अलिकडे हवामान खात्याकडून शेतकर्यांसह
सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. हवामान अंदाज अचूक यावा, ही अपेक्षा तशी रास्तच आहे. मात्र हवामान खात्याकडून जो अंदाज दिला जातो,
त्याविषयी थोडे आकलन होण्याची आवश्यकता आहे. लोकांना या अंदाजाबद्दल
समज आणि थोडे स्पष्टीकरण देणेसुद्धा गरजेचे आहे. याचा अर्थ हवामान अंदाजाबाबत
जागृती वाढवणे आवश्यक आहे. म्हणजे अंदाजावर सारासार विचार करून शेतकरी वर्ग
शेतीविषयी निर्णय घेतील. मात्र अंदाज अचूक येण्याच्यादृष्टीने राज्यासह देशभरातील
निरीक्षण केंद्रे आणि रडार यांची संख्या वाढवण्याचीही गरज आहे. त्याशिवाय अंदाज
अचूकतेकडे जाणार नाही.

जून महिन्यात वेळेवर पाऊस
झाल्याने पेरण्या चांगल्या झाल्या. विदर्भ सोडला तर सर्वत्र पाऊस झाला. जूनच्या
शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊसमान कमी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. कृषी हवामान खात्याच्या
साहाय्याने दर आठवड्याला अंदाज जिल्हावार व स्थानिक भाषेत दिला जातो. त्यात
पिकांपासून जनावरांच्या व्यवस्थापनापर्यंतची माहिती असते. मात्र ती हवामान तज्ज्ञांनुसार
देशभरातील केवळ 33 लाख शेतकर्यांपर्यंतच पोहचते. हवामान
खात्याच्या वेबसाईटवर शेतकर्यांना त्यांची नोंद करता येते. पण ते अजूनही फारसे
त्यांच्यापर्यंत पोहचले नाही. हवामान खाते आणि शेतकरी यांच्यातील अंतर कमी
करण्याची आवश्यकता आहे. एकाच जिल्ह्यात अतिपावसाचा व कमी पावसाचा प्रदेश असतो.
त्यामुळे अनेकदा या अंदाजाचा पुरेसा उपयोग होत नाही. शेतकर्यांसाठी तालुका
पातळीवर अंदाज कसा देता येईल, गावपातळीवर कशी माहिती मिळेल,
ही लोकांची अपेक्षा आहे. सध्या तरी हवामान विभागाला असा अंदाज
देण्यासाठी मर्यादा आहेत. ते जिल्हा पातळीपर्यंत अंदाज देऊ शकतात.
गावपातळी व तालुका
पातळीपर्यंतचा अंदाज देण्यासाठी नव्याने काही यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.
किमान प्रत्येक 100 ते 150
किलोमीटरवर रडार उभारण्याची गरज आहे. शिवाय तालुका पातळीवर जास्तीत जास्त
स्वयंचलित निरीक्षक केंद्रे उभारावी लागतील.या केंद्रांमधून जो डेटा मिळेल,
त्यानंतरच हवामान खाते अधिक अचूक आणि शेतकर्यांना हवा तसा अचूक
अंदाज व्यक्त करू शकेल. वास्तविक निसर्गाचे सर्वच चक्र अजून मानवाला समजलेले नाही.
परदेशातदेखील हवामान खात्यांचे अंदाज अनेकदा चुकत असतात. हवामान तज्ज्ञांच्यामतानुसार
जेव्हा कमीदाबाचे क्षेत्र नसते, तेव्हा ढगांची निर्मिती
कोठेही होऊ शकते आणि तुरळक ठिकाणी पाऊसही पडू शकतो. जेव्हा मान्सून वीक असतो,
तेव्हा अंदाज चुकतो. आपल्याकडे शास्त्रज्ञांची कमतरता नाही. जगाच्या
बरोबरीने आपले शास्त्रज्ञ काम करत आहेत. त्यांच्या तोडीला तोड आपले शास्त्रज्ञ
आहेत. मात्र आपल्याला कमतरता भासते आहे ती साधनांची! ही साधने जितकी गाव केंद्रीत
होतील,तितकी आपले शास्त्रज्ञ ती गावपातळीपर्यंतचे अचूक
हवामान अंदाज देतील. मात्र हवामान यंत्रणेमुळे बराच फायदा होत आला आहे. कारण
पूर्वी चक्रीवादळात लाखो माणसांचा मृत्यू होत असे. आता पूर्व किनार्यावर रडारची
मालिका बसवल्यामुळे चक्री वादळाचा अंदाज मिळतो व त्यामुळे लाखो लोकांचे प्राण आणि
आर्थिक हानी यापासून सुटका मिळत आहे. केंद्र सरकारने शेतकर्यांच्या जीवनाकडे लक्ष
देतानाच हवामान अंदाज कसा अचूक येईल,यासाठी ज्या साधनांची
जिथे जिथे गरज आहे, तिथे तिथे ती बसवण्यासाठी तत्परतेने पाऊल
उचलण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment