीन आर्थिक महासत्ता म्हणून प्रस्थापित होऊ शकला. भारत-चीन यांच्यातील व्यापार 2015मध्ये 70 अब्ज डॉलर्स इतका असल्याची आकडेवारी आहे. खेळणी किंवा विद्युत उपकरणांपासून मोबाइलपर्यंत चिनी मालाने भारतातच नव्हे तर जगाच्या सर्व बाजारात घुसखोरी केली असली तरी या उत्पादनांचे आयुष्य फार काळ राहात नाही, याची खात्री ग्राहकांना पटली आहे.
     भारत ही चिनी वस्तूंसाठी मोठी बाजारपेठ आहे हे खरे; पण देशप्रेमींनी या वस्तूंवर बहिष्कारसत्र चालू ठेवल्यास चीनची पंचाईत झाल्याखेरीज राहाणार नाही. लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळीचा फायदा सांगताना म्हटले होते की परकीय मालाच्या तुलनेत स्वदेशी माल महाग मिळाल्याने ग्राहकांचे थोडेफार नुकसान होत असेलही; परंतु यात महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते ते हे की चार कोटीचा विलायती (परदेशी) माल घेतला तर चार कोटीच्या चार कोटी विलायतेस जातात आणि तितकाच माल पाच कोटीस खरेदी केला तर सर्व पाच कोट रुपये स्वदेशात राहातात. म्हणूनच पाच कोटीचा स्वदेशी माल घेण्यात एक कोटीचे नुकसान होते ही समजूत चुकीची आहे, असे स्पष्ट करीत लोकमान्य म्हणतात, गिर्हाईकास एक कोटी रुपये जास्त पडतात हे खरे; पण देशातल्या देशात राहून त्याचे अखेर विनियोग भांडवलाच्या रुपाने नवीन कारखाने काढण्यात होत असतो. स्वदेशी चळवळीने किंवा परदेशी मालावर जकात अधिक बसवल्याने देशातील उद्योगधंद्यास ते उत्तेजन मिळायचे त्याचा मार्ग हाच’. लोकमान्यांनी व्यापार्यांनाही स्वदेशी चळवळ पुढे नेण्याचे आवाहन केले होते. देशी मालाची किंमत विनाकारण वाढणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे. तसेच स्वदेशी मालाचा जितका जास्त पुरवठा करता येईल तितका करण्याविषयी व्यापार्यांनी झटले पाहिजे. देशातील उद्योगधंद्याच्या उत्तेजनार्थ लोकांनी काही दिवस तरी स्वार्थ त्याग केला पाहिजे. यात थोडी गैरसोय असली तरी ती लोकांनी सोसली पाहिजेटिळकांचे हे विचार आजच्या चिनी मालावरील बहिष्काराच्या निर्णयामुळे किती कालातीत आहेत हेच स्पष्ट करतात.

No comments:

Post a Comment