गेल्या महिन्यात दहावी-बारावी या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यातील
परीक्षांचे निकाल लागले. यात खरे तर मुलींनीच अधिक बाजी मारली.
पण मुलेही काही मागे नव्हते. त्यांनाही चांगले
गुण मिळाले. अभ्यास न केलेल्या मुलांची मात्र दांडी उडाली.
खरे तर आता दहावी-बारावीची परीक्षा पास होणं अवघड
नाही. कारण या परीक्षांमध्ये मुलांना चांगले गुण मिळत आहेत.
अगदी शंभराहून अधिक मुलांना दहावीच्या परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी गुण
मिळाले. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञ टीका करत आहेत. या गुणांना किंमत राहिली नाही. हा गुणांचा फुगवटा आहे.प्रत्यक्षात मुले आणि त्यांची गुणवत्ता मागे आहे, अशी
टीका होत आहे. मित्रानों, आपण त्याकडे दुर्लक्ष
करत मेहनत केली पाहिजे. जास्तीत जास्त गुण मिळण्याच्यादृष्टीने
अभ्यास केला पाहिजे. मनासारखे यश मिळवण्यासाठी जिद्द,मेहनत महत्त्वाची आहे.त्यासाठी काही गोष्टींची काळजी
घ्यावी लागणार आहे. नियोजन करावे लागणार आहे.यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत,ते समजून घेतले पाहिजेत.
ध्येयाची स्पष्टता-सगळ्यात महत्त्वाचे महणजे आपण ध्येय निश्चित केले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही क्षेत्रात
हमखास यश संपादन करायचे असेल तर तुमच्या डोळ्यासमोर सतत तुमचे ध्येय स्पष्ट व निश्चित असले पाहिजे. आपल्याला परीक्षेमध्ये किती गुण मिळवायचे
आहेत त्याचा आराखडा आधीच तयार असला पाहिजे. परीक्षेत यश का प्राप्त
करायचे आहे, हे जर आधीच स्पष्ट असेल तर यश मिळविणे आणखी सोपे
होते. यशाचा पुढील जीवनाशी काय संबंध आहे, याची जाणीव असणे आवश्यक असते. परीक्षेतील हे यश जीवनाच्या
दूरगामी उद्दिष्टपूर्तीसाठी ते कसे आवश्यक आहे, हे जेवढे लवकर
आणि नीट समजेल तेवढे यश मिळवण्यासाठी प्रयत्न सातत्यपूर्ण, नेटाने
होऊ शकते. म्हणून तुमचे ध्येय नेहमी डोळ्यासमोर असावे.
ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न- एकदा का ध्येय निश्चित
झाले की, आपण त्यानुसार वाटचाल करायला मोकळे होतो. आत्मविश्वास बाळगल्यास पुढच्या गोष्टी सुकर होतात.
ध्येय गाठण्यासाठी क्षमता तुमच्याकडे आहे हा आत्म विश्वास बाळगा. स्वतःबद्दल सकारात्मक प्रतिमा असणे अत्यंत
आवश्यक असते, त्यामुळे आत्मविश्वास बाळगा.
ध्येय प्राप्तीसाठी भरपूर मेहनत घ्यावी. कारण मेहनती
शिवाय कोणतेही यश मिळवता येत नाही. जर जगावेगळे यश पाहिजे असल्यास
प्रयत्न ही जगावेगळेच करावे लागतील, हे उघड आहे. मेहनतीला कधीही घाबरू नका. तुम्ही केलेल्या मेहनतीचे
फळ शंभर टक्के तुम्हाला यशप्राप्तीच्या रूपाने मिळणार आहे.
ध्येय कसे ठरवायचे - ध्येय ठरवताना कधीही कंजूषपणा करू नका. आपल्या क्षमता
आणि कुवतीप्रमाणे ध्येय ठरवा पण जे मिळवताना थोडा ताण पडेल स्वतःमधील सुप्त क्षमताचा
शोध घेऊन त्या उपयोगात आणता येतील. आपल्या क्षमतेचा विचार न करता,
अवास्तव ध्येय ठरवू नका. कारण अवास्तव ध्येयाच्या
ओझ्याखाली तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता आणि तणावाखाली यश मिळविणे अवघड असते.
महत्त्वाचे म्हणजे फार सोपे आणि सहजसाध्य असे उद्दिष्ट ठरवू नका.
जे मिळाल्याने विशेष आनंद वाटणार नाही. तुमचे उद्दिष्ट
थोडे आव्हानात्मक असले पाहिजे. उद्दिष्ट नेहमी मनात न ठेवता लिहून
ठेवा. कागदावर ठळक अक्षरात, रोज आपल्याला
आणि इतरांनी दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवा. कारण तुम्ही विसरलात
तरी इतरांनी तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे. अनेक वेळा आपली
इच्छाशक्ती अपुरी पडते आणि ठरविलेल्या सर्व गोष्टी आपण करतोच असे नाही. म्हणून दुसर्यांची मदत सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते.
एकाग्रता - ध्येय निश्चित झाले की, तुमचे
सर्व ध्यान सतत ध्येयाकडे असू द्या. इतर काही गोष्टी ज्या तुम्हाला
ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आडकाठी आणणार्या असतील त्या सर्व
बाबींपासून दूर राहा. महाभारतातील अर्जुनाचे उदाहरण माहिती असेल.
105 कौरव पांडवांमध्ये धनुर्विद्येमध्ये लक्ष्यवेध केवळ अर्जुनाला करता
येतो. कारण आपल्या लक्ष्याव्यतिरीक्त दुसरे काही दिसत नव्हते.
म्हणून अर्जुनासारखे एकाग्रचित्त बना. सर्व क्षणिक
सुख देणार्या गोष्टी कडे दुर्लक्ष करा. मग बघा यशो-देवता तुम्हाला प्रसन्न झालीच पाहिजे.
No comments:
Post a Comment