Saturday, July 1, 2017

'वाट ती चालावी पंढरीची’

     विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग, वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्ठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठलाला लागू पडते. विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.

     श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन सोळखांबीत येऊन दक्षिणेकडील दरवाजाने बाहरे पडताच अनुक्रमे अंबाबाई, उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घडते. पुढे तरटी दरवाजाच्या आत पायर्यांजवळ संत कान्होपात्रा समाधिस्थान आहे. समाधीवर तरटीचे झाड आहे. तसेच पुढे गेल्यावर भगवान व्यंकटेशाचे छोटे मंदिर आहे. ही अतिशय सुंदर, चतुर्भुज मूर्ती गंडकी शिळेची आहे. त्याला उजवे घालून जाताना डाव्या बाजूच्या भिंतीत श्रीगणेशाची मूर्ती दिसते. व्यंकटेशाला प्रदक्षिणा घालून खाली उतरताना बाजीराव पडसाळी (ओवरी) लागते. या सभामंडपात विविध कार्यक्रम सदैव होत असतात. तसेच याच मंडपात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे रोज सकाळी मोफत खिचडी, ताक व बुंदीच्या लाडूच्या प्रसादाचे वाटप केले जाते. त्याला लागूनच श्रीमहालक्ष्मीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात अन्नपूर्णेची मूर्ती आहे व एका खांबावर नृसिंहाची मूर्ती आहे. बाजीरावाच्या ओवरीत रामेश्वर, खंडोबा, गणपती, नागोबा व श्रीकृष्ण यांच्या छोट्या सुरेख मूर्ती आहेत. तिथून पुढे जाताना डाव्या हाताला पश्चिमद्वार आहे. पुढे नवग्रहाचे मंदिर आहे. हा भाग श्रीविठ्ठलाच्या गर्भगारामागे येतो. इथेच एक बाजूस श्रीदत्त, सूर्य व चिंतामणी यांच्या मूर्ती आहेत. याच्या पुढे गेल्यावर श्रीरुक्मिणीमातेचे मंदिर लागते.
दिंडी
दिंडी हा शब्द प्रकार पूर्वीपार प्रचलित नसला तरी हा शब्द सर्वप्रथम पंढरपूरच्या विठ्ठलासंदर्भातच वापरला गेला व जनमानसात रूळलादेखील. ‘दिंडीया शब्दाचा खरा अर्थलहान दरवाजाकिंवापताकाअसा घेतला जातो. त्याचप्रमाणे वीणेसारख्या एका वाद्यालाहीदिंडीअसे संबोधले जाते. ‘दिण्डूया कानडी शब्दापासूनदिंडीहा शब्द आला असावा. ‘दिण्डूया शब्दाचा अर्थ स्वाभिमानी, श्रेष्ठ अशा लोकांची मिरवणूक असा सांगता येईल.
     वारकर्यांचे जथ्थेच्या जथ्थे पंढरीकडे निघतात. त्यात टाळकरी, पखवाजवादक, पताकाधारी, विणेकरी अशांचा समावेश होतो व त्यांचेच पुढे दिंडींमध्ये रूपांतर होते. दिंडीची स्वत:ची अशी एक शिस्त असते. दिंड्यांचे काही अलिखित नियम असतात. वीणाधारी वारकरी या दिंडीचा मुख्य असतो. दिंड्यांची जागा व क्रम आखून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निश्चित असतो. पराकोटीची शिस्त ही या दिंड्यांची वैशिष्ट्ये आहेत. यात्रा संपल्यावर पंढरपुरात आपापल्या मठात, राहुटीत मुक्काम केलेले हे वारकरी नगर प्रदक्षिणा, काला यथासांग पार पडून आपापल्या गावी जातात. ही शिस्तबद्ध यंत्रणा गेली शेकडो वर्षे अव्याहतपणे कार्यरत आहे. हे नियम ज्ञानदेवादी संतमहंतांच्या सर्वश्रेष्ठ मांदियाळीने अधिक दृढ केले. त्याच्यावरुन मार्गक्रमण करणारे वारकरी खरोखरचधन्यआहेत.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले । उद्धरावया आले दीन जनां ॥1

ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घेता वदनी दोष जाती ॥2

हो कां दुराचारी विषयी आसक्त । संत कृपे त्वरित उद्धरती ॥3

अखंडित नामा त्यांचा वास पाहे । निशिदिनी ध्याये सत्संगती ॥4
संतसंगे हरे पाप ।

संतसंगे निरसे ताप । संतसंगे निर्विकल्प ।

होय मानस निश्चळ ॥1

संतसंगे वैराग्य घडे । संतसंगे विरक्ती जोडे । संतसंगे निजशांति वाढे । साधन ह्रदयी अखंडित ॥2

संत संगे हरिची भक्ती । संतसंगे ज्ञान विरक्ती । संतसंगे भुक्ती मुक्ती । साधका वरिती अनायसे ॥3

निळा म्हणे साधू संत। महाभाग्याचे हे भाग्य । सेविती ते स्वरुप चांग । पार्वती आत्मया श्रीहरिचे ॥4
टाळी वाजवावी गुढी उभारावी

     पावसाळा सुरु झाला की आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात. आषाढी-कार्तिकीलापंढरपुरा नेईन गुढीम्हणत सर्व महाराष्ट्रातून दिंड्या येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंड्या येतात. नदी अनंत अडचणी आल्या तरी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप होण्यास आतुर झालेली असते तशीच ही विठ्ठल भक्तीची गंगा, चंद्रभागेच्या काठाशी असणार्या पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप होते ती वारकरी सोहळ्याच्या रूपात.
     वारी हा आध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सद्गुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता आविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तितील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करताना पांडुरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी उच्च-नीच नव्हते, कोण्या एका जातीचे संत नाहीत. संतकवी कोण्या एका गावाचे नाही घराण्याचेही नाहीत. सेना-‘न्हावी’, सावतामाळी’, नामाशिंपी’, गोराकुंभार’, नरहरीसोनारकान्होपागावारांगना’, एकनाथब्राह्मण’, तर चोखामहार’! अशी एकात्मतेची शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे! विठ्ठलरूप व्हावे हेच सत्य. विठ्ठलाला माउली मानणार्या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मूर्ती आहे. सासूरवाशीण मुलगी माहेराला जाते. प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी सकल संतांची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहोचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकर्यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकर्यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतांनी दाखविली. आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे. अहो! एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो. जेवढी सहलीला येणार्यांची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं तसं नाही. वारी ठरावीक तिथीला निघते, आषाढीला पोहोचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्याच्या भोवती दिंडीचा आराखडा. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं. ‘गोपालकाल्यातसर्वांच्या शिदोर्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रापंचिक दु:खेही वाटून घेतात.
     सोलापुरातील विठ्ठल मंदिर
     श्री ज्ञानेश्वरांच्या कुळात त्यांच्या पिढीपूर्वी वारी होती. वारीच्या परंपरेतील 850 वर्षांपूर्वीची एक निशाण सोलापुरात सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात पांडुरंग देवालय पाहावयास मिळते. श्री ज्ञानेश्वर माउलींचे आजोबा श्री गोविंदपंत आणि त्यांच्या धर्मपत्नी भाग्यवंती नीराबाई या पंढरीच्या वारीस निघाल्या होत्या. ते दरवर्षी आषाढीला सोलापूरमार्गे जात असत. त्यांचा एक मुक्काम सोलापूरला असायचा. एकदा पायी चालत ते सोलापूरला आले. दोघेही फार थकलेले होते. त्यावेळेस श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या भक्तांकडून श्रमदानाने तलाव खोदाईचे काम सुरू होते. तेव्हा तळकाठी एका झाडाखाली गोविंदपंत व नीराबाई मुक्कामासाठी थांबले. फेरफटका मारताना सिद्धरामेश्वरांच्या नजरेस झाडाखाली बसलेले वृद्ध दाम्पत्य दिसले. त्यांच्याजवळील पताका पाहून हे वारकरी आहेत असे महाराजांनी ओळखले आणि महाराजांनी त्यांना विचारले की, आपण एवढ्या थकलेल्या अवस्थेत कोठे निघालात? त्यावर गोविंदपंतांनी महाराजांना सांगितले की आम्ही दोघे श्री पांडुरंगाच्या दर्शनाला चालत निघालो आहोत. परंतु आम्ही फार थकलेलो आहोत. आता चालवत नाही असे सांगितले. तेव्हा सिद्धेश्वर महाराजांनी त्यांना आहे तिथेच विठ्ठलाचे साक्षात दर्शन घडविले. आजही श्री विठ्ठलाची सुंदर सुबक मूर्ती आपणास पाहावयास मिळते. या मंदिराच्या सेवेचे भाग्य पाठक घराण्याकडे पिढीजात आहे.



No comments:

Post a Comment