सध्याच्या धावत्या
युगात कोणत्या पिकातून चांगला नफा मिळेल याचा अभ्यास करून आधुनिक शेती केल्यास चांगले
उत्पन्न मिळू शकते. हाच कित्ता गिरवत आणि त्याला मेहनतीची जोड देत चिंचवाड (ता.शिरोळ जि.कोल्हापूर)
येथील अभय चौगुले या तरुणाने एका एकरात झेंडूची शेती केली आणि फक्त चार
महिन्यात तब्बल अडीच लाखाचा नफा कमावला. आता याच तरुणाने एका
एकरात शेवंतीचीही लागवड केली आहे.यातही चांगला लाभ होईल,
असा त्याला विश्वास आहे.
एका एकरात तब्बल
सोळा टन झेंडू फुलाचे उत्पादन घेऊन तरुण शेतकर्यांसाठी आदर्श निर्माण करणार्या अभयचे उदगावमध्ये
वर्कशॉप आहे. मंदीमुळे वर्कशॉप चालवताना अडचणी आल्याने त्याने
आपला मोर्चा शेतीकडे वळवला.अभयच्या कुटुंबाची वडिलोपार्जित सात एकर बागायती शेती
आहे. वडील सुरेश आणि बंधू रमेश यांच्या मदतीने शेतात ऊस,टोमॅटो या पिकांसह भाजीपाला घेतला जातो. अभयने फेब्रुवारी
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोलकाता भगवा या जातीच्या झेंडूची 7 हजार 500 रोपांची लावणी केली.
सुरुवातीला शेतात
शेणखत टाकून उभी आणि आडवी नांगरणी केली. नंतर चार फूट अंतराच्या सर्या सोडल्या आणि
झेंडूच्या पिकासाठी जमीन तयार केले. साधारण दीड फूट अंतराने झेंडूच्या
रोपांची लावण केली. रोपे लावणीनंतर आठवड्याने आळवणी केली.पाटपाणी असल्याने प्रत्येक तीन दिवसांनी झाडांची वाढ चांगली व्हावी,
यासाठी दीड महिना हातानेच लागवड आणि औषधांची आळवणी केली. रोपांची लागवड टोकण पद्धतीने करण्यात आली होती. अभय सांगतो
की, झाडाची भरणी करताना रासायनिक खते वापरल्याने झाडांची वाढ
जोमात झाली. यामुळे झाडे जमिनीवर पडू लागली. त्यासाठी तार व काठीच्या साहाय्याने झाडे बांधून घेतली. प्रारंभीला म्हणजे सुरुवातीच्या 30 दिवसांपर्यंत आलेल्या
कळ्या तोडून टाकल्या. मग सुमारे 45 दिवसानंतर
फुलांची पहिली तोडणी केली. अर्थात झेंडूच्या झाडांची वाढ चांगली
व्हावी आणि रोगाचा प्रादुर्भाव व फुले आकर्षक तसेच मोठी व्हावीत, यासाठी वेळावेळी औषधांची फवारणी करत राहिलो.
झेंडू फुलाच्या
पहिल्या तोडणीत तीन कॅरेट फुले मिळाली. एका कॅरेटमध्ये 12 किलो फुले भरतात.
चार महिन्यात एकूण एक हजार 330 कॅरेटचे विक्रमी
उत्पादन घेतले. म्हणजे जवळजवळ 16 टन झेंडू
फुलांचे उत्पादन मिळाले. या कालावधीत अभयला 10 ते 70 रुपये प्रतीकिलो दराने फुलांची विक्री झाली.
शेवटच्या दोन महिन्यात मात्र दर कमी आला. मात्र
तरीही 17 तोडण्यात एक एकरासाठी 4 लाख
42 हजार रुपये उत्पन्न चार महिन्यात मिळाले.2 लाख
2 हजार रुपये खर्च जाता निव्वळ 2 लाख
40 हजाराचा नफा झाला. खर्चाचा हिशोब सांगताना अभय
म्हणाला की, रोपांसाठी दहा हजार खर्च आला. तारकाठीसाठी 12 हजार तर खते आणि औषधे यांच्यासाठी साधारण
30 हजार खर्च आला. आणि मजुरांच्या मजुरीचा खर्च
80 हजार रुपये आला. आता नफेचा हाच दृष्टीकोन ठेवून
अभयने शेवंतीच्या फुल झाडांचीही लागवड केली आहे. यातही चांगला
नफा मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
नोकरीच्या मागे न लागता आपल्या शेतात कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास निश्चितच फायदा होतो, हा आदर्श अभय सुरेश चौगुले याने इतर
शेतकर्यांपुढे घालून दिला आहे.
No comments:
Post a Comment