सध्या पावसाने
चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरी बिथरला आहे. यंदा मान्सून चांगला बरसणार,
असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकरीराजा खूश होता.
सगळ्यांनाच याचा आनंद झाला होता,पण पहिले एक-दोन पाऊस वगळले तर पाऊस बेपत्ताच आहे. कुठे गेला त्याचा
थांगपत्ताच नाही. हवामान खाते आज येईल, उद्या येईल, असा अंदाज बांधतच बसला आहे. मात्र इकडे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तिकडे गृहिणी
घरचे स्वयंपाकाचे बजेट वाढल्याने काळजीत आहे. भाज्यांची बाजारातली
आवक कमी झाली आहे, साहजिकच त्याचे भाव वाढलेले आहेत. मागच्या खेपेला दुष्काळ पडल्याने गावागावांना टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.
सरकारी खर्च वाढतो आहे,त्यामुळे प्रशासनदेखील काळजीत
आहे. त्यांना पाण्याची व्यवस्था पाहावी लागत आहे. त्याचे नियोजन करण्यात ते व्यस्त आहे. काही ठिकाणी पेरण्या
झाल्या आहेत. काही ठिकाणी दुबार पेरण्यांचे संकट ओढवले आहे.
तर बहुतांश ठिकाणी पेरण्या ह्या झाल्याच नाहीत. त्यामुळे बळीराजा काळजीत आहे. निसर्गाचा असा हा जीवघेणा
चमत्कार सोसावा लागत असताना नव्याने आलेल्या जीएसटीने व्यापारी वर्ग वैतागून गेला आहे.
सगळ्याच वर्गात,वातावरणात ताणतणाव भरला आहे. अशा अवस्थेत काय करायचे, हा मोठा प्रश्न पडला आहे.
आपल्याला माहित
आहे, पाऊस बेभरवशाचा आहे. शंभर टक्के त्याने हवामानाचे अंदाज चुकवले आहेत. तसा
याहीवर्षी त्याने अंदाज चुकवला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या काळजाचे ठोके चुकले आहेत. पण यातून काहीच शिकताना
दिसत नाही. दैवावर सगळे ढकलून मोकळे होतो. यातून शासन करणारे राजकर्ते काहीच शिकायला तयार नाहीत. बाकी देशात पाऊस बरसला नाही तर त्याला बरसावयाला भाग पाडतात. चीन हा देश तर तब्बल 90 टक्के पाऊस कृत्रिमद्वारा पाडतो.
आपण मात्र हातावर हात टाकून बसून राहतो. पाऊस कधी
पडेल, याची वाट पाहात उभे राहतो. आपल्याला
कृत्रिम पावसाचा खेळ थोडा माहित झाला आहे. गेल्या वर्षी त्याबाबतीत
थोडा प्रयत्न झाला. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या
काळातही याबाबत थोडीफार पावले उचलली गेली. मात्र कृत्रिम पावसाबाबत
आपण फारसे मनावर घेतलेच नाही. आतापर्यंत यावर अभ्यास आणि प्रयत्न
झाले असते तर आपण मान्सून पावसावर अवलंबून राहिलो नसतो. आज शेतातले
चित्र वेगळे दिसले असते. पण आपण चित्र बदलण्याच्या मानसिकेतत
नाही. सगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण भरारी
घेत आहोत,पण पावसाच्याबाबतीतच का आपण मागे आहोत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पावसाच्या साहाय्याने बरेच काही साध्य करता आले असते.
आपण जूनपासूनच कृत्रिम पावसाच्या मागे लागायला हवे होते. नव्हे दरवर्षी त्याची तयारी करायला हवी,ाअणि कृत्रिम
पाऊस पाडण्याचा प्रयत्न करायला हवा. आताही शासनाने याकडे गंभीरपणे
पाहायला हवे. यात प्रगती साधून शेती हिरवीगार करता येईल.
पण आपण कधी मनावर घेणार? तंत्रज्ञानाचा वापर करून
कधी प्रगती साधणार? हा मोठा चिंताजनक सवाल आहे.
आता थोडे कृत्रिम पावसाविषयी! तो काय आहे? आणि तो कसा
पाडतात. कृत्रिम पाऊस म्हणजे काय?तर कृत्रिम पाऊस म्हणजे सोप्या शब्दांत
सांगायचे तर एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे ढगांची भौतिक अवस्था कृत्रिम पद्धतीने बदलून
त्यांना पावसायोग्य बनविणे होय. ढगांच्या रुपांतरणाच्या या प्रक्रियेला
क्लाऊड सीडिंग म्हटले जाते. आपण शाळेतच शिकलो आहे, ढग हे अतिसूक्ष्म जलकणांद्वारे बनलेले असतात. जे कमी
वजनामुळे पृथ्वीवर जलधारा बरसण्यायोग्य नसतात. विशिष्ट स्थितीत
हे कण संघटित होतात आणि त्यांच्यात आवश्यक ते वजन येते तेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे
हे कण पावसाच्या रुपात पृथ्वीवर पडू लागतात. ढगांच्या एखाद्या
लहान तुकड्यामध्येही सुमारे 750 क्युबिक किमी पाणी धारण केलेले
असू शकते. कृत्रिम पावसाच्या तीन पायर्या कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होते.
पहिल्या टप्प्यात रसायनांच्या साहाय्याने त्या भागात वायूला वरच्या भागात
पाठविले जाते. याद्वारे तो वायु पावसाच्या ढगांमध्ये रुपांतरीत
होतो. या प्रक्रियेत कॅल्शियम ऑक्साईड, मीठ आणि युरियाचे संयुग तसेच अमोनियम नायट्रेटचा वापर केला जातो. हे संयुग हवेतून बाष्प शोषून घेते आणि जलकणांच्या संघटनाची प्रक्रिया सुरू
करते. दुसर्या टप्प्यामध्ये मीठ,
युरीया, अमोनियम नायट्रेट, कार्बन डाय ऑक्साईडचा बर्फ आणि कॅल्शियम क्लोराईड यांद्वारे ढगांचे द्रवमान
वाढवले जाते. तिसर्या टप्पा यामध्ये सिल्वर
आयोडाईड आणि कार्बन डाय ऑक्साइडच्या बर्फाचा ढगांवर मारा केला जातो. त्यामुळे जलकण संघटित होऊन पावसाच्या रूपात जमिनीवर पडू लागतात. विमानांच्या मदतीने पाऊस पहिल्या दोन टप्प्यांमध्ये पावसायोग्य ढगांची आवश्यकता
असते. हा प्रयोग खर्चिक आणि वेळखाऊ असतो. मात्र आकाशात ढग असतील तर थेट तिसरी पायरी वापरून पाऊस पाडला जाऊ शकतो.
ज्या भागात पाऊस पाडायचा आहे त्या भागातील ढग रडारवर दिसू लागल्यानंतर
विमानांना सीडिंगसाठी पाठवले जाते. याद्वारे ढगांना हवेमुळे पुढे
जाण्यापासून रोखले जाते.
आता आपण कृत्रिम पावसाचा इतिहास
पाहू. तर क्लाऊड सीडिंगचे पहिले प्रदर्शन जनरल इलेक्ट्रिक
लॅबद्वारे 1947 च्या फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आले
होते. आजघडीला संयुक्त अरब अमिरातीसह सुमारे 50 देशांत या प्रयोगाला यश मिळाले आहे. मात्र
1947 पासून आजपर्यंत या तंत्रज्ञानात फार मोठा बदल करण्यात आलेला नाही.
अर्थात, संशोधकांकडे चांगल्या दर्जाचे रडार आणि
संगणकासारखी उपकरणे आल्यामुळे याचा खर्च कमी होण्याबरोबरच प्रयोग यशस्वी होण्याच्या
शक्यता वाढल्या आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगांमध्ये चीन सर्वांत
आघाडीवर आहे. चीनच्या तब्बल 90 टक्के भागात
कृत्रिम पाऊस पाडला जातो. अमेरिका, ऑस्ट्रेलिया,
इस्त्राइल, रशिया, दक्षिण
अफ्रिका आणि चीनसारख्या देशांनी यात वर्चस्व प्राप्त केले आहे. यासाठी आवश्यक गोष्टी निर्माण केल्या आहेत.
वार्याद्वारे क्लाऊड सीडिंग करण्यासाठी बर्याचदा विमानाची मदत घेतली जाते. विमानात सिल्व्हर आयोडाईडचे
दोन जनरेटर लावलेले असतात. यात सिल्व्हर आयोडाईडचे मिश्रण उच्च
दाबाने भरलेले असते. पाऊस पाडायच्या भागात विमान हवेच्या विरुद्ध
दिशेने चालविले जाते. योग्य ढग दिसताच हे जनरेटर चालू केले जातात.
हवामानानुसार क्लाऊड सीडिंगचे अधिकारी उड्डाणाचा निर्णय घेतात.
कोरडा बर्फ (कार्बन डाय ऑक्साईडचे घनरूप)
शून्य तापमानापर्यंत थंड केला जातो. यामुळे हवेमध्ये
असणारे बाष्पकणांचे रूपांतर बर्फात होते. यासाठी बलून अथवा रॉकेटचाही
वापर केला जातो. कृत्रिम पावसाची आव्हाने क्लाऊड सीडिंगच्या प्रत्येक
पायरीमध्ये यशासाठी अचूकता, अभ्यासपूर्णता आणि अनुभव आवश्यक असतो.
एखादी छोटी चूकही सर्व मेहनतीवर पाणी फिरवू शकते. 2009 साली मुंबई महापालिकेला कृत्रिम पावसाचा प्रयोग असफल झाल्याने 48 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकारात कोणते रसायन
आणि त्याचे किती प्रमाण वापरावे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कृत्रिम पावसासाठी हवामान योग्य आहे की नाही, जिथे पाऊस
पाडायचा आहे तिथली स्थिती काय आहे, ढगांचा प्रकार, हवेचा वेग, आणि दिशा काय आहे, जिथे
रसायन पसरवायचे आहे तिथले वातावरण कसे आहे, रडारचा वापर करून
हवामानाची स्थिती, ढग बनण्याची प्रक्रिया, पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असणार्या घटकांच्या हालचालींवर
लक्ष ठेवावे लागते.
हवामानाच्या लहरीपणामुळे दुष्काळासारखे
प्रश्न गंभीर बनत आहेत. त्यामुळे
याबाबत संशोधन करण्याची गरज आहे. आणि सतत प्रयत्न केल्यावरच याबाबतीत
आपण एका यशस्वी टप्प्यावर येणार आहोत. त्यामुळे कृत्रिम पावसाचे
प्रयत्न सातत्याने सुरू राहिले पाहिजेत. त्यावर संशोधन सुरू राहिले
पाहिजे. प्रयत्न केला की, यश हे मिळतेच
त्यामुळे कृत्रिम पावसाच्या मागे संपूर्ण देशाने आणि राज्यांनी लागायला हवे आहे.
यात अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याने संशोधकांनी
त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी शास्त्रज्ञांची
फौजुेखील कामाला लावली पाहिजे. मग त्यांना यात लवकरच यश मिळून
देशातील दुष्काळाचा धोका टाळता येऊ शकतो. नैसर्गिक पावसावर अवलंबून
राहण्यापेक्षा देशात सिंचन सुविधांवर भर देण्याबरोबरच कृत्रिम पावसाचा प्रयोग अवलंबण्याची
गरज आहे.
No comments:
Post a Comment