Thursday, July 6, 2017

पुस्तकातल्या पानातला पाऊस

पुस्तकातल्या पानातला पाऊस

पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा. आपल्याला जसा तो प्रत्यक्षात भेटून दिल खूश करून जातो,तसा तो पुस्तकांच्या पानांतूनही भेटत राहतो. इथे त्याचे प्रकार भिन्न भिन्न असतात. श्रावणातला,आषाढातला पाऊस असतो. तिच्यासोबत येणारा पाऊस असतो. तिच्या आठवणीसोबत कोसळणारा पाऊस असतो. तो नाचत-बागडत,झिरपत असा कसाही येतो. तो मागचा असतो,पुढचा असतो म्हणजे कसाही असतो. तो मस्त असतो,चिंब असतो.तो सुखावणारा असतो,तडफडायला लावणारा असतो. म्हणजे आपल्याला कसाही वाकवायला लावतो. असा पुस्तकातला पाऊस ऐकायला आणि पचायलाही असतो, म्हणजे भलताच भारीही असतो.
असाच हा थोडासा पाऊस! पुस्तकांच्या पानांमधून वेचून इथे आणला आहे.

पावसाळा
समज मी एक काळाकुट्ट ढग होऊन
तुझ्या खिडकीसमोरून तरंगत गेलो तर
निळ्या निळ्या कोवळ्या पंखांची परी होऊन

तू मागोमाग येशील?
... छे! तुला तरंगता कधी येतच नाही
तुला असतात तुझी घरकामे,तुला असतो तुझा अभ्यास
तुला असतो तुझा नखरा आणि पाहुण्यांना मानसन्मान!
मी मात्र तसाच तरंगत भरकटत जातो पुढे एकटाच
आणि ठेच लागून दगडाशी कोसळून चिखल करून घेतो
रडून रडून हलक्या झालेल्या आभाळात तेव्हा
पुन्हा तुझ्याच स्वप्नांचे इंद्रधनुष्य पडलेले असते
...पावसाळ्यात खरं म्हणजे चिखलच जरा जास्त होतो
-नितीन तेंडुलकर (पावसाळा)

आभाळ कसे भरून...
आभाळ कसे भरून आले आहे...
ही तगमगती काहिली त्यालाही असह्य झाली असेल...
 सारेच आसमंत कसे निश्चल, स्वत:च खिळून राहिले आहे...
पहा ना झाडाचे पानही हलत नाही
त्या पहिल्या टपोर्या थेंबाची प्रतीक्षा सार्या वातावरणात
दाटून राहिली आहे
म्हणतात ना,तापल्याशिवाय द्रवत नाही...
आभाळ तसे निश्चल, आत्ममग्न तंद्रीतच राहिले तर किती
बरे होईल...
वादळी वार्यांनी त्याला घेरले नाही तरच या भरलेपणातून
तो पहिला टपोरा थेंब आभाळाचे काळीज उकलून सरसरत
खाली येईल...
एकामागून एक, अनेक,कितीएक,

मीही वाट पाहात आहे.
माझ्या मनावर आपले कोवळे पाऊलठसे उमटवून निसटून
गेलेल्या माझ्या कवितेची
मनाच्या खोल अंधार्या विवरात अदृश्य झालेल्या त्या
कवितेचे लुकलुकते डोळे,मला कासावीस करताहेत
मी वाट पहाते आहे
त्या पहिल्या टपोर्या थेंबाची.
त्या थेंबामधून माझी कविताही अलगद खाली येईल ना...
-अनुराधा पोतदार (मंझधार)

पाऊस
पुन्हा पाऊस कोसळतोय
शांत आणि स्थिर लयीत
रात्रभर हा पावसाचा आवाज
स्त्रवत होता निद्रामय शरीरात
 पावसाचा आवाज आणि तुझा स्पर्श
तू माझ्या बाजूलाच झोपलेली होतीस खरे तर
असे आठवते आहे;
मग उठून पावसात केव्हा गेलीस?
ऊारा आणि पाऊस तुझ्या केसात
मी पांघरुणातून बाहेर काढावा तसा
स्वप्नातून हात बाहेर काढतो
आणि चेहरा चाचपतो
चेहरा,केस,गळा
बाहेर पाऊस कोसळतोय
पावसाचा आवाज
तुझ्या त्वचेच्या आत ऐकू येतोय
-वसंत आबाजी डहाके (शुभवर्तमान)

वाळा रुणुझुणू झाला
धाव वार्याची भरारा, आभाळही सैरावैरा
वेड्या पावसाच्या धारा,पाणजंजाळ पसारा
गावकुसाच्या बाहेर,भिजे चिंब तणघर
खेळे झोळीत तान्हुले,तिच्या डोळ्यात कहार
दारी लाटेमाग लाट,पाणी आत ये रांगत

ढासळती उतरंड,तान्हे उचली क्षणात
निर्या कोरड्या वेढून,तान्हे उराशी लावीत
डोळ्यातून धारा धारा, ओठ मिटलेले घट्ट
चुरू चुरू चोखताना,वाजे घुंगुराचा वाळा
पोटा लागल्या पाण्यात,हात तान्ह्याचा खेळला
खुदू खुदू हासताना,थेंब दुधाचा ओठाशी
तिने कवटाळिले तान्हे,वर धरून गळ्याशी
ओढ पाण्याला लागली,तोल ढळाया लागला
अशी तशी हालताना,वाळा रुणुझुणू झाला
-इंदिरा ( वंशकुसुम)

आर्त
सरकून मेघ जाताना
गलबलते आत कुठेसे
सुनसान हृदयवाटेला
सुख रडते आत कुठेसे
निसटल्या ईश्वरी हाका
करवली सनातन नाती
दृमरणावर फुलूनी येता
कालवते आत कुठेसे
करुणेतून तेज झरावे
प्रार्थना तशी मह स्फुरते
 ते भान निळ्या पापाचे
मालवते आत कुठेसे
श्वासाइतकेच स्वत:चे
गीतात दु:ख हलताना
शब्दांचे हिरवेपणगे
पालवते आता कुठेसे
सरकून मेघ जाताना
लवलवते आत कुठेसे
कोवळे आर्त जन्मांचे
गलबलते आत कुठेसे
-           अरुणा ढेरे (यक्षरात्र)

आभाळ झिरपते भरलेल्या माठात
अन निळा माठ बघ भरला आभाळात
आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे
का वेडा जमवी आभाळाचे तुकडे
गडगडून आले माथ्यावर आभाळ
थयथयती मंजूळ पायातील लय चाळ
लचकला स्वरांचा तुरा निळ्या डोळ्यात
इंगळी डसे इरकली मोरपंखात
-रॉय किणीकर(उत्तररात्र)

गेला पडून पाऊस
किती हायसे वाटले
असे त्याच्या छातीवर
शांत मस्तक टेकले...
-शिरीष पै (ऋतुचित्र)

 पाऊस किती दिवसात
फिरकला नाही
पाऊस कुणाला
कधीच कळला नाही

पाऊस
ऋतूंचे निमित्त करूनी दिसतो
पाऊस
पापणीआड
कधीचा असतो...
-सुधीर मोघे (लय)

मृगाचे आभाळ
उतरले डोळा
मोरपंखी लळा...
स्तनांवर नाचे
पावसाचे थेंब
मन ओलेचिंब
पायात पैंजण
कसा ताल धरू
गर्भात लेकरू
-ना.धों.महानोर (वही)

पाऊस अवेळी आज
का डख मारुनी गेला
पाऊस अवेळी आज?
निजलेली गुपिते माझी
उठलीत सोडुनी लाज
या उठलेल्या वेड्यांना
आभाळ पुरे ना झाले
ढग सगळे या गुपितांचे
अंग रंग माखुनि सजले
समजावू आता कशी मी
  माझ्याच अंतरंगाला
पाऊस अवेळी आज
रंग रंग गोंदुनि गेला!
-पद्मा (श्रावणमेघ)

भरलेल्या मेघा
इागलीसे कळ
चाललाहे छळ
आभाळाचा...
उरात फुटून
कोसळतो ढग
जळाची ही धग
सोसवेना...
पाझरतो आत
मीही किती वेळ;
कोसळण्या बळ
नाही मज.
-प्रियदर्शन पोतदार (लाटांच्या आसपास)

तू रिमझिम संपू नकोस
आपल्या सर्व सांडणार्या वेळा
तू जमवू नकोस
आणि अधाशासारखा टिपू नकोस
एक एक रंग
अजून पाहायचा आहे पाऊस!
त्या अगोदरचा थंड उजेड
पालवू नकोस डोळ्यांमधून
हे आयुष्य निराधार आहे
निराधार आपल्या पावलांना संगत
फक्त कोसळणार्या पावसाची
तू रिमरिमून संपू नकोस
त्या आधीच
-अरुण बागवे (आलम)

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले
जळ
ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया
साज
झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली
पाखरें
हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून
खार
पावसाच्या धारा डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरे शोधिती
निवारा
नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धांवे जणू नागीणच
थोर
झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें
रंगदार छबी
थांबला पाऊस उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी
प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें
वस्तुजात खुले
सुस्नात जाहली धरणी हांसली,
वरुणाच्या कृपावर्षावाने
सन्तोषली
शांता. शेळके

आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग ॥ धॄ ॥
आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥
कोसळल्या कश्या, सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥
लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली
वारा दंगा करी, जुइ शहारली,
चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥
शांता. शेळके

संकलन- मच्छिंद्र ऐनापुरे,जत



No comments:

Post a Comment