Friday, July 21, 2017

चिनी राखीला करा बाय बाय

     बहीण भावाच्या पवित्र बंधनाच्या धाग्याला देशसेवेचा अधिक स्पर्श राहावा,यासाठी यंदा चिनी बनावटीच्या राखीला बाय बाय करा. व्यापारी बांधवांनी या राख्या आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवू नये. अलिकडे दिवसेंदिवस चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. आशिया खंडात आपण बलवान आहोत, या गुर्मित चीन वागत आहे.त्यालादेखील महासत्ता व्हायचे आहे, मात्र त्यांची रीत धाकदपटशा, दहशत यावर अवलंबून आहे. मात्र अशा मुजोरपणावर कुणाला जिंकता येत नाही. भारतानेही त्याच्या गुरगुरण्याला भीक घालू नये. सिक्कीममध्ये बेकायदेशीर घुसखोरी करून प्रदेश बळकवण्याचा प्रयत्न चालला आहे, तो भारताने हाणून पाडायला हवा.करारानुसार इतर देशांना भारताने संरक्षण देण्यात कुचराई करू नये. भारतीय सेना सडेतोडपणे उत्तर द्यायला सज्ज आहे. आपण भारतीय म्हणून सैनिक व देशाच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. ही कर्तव्य भावना समोर ठेवून चीनला धूळ चारण्यासाठी आपणही चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा. कोणतीही चायनीज वस्तू खरेदी न करण्याचा निर्धार करायला हवा.

     लवकरच रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण येतो आहे. या उत्सवात प्रत्येकाने देशी धागा खरेदी करावा. बहीण भावाच्या स्नेहाचा पवित्र उत्सव देशी धागा वापरून अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करावा. व्यापारी बांधवांनीही याला मोलाची साथ द्यायला हवी. महत्त्वाचे म्हणजे चिनी बनावटीची राखी दिसायला सुंदर व आकर्षक दिसते. परंतु, चीनमधून आलेला कच्चा माल व त्यावर रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर सूत,धागे,कागद व पॉलिथीनचा  वापर राखीसाठी केला जातो. शरीराला या वस्तू अपायकारक आहेत. मळमळणे, ओकारी येणे, ताप येणे आदी विविध आजार गतवर्षी लहान मुलांना राखी बांधल्यानंतर झाले असल्याच्या घटना वृत्तपत्रातून वाचण्यात आल्या होत्या. त्यांची बोटे तोंडात गेल्यामुळे असे प्रकार घडले होते. त्यामुळे ही चायनीज बनावट राखी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. येत्या रक्षाबंधन सणाला देश माझा, मी देशाचा, हे भान ठेवून प्रत्येक भारतीयांनी चिनी बनावटीच्या राख्या खरेदी करू नयेत. व्यापारी बांधवांनीही अशा राख्या दुकानात विक्रीसाठी ठेवू नये.


No comments:

Post a Comment