Saturday, July 1, 2017

कमी क्षेत्रात फायद्याची 'गुलछडी' फुलशेती

     कष्ट आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणत्याही गोष्टीवर मात करता येते.शेती क्षेत्रात तर याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच तुळजापूर (जि.उस्मानाबाद) तालुक्यातल्या खडकी गावच्या अंकुश जवान नावाच्या शेतकर्‍याने अवघ्या 20 गुंठ्यात तीन महिन्याच्या मेहनतीवर गुलछडी फुलाचे लाखाचे उत्पादन घेतले. आता त्याने फुलशेतीच करण्याचे ठरवले आहे. गुलछडी ही फुलशेती अंकुश जवानबरोबरच आणखीही काही शेतकर्‍यांच्या कुटुंबांच्या जगण्याचा आधार बनू पाहात आहे.

     वास्तविक खडकी गाव परिसरातील जमीन चुनखड व खडकाळ आहे. गावाच्या शिवारात पाण्याचे साठवण तलाव किंवा नदी असे पाण्याचे स्त्रोत अजिबात नाहीत. पाऊस हाच त्यांचा आधार. मात्र पावसाच्या माध्यमातून विहिरींचा पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीकोनातून विविध प्रयोग इथल्या शेतकर्‍यांनी केले. परिणाम विहिरींचा पाणीसाठा वाढला आणि त्याच्या जीवावर गुलछडी फुलशेती यशस्वी करून दाखवली.अंकुशसह गावातल्या नेताजी जाधव, शिवाजी जाधव, परमेश्‍वर शिंदे,विलास साळुंखे, अनिल जाधव, तुकाराम मन्सावले आणि शाहू शिंदे या शेतकर्‍यांनी गुलछडीची शेती केली आहे. या शेतकर्‍यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे आणि पाण्याचे नियोजन पाहून 5 ते 20 गुंठ्यांपर्यंत डिसेंबर 16 मध्ये सरी पद्धतीने गुलछडी रोपांची लागवड केली. तीन महिन्यानंतर त्या रोपांना फलधारणास सुरुवात झाली.
     अंकुश जवानने केलेल्या 20 गुंठे क्षेत्रावरच्या लागवडीवर त्याला यातून रोज 70 ते 80 किलो फुलांचे उत्पादन मिळते. यातून त्याला सगळा खर्च वजा जाता 1 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले.बाकीच्या शेतकर्‍यांना त्यांच्या रोपांच्या लागवडीनुसार 5 ते 30 किलोचे उत्पादन मिळते.लग्नाच्या सिझनमध्ये फुलांना किलोला रोज 100 रुपयांचा भाव मिळाला. सध्या लग्न हंगाम नसला तरी 20 ते 40 रुपये किलो भाव मिळत आहे. सोलापूर खडकीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. इथल्या फुल बाजारात ही फुले विक्रीसाठी जातात. बाजारपेठ जवळ असल्याने प्रवास खर्च कमी होतोय.
     प्रवास खर्चाबरोबरच घरची माणसे फुले वेचायला असल्याने मजुरीचे पैसेही वाचले. खरे तर मजूर मिळणे ही एक मोठी समस्या बनून बसली आहे. यावर अंकुश जवान यांनी घरचीच माणसे फुले वेचायच्या कामाला लावून बचत केली. फुले तोडणीचे काम पत्नी,मुलगा,मुलगी आणि स्वत: केले. पहाटे पाचपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत फुले तोडली जातात. ती दोन वाजेपर्यंत सोलापूर बाजारात नेली जातात. दोन नंतर फुलांचा लिलाव होतो. अशा प्रकारे कष्ट आणि पाण्याचे नियोजन झाल्यास फुलशेती परवडते. अगदी कमी क्षेत्रातदेखील फुलांचे चांगले उत्पादन घेऊन पैसा मिळवता येतो. ही फुलशेती इतरांसाठी मार्गदर्शकच आहे.


No comments:

Post a Comment