येत्या 17 जुलैला देशातील सर्वोच्च पदाची
म्हणजे राष्त्रपती पदाची निवडणूक होत आहे. यासाठी भाजप आणि मित्रपक्षाकडून
रामनाथ कोविंद तर काँग्रेस आघाडीकडून मीराकुमार निवडणूक मैदानात आहेत. मीराकुमार यांना बळीचा बकरा बनवला गेल्याची टीका होत असताना आपल्याकडे पुरेसे
संख्याबळ नाही म्हणून निवडणूक लढवायची नाही का, असा थेट सवाल
मीराकुमार यांनी केला आहे. गेल्या दोन राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभा
पाटील, प्रणव मुखर्जी यांच्या बाजूने अनुक्रमे 65.8 व 69.3 टक्के मते पडली होती. तरीही
तेव्हा विरोधात असलेल्या आताच्या सत्ताधार्यांनी अनुक्रमे भैरोसिंह
शेखावत आणि पी. ए. संगमा यांना उमेदवारी
देऊन निवडणूक अपरिहार्य केली होती. यापूर्वीही शेखावत,
संगमा यांचे वेगळे काय झाले, असे विचारले जाऊ शकते.
विरोधकांनी कोविंद यांचा विजय गृहीत धरलाच असून, ही प्रतिकात्मक, वैचारिक लढाई असल्याचे म्हटले आहे.
या अगोदरही अशाच पद्धतीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत.
देशातल्या राष्ट्रपतीपदाच्या इतिहासात फक्त एकदाच निवडणूक बिनविरोध झाली
आहे. नाही तर निवडणुका या अटळ ठरल्या आहेत.
दलित उमेदवार या अगोदरही देण्यात आला
आहे. मात्र आता सारखी त्यावेळी परिस्थिती नव्हती. त्यावेळी राजकीय अजेंडा करण्यात आला नव्हता. पहिले दलित
राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या विरोधात
टी. एन. शेषन यांनी निवडणूक लढविलीच होती.
त्यामुळे ‘कोविंद यांच्या उमेदवारीला विरोध म्हणजे
सर्व दलितांना विरोध’ ही केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी
केलेली टीका हस्यास्पद म्हणावी लागेल.
डॉ. नीलम संजीव रेड्डी यांचीच फक्त सन 1977 मध्ये बिनविरोध
निवड झाली होती. तीसुद्धा सहमतीने नव्हे; तर तांत्रिक कारणामुळे या निवडणुकीसाठी एकूण 37 उमेदवारांनी
अर्ज दाखल केले होते. त्यातील 36 अर्ज निवडणूक
निर्णय अधिकार्यांनी अवैध ठरविल्यामुळेच ही निवड बिनविरोध होऊ
शकली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत
(आताची निवडणूक धरून) राष्ट्रपतिपदासाठी पंधरा
निवडणुका झाल्या. त्यातील केवळ एक बिनविरोध निवड झाली तर सात
वेळा सरळ लढती झाल्या. देशाच्या या सर्वोच्च पदासाठी सातवेळा
चक्क बहुरंगी सामने झाले आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे
1977 मध्ये 37 उमेदवारांनी अर्ज केले होते तर
1969 मध्ये तब्बल 17 तर 1966 मध्ये 15 उमेदवार रिंगणात होते. डॉ. राजेंद्रप्रसाद हे दोनदा राष्ट्रपती होणारे पहिले
नेते. सन 1952 व 1957 या दोन निवडणुका ते जिंकले. सन 1952 च्या निवडणुकीत त्यांना 83.8 टक्के मते पडली होती तर
त्यांचे प्रतिस्पर्धी के. टी. शहा यांना
15.3 टक्के मते मिळाली.
देशाचा चौदावा राष्ट्रपती निवडण्यासाठी
सत्ताधारी आघाडी व विरोधी आघाडी यांच्यात सहमती न झाल्यामुळे मतदान होणार आहे. आजवरचा इतिहास पाहिला तर डॉ. नीलम संजीव रेड्डी यांचा अपवाद वगळला तर सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागले
आहे. सर्वाधिक 98 व 99 टक्के मतदार पाठीशी असलल्या डॉ. राजेंद्रप्रसाद व डॉ.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचीही निवड बिनविरोध झाली नव्हती.
1957 मध्ये मात्र 99 टक्के मते मिळवून राजेंद्रप्रसाद
यांनी एक विक्रम नोंदविला. तो अजून अबाधित आहे. यावेळी नागेंद्र नारायण यांना अवघी 0.4 टक्के मते मिळाली
होती. हा एक निचांकच असावा. सन
1962 मध्ये 98.2 टक्के मते घेत प्रकांड पंडित डॉ.
सर्वपल्ली राधाकृष्णन निवडून आले होते. विरोधी
उमेदवार चौधरी हरिराम यांना फक्त 1.1 टक्के मते मिळू शकली.
तर 56.2 मते घेत 1967 मध्ये
डॉ. झाकिर हुसेन राष्ट्रपती झाले. विरोधी
उमेदवार कोटा सुब्बाराव यांना 43.4 टक्के मते मिळाली होती.
डॉ. हुसेन हे देशाचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती
होत. दुर्दैवाने त्यांचे पदावर असतानाच निधन झाले. व्ही. व्ही. गिरी व नीलम संजीव
रेड्डी यांच्यात झालेली निवडणूक खूप गाजली. अधिकृत काँग्रेस उमेदवार
रेड्डी यांच्याविरोधात इंदिरा गांधी यांनी गिरी यांना उमेदवारी देऊन सद्सद्विवेकबुद्धीला
स्मरून मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी या दोघांव्यतिरिक्त
13 उमेदवार रिंगणात होते. पण 48 टक्के मते घेत गिरी राष्ट्रपती झाले. रेड्डी यांना
37.5 टक्के मते मिळाली. सर्वात कमी 48 टक्के मते घेऊन राष्ट्रपती झालेले गिरी हे एकमेव राष्ट्रपती असावेत.
किमान 80.2 मते घेत 1974 मध्ये फक्रुद्दीन अली अहमद राष्ट्रपतिपदावर विराजमान झाले. ते देशाचे दुसरे मुस्लीम राष्ट्रपती. त्यांच्या विरोधात
उभ्या राहिलेल्या त्रिदिब चौधरींना 19.8 टक्के मते मिळाली होती.
अहमद यांच्या कारकिर्दीतच आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यांचे पदावर असतानाच निधन झाले. सन 1969 मध्ये पराभूत झालेले नीलम संजीव रेड्डी जनता पक्ष सरकारच्या राजवटीत बिनविरोध
राष्ट्रपती झाले. सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन
ब्ल्यू स्टार’ नंतर दुखावलेल्या शीख समाजाला सुखावण्यासाठी इंदिरा
गांधी यांनी 82 मध्ये ग्यानी झैलसिंग यांना राष्ट्रपतिपदासाठी
उमेदवारी दिली. एच. आर. खन्ना यांचा पराभव करून ते विजयीही झाले. झैलसिंग यांना
72.7 तर खन्ना यांना 27.3 टक्के मते पडली.
1987 च्या निवडणुकीत आर. वेंकटरमण 72.3 टक्के मते घेत राष्ट्रपती झाले.
त्यांचे प्रतिस्पर्धी न्या. व्ही. कृष्णा अय्यर 27.5 टक्के मते मिळाली होती. डॉ. शंकर दयाळ शर्मा 1992 च्या
निवडणुकीत राष्ट्रपती झाले. त्यांना पडलेली मते होती
65.9 टक्के. जी. जी.
स्वेल त्यांचे विरोधी उमेदवार होते. त्यांना
33.8 टक्के मिळवता आली. 1997 मध्ये देशाला के.
आर. नारायणन यांच्या रूपाने पहिला दलित राष्ट्रपती
मिळाला. त्यावेळी 95 टक्के मते घेत ते विजयी
झाले. त्यांचे विरोधी उमेदवार टी. एन.
शेषन अवघी 5 टक्के मते घेऊ शकले. सन 2002 च्या निवडणुकीत डॉ. ए.
पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती
झाले. एकूण 89.6 टक्के मतांच्या आधारे त्यांनी
कॅप्टन लक्ष्मी सहगल (10.4 टक्के) यांचा
पराभव केला. पुढील 2007 मधील निवडणुकीत
देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती लाभल्या. प्रतिभा पाटील
(यूपीए) यांनी भैरोसिंह शेखावत (एनडीए) यांचा पराभव करून हा मान मिळविला. पाटील यांनी 65.8 टक्के मते घेतली तर शेखावत यांना
34.2 टक्के मते पडली.
17 जुलै रोजी होणार्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्ष यांच्याकडून उमेदवारी देण्यात आलेले रामनाथ
कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेकांनी कोविंद यांच्या उमेदवारीला
पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोविंद यांना 62 टक्के मते पडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे,तर काँग्रेस
आघाडीकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या मीराकुमार यांना 34 टक्के मते पडावीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment