आज सकाळीच साप गारुड्याची एक महिला
एक टोपली घेऊन दारात आली. त्यात साप होता. नागाला दूध पाजा माय,पुण्य लागंल. असं काही बाही म्हणत दारात थांबली.तिच्या टोपलीतला साप
अगदी मरणाला टेकला होता. आता ती दोन-तीन
दिवस आपल्या टोपलीत ठेवून घरोघरी फिरणार होती आणि सापाला दूध, पैसे आणि स्वत:ला लुगडं,पातळ म्हणजे
साडी मागत फिरणार होती. साप काही दूध पिणार नव्हता.पण ते दूध तिच्या संसाराला उपयोगाला येणार होतं.सापाच्या
जिवावर तिचे तीन-चार दिवस घर चालणार होते. अलिकडेच जागतिक सर्पदिवस साजरा झाला. मात्र तो कुणी साजरा
केल्याचं ऐकलं नाही की वाचलं नाही. आता नागपंचमी आली आहे.
यादिवशी आपण त्याची पूजा करतो.त्याला दूध पाजतो.
इतर वेळी दिसला की,मात्र त्याला मारायला बघतो.
वास्तविक साप आपल्या शेतकर्याचा मित्र आहे.
त्याच्यामुळे निसर्ग संतुलन राहण्यास मदत होते. त्याला वाचवण्याची गरज आहे. घरात-दारात अथवा अन्य कुठला दिसला तर त्याला मारू नका. त्याला
जिवंत पकडून लांब रानात सोडत चला.खरे आपल्या देशात साप वाचवण्याची
मोहीम राबवण्याची गरज आहे.
आपण नागपंचमी सोडली
तर साप दिसला की, त्याला ठेचायचे,हा एकमेव एककलमी कार्यक्रम करतो.
आपण तो कोणत्या जातीचा,विषारी की बिनविषारी असला
विचारच करत नाही. त्याला यमसदनाला पाठवण्यासाठी सज्ज होतो.जतसारख्या ठिकाणी साप-गारुडी समाज आहे. शहरातले काही सुशिक्षित लोक साप दिसला की त्यांना बोलावून घेतात. ही मंडळी साप पकडून राना-वनात सोडतात. सर्पमित्रदेखील हेच काम करतात. सापाविषयी कळवळा असलेली
किंवा जागरूक माणसे याबाबत दक्ष असतात. मात्र सगळीकडेच असे होत
नाही. त्यामुळे सर्पाविषयी मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज
आहे. तो वाचला पाहिजे, यासाठी सर्व स्तरातून
प्रयत्न झाले पाहिजेत.
नाग आणि सर्पांविषयी
आपल्याकडे अनेक दंतकथा आहेत. ठिकठिकाणी नागाची मंदिरे आहेत. दरवर्षी नागपंचमीला त्याची
पूजा केली जाते. यादिवशी अगदी भक्तीभावाने महिला भाऊराया म्हणून
त्याची पूजा करतात. त्याला हळद-कुंकू वाहतात.दूध पाजतात. पण याच गोष्टी त्याच्यासाठी जीवघेण्या ठरतात.
कारण आजकाल हळद-कुंकू तयार करताना त्यात केमिकलचा
वापर करतात. त्याचा त्रास नागाला किंवा सापाला होतो. मानवी शरीरालादेखेल मोठे घातक आहे. हळद-कुंकू लावलेल्या ठिकाणी खाज सुटणे, जखम होणे असे प्रकार
आपण ऐकले आहेत,पाहिले आहेत. त्यामुळे सापाच्या
नाका-तोंडात हळद-कुंकू गेल्यास त्याला ते
बाधते. नाग दूध पित असला तरी त्याला ते पचत नाही.त्याच्या शरीरात ऊधाच्या गाठी होतात आणि तो पंधरा दिवसात मृत्यू पावतो,
असे आपले सर्पमित्र सांगतात.
सांगली जिल्ह्यातल्या
बत्तीस शिराळ्यात जिवंत सापांचा खेळ खेळला जातो. मात्र अलिकडे न्यायालयाने या खेळाला आणि जिंवत नागाची पूजा करण्यास
बंदी घातली आहे. सध्या यावर बरीच चर्चा आहे. पण प्रशासन आपल्या मतावर ठाम असल्याने बत्तीस शिराळ्याला नागपंचमीला होणारी
गर्दी कमी होऊ लागली आहे. नाही तर यादिवशी सापाचा खेळ आणि त्याची
पूजा करायला शिराळ्यात प्रचंड गर्दी असायची.पण काही मंडळे असा
खेळ करण्यासाठी पंचमीच्या अगोदर पंधरा दिवस साप पकडण्याची मोहिम सुरू करतात.
त्यामुळे सापांचे हाल थांबलेले नाहीत.
जगभरात जवळपास 3 हजार 400 च्यावर सापाच्या विविध जाती आहेत. आपल्या भारतातदेखील
300 ते 400 सापाच्या जाती आढळतात. मात्र यातले फारच थोडे साप विषारी असतात अन्य बाकी साप सगळे बिनविषारी असतात.
परंतु, आपल्यातील माणसे पुढचा-मागचा विचार न करतातच. त्याला दिसताच ठेचून टाकतात.साप चावला तर अघोरी उपचार करून घेतो किंवा दवाखाना गाठतो. बिनविषारी साप असला तर त्याचा फारसा त्रास होत नाही.मात्र
विषप्रतिबंधक लस टोचण्याचा डॉक्टरांना आग्रह करतो. परंतु,
चावा घेतलेला साप बिनविषारी असेल अ प्रतिबंधक लसीचा आपल्या शरिराला धोका
निर्माण होतो. त्याची रिअॅक्शन होऊन त्याचा
त्रास व्हायला लागतो. दंश करणारा साप बिनविषारी असेल तर त्याच्या
चाव्याने शरिरावर रक्त बाहेर येते. मात्र तो साप विषारी असल्यास
शरीरावर दोन काळे टिपके दिसू लागतात. तो भाग सुजू लागतो.
त्यामुळे तात्काळ उपचार घ्यावेत. आज नागपंचमी आहे.
त्याची पूजा करा. मात्र त्याला वर्षभरात कधी दिसला
तर मारायला जाऊ नका. त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करा.
समज-गैरसनज दूर करून सापांविषयी वस्तुनिष्ठ माहिती
समजून घ्या आणि त्याला वाचण्यासाठी प्रयत्न करीत राहा. त्याची
राखण केल्यासच खर्या अर्थाने त्याची पूजा केल्यासारखे होईल.
पर्यावरण वाचवायचे असेल तर साप वाचला पाहिजे. प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याने
आपण सापाला मारणार नाही, अशी शपथ या नागपंचमीच्या निमित्ताने
घ्या.
No comments:
Post a Comment