Wednesday, July 5, 2017

सेल्फीचा अतिरेक, आनंदावर विरजण

     सेल्फीचा मोह धोकादयक बनत चालला आहे. या सेल्फीच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. या बातम्या वाचून,पाहूनही लोक सेल्फी काढताना सावधगिरी बाळगत नाहीत, हेच मोठे दुर्दैव म्हटले पाहिजे. सेल्फी काढताना आपण केलेले धाडस शेअर करताना लोकांना आनंद मिळत असतो, ही वस्तूस्थिती आहे, मात्र याच धाडसाने जीव जातो,याचा विचार कोणी करत नाही. नको ते धाडस आणि नको तितके धाडस काही कामाचे नाही. पण काही काळजी घेतल्यास, सावधगिरी बाळगल्यास तुम्हाला हवा तो फोटो, हवी ती पोज काढता येते. याकडे दुर्लक्ष करू नका.

     फिरायला किंवा पिकनिकला गेल्यावर सेल्फी काढल्याशिवाय आपल्याला चैन पडतच नाही,ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या स्पॉटवर सेल्फी काढणे आणि तो लगेच फॉर्वर्ड करणे यात आपण काय करतो, याचेही भान आपल्याकडे नसते. सेल्फी स्टीक नसेल तरी चालेल, कोणतेही धाडस करून तो सेल्फी काढता आलाच पाहिजे, हा अट्टहास अलीकडच्या काळात वाढू लागला आहे. समुद्रकिनारी, डोंगराच्या कड्यावर, नदीकाठी, धरणाच्या बांधावर इतकेच नाही तर झाडांवर किंवा अगदी घराच्या गच्चीवर देखील उभे राहूनपोजदेत फोटो काढणे हे आपले पॅशन झाले आहे. सेल्फी काढणे कधीच वाईट नाही; पण तो कोणत्या कारणासाठी, कसा, केव्हा, का आणि कुठे अशाच्या बाराखडीत बसणार्या प्रश्नांमध्ये अडकलेला असेल तर तो नक्कीच आपल्याला धोकादायक ठरणार आहे.
     पावसाळा म्हटले आता वर्षा सहल तरुणाईला,लोकांना खुणावत आहे. धबधब्यांना आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. अशा गर्दीतही काहीतरी वेगळे धाडस करीत सेल्फी काढण्याचे प्रकार घडत असतात. डोंगराच्या कड्याच्या अगदी कड्यावर जाऊन एकमेकांच्या गळ्यात हात टाकून फोटो काढले जातात. या ग्रूपचे वैशिष्ट्य असते. एका ग्रूपने केले की लगेच दुसरा ग्रूप तसेच करतो, मग तिसरा... चौथा... पाचवा... अशी त्याची लागण सुरू होते. लाटेवर स्वार व्हावे, तशी ही गोष्ट एका मिनिटात पसरते आणि मग त्याच स्पॉटवर सेल्फी काढण्याची चढाओढच लागते. कड्यावर एकमेकांना धरून ओढताना काही दुर्घटना घडली तरी काय होणार, याचा विचारही त्यावेळी मनात येत नाही. फक्त सेल्फी काढायचाय एवढेच त्यावेळी त्या ग्रूपचे उद्दिष्ट असते. या गोष्टीला उद्दिष्ट तरी म्हणता येईल की नाही, ही पण शंकाच आहे. कारण उद्दिष्ट चांगलेच असावे, असे आपण म्हणतो; पण इथे तसे होत नाही. इथे असते ते फक्त एक अघोरी धाडस. यातून काही घडले तर पिकनिक स्पॉटला जातानाचा आनंद येताना आपण काय घेऊन येणार आहोत, याचा न आलेला अंदाज किंवा काळाची पावले... या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
     सहलीला गेल्यावर कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे आणि किती द्यायचे यालाही काही मर्यादा आहेत. आपण मात्र त्या मर्यादा कधीच पार केलेल्या आहेत. दरवर्षीच्या दुर्घटना ऐकल्या कीबापरे...’ म्हणायचे आणि पुन्हा आपण तेच करायचे, यातच आपलेपण सामावलेले आहे की काय, असे वाटावे इतके हे सेल्फीचे लोण पसरले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्याच्याशी आपण एकरूप होत नाही, तर तिथे जाऊन धांगडधिंगा घालायचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याऐवजी अगदी त्याला देखील छेडायचे आणि मग त्याच निसर्गाने आपले उग्र दाखवले की मग तोंड बारीक करून, दुःखी होऊन परतायचे. अशा गोष्टी नित्याच्या झालेल्या आहेत. यातल्या काहींना आपण गमावलेले असते. तर स्वत:चे काही गमावून स्वत:ही परतत असतो.मग याला मजा म्हणायचे का? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. आपल्या आनंदाला परिसीमा नाही, पण दु:खाला आहे. याचे भान लक्षात घ्यायला हवे.

No comments:

Post a Comment